सोळंकी, सुशीलकुमार : (२६ मे १९८३). भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कुस्तीगीर व ऑलिंपिक रौप्यपदकाचा मानकरी. सुशीलकुमार या नावाने विशेष परिचित. त्याचा जन्म नवी दिल्ली जवळच्या बाप्रोला (नजफगढ) या खेड्यात दिवाणसिंग व कमलादेवी या सामान्य कुटुंबातील दांपत्यापोटी झाला. त्याचे वडील बसचालक तसेच हौशी कुस्तीगीर होते. त्याने सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढील शिक्षण दिल्लीमध्ये घेतले. विद्यार्थिदशेतच वडील व चुलतभाऊ संदीप यांच्याकडून प्रेरणा घेऊन घरच्यांच्या इच्छेनुसार तो कुस्तीकडे आकृष्ट झाला. त्याने वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रसाल क्रीडागाराच्या (दिल्ली) आखाड्यात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि शारीरिक व्यायामाबरोबरच आहाराचे तंत्र सांभाळले. या क्रीडागारात त्याला यशवीर व रामपाल या अनुभवी कुस्तीगीरांचे मार्गदर्शन लाभले. पुढे अर्जुन पुरस्कारविजेते प्रसिद्ध कुस्तीगीर सत्पाल यांच्या मार्गदर्शनाखाली तो कुस्तीचा सराव करू लागला. शिवाय त्याला ग्यानसिंग हे प्रशिक्षक लाभले. या सर्वांकडून सुशीलकुमारने मेहनतीने कुस्तीचे शिक्षण आत्मसात केले. गादीवरील कुस्तीबरोबरच तो रेल्वे कँपमधील वसतिगृहातील वीस-वीस तरुण मल्ल युवकांबरोबर प्रसंगोपात्त मुकाबला करू लागला. त्याने ‘वर्ल्ड कॅडेट गेम्स ‘मध्ये सुवर्णपदक (१९९८) वयाच्या अठराव्या वर्षी कनिष्ठ गटातील राज्य पातळीवरील अजिंक्यपद (२०००) त्यानंतर नवी दिल्लीतील आशियाई कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात ब्राँझपदक (२००३) आणि राष्ट्रकुल स्पर्धेत (लंडन) सुवर्णपदक पटकावले (२००३). जागतिक विजेतेपदाच्या क्रमवारीत त्याचे तिसरे स्थान होते. अथेन्स (ग्रीस-२००४) ऑलिंपिक स्पर्धेस पात्र ठरूनही त्याच्या पदरी अपयश आले तथापि पुढील २००५ वर्षीच्या (केपटाउन) आणि २००७ वर्षीच्या (लंडन) अनुक्रमे दोन राष्ट्रकुल स्पर्धांत त्याने सुवर्णपदक मिळविले. यामुळे २००८ मधील बीजिंग (चीन) ऑलिंपिकसाठी तो पात्र ठरला आणि त्याने ६६ किलो वजनाच्या मुक्त कुस्तीत (फ्री स्टाइल) तीन फेऱ्यामध्ये स्पिरिडोनोव्ह याला ३-१ अशा गुणांनी पराभूत करून ब्राँझपदक मिळविले. तसेच त्याआधीच्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धांत त्याने ब्राँझपदक मिळविले. रशियातील मॉस्को येथील जागतिक स्पर्धेमध्ये (१२ सप्टेंबर २०१०) सुशीलकुमारने ६६ किलो वजनाच्या मुक्त कुस्तीत ॲलन गोगर्व्ही या ख्यातनाम रशियन मल्लाचा ३-१ गुणांनी अंतिम फेरीत पराभव करून सुवर्णपदक मिळविले. भारताला कुस्तीत मिळालेले जागतिक क्रीडास्पर्धांतील हे पहिले-वहिले सुवर्णपदक होय. १० ऑक्टोबर २०१० रोजी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (नवी दिल्ली) सुशीलकुमारने हाइन्रिक बार्नेस (दक्षिण आफ्रिका) याचा कुस्तीच्या अंतिम लढतीत ७-० गुण मिळवून पराभव केला आणि ६६ किलो वजनाच्या मुक्त कुस्तीचे सुवर्णपदक पटकावले. यानंतर २०१२ मध्ये झालेल्या लंडन (इंग्लंड) ऑलिंपिकमध्ये ६६ किलो वजनाच्या मुक्त कुस्तीमध्ये अंतिम लढतीत जपानच्या तात्सुहिरो योनेमित्सु याच्याकडून पराभूत झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी फक्त खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथील ऑलिंपिक स्पर्धेत (१९५२) ब्राँझपदक मिळविले होते.
सुशीलकुमारच्या कुस्तीतील अनन्यसाधारण कर्तृत्वाची दखल घेऊन केंद्र शासनाने त्याची भारतीय रेल्वे खात्यात तिकिट-निरीक्षकपदी नियुक्ती केली. पुढे त्याच्या ऑलिंपिकमधील स्पृहणीय कामगिरीनंतर त्यास पदोन्नती देऊन त्याची सहायक वाणिज्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली (२००९). त्याला विविध संस्था, केंद्र शासन व राज्य शासने यांच्याकडून करोडो रुपये बक्षीसादाखल मिळाले आहेत. या रकमांत हरयाणा सरकारने दिलेले दीड करोड रुपये व दिल्ली सरकारने दिलेले दोन करोड रुपये ह्या सर्वांत मोठ्या रकमा आहेत (२०१२).
विविध स्पर्धांतील ब्राँझ व सुवर्णपदकांव्यतिरिक्त त्यास अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी अर्जुन पुरस्कार (२००६) आणि प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२००८) हे विशेष होत.
देशपांडे, सु. र.
“