वॉलेस स्टीव्हन्स

स्टीव्हन्स, वॉलेस : (२ ऑक्टोबर १८७९—२ ऑगस्ट १९५५). अमेरिकन कवी. जन्म पेनसिल्व्हेनियामधील रेडिंग येथे. आरंभीचे काही शिक्षण रेडिंगमध्येच झाल्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठात त्याने तीन वर्षे शिक्षण घेतले (१८९७—१९००). त्यानंतर अल्पकाळ त्याने न्यूयॉर्क हेरल्ड ट्रिब्यूनमध्ये वार्ताहर म्हणून काम केले. तसेच ‘ न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लॉ स्कूल ’मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले (१९००—१९०३). १९०४ मध्ये तो वकील झाला आणि न्यूयॉर्क सिटीत वकिलीचा व्यवसाय करू लागला. स्टीव्हन्सचे कवितेवर प्रेम होते त्यामुळे हे सर्व करीत असताना तो कविता लिहीत होताच. १९१४ मध्ये त्याच्या कविता पोएट्री ह्या केवळ कवितेला वाहिलेल्या उत्कृष्ट मासिकात प्रसिद्ध झाल्या. १९१६ मध्ये तो हार्टफर्ड, कनेक्टिकट येथील एका विमा कंपनीत नोकरीस लागला आणि १९३४ मध्ये त्याच कंपनीचा उपाध्यक्ष झाला.

कवी म्हणून त्याच्या सामर्थ्याची कल्पना वाङ्मयीन जगात असली, तरी त्याला कीर्ती फार उशिरा मिळाली. हार्मोनियम (१९२३) ह्या त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या फार थोड्या प्रती खपल्या. ह्या संग्रहातच त्याने वास्तव आणि कल्पनाशक्ती ह्यांच्यातील नातेसंबंधाची कल्पना मांडली. कल्पनाशक्ती आपल्या दैनंदिन जीवनात सौंदर्य आणि अर्थपूर्णता आणते, अशी त्याची धारणा होती. कल्पनाशक्ती धारण करणार्‍या कवीचे समाजाशी असलेले नातेही त्याच्या विचाराचा एक भाग होता. वास्तव आणि कल्पनाशक्ती ह्या विषयाने त्याचे सर्जनशील आयुष्य व्यापून टाकले होते तसेच त्या विषयाने स्टीव्हन्सच्या संपूर्ण काव्यनिर्मितीला एकात्मता प्राप्त करून दिली होती. द मॅन विथ द ब्लू गिटार ह्या दीर्घ कवितेत गिटारवादक हा कवी, तर त्याच्या हातातील निळी गिटार ही कल्पनाशक्ती आहे. गिटारवादक म्हणतो, की गोष्टींचे ( वास्तवाचे ) स्वरूप निळ्या गिटारीवर बदलते. स्टीव्हन्सने म्हटले आहे, की आपल्या धर्मनिरपेक्ष, लौकिक जगात संगीताच्या पलीकडे जाणार्‍या कवितेने रितारिकामा स्वर्ग आणि त्याची स्तोत्रे ह्यांची जागा घेतली पाहिजे. माणसे त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जगात सर्वांत अधिक जिवंत असतात आणि कल्पना करणारा कलावंत सर्वांत अधिक जिवंत माणूस असतो. कल्पनाशक्तीची तुलना त्याने देवदूताशी केली आहे.

स्टीव्हन्सच्या काव्यसंग्रहांत आयडिआज ऑफ ऑर्डर (१९३५), द मॅन विथ द ब्लू गिटार (१९३७), पार्ट्स ऑफ अ वर्ल्ड (१९४२), ट्रॅन्स्पोर्ट टू समर (१९४७) आणि द ऑरोराज ऑफ ऑटम (१९५०), कलेक्टेड पोएम्स (१९५४) ह्यांचा समावेश होतो. द नेसेसरी एंजल (१९५१) हा त्याच्या काव्यविषयक निबंधांचा संग्रह. त्याच्या कलेक्टेड पोएम्स ला कवितेचा पुलिट्झर पुरस्कार मिळाला.

स्टीव्हन्सच्या मृत्यूनंतर सॅम्युएल फ्रेंच मोर्स ह्याने Opus Posthumous (१९५७) हे स्टीव्हन्सच्या साहित्याचे संकलन प्रसिद्ध केले. त्यात आधीच्या संकलनात अंतर्भूत नसलेल्या स्टीव्हन्सच्या कविता आणि गद्यलेखन समाविष्ट आहे.

हार्टफर्ड, कनेक्टिकट येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Bates, Milton J. Wallace Stevens : A Mythology of Self, १९८५.

2. Morse, Samuel French Ed. Mulder, John, Wallace Stevens : Life as Poetry, १९७०.

3. Pack, Robert, Wallace Stevens : An Approach to His Poetry and Thought, १९६७.

4. Prasad, V. R. Wallace Stevens, १९८६.

5. Vendler, Helen H. Wallace Stevens, १९८६.

कुलकर्णी, अ. र.