जॅक स्टाइनबर्गर

स्टाइनबर्गर, जॅक : (२५ मे १९२१). अमेरिकन भौतिकीविज्ञ. न्यूट्रिनो या मूलकणाच्या शोधाबद्दल त्यांना १९८८ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक ⇨ लीऑन मॅक्स लेडरमन आणि ⇨ मेल्व्हिन श्‍व्हार्त्स यांच्याबरोबर विभागून मिळाले.

स्टाइनबर्गर यांचा जन्म बॅड किस्सिंगन ( जर्मनी ) येथे झाला. ते १९३४ मध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाचे रहिवासी झाले. त्यांनी शिकागो विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९४८). सन १९४९–५० मध्ये स्टाइनबर्गर यांनी गियान कार्लो विक यांचे साहाय्यक म्हणून कॅलिफोर्निया विद्यापीठात काम केले. त्यानंतर ते कोलंबिया विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक होते (१९५०—७१). त्यांनी जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथील ⇨ सेर्न या संस्थेत भौतिकीचे संशोधक म्हणून काम केले (१९६८—८६).

स्टाइनबर्गर यांनी कोलंबिया विद्यापीठात लेडरमन आणि श्‍व्हार्त्स यांच्यासमवेत ब्रुकहॅवन नॅशनल लॅबोरेटरी येथील ⇨ कणवेगवर्धक वापरून मूलकणांचे संशोधन करण्याकरिता महत्त्वाचा प्रयोग केला. त्यात त्यांनी प्रथमत: न्यूट्रिनोंचा प्रयोगशालीय प्रवाह ( शलाका ) तयार केला. त्यांनी विद्युत् भार शून्य आणि द्रव्यमान जवळजवळ शून्य असलेल्या न्यूट्रिनो मूलकणासंबंधी संशोधन करून त्यास म्यूऑन-न्यूट्रिनो असे संबोधिले. त्यांनी शोधलेले अतिऊर्जावान न्यूट्रिनो प्रवाह हे मूलकण आणि अणुकेंद्रीय प्रेरणा यांच्या अभ्यासाकरिता महत्त्वपूर्ण साधन ठरले. तसेच न्यूट्रिनोच्या शलाकेचा उपयोग किरणोत्सर्गी क्षय प्रक्रियेत असणार्‍या कमी अणुकेंद्रीय प्रेरणांच्या अभ्यासाकरिता साहाय्यभूत ठरला.

स्टाइनबर्गर यांना डॉर्टमंड, ग्लासगो, क्लेरमाँट-फेरंड आणि कोलंबिया या विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले. त्यांना इटालियन फिजिकल सोसायटीचे मॅटेझी पदक मिळाले.

 खोब्रागडे, स्नेहा दिलीप