स्त्रीमुक्ति आंदोलन : सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष समतावादासाठी व स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासाठी आधुनिक काळात छेडले गेलेले आंदोलन. स्त्रिया व काही समाजसुधारकांनी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व वैचारिक पातळीवर हाताळलेले असल्यामुळे त्यास चळवळ म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘ स्त्री वर्ष ’ म्हणून व १९७५ — ८५ हे ‘ स्त्री दशक ’ म्हणून घोषित करण्यात आल्यावर स्त्रीमुक्ती चळवळींच्या माध्यमातून स्त्रियांसंबंधीचे अनेक प्रश्न विशेषत्वाने पृष्ठस्तरावर येऊ लागले. स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीवाद वगैरे संकल्पना याच काळात रूढ झाल्या, तरी स्त्रियांच्या उद्धाराचा,कल्याणाचा विचार व कृती शतकापूर्वीच सुरू झाली होती. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान दिल्याने व रूढ समाजव्यवस्थेत धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक व आर्थिक अशा सर्व व्यवस्था स्त्रियांचे शोषण करतात, याची जाणीव झाल्याने त्यांना विरोध करण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळ अस्तित्वात आली. स्त्रीचे माणूसपण नाकारून तिला जी पशूतुल्य स्थिती प्राप्त करून दिली जाते, त्याविरुद्ध बंड पुकारत समाजात व्यक्ती म्हणून असलेले तिचे स्थान प्रस्थापित करण्यासाठी विकसित करण्यात आलेली ही एक विचारप्रणाली आहे. मोर्चे, आंदोलने, चळवळी, धरणे, निवेदने, बैठका, सभा, साहित्य, भाषणे, चर्चासत्रे, अधिवेशने, कार्यशाळा, स्त्री अभ्यासकेंद्रे इत्यादींच्या माध्यमांतून जगभर स्त्रियांनी पुरुषी मानसिकतेला धक्के देत आपले न्याय्य हक्क मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालवले आहेत.
धर्म, संस्कृती, परंपरा यांची बीजे समाजमनात खोलवर रुजलेली असतात. हजारो वर्षांपासून स्त्री-पुरुषांच्या कामाची वाटणी ठरलेली आहे. पूर्वीच्या काळी शिकार, लढाया, संरक्षण ही पुरुषांची प्रमुख कतर्र्व्ये होती. त्यानंतर शेती, अर्थार्जन, शिक्षण, कुटुंबाची प्रतिष्ठा, पत व नाव राखणे, धार्मिक आणि सांस्कृतिक रीतीरिवाजांचे पालन, व्यक्तिगत विकास साधणे इ. कर्तव्ये करणे व कुटुंबाचे प्रमुखपद सांभाळणे ही कामे त्यांच्याकडे आली. स्त्रियांकडे मात्र पूर्वापार घरकाम, मुलांना जन्म देणे आणि सांभाळणे, शेती व अन्य कामात मदत करणे अशी कामे होती. स्त्रियांची कामे मुख्यतः शरीर पातळीवरची असून त्यांची बुद्धी व विचार यांना संधी मिळण्याची सोय या विभागणीत नाही. वरवर पाहता ही विभागणी न्याय्य व सोयीची वाटली, तरी पुढे त्याला उच्च-नीच असा उतरंडीचा दर्जा प्राप्त झाला.
नरनारी ही व्यवस्था नैसर्गिक आहे मात्र पुरुषप्रधान व्यवस्थेत लिंगभेदभाव ( जेंडर ) मुद्दाम घडवला गेला. संस्कृतीच्या इतिहासाने मर्दुमकी, पराक्रम, सामर्थ्य, धैर्य, निर्भयपणा, बुद्धिमत्ता, धीटपणा या गोष्टी ‘ पुरुषी ’ या अभिधानाला चिकटवल्या. दुबळेपणा, परावलंबित्व, भित्रेपणा, चंचलता, अधीरता, लाजाळूपणा, रडवेपणा, हळवेपणा अशा नकारात्मक प्रतिक्रियेने ‘ बायकी ’ हे अभिधान दाखवण्यात आले. फ्रेंच विचारवंत व कादंबरीकर्त्री सीमॉन द बोव्हारने (१९०८—८६) म्हटल्याप्रमाणे ‘ कोणी बाई म्हणून जन्माला येत नाही पण नंतर तिला बाई बनवली जाते ’ म्हणजे केवळ लिंगवैशिष्ट्यामुळे एखाद्या व्यक्तीवर बाईपणाच्या कल्पना लादल्या जातात. अशा प्रकारच्या विरोधावर उभारलेल्या तत्त्वज्ञानामुळे पुरुषाचा पराक्रम सिद्ध होण्यासाठी स्त्रीला दुबळेपणा स्वीकारावा लागतो. पुरुषाला मोठेपणा, तर स्त्रीकडे कमीपणा पुरुष स्वामी, तर स्त्री दासी पुरुष क्रियाशील, तर स्त्री निष्क्रिय हे संदर्भ समाजातील मूल्यपद्धतींशी जोडले गेल्याने स्त्रीचे अवमूल्यन झाले.
‘ पितृसत्ताक पद्धतीतील प्रतिकात्मक व्यवस्थेत जे बाजूला टाकलेजाते, ते म्हणजे स्त्रीत्व ’, असे सुप्रसिद्ध बल्गेरियन-फ्रेंच भाषावैज्ञानिक ज्युलिया क्रिस्तिव ( ज. १९४१) हिला वाटते. पितृसत्ताक पद्धती स्त्रियांना मुख्य प्रवाहातून दोन टोकाच्या भूमिकांकडे लोटते. जिच्याबद्दल समाजाला आदर वाटतो ती देवता, पतिव्रता, सौभाग्यवती व माता या भूमिका, तर दुसर्या टोकाला समाजामध्ये ज्यांना किंमत नाही अशा परित्यक्ता, वेश्या, कुमारी माता, विधवा, प्रौढ कुमारिका अशा भूमिका. स्त्री ही माणूस आहे म्हणून व्यक्ती या स्वरूपात तिचा विचार होत नाही, तर स्त्रीच्या पुरुषांशी असलेल्या संबंधांवरून तिची भूमिका ठरते. स्त्रीविषयक सत्याशी या भूमिकांचा संबंध नाही, असे स्त्रीमुक्ती विचारवाद्यांना वाटते.
जगातील कोणत्याच धर्मग्रंथांनी स्त्रीला पुरुषांबरोबरचे स्थान दिलेले नाही. ‘ द हेड ऑफ एव्हरी विमेन इज मॅन ’ ( बायबल ), ‘ न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति। ’ ( मनुस्मृती ) अशी वचने स्त्रीचा दुय्यमपणा व परावलंबित्व दाखवतात. भारतीय परंपरेतील अध्यात्म विचारात स्त्री ही विषयवासनेचे आगर समजली गेली आहे. पुरुषाला संसारातून मुक्त होऊन मोक्षाची साधना करायची असेल, तर स्त्रीसंगाचा त्याग ही पहिली पायरी आहे, म्हणजे मानवकोटीतील म्हणूनही स्त्रीचा विचार अध्याहृत नाही. शेकडो वर्षे याच तुच्छतेच्या भूमिकेतून स्वतःकडे पाहिल्यामुळे स्त्रीजन्म ही पूर्वजन्मीच्या कर्माची फळे आहेत, अशा विचाराने स्त्री स्वतःला तुच्छ लेखू लागतेे. स्वाभिमान, आत्मगौरव, यशस्वी इच्छा, नैपुण्य, आत्मविश्वास, स्वातंत्र्य, स्वावलंबन या माणसाच्या नैसर्गिक इच्छा मारल्यावर माणसाचा जो कोंडमारा होतो, त्याला स्त्री बळी पडली आहे.
स्त्रियांची चळवळ उभी राहिली ती समाजपरंपरेतील स्त्रीप्रतिमा नाकारण्यासाठी. समाजाने दिलेल्या भूमिकांमधील दुटप्पीपणा, पोकळपणा, दांभिकता व स्वार्थ लक्षात येत गेल्यावर स्त्रियांनी त्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला. स्त्रीशिक्षण, अर्थार्जन, करिअरचा विचार या प्रवासात स्त्रीला स्त्री अनेक रूपांत भेटली. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे स्त्री-पुरुषांत येणारा मोकळेपणा, ठराविक कपडे वापरण्याबाबत सैल झालेले निर्बंध, कुटुंब नियोजनाच्या साधनांमुळे संततीची संख्या ठरविण्याचे मिळालेले स्वातंत्र्य, समाजात कामानिमित्त घालवावा लागणारा वेळ, स्वतःच्या स्वातंत्र्याची झालेली जाणीव, आधुनिक राहणीतील सुखसोयी, सैलावलेले कडक धार्मिक रीतीरिवाज इ. अनेक विधायक बदलांमुळे स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याचे आत्मभान व आत्मविश्वास येत गेला. केवळ चूल आणि मूल एवढेच स्त्रीचे कार्यक्षेत्र नाही. घर, लग्न, आईपण इतकेच नव्हे, तर स्वतःचे करिअरही महत्त्वाचे आहे आणि सहकार्य मिळाले, तर संसार सांभाळूनही ते करता येते. स्त्री-पुरुष हे दोघे समान पातळीवर आहेत म्हणून पतीला देव समजणे चूक असा विचार बळावत गेला. निर्मिती हा स्त्रीच्या आयुष्याचा भाग सोडला, तर मनुष्य म्हणून असलेल्या सर्व क्षमता स्त्रीमध्येही आहेत. ‘ स्त्री म्हणून आम्ही वेगळ्या असलो, तरी आम्ही समपातळीवर आहोत ’, हा काही काळ स्त्री चळवळीचा नारा होता. शारीरिक दुबळेपणा, सौंदर्य इ. गोष्टी संस्कृतीने आरोपित केलेल्या म्हणून त्या वरवरच्या आहेत. पुरुषांइतकीच स्त्रीलाही स्वतःची ओळख पटणे, स्व-विकास, स्वतंत्रता यांची जरूरी आहे. स्वत्वाची ओळख, स्वायत्तता, स्वयंनिर्णय, सक्रिय सहभाग या गोष्टी स्त्रीला व्यक्ती म्हणून परिपक्व बनवतात. ‘ मी कोण ’ या प्रश्नापासून स्त्रीचा ‘ मी मला हवे ते होऊ शकते ’, या आत्मविश्वासाकडे झालेला प्रवास सोपा नाही. या दोन डगरींमधील अंतर मोठे असून ते पार करण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळींना मोठा लढा द्यावा लागला आहे. स्वतःवर होणारे अन्याय समजणे, स्वतःला मिळणार्या दुय्यम स्थानाबद्दल असमाधान निर्माण होणे, स्त्रीच्या पारंपरिक भूमिकेला नकार देणे, स्वतःच्या सामर्थ्याबद्दल विश्वास असणे, अन्याया-विरुद्ध आवाज उठविण्याची मानसिक ताकद असणे, समान स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करणे, स्वतःला समाजाच्या मध्यप्रवाहात एक व्यक्ती म्हणून संस्थापित करणे इ. पायर्या चढतच स्त्री आत्मनिर्भर होऊ शकते.
स्त्रीमुक्ती विचारसरणीला एक राजकीय दिशा आहे. स्त्रियांना दुय्यमत्व देण्यामागे जे पुरुषी राजकारण आहे, त्याचा बिमोड करणे हे चळवळीचे उद्दिष्ट आहे. शोषणाच्या सर्व प्रवृत्ती पुरुषी आक्रमकतेतून अस्तित्वात आल्यामुळे त्या प्रवृत्तींना छेद देण्याचे काम आव्हानात्मक आहे कारण पुरुषी श्रेष्ठत्वाच्या कल्पना स्त्रियांच्याही मनावर खोलवर रुजलेल्या आहेत. संसारात पतिपत्नी समान असून सर्व निर्णय दोघांच्या संमतीने घेतले जावेत स्त्रीलाही पुरुषाइतकीच लैंगिक भूक आहे स्त्रीचे लैंगिक शोषण हा अपराध आहे लग्न हे तकलादू पायावर उभे असेल, तर ते मोडणे चांगले एकटी स्त्रीसुद्धा समाजात सन्मानाने स्वावलंबी जीवन जगू शकते हे समाजमनावर, विशेषतः स्त्रियांच्या मनावर, बिंबवणे आवश्यक ठरते. कुटुंब, सार्वजनिक संस्था, धर्म-कर्मकांडे, रूढी-परंपरा, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक व राजकीय सन्मानाची पदे, आर्थिक स्वातंत्र्य इ. सर्व स्तरांवर स्त्रीच्या कर्तृत्वाला अवकाश निर्माण करून देणे, हे स्त्रीमुक्ती चळवळीसमोरील मोठे कार्य आहे.
स्त्रीमुक्ती चळवळीपुढील प्रश्न त्या त्या देशातील संस्कृती व जीवनाच्या संदर्भात कमी-अधिक महत्त्वाचे ठरतात. या चळवळीचा उगम प्रथम पाश्चात्त्य देशांत झाला. भारतीय संस्कृती पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा भिन्न असल्याने स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार दोन्ही परिप्रेक्ष्यांतून स्वतंत्रपणे केला आहे.
पाश्चात्त्य चळवळी व विचारसरणी : सतराव्या शतकापासूनच धर्मसत्तेचे वर्चस्व कमी होऊन राष्ट्र, राजकीय हक्क व कर्तव्ये, राज्यघटना या गोष्टी प्रभावी होऊ लागल्या. त्या काळापासूनच स्त्रियांना राजकीय हक्क का नाहीत, हा प्रश्न निर्माण झाला पण भांडवलशाही व औद्योगिकी-करणाच्या रेट्यात स्त्रियांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही वा त्यांना मताधिकारही मिळाला नाही मात्र इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका या देशांत जी जी राजकीय स्थित्यंतरे झाली, ती स्त्रीवर्गात चळवळसदृश परिस्थिती निर्माण करणारी ठरली. समान हक्क, समान दर्जा आणि स्वातंत्र्य या स्त्रीमुक्तीच्या मूळ कल्पना फ्रेंच राज्यक्रांतीचे उद्गाते रूसो, लॉक व बेंथॅम यांच्या विचारसरणीतून उगम पावल्या आहेत पण या तिघांचीही मते स्त्रियांच्या बाबतीत मात्र पारंपरिक विचारसरणीची होती. १ ७९२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ब्रिटिश लेखिका व विचारवंत मेरी वुलस्टोनक्राफ्ट (१७५९—९७) हिच्या ए व्हिन्डिकेशन ऑफ द राइट्स ऑफ विमेन अर्थात — ‘स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली’ या ग्रंथात सर्व मानवांना समान हक्क नसतील, तर त्या मनुष्यच असल्या पाहिजेत म्हणून त्यांचे हक्क त्यांना मिळालेच पाहिजेत, अशी जोरदार मागणी प्रथमच करण्यात आली. स्त्रीला मतदानाचा हक्क मिळावा म्हणून फार मोठा संघर्ष पाश्चात्त्य स्त्रियांना करावा लागला. जॉन स्टुअर्ट मिलने द एन्फ्रान्चिस्मेंट ऑफ विमेन या ग्रंथात स्त्रियांना मतदानाचा अधिकार व भांडवलशाहीमुक्त व्यवस्थेत समान संधी देण्याची मागणी केली. द सब्जेक्शन ऑफ विमेन या ग्रंथात ब्रिटिश विचारवंत हॅरिएट टेलर-मिल हिने (१८०७—५८) स्त्रियांना शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य हवे, यातून हळूहळू स्त्री-पुरुष समता निर्माण होईल, असे मत मांडले. या दोघांनी मिळून लिहिलेल्या ऑन लिबर्टी या ग्रंथात स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याची मागणी केली. लंडनमध्ये मता-धिकाराच्या चळवळीतून स्त्रीसंबंधीचे नवे भान आकाराला येत गेले. शंभर–दीडशे वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर १९२८ मध्ये तेथील स्त्रियांना पूर्ण मताधिकार मिळाला.
फ्रान्समध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचे विश्लेषण करून स्त्रियांचा पुरुषांना शरण जाणारा स्वभाव हाच तिच्या दुय्यमत्वाला कारणीभूत असल्याचे मत मादाम द स्ताल (१ ७६६—१८१७) हिने मांडले. ऑलँप द गॉजिस (१७४८—९३) हिने राष्ट्रीय सभेपुढे १७ मागण्या सादर करून स्त्रियांना समान दर्जा देण्याची मागणी केली. १८६८—७१ दरम्यान माराया देम्स हिच्या नेतृत्वाखाली स्त्रीहक्कांसाठीची चळवळ उभी राहिली. १८७२ मध्ये फ्रान्समध्ये स्त्रियांची आंतरराष्ट्रीय परिषद झाली, तर १८९२ मध्ये स्त्रीवादी काँग्रेसचे आयोजन करण्यात आले मात्र फ्रेंच स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी १९४५ साल उजाडावे लागले.
अमेरिकेमध्ये १६७४ मध्ये मार्गारेट बेंटनने प्रथम मेरीलँड विधानसभेत स्त्रियांना स्थान व मताचा हक्क देण्याची मागणी केली ती अर्थातच फेटाळण्यात आली. १८४८ मध्ये एलिझाबेथ स्टॅन्टन, मार्था राइट, ल्युक्रेशिया मॉट इत्यादींनी न्यूयॉर्क राज्यातील सेनेका फॉल्समध्ये स्त्रियांचे पहिले अधिवेशन भरवून स्त्रीस्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सर्व स्त्री-पुरुष जन्माने समान आहेत. मनुष्यजातीच्या इतिहासाने उच्च-नीच भेद घडवून स्त्रियांवर अन्याय केला आहे. स्त्रियांचा शिक्षणात सहभाग, धर्मगुरू होण्याचा, शिकवण्याचा, पैसा मिळवण्याचा, मतदान करण्याचा व निवडणूक लढवण्याचा हक्क याची त्यांनी जोरदार मागणी केली. यापुढील काळात स्त्रियांच्या हक्कांसाठी अनेक जोरदार चळवळी झाल्या. या चळवळी व पहिल्या महायुद्धातील स्त्रियांच्या मोठ्या सहभागामुळे १० जानेवारी १९१८ रोजी अमेरिकन स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. १९२९ मध्ये सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार व्हर्जिनिया वुल्फ हिने ‘ ए रूम ऑफ वन्स ओन ’ या प्रदीर्घ निबंधातून समानता आणि न्याय याची मागणी करत स्त्रियांना विचारप्रवृत्त बनवले. सीमॉन द बोव्हार हिचा द सेकंड सेक्स हा ग्रंथ १९४९ मध्ये फ्रेंच भाषेत व १९५३ मध्ये इंग्रजीत प्रसिद्ध झाला. पुरुष हा स्वत्वाचा केंद्रबिंदू असतो, तर स्त्रीला समाजात परिघावरचे स्थान असते. पुरुषांच्या लेखी ती वस्तूमात्र आहे. बायकी व पुरुषी या विशेषणांना शरीरभेदाव्यतिरिक्त सांस्कृतिक अर्थ चिकटलेले असतात, हा महत्त्वाचा विचार तिने मांडला. १९६३ मध्ये बेटी फ्रिडन हिने द फेमिनिन मिस्टिक हा ग्रंथ प्रसिद्ध करून त्यात अमेरिकन स्त्री स्वतःच निर्माण केलेल्या स्त्रीत्वाच्या पिंजर्यात अडकली आहे, ती ‘ स्व ’ विसरली आहे, असे खळबळजनक विधान केले. स्त्रियांचा स्व–विकास, स्वतंत्रता, स्वावलंबन यांची जरूरी तिने समाजमनावर बिंबवली. आजच्या आधुनिक अमेरिकन स्त्रीवादाची सुरुवात या ग्रंथापासून झाली, असे म्हटले पाहिजे.
१९६८-६९ मध्ये भरलेल्या जागतिक सौंदर्यस्पर्धांना प्रचंड विरोध करण्यात आला. व्हाइट हाउससमोरच्या निदर्शनात गर्डल्स, ब्रा, खोट्या पापण्या, उंच टाचांच्या चपला वार्ताहरांसमोर कचरापेटीत टाकून निषेध नोंदवण्यात आला. पितृप्रधान समाजरचनेत स्त्रिया व्यापारी आणि शोषक वृत्तीच्या बळी आहेत, हे अधोरेखित करण्यात आले. ‘ पर्सनल इज पोलिटिकल ’ ( जे जे व्यक्तिगत ते ते राजकीय ), हा पुढील स्त्रीवादी चळवळींचा नारा बनला. रोजॅलिंड कॉवर्ड, केट मिलेट, हेलन सिक्सस, ज्युलिया क्रिस्तेवा, ॲलन शोवॉल्टर, जर्मेन ग्रिअर, रॉबिन लॅकॉफ, ॲलिशिया ओ स्ट्रायकर इ. विचारवंत लेखिकांनी स्त्रियांच्या शरीरापासून ते भाषा, मानसशास्त्र, साहित्य, समीक्षा इ. आयामांवर ग्रंथ लिहून स्त्रीमुक्ती चळवळीला वैचारिक बैठक प्राप्त करून दिली. विचारांच्या चहुदिशांना कवटाळत पुढे जहाल, मवाळ, मार्क्सवादी, कृष्णवर्णीय, पर्यावरणवादी इ. अनेक छटा असलेल्या बहुविध संघटना आणि व्यक्ती या चळवळीत सामील झाल्या.
एकविसाव्या शतकातील नवीन स्त्रीमुक्ती लाटेत स्त्रियांनी स्त्रियांवरचे अत्याचार, स्त्रियांचा व्यापार, सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया, माध्यमातील स्त्रियांचे अश्लील चित्रण, योनी अंगच्छेदन ( म्यूटिलेशन ) यांविरुद्ध आवाज उठ-वण्यावर अधिक भर दिला असून जगभरातील स्त्रियांनी एकत्र येऊन अर्धे आकाश आपले आहे हे सिद्ध करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
पाश्चात्त्य स्त्रीमुक्ती विचारात पुरुषविरोध, स्त्रीच्या व्यक्तिवादाची स्थापना, सर्व प्रकारचे स्वातंत्र्य व समानता या तत्त्वांवर अधिक भर दिला गेला. भारतात स्त्री विरुद्ध पुरुष अशी भावना नसून स्त्रियांच्या उद्धाराचे काम मोठ्या प्रमाणात पुरुषांनीच सुरू केले. भारतात कुटुंबसंस्थेला महत्त्व असल्याने पिता, भाऊ, पती, मामा, काका इ. नातेसंबंधांतून स्त्री-विकासाचे मार्ग खुले होतात. व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा व्यापक समाजहितासाठी त्याग करण्याची परंपरा भारतात असल्याने स्त्रीमुक्तीचा विचार भारतीय परिप्रेक्ष्यात पाश्चात्त्य विचारांपेक्षा वेगळा करण्याची गरज भासते. तरी अंतिमतः स्त्रीमुक्तीचा विचार स्त्री-स्वातंत्र्य, समानता व आत्मनिर्भरता यांच्या विचारांपाशीच जातो, याचे भान ठेवायला हवे.
भारतातील स्त्रीमुक्ती चळवळ व विचारसरणी : राक्षसांचा संहार करणार्या दुर्गा, काली, चंडी या देवता स्त्रीरूप असल्या, तरी प्राचीन काळापासून भारतातील स्त्री शोषित व अन्यायग्रस्तच आहे. वेदकाळात गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी, सुलभा या स्त्रिया ब्रह्मवादिनी होत्या. इतिहास-काळात जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई, चांदबिबी, राणी लक्ष्मीबाई इ. राजघराण्यातील स्त्रिया लढवय्या होत्या. मध्ययुगीन काळातील मुक्ताबाई, जनाबाई, विठाबाई, कान्होपात्रा इ. संतस्त्रियांनी अभंगरचनेतून स्त्रीच्या आध्यात्मिक मुक्तीची कल्पना मांडली, तरी हे सर्व अपवाद आहेत. मनुवादी विचारसरणीच्या प्राबल्यामुळे येथील स्त्री दुर्बल, परावलंबी व अज्ञान-अंधकारात पिचलेलीच होती. धर्माने स्त्रीला धार्मिक रीतिरिवाजांत कोणतीही क्रियाशील भूमिका दिली नाही, उलट, व्रतवैकल्यांचे ओझे पापपुण्याशी जोडून शारीरिक कष्ट व उपवास तिच्यावर लादले. नवर्याच्या मृत्यूनंतर सती जाणे, बालवयातील विवाह व मातृत्व, बालाजरठविवाह, विधवांचे केशवपन, शिक्षणाचा अभाव हे येथील स्त्रीचे भोग होते.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या प्रबोधनयुगाने परंपरेवरची पुटे खरवडण्यास सुरुवात केल्यानंतर स्त्री उद्धाराचा विचार व कृती यांना गती मिळाली. राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा जोतीराव फुले, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इ. समाजसुधारकांनी सतीबंदी, बालाजरठविवाह प्रतिबंध, संमती वयाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, केशवपनाला विरोध, स्त्रीशिक्षण, विधवाश्रम इ. संदर्भांत विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अनेक वैचारिक व कृतिशील चळवळी उभ्या केल्या. १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढली. लोकमताची पर्वा न करता, लोकांच्या छळाला न जुमानता सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या स्त्री शिक्षक, स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या, पददलित स्त्रियांच्या कैवारी आणि प्रौढ स्त्रीशिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या बनल्या. विचाराने आणि आचाराने काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या या स्त्रीने ‘ शिक्षणाने बाईला मनुष्यत्व येते व पशुत्व हटते ’ ही स्त्रीमुक्तीची आधुनिक संकल्पना दीडशे वर्षांपूर्वीच सांगितली. ताराबाई बापूजी शिंदे ( सु, १८४०—१९१० ) या प्रख्यात स्त्रीवादी निबंधकारीचा जन्म एका सधन जमीनदार कुटुंबात बुलढाणा येथे झाला. त्यांचे वडील बापूजी हे महसूल खात्यात अव्वल कारकून होते तथापि ते सत्यशोधक समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांनी ताराबाईंना सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी पुरस्कृत शिक्षण दिले. त्यांना मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी या भाषा चांगल्या अवगत होत्या. योग्य वेळी त्यांचा विवाह झाला. वडिलांनी कन्येसाठी घरजावई केला पण ताराबाईंचे जीवन सुखाचे झाले नाही. सासरच्या गुलामगिरीच्या प्रथा त्यांनी नाकारल्या. त्यांना संतती नव्हती. उत्तर आयुष्यात वैधव्य प्राप्त झाल्यावर त्यांनी जुन्या प्रथेप्रमाणे ‘ सांदीचे खापर ’ होऊन जगण्याचे नाकारले आणि उर्वरित जीवन लेखन-वाचन छंदात व वडिलांना मदत करण्यात व्यतीत केले. १८८२ च्या सुमारास त्यांनी लिहिलेला ‘ स्त्रीपुरुष-तुलना ’ हा निबंध म्हणजे स्त्रीमुक्ती विचारसरणीची एक क्रांतिकारक सुरुवातच होती. या निबंधात त्यांनी स्त्रियांच्या व्यथा-वेदनांना प्रथमच वाचा फोडली पण प्रक्षोभक म्हणून त्यावर टीका झाली. तेव्हा म. फुले यांनी जाहीर रीत्या त्याचे समर्थन केले (१८८५). या निबंधात ताराबाईंची बहुश्रुतता, तैलबुद्धी, समतोल विचार व शास्त्रशुद्ध दृष्टिकोण प्रकट होतो. पुरुषांच्या बाहेरख्याली वृत्तीवर परखड टीका करून त्यांनी स्त्रियांवर होणार्या अन्यायाला अतिशय कडक शब्दांत वाचा फोडली. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, जनाक्का शिंदे अशा कितीतरी कर्तबगार स्त्रियांनी या काळात स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचे काम केले.
स्त्री ही शक्ती असून तिची अस्मिता केवळ पुरुषांच्या संदर्भात मर्यादित नाही. तिचे स्वातंत्र्य समाजघडणीसाठी आवश्यक आहे, हे भान महात्मा गांधींनी दिले. १९०९ व १९१९ च्या राजकीय सुधारणांत स्त्रियांना मर्यादित मतदानाचा अधिकार मिळाला. १९३० चा मिठाचा सत्याग्रह, १९३२ ची सविनय कायदेभंग चळवळ यांत महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने हजारो स्त्रिया प्रथमच सामील झाल्या. मोर्चे, लाठीमार, तुरुंगवास, हालअपेष्टा यांना तोंड देण्याचे सामर्थ्य याच काळात स्त्रीमध्ये आले. सरोजिनी नायडू , ॲनी बेझंट यांनी राष्ट्रीय चळवळ व होमरूल चळवळ यांचे नेतृत्व केले. पहिल्या महायुद्धापासून आर्थिक मंदीमुळे स्त्रियांना नोकरी करण्याला अडसर राहिला नाही, त्यामुळेही स्त्रीशिक्षणाला अधिक चालना मिळाली. १९३७ मधील प्रांतिक स्वायत्तता, १९४७ मधील स्वातंत्र्यप्राप्ती, १९५० मधील सार्वभौम प्रजासत्ताकाची स्थापना यांमुळे स्त्रियांना घटनात्मक समान नागरिकत्वाचा दर्जा व सर्व क्षेत्रांत समान संधीची ग्वाही मिळाली.
गेल्या ६५ वर्षांत परिस्थिती बदलण्यासाठी स्त्रियांच्याच नेतृत्वाखाली आंदोलने झाली. १९७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ समानतेच्या दिशेने ’ या अहवालानुसार पारंपरिक पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये शिक्षण, आरोग्य, राजकारण, रोजगार इ. क्षेत्रांत प्रत्यक्षपणे स्त्रियांची पिछेहाट होत असल्याचे निदर्शनास आले. डाव्या पक्षाशी संबंधित स्त्रियांच्या गटाने महागाईविरोधात आंदोलन उभे केले. १९७५ मध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष परिषद भरली. पुरोगामी महिला संघटना, नारी समता मंच, महिला दक्षता समिती, समाजवादी महिला सभा इ. स्त्री संघटनांनी स्त्रियांवरचे अन्याय-अत्याचार, हुंडाबळी, स्त्रीभू्रण- हत्या, एकतर्फी प्रेमातून होणार्या हत्या, स्त्रियांचे अश्लील चित्रीकरण, बलात्कार इ. प्रश्नांवर आवाज उठवला मात्र स्त्रियांच्या प्रश्नांची निकड आजही सामान्य स्त्रीला वाटत नाही म्हणून स्त्रियांच्या चळवळी इथे मर्यादित गटापुरत्याच सीमित राहिल्या. मात्र स्त्री चळवळींच्या रेट्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा, हुंडाबंदी कायदा, स्त्रीधनाचा कायदा, वडिलोपार्जित संपत्तीत स्त्रीला समान हिस्सा देणारा कायदा, कौटुंबिक अत्याचारविरोधी कायदा, बलात्कारविरोधात कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा इत्यादींमुळे स्त्री जीवनाची प्रत सुधारण्यास मदत झाली. कुटुंब न्यायालये, महिला आयोगाची स्थापना, स्थानिक स्वराज्य संस्थेत, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद इत्यादींमध्ये ५०% आरक्षण यांमुळे अनुक्रमे महिलांवरील अन्याय-अत्याचाराला दाद मिळाली व राजकीय क्षेत्र खुले झाल्याने स्त्रियांना सत्ता मिळाली. ‘ मुलगी झाली हो ’ सारखी पथनाट्ये, स्त्री, प्रेरक ललकारी, बायजा, मिळून सार्याजणी यांसारखी स्त्री प्रश्नांचा ऊहापोह करणारी मासिके, स्त्रीवादी कथा, कविता, कादंबर्या, वैचारिक लेखन, सखी मंडळे, भाषणे, संमेलने, चर्चासत्रे, विद्यापीठीय स्तरावरील अभ्यास केंद्रे यांमुळे स्त्री प्रश्नांचा सार्वजनिक ऊहापोह होऊन जागृती निर्माण झाली. जशा तळागाळातील जातिजमातींना आपल्याला दिल्या जाणार्या दुजाभावाची पोटतिडिकेने जाणीव झाली आणि त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला, त्याचप्रमाणे कौटुंबिक, सामाजिक व राजकीय स्तरांवर स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार, दडपशाही यांविरुद्ध आवाज उठवला जाऊ लागला.
एकविसाव्या शतकाच्या गेल्या १३ वर्षांत स्त्री जीवनात क्रांतिकारी बदल झाले. तंत्रज्ञानाच्या रेट्याने स्त्री-पुरुष हा भेद कमी होऊ लागला. आत्यंतिक व्यक्तिवादामुळे कुटुंब संस्कृती टिकणार की नाही, अशी भीती निर्माण झाली. एखादे मूल हवे किंवा मूल नकोच, अशी वृत्ती निर्माण झाली. हाती पैसा आल्याने चैनीचे आयुष्य, दागदागिने, कपडेलत्ते यांची मनसोक्त खरेदी, सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेक व देहाचा आकर्षकपणा टिकवण्यासाठी वैद्यकीय उपचार हे करण्यात स्त्रियांना संकोच उरला नाही. जाहिराती, मॉडेलिंग, मालिकांमधील सहभाग, सिनेक्षेत्रातील वावर यांतून देहप्रदर्शन करणे हा प्रसिद्धी, पैसा व प्रतिष्ठा मिळविण्याचा राजमार्ग ठरला. दिल्लीत काढण्यात आलेला स्लट ( बेशरमी ) मोर्चा हे आत्यंतिक व्यक्ति-वादाचे उदाहरण आहे. स्त्री देहाचे वस्तूकरण नको म्हणणारी कालची स्त्री आज स्वतःच वस्तूकरणाच्या जाळ्यात ओढली गेली आहे. सरोगेट मदरहूड, स्पर्मबँकेकडून अपत्यनिर्मिती, विवाहाविना सहजीवन, विवाहाविना अपत्य, विवाहबाह्य लैंगिक संबंध, समलिंगी कुटुंब यांतून समाजातील काही स्तरांपुरती तरी स्त्रीमुक्ती चळवळ आता वेगळ्या वळणावर गेली आहे मात्र ही स्त्रीजीवनाची काळी बाजू अधिक गहिरी व गंभीर समस्या बनत आहे. स्त्रीभ्रूणांची होणारी मोठ्या प्रमाणातील हत्या, त्यामुळे उतरलेला स्त्री जनन दर, वाढता वेश्याव्यवसाय, एड्सची लागण, हुंडाबळी व स्त्रियांचे विद्रूपीकरण, सामूहिक बलात्कार, अंधश्रद्धांचा स्त्रियांवरील वाढता प्रभाव इ. घटनांमुळे स्त्रियांचे जीवन शोषित, दडपणाखालचे व दुय्यम स्तरावरचे राहिले आहे. आयुष्यास आलेल्या एकंदर बकालपणात स्त्रीचा मोठ्या प्रमाणावर बळी जातो आहे. एकंदरीतच स्त्री स्वातंत्र्य, समानता यांपेक्षा स्त्रियांचे वर उल्लेखलेले प्रश्न सोडविणे हीच सध्याच्या स्त्रीमुक्ती चळवळीपुढील आव्हाने आहेत.
पहा : स्त्रीवाद.
संदर्भ : 1. Hooks, Bell, Feminist Theory : From Margin to Center,New York, 2000.
2. Nicholson, Linda, Ed. The Second Wave,London, 1997.
३. चौसाळकर, अशोक, संपा. टिळक आणि आगरकर यांचे राजकीय विचार, कोल्हापूर, २००७.
धोंगडे, अश्विनी
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..