सोयराबाई-२ : (?–२७ ऑक्टोबर १६८१). छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ट राण्यांपैकी एक महाराज्ञी-पट्टराणी. त्यांचे बालपण, जन्मतारीख आणि जन्मवर्ष यांविषयी विश्वसनीय माहिती ज्ञात नाही. ऐतिहासिक कागदपत्रांतून त्यांचा उल्लेख सोईराबाई किंवा सोयरीबाई असाही आढळतो. सोयराबाई या मोहिते घराण्यातील असून त्यांचा विवाह छ. शिवाजी महाराजांशी काहींच्या मते १६४१ मध्ये, तर काहींच्या मते १६५० मध्ये झाला असावा व राणीवशात त्यांचा क्रम दुसरा वा चौथा असावा तथापि सोयराबाईंचा लग्नातील अनुक्रम किंवा काल कोठेच उपलब्ध नाही. त्यांना छ. राजाराम (१६७०-१७००) हा मुलगा आणि बाळीबाई ऊर्फ दीपाबाई ही कन्या अशी दोन अपत्ये झाली. राज्याभिषेकापूर्वी छ. शिवाजी महाराजांनी धर्मशास्त्रानुसार आपल्या हयात भाऱ्याशी ३० मे १६७४ रोजी विवाह केला. त्यानुसार महाराजांचा सोयराबाईंशी पुन्हा विवाह झाला. त्याची नोंद शिवापूर शकावली, शिवचरित्रप्रदीप, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी (खंड १) आदी इतिहाससाधनांत आढळते कारण राज्याभिषेकप्रसंगी (६ जून १६७४) सोयराबाई यांना पट्टराणीचा मान आणि छ. संभाजीराजे यांना युवराजपदाचा मान दिला होता. यावेळी छ. राजाराम हे जेमतेम चार वर्षांचे होते. छ. संभाजीराजांच्या युवराजपदामुळे पुढे छ. शिवाजी महाराज, सोयराबाई आणि छ. संभाजीराजे यांत गृहकलहास-सापत्नभावास प्रारंभ झाल्याचा उल्लेख अनुपुराण, शिवदिग्विजय व बखरींतून आढळतो. त्याची परिणती महाराजांच्या मृत्यूनंतर (३ एप्रिल १६८०) छ. राजाराम महाराजांच्या रायगडावरील मंचकारोहण समारंभात झाली तथापि छ. संभाजीराजांच्या २७ ऑगस्ट १६८० रोजी बाकरेनामक उपाध्यांना दिलेल्या दानपत्रात “वैरभाव प्रविष्ट प्रधानादी -सापत्न रोषाक्रांत…..” असा उल्लेख आहे. त्याचा मतितार्थ असा, की ‘संभाजीराजांना युवराज्य अभिषेक झाल्यामुळे तत्कालीन पट्टराणी सोयराबाई यांचे हृदय दुष्ट मंत्र्यांच्या सल्ल्याने कलुषित झाले आहे. वस्तुतः मातोश्री निळ्या पिवळ्या पार्श्वभूमीत असलेल्या स्फटिकाप्रमाणे स्वच्छ हृदयाची, सौजन्ययुक्त आहे.’ या संस्कृत दानपत्रात छ. संभाजीराजांनी रामायणातील कैकयीचा दाखला देऊन मंथरेचा दुष्ट हेतू सांगितला आहे. यावरून छ. संभाजीराजांना सापत्नभावाचा त्रास झाला असेल, हे असंभवनीय नाही. त्यांच्या राज्यारोहणानंतर सोयराबाई अनेक महिने हयात होत्या. त्यांचा मृत्यू रायगडावर झाला, असे बृहदीश्वर शिलालेख, इंग्रजांचे पत्र आणि मआसीर-इ-आलमगिरी यांत म्हटले आहे व त्यावेळी छ. संभाजीराजे पन्हाळ्यास होते.
पहा : राजाराम, छत्रपति शिवाजी, छत्रपति.
भूमकर, वि. ह.