स्किरेट : ( चेर्विज, लॅ. सियम सिसॅरम कुल-ॲपिएसीई किंवा अंबेलिफेरी ). सियम प्रजातीतील अनेक सुगंधी ओषधींपैकी सि.सिसॅरम या जातीला स्किरेट असे नाव आहे. खाद्य मांसल मुळांसाठी तिची लागवड केली जाते. ही बहुवर्षायू वनस्पती संपूर्ण उत्तर गोलार्ध व आफ्रिकेत पसरलेली आहे. ती मूळची पूर्व आशिया व भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून यूरोपात फार पूर्वीपासून तिची लागवड केली जाते. तिची उंची ०.९—१.५ मी. असून पाने अपूर्ण पिच्छाकृती आणि दले आयत–लघुकोनी व दंतुर असतात. वनस्पतीच्या शेंड्यावर किंवा बाजूस संयुक्त चामरकल्प फुलोरे येतात फुले लहान व पांढरी असतात आणि इतर सामान्य शारीरिक लक्षणे अंबेलिफेरी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. छदमंडलात पाच बहिर्गत छेद असतात. फुले द्विलिंगी असून कीटकांद्वारे त्यांचे परागीभवन होते. ही वनस्पती स्वयंजननक्षम आहे. नवी पाने मार्चच्या दरम्यान, तर फुले जुलैमध्ये येतात. बिया सप्टेंबरमध्ये पक्व होतात. स्किरेटची मुळे डेलिया किंवा रताळ्यासारखी मांसल, झुबकेदार, पांढरी, अधिक लांबट (१६ सेंमी. किंवा यापेक्षा अधिक ), चितीय व काहीशी पेरेदार असतात. ती कच्ची किंवा शिजवून खाल्ली जातात. ती गोड, कडक व पिठूळ असून आतील गाभा टणक लाकडी असतो. कच्च्या मुळांचा स्वाद अतिशय चवदार असतो, तो काहीसा गाजरासारखा असून त्याला कपालीसारखा गंध असतो. ती उकडून, भाजून अथवा सूप करून देखील खाता येतात. भाजल्यानंतर त्यांचा वापर कॉफीसारखा करता येतो.
परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.