स्टर्क्युलिएसी : ( मुचकुंद कुल ). ह्या वनस्पति-कुलाचा समावेश फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग ]  द्विदलिकित वर्गातील माल्व्हेलीझ या गणात केला असून ⇨ माल्व्हेसी, ⇨ टिलिएसी, ⇨ बॉम्बॅकेसी व एलिओकार्पेसी ही कुलेही त्याच गणात समाविष्ट आहेत. माल्व्हेसी कुलाचे ⇨ यूफोर्बिएसी  कुलाशी अनेक लक्षणांत साम्य असून त्यांचे एकमेकांशी आप्तभाव आहेत. या कुलात ( विलिसच्या मते ) ४८ प्रजाती व ६०० जाती असून त्या बहुतेक उष्णकटिबंधात आढळतात ( रेंडेलच्या मते ६८ प्रजाती व ७०० जाती आहेत ). यांचा आढळ भारतात दक्षिणेत, पूर्व व पश्चिम किनारपट्टीतील जंगलांत आहे. या वनस्पती ⇨ ओषधी, क्षुपे, वृक्ष व क्वचित वेली असून त्यांच्या कोवळ्या भागांत श्लेष्मल ( बुळबुळीत पदार्थ असलेल्या ) कोशिका असतात. त्यांच्या खोडावर सूत्रल व तारकाकृती केस असतात. पाने एकांतरित, साधी, हस्ताकृती, अखंड किंवा विविध प्रकारे खंडित व सोपपर्ण ( तळाशी उपांगे असलेली ) असतात. फुले नियमित, अवकिंज व द्विलिंगी संदले बहुधा ५, धारास्पर्शी व जुळलेली प्रदले ५, सुटी तथापि तळाशी केसरदलांना चिकटलेली केसरदले अनेक व एकसंध परागकोश दोन कोटर ( कप्पा ) असलेला किंजदले ५ किंजपुट ऊर्ध्वस्थ व ५ कप्प्यांचा असतो. फळाचे बोंड तडकणारे किंवा न तडकणारे असून ते मांसल किंवा कठीण बी सपुष्क, कधीकधी त्यावर लहान गाठ ( बीजोपांग ) असते. परागण कीटकांमार्फत व फल-बीज-विकिरण पक्षी किंवा मनुष्यांच्या मध्यस्थीने होते. कोला, कोको, उलतकंबळ ( औषधी ), मेथुरी, मुरुडशेंग ( औषधी ), सुंद्री, सुंद्री-चांद, मुचकुंद, कनक चाफा, रुद्राक्षी, भोला, नवा, कौशी, गोलदारू, गोलदार, कंडोल व सारडा इ. उपयुक्त वनस्पती या कुलातील आहेत. याला काहीजण मुचकुंदादी कुल देखील म्हणतात.

पहा : माल्व्हेलीझ.                            

पराडकर, सिंधू अ.