सौन्ती : भारतातील एक आदिवासी जमात. त्यांची वसती प्रामुख्याने ओरिसा राज्यात, विशेषतः मयूरभंज व केओंझार जिल्ह्यांत असून बलसोर जिल्ह्यातही काही सौन्तींची वसती आढळते. त्यांची लोकसंख्या ६७,८७२ होती (१९८१). ते ओडिया भाषा आणि लिपी दोन्हींचा वापर करतात. ते मांसाहारी आहेत. त्यांचे भात हे मुख्य अन्न असून मूग, कुळीथ, बिरी ही कडधान्ये व कंदमुळेही ते खातात. स्वयंपाकात मोहरी व तिळाचे तेल वापरतात. स्त्री-पुरुष दोघेही घरगुती तयार केलेली तांदळाची बिअर पितात.

सौन्तींचा प्रामुख्याने शेती व्यवसाय असला, तरी त्यांपैकी बरेच लोक शेतमजूर आहेत. शिवाय पत्रावळ्या तयार करणे, कंदमुळे गोळा करणे व पशुपालन हेही उद्योग ते करतात. सौन्तींची अनेक बहिर्विवाही कुळींत ( खिल्ली ) विभागणी झालेली असून त्यांपैकी दोल्दाशिया, बार्डिया, सरू आणि तांगसरिया या काही प्रमुख कुळी होत मात्र त्यांचे नागेश्वर हे एकच गोत्र असून नाग हे कुलचिन्ह आहे. ते आपल्या शेजार्‍यांबरोबर मित्रत्वाचे व परस्परांना सहकार्याचे नातेसंबंध ठेवतात. राजपरब, दसरा आणि नौखिया यांसारखे सण-उत्सव ते एकत्र साजरे करतात. मुलेमुली वयात आल्यानंतर ( सज्ञान झाल्यावर ) त्यांचे एकमेकांच्या संमतीने ज्येष्ठ मंडळी विवाह ठरवितात. ते एकपत्नीक आहेत. वधूमूल्य रोख व वस्तुरूपात दिले जाते. हिंगुळाचा टिळा ( कुंकू ), धातूच्या बांगड्या व पायातील जोडवी ही सौभाग्यलक्षणे ल्यालेली मुलगी विवाहित समजण्यात येते. विवाहविधी मुलीच्या घरी संपन्न होतो आणि भोजनाचे व्यवस्थापन दोन्ही बाजूंकडून केले जाते मात्र वाङ्निश्चयाचा समारंभ पाचव्या दिवशी मुलाच्या घरी संपन्न होतो. लग्नानंतर वधू पितृगृहीच राहते. विधवाविवाहास जमातीत संमती आहे. वैवाहिक जोडप्यातील सौहार्द व्यभिचार, क्रौर्य, पौरुष्यहीनता यांमुळे नष्ट होऊन भांडणे होत असतील, तर विभक्त होण्यास किंवा घटस्फोटास पंचायत सहमती दर्शविते. जमातीत कनिष्ठ मेहुणीविवाह आणि कनिष्ठ देवरविवाह ह्या पद्धती रूढ असून वारसाहक्क ज्येष्ठ मुलाकडे जातो. गर्भवती स्त्री नवव्या महिन्यात साधुखानामक विधी करते. मुलाच्या जन्मा-नंतर नवव्या दिवशी उथेरीनामक विधी करतात आणि विसाव्या दिवशी एकेशियानामक विधी करतात. जन्मानंतर एक वर्षाच्या आत मुलामुलींचे जावळ ( मुंडन ) काढतात. मृताला शक्यतो अग्नी देतात पण क्वचित दफनही करतात. अशौच पंधराव्या दिवशी सहभोजनाने संपुष्टात येते.

सौन्ती हे मुख्यत्वे हिंदू धर्मीय असून ते हिंदूंचे सण साजरे करतात. त्यांच्या देवतांमध्ये ठाकुराणी आणि मंगला या देवतांना विशेष महत्त्व आहे आणि त्यांचा पुजारी (देहुरी) त्यांची पूजा करतो. याशिवाय शिव, विष्णू , रघुनाथ वगैरे अन्य देवतांनाही ते पूजतात. त्यांची लग्ने आणि अंत्य-विधी दुसर्‍या जमातीतील पुजारी करतात.

देशपांडे, सु. र.