सोयाबीन : (लॅ. ग्लायसीन मॅक्स किंवा ग्लायसीन सोया). हे वर्षायू, शिंबावर्गीय फॅबेसी किंवा ⇨ लेग्युमिनोजी कुलातील गळिताचे पीक व खाद्यान्न आहे. सोयाबीन हे जगातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. ते वनस्पतिजन्य प्रथिनांचा (प्रोटिन्स) व अनेक रासायनिक उत्पादांतील घटकद्रव्यांचा महत्त्वाचा स्रोत आहे. या पिकास जगात अद्भूत कडधान्य (वन्डर बीन्स) म्हटले जाते.

सोयाबीन वनस्पतीचा मूळ उगम संदिग्ध आहे. मात्र अनेक वनस्पतिविज्ञांना वाटते की, ते बहुधा मूलस्थान चीन असलेल्या ग्लायसीन यूझुरिएन्सिस यापासून निर्मित झाले असावे. सुमारे ५,००० वर्षांपासून चीनमध्ये सोयाबिनाचा वापर अन्न व औषध म्हणून केला जात आहे. अठराव्या शतकाच्या सुमारास अमेरिकेत सोयाबिनाचा प्रवेश झाला.

आ. १. सोयाबिनाचे जीवनचक्रसोयाबीन हे सरळ वाढणारे पीक असून त्याची वाढ काही सेंमी. ते २ मी.पर्यंत होते. स्वयंपरागण होणारी फुले पांढरी वा जांभळसर छटा असलेली असतात. पाने एकेरी, गोल, खोडाच्या दुसऱ्या पेरावर सरळ द्विदलात वाढतात. शेंगा पिवळसर राखाडी, तपकिरी किंवा काळ्या रंगाच्या असतात. झुडपावर जास्तीत जास्त ४०० शेंगा लागतात. बिया साधारणतः ०·६ सेंमी. लांब असून १२०-२०० मिग्रॅ. वजनाच्या असतात. इतर लेग्युमिनोजी पिकांप्रमाणेच (उदा., वाटाणा, लवंग व आल्फा-आल्फा) सोयाबिनाची नायट्रोजन स्थिरीकणाची क्षमता ऱ्हायझोबियम कुलातील सूक्ष्मजंतूंसोबतच्या संयोगाने होत असते. या वनस्पतींच्या मुळांवरील गाठींत असलेले सूक्ष्मजंतू हवेतील नायट्रोजन हा अमोनिया व नायट्राइडाच्या स्वरूपात शोषून घेऊन जमिनीत स्थिर करतात [ ⟶  नायट्रोजन]. या गुणधर्मामुळे नायट्रोजनयुक्त जोरखते (फर्टिलायझर्स) देण्याची गरज या पिकास भासत नाही.

सोयाबिनाचा आहारातील वापर : सोयाबिनामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. इतर प्रथिनांच्या तुलनेत सोयाबीन प्रथिनांची प्रत सर्वांत चांगली आहे. त्याच्या प्रथिनांमध्ये सर्व प्रकारची उपयुक्त ॲमिनो अम्ले असल्यामुळे सोयाबिनाचा आहारात वापर वाढविणे आवश्यक आहे परंतु उपयुक्त प्रथिनांसोबतच सोयाबिनामध्ये ट्रिप्सिन प्रतिबंध व हिमॅग्लुटीनीन यांसारखे आहारविरोधी घटकही आहेत. हे घटक नष्ट करण्यासाठी सोयाबीन गरम पाण्यात भिजवून किंवा शिजवून आणि वाळवून वापरतात.

सोयाबीन हे सर्वांत पोषक आणि सहज पचन होणारे अन्न आहे. तसेच ते प्रथिनांसाठी सर्वोत्कृष्ट व आर्थिक दृष्ट्या स्वस्त असा स्रोत आहे. जवळजवळ सर्व जगभर ते माणसांच्या व प्राण्यांच्या आहारात समाविष्ट केलेले आहे. सोयाबिनामध्ये १७% तेल आणि ६३% खाद्य घटक असतात, त्यात कार्बोहायड्रेटे १०-२५ टक्क्यांपर्यंत, तर सु. ५०% प्रथिने असतात. सोयाबिनातील प्रथिनांमध्ये ॲमिनो अम्लांचे उत्कृष्ट संतुलन असते. मात्र मिथिओनीन आणि सिस्टाइन यांचे प्रमाण कमी असते. सोयाबिनामध्ये स्टार्च नसल्याने ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे.

सोयाबिनाचा वापर मुख्यतः सोयाबीन दूध, पांढरे द्रव संधारण आणि टोफू (दह्यासारखा दिसणारा घरगुती चीजसारखा पदार्थ) यांत केला जातो. ते सॅलडामध्ये किंवा भाजीपाला म्हणून वा भाजून स्नॅक्स पदार्थ म्हणून खाल्ले जाते. यापासून सोया सॉस (खारट तपकिरी द्रव) बनविले जाते. दळीत सोयाबीन आणि गहू यांच्या पिठातील पाण्याच्या मिश्रणाचे यीस्ट किण्वण करून सोया सॉस तयार करतात. सोया सॉस हे आशियामधील जेवणातील अत्यावश्यक असा भाग आहे. आधुनिक संशोधकांनी सोयाबिनाच्या विविध उपयोगांवर संशोधन केलेले आहे. त्याच्या तेलाचा वापर मार्गारिनामध्ये तसेच शाकाहारी चीज निर्मितीत केला जातो. औद्योगिक वापरात तेलाचा उपयोग रंगांत, आसंजकांत, जोरखते, कापडांवरील अंतिम संस्करणामध्ये (झळाळी आणणे), लिनोलियम बॅकींग-मध्ये, कीटकनाशकांत, अग्निरोधक द्रवांत तसेच इतर उत्पादांत करतात. यामधील उच्च प्रथिनक्षमतेमुळे मांसासाठी ते बऱ्याच उत्पादांत पर्याय म्हणून वापरतात उदा., बेबी फूड.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जगातील कुपोषण, उपासमारी व भुकेचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सोयाबीन पिकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली आहे.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिका हा सोयाबीन पिकाचा सर्वांत मोठा उत्पादक देश होता. त्या खालोखाल ब्राझील व अर्जेंटिना हे देश होत. भारतात देखील सोयाबीन हे एक महत्त्वाचे गळिताचे पीक म्हणून उदयास येत आहे. खेड्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यास हे पीक महत्त्वपूर्ण ठरत आहे. २००७-०८ मध्ये देशातील सोयाबीन क्षेत्र ८·८८ दशलक्ष हेक्टर व उत्पादन १०·९६ दशलक्ष टन होते. त्यामुळे हे देशातील प्रथम क्रमांकाचे गळीताचे पीक ठरले.


 हवामान : सोयाबीन हे पीक उष्णता व पाण्याच्या ताणास संवेदनशील असे पीक आहे. हे पीक २०°-३५° से. तापमान व ७००-१,२०० मिमी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात उत्तम येते. सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकावर परिणाम होतो. भरपूर फुलोऱ्यांसाठी निदान दहा तासापेक्षा जास्त काळोख्या रात्री असाव्या लागतात, म्हणून खरीप हंगामात हे पीक चांगले येते. साधरणत: हवामानाच्या वर्गीकरणानुसार कमी पावसाचा, निश्चित पावसाचा आणि मध्यम ते भारी पावसाचा प्रदेश असे प्रकार पडतात. या पिकाचा हवामानाच्या वर्गीकरणानुसार मध्यम ते उशिरा कालावधीचा वाण टीएएमएस ९८-२१ हा जास्त पावसाच्या प्रदेशांत वापरतात. संरक्षित ओलिताची सोय नसल्यास वरील वाणाचे अपेक्षित उत्पादन येत नाही.

आ. २. बीजपोषणाच्या अवस्था जमिनीची निवड : सोयाबिनाच्या पिकाला मुख्यत्वे मध्यम ते भारी मगदुराची व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते. हलक्या व उथळ जमिनीत सोयाबीन घेतल्यास उत्पादनात घट येते. गाळाची परंतु चांगल्या निचऱ्याची जमीन सोयाबिनाच्या लागवडीसाठी योग्य असते. भात खाचरांतील मध्यम प्रकारच्या जमिनी या पिकांसाठी योग्य असतात. चिकट व पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेत नाहीत. जमिनीचा सामू (पीएच मूल्य) ६·५-७·५ च्या जवळपास असल्यास पीक उत्तम येते. हे पीक क्षारयुक्त जमिनीत घेत नाहीत व घ्यायचे असल्यास जिप्समाचा वापर करून मगच घेतात.

पूर्व मशागत : उत्तम पीक येण्यासाठी शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर करण्याला अनन्य साधारण महत्त्व असते. जमिनीतील पूर्वीच्या पीक कापणीनंतर लगेचच नांगरटी करून जमिनीतील धसकटे, काडीकचरा वगैरे वेचून जमीन स्वच्छ ठेवतात. नांगरणीनंतर वरवरच्या २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत व समपातळीत करून घेतली जाते. कारण त्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होईल. कोरडवाहू क्षेत्रांमध्ये मृदा आणि जल संधारणांची कामे करणे अत्यंत आवश्यक असते. कोरडवाहू क्षेत्रात उथळ आणि मध्यम खोलीच्या जमिनीसाठी समपातळीत बांध आणि खोल जमिनीसाठी ढाळीचे बांध घालणे, भारी व उत्तम गाळाच्या जमिनीतून जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढणे इ. कामे केल्यानंतर उताराला आडवी मशागत व पेरणी करणे योग्य असते. जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरविण्यासाठी सारे किंवा छोटे-छोटे वाफे करणे फायद्याचे ठरते.

पेरणीपूर्व तयारी : जमिनीची मशागत व सुधारित वाणांची निवड तसेच बियाणांची उगवणक्षमता, जीवाणू खतांची उपलब्धता, माती परीक्षणानुसार खत मात्रा ठरविणे इ. तपासण्या करणे आवश्यक असते. सोयाबीन बियाण्यांचे वरचे टरुल अतिशय नाजूक असल्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत सोयाबिनाची अंकुरणक्षमता कमी होऊ शकते. म्हणून ७०% किंवा त्यापेक्षा जास्त उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरतात.

बीज प्रक्रिया : बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करणे, उगवण टिकविणे तसेच सोयाबीन द्विदल वर्गीय पीक असल्यामुळे या पिकाला बुरशीनाशकांची व जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणे अत्यावश्यक ठरते.

सोयाबिनासाठी ऱ्हायझोबियम जॅपोनिकम हे जीवाणू खत वापरतात. या जीवाणू संवर्धनामुळे या पिकाची नायट्रोजनाची गरज काही प्रमाणात भागते. तसेच पुढील पिकांसाठी प्रतिहेक्टरी ३०-४० किग्रॅ. नायट्रोजन जमिनीत उपलब्ध होतो. तसेच फॉस्फेट (स्फुरद) विरघळविणाऱ्या जीवाणू खताची सुद्धा बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. यामुळे पिकास लागणाऱ्या फॉस्फेटाच्या उपलब्धतेचे प्रमाण वाढते. प्रतिकिग्रॅ. बियाण्यास २५ ग्रॅ. ऱ्हायझोबियम जॅपोनिकम व २५ ग्रॅ. पीएसबी याची (स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत) बीज प्रक्रिया करतात.

जीवाणू खताची बीज प्रक्रिया : २५० ग्रॅ. जीवाणू संवर्धकाचे अर्धा लिटर पाणी व १०० ग्रॅ. डिंक किंवा गुळाची काकवी वापरून द्रावण करतात. हे द्रावण १० किग्रॅ. बियाण्यावर शिंपडून सर्व बियांना लागेल असे सावकाश चोळतात. बियाणे सावलीत वाळवितात. शक्यतोवर पेरणीपूर्वी दोन ते तीन तास आधी ही बीज प्रक्रिया केली जाते.

वेळेवर डिंक किंवा गुळाची काकवी उपलब्ध नसल्यास बियाण्यावर ऱ्हायझोबियम व पीएसबी यांची पावडर टाकून आणि पाणी शिंपडून बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. काही कारणास्तव पेरणीच्या वेळी ट्रायकोडर्मा, ऱ्हायझोबियम जॅपोनिकम व पीएसबी या जैविकांची बीज प्रक्रिया न झाल्यास जीवाणू खते शेणखत मिसळून पेरतात. याकरिता १०० किग्रॅ. चाळलेले शेणखत किंवा ५० किग्रॅ. गांडूळ खत घेऊन त्यात २·५ किग्रॅ. ऱ्हायझोबियम जॅपोनिकम, २·५ किग्रॅ. पीएसबी व २·५ किग्रॅ. ट्रायकोडर्मा चांगले मिसळून घेतात आणि त्यावर थोडे पाणी घालून पहिल्या डवरणीच्या आधी जमिनीत एकसारखी पेरणी करतात.

जीवाणू संवर्धके वापरताना घ्यावयाची काळजी : जीवाणू संवर्धकाचे पाकिट थंड व कोरड्या जागी ठेवतात तसेच ते कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके व रासायनिक खतांपासून दूर ठेवतात. जीवाणू संवर्धकाच्या पाकिटावर जी अंतिम वापराची तारीख दिलेली असेल त्या त्या तारखेपर्यंत जीवाणू खताचा वापर करणे आवश्यक असते. ऱ्हायझोबियम जीवाणू लावण्यापूर्वी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया प्रथम केली जाते. जीवाणू संवर्धक लावण्यापूर्वी बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके इ. लावलेली असतील तर जीवाणू संवर्धक नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लावणे चांगले असते. कोणत्याही रासायनिक खताबरोबर जीवाणू संवर्धक मिसळत नाहीत. बीज प्रक्रिया सावलीत करून व पेरणीपूर्वी असे बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी ताबडतोब करणे गरजेचे असते.

खत व्यवस्थापन : अधिक पीक उत्पादनासाठी तसेच जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रासायनिक खताच्या तुलनेत सेंद्रिय खतामध्ये पिकांच्या वाढीस आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असते परंतु जमिनीचे भौतिक गुणधर्म आणि जडण-घडण टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांचा फार मोठा सहभाग असतो. सेंद्रिय खताचा व जीवाणू खताचा वापर करून रासायनिक खतांची आवश्यक मात्रा अर्ध्यावर आणता येते.

सोयाबिनाला मध्यम प्रकारच्या जमिनीसाठी हेक्टरी ५ टन शेणखत किंवा २·५ टन गांडूळ खत आणि जीवाणू खतांची बीज प्रक्रिया व सोबत पेरणीच्या वेळी ३० किग्रॅ. नायट्रोजन (६५ किग्रॅ. यूरिया) व ७५ किग्रॅ. स्फुरद (४७० किग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट) प्रतिहेक्टरी टाकतात, तसेच आवश्यकता असल्यास ३० किग्रॅ. पालाश टाकतात. नायट्रोजनाच्या मात्रेची विभागणी न करता संपूर्ण खत मात्रा एकाच वेळी देतात किंवा एकात्मिक खत व्यवस्थापनाच्या दृष्टीने शेणखत १० टन किंवा ५ टन गांडूळ खत आणि ३३ किग्रॅ. यूरिया (१५ किग्रॅ. नायट्रोजन) व २३५ किग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट (३६ किग्रॅ. फॉस्फरस) यांसोबतच जीवाणू खताची बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. तसेच माती परीक्षणानुसार पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केली जाते.

सोयाबीन हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे त्याला गंधकाची आवश्यकता असते. ती पूर्ण करण्यासाठी फॉस्फेट या द्रव्याची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटामधूनच देतात परंतु स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटामधून देणे शक्य नसते तेव्हा प्रतिहेक्टरी १६० किग्रॅ. डीएपी व १५० किग्रॅ. जिप्सम वापरतात अथवा जमिनीतून देेतात.

सोयाबीन पिकात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पिकाला दाणे भरण्याच्या अवस्थेत नायट्रोजनाची जास्त गरज निर्माण होते. म्हणून या पिकावर शिफारस केलेल्या खत मात्रेसोबत पेरणीनंतर ५० व ७० दिवसांनी २% यूरिया फवारणीची शिफारस केलेली आहे.

पेरणी : सर्व खरीप पिकांची पेरणी शक्यतोवर पूर्व-पश्चिम अशी करतात. सोयाबीन सुद्धा याला अपवाद नाही. परंतु शेताला जर उतार असेल तर मशागतीसोबतच पेरणी सुद्धा उताराला आडवी समपातळीत राहील याची दक्षता घेऊनच करतात. पेरणी करताना तीफणीने किंवा सरत्याने दोन ओळींतील व रोपट्यांमधील अंतर ३०x१० सेंमी. (मध्यम जमीन) किंवा ४५x१० सेंमी. (भारी जमीन) ठेवतात. बियाणे ४ सेंमी.पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची दक्षता घेतात. प्रतिहेक्टर ४-४·५ लाख रोपांची संख्या राखणे अत्यावश्यक असते. दाट उगवण झाल्यास ८-१० दिवसांनी विरळणी केली जाते.


 आंतर मशागत : सोयाबीन पीक सुरुवातीच्या ४० दिवसांपर्यंत तणविरहित ठेवणे अत्यंत आवश्यक असते. या पिकाच्या उत्पादनात केवळ तणांमुळे ३५-७० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. ही उत्पादनातील घट तणांचा प्रकार, तणांची घनता व तणनियंत्रणाचा कालावधी यांवर अवलंबून असते. या पिकात प्रामुख्याने हराळी, लव्हाळी, कुंदा, दुधी, कोंबडा, हजारदाणा, गाजर गवत, आघाडा, केना, कुंजर, पांढरी फुली, एकदाणी, कंबरमोडी, चिकना, रायमोनिया, गोखरू इ. प्रचलित तणांचा प्रादुर्भाव दिसून येतो. उभ्या पिकातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी डवरणी व खुरपणी किंवा निंदणी ही आंतर मशागतीची कामे अतिशय उपयुक्त ठरतात. त्याचसोबत कोरडवाहू जमिनीत यामुळे जलसंवर्धन देखील साधता येते. या पिकासाठी डवरणीच्या दोन पाळ्या व एक निंदणी अत्यंत आवश्यक असते तसेच तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास दुसरी निंदणी करून घेतात. पीक ४० दिवसांचे होण्यापूर्वी डवरणी संपवितात. पहिली डवरणी १२-१८ दिवसांनी व दुसरी डवरणी ३०-४० दिवसांदरम्यान केली जाते. पीक फुलोऱ्यावर असताना डवरणी करीत नाहीत. तसेच खुरपणी किंवा निंदणी आवश्यकतेनुसार ४५ दिवसांच्या आत करून घेतात.

खरीपात कधीकधी पावसात खंड पडतो. अशा वेळी मूलस्थानी जलसंधारण करणे अत्यंत गरजेचे असते, तेव्हा दुसऱ्या डवरणीच्या वेळी जानकुळाला दोरी बांधून डवरा चालवितात. जेणेकरून रोपाच्या ओळीवर माती चढवून दोन ओळींमध्ये सरी तयार होईल व त्यामुळे जलसंवर्धन होईल. डवरीमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल किंवा जास्त झालेले पाणी नाल्याद्वारे शेताबाहेर निघून जाईल. खरीप हंगामात बरेचदा सततच्या पावसामुळे पिकात योग्य वेळी आंतर मशागतीची कामे करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत पेरणीपूर्व तथा उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करून पीक २५-३० दिवसांपर्यंत (रोपावस्थेत असताना) तणविरहित ठेवणे उपयुक्त ठरते.

विविध पीक पद्धती :(अ) आंतर पीक पद्धती : कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन हे सलग पीक म्हणून घेतात परंतु हे पीक सलग न घेता आंतर पीक म्हणून घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते. यासारख्या पिकामुळे हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिर होण्यास तसेच जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

आंतर पीक पद्धतीमुळे तणे, रोग व किडीच्या प्रादुर्भावास आळा बसतो आणि जनावरांकरिता चारा उपलब्ध होतो. कपाशी व सोयाबीन १:२ किंवा १:१ ओळीच्या प्रमाणात किंवा तूर व सोयाबीन १:२ किंवा २:४ ओळीच्या प्रमाणात घेतले जाते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोयाबीन, ज्वारी व तूर ६:२:१ किंवा ९:२:१ या त्रिस्तरीय पद्धतीची शिफारस केली आहे. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाऊस आल्यास सोयाबीन कापणी नंतर मोहरी हे पीक घेता येते.

आंतर पीक पद्धतीचा अवलंब करताना : (१) मध्यम ते खोल जमिनीवर तूर व सोयाबीन हे आंतर पीक घेतात. (२) दोन पिकांपैकी एक पीक लवकर परिपक्व होणारे, तर दुसरे उशिरा परिपक्व होणारे असले म्हणजे पीक वाढीच्या वेळी त्यांच्यात स्पर्धा निर्माण होत नाही. तुरीची वाढ पहिल्या ६० दिवसांत मंद गतीने होत असल्यामुळे सोयाबीन पिकाच्या वाढीस अडथळा निर्माण होत नाही. पुढे या पिकानंतर तूर पिकास भरपूर जागा, सूर्यप्रकाश व ओलावा मिळाल्याने तुरीचे सुद्धा सलग पिकाइतके उत्पन्न मिळू शकते. (३) एका पिकाची मुळे खोल जाणारी, तर दुसऱ्या पिकाची मुळे जमिनीच्या वरच्या थरात (३० सेंमी.) पसरणारी असावी लागतात, जेणेकरून जमिनीतील वेगवेगळ्या थरांतील उपलब्ध अन्नद्रव्य व ओलावा यांचा कार्यक्षम वापर होईल.

(आ) दुबार पीक पद्धती : सोयाबीन हे दुबार पीक पद्धतीसाठी सुद्धा एक फायदेशीर पीक आहे. याच्या कमी दिवसांत येणाऱ्या वाणा नंतर कोरडवाहू क्षेत्रात सुद्धा करडईसारखे दुबार पीक घेता येते.

साधारणत: सोयाबीन-करडई, सोयाबीन-हरभरा दुबार पीक पद्धती कोरडवाहू क्षेत्रात फायदेशीर असते. एक किंवा दोन वेळा पाण्याची उपलब्धता असल्यास सोयाबीन-मोहरी या पीक पद्धतीचा अवलंब करता येतो. तसेच ओलिताची सोय असल्यास सोयाबीन-गहू या पीक पद्धतीपासून सुद्धा फायदा मिळविता येतो. सोयाबीन-गहू-वैशाखी मूग, सोयाबीन-रब्बी ज्वारी-चाऱ्यासाठी मका, कापूस-सोयाबीन, भात-सोयाबीन, सोयाबीन-कांदा अशा बहुविध पीक पद्धतींचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो.

(इ) पीकांची फेरपालट : पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पिकानंतर फेरपालटीचे पीक म्हणून सोयाबीन पीक घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.

कापणी व मळणी : साधारणपणे जेव्हा सोयाबिनाची सर्व पाने झडून जातात तसेच ९५% शेंगा पक्व झालेल्या असतात तेव्हा पीक कापणीयोग्य झाले असे समजतात परंतु याच्या जास्त कालावधीच्या जातींमध्ये शेंगा जरी पक्व झालेल्या दिसल्या तरी झाडावर हिरवी पाने दिसूनयेतात. तसेच १०% शेंगा सुद्धा हिरव्या दिसतात. त्यामुळे पीक पक्व झाल्याबरोबर ताबडतोब कापणी सुरू करावी लागते, अन्यथा उशीर झाल्यास शेंगा तडकून जातात व उत्पन्नात घट येऊ शकते. रोपांमधील ओलाव्याचे प्रमाण १७% असताना या पिकाची कापणी करणे योग्य ठरते. तसेच मळणी करताना दाण्यांतील ओलाव्याचे प्रमाण १३-१५% असणे आवश्यक असते. बियाण्यामधील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास अशा वेळी मळणी करताना दाणे फुटून डाळ होण्याचे प्रमाण वाढते किंवा बियाण्याच्या वरच्या कवचाला तडा जाऊन उगवणशक्तीचा ऱ्हास झालेला दिसून येतो. मळणीच्या वेळी बियांमधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने देखील बियाण्यास हानी पोहोचू शकते. तेव्हा पिकाच्या कापणी व मळणीच्या वेळी बियाण्यामधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५% दरम्यान असणे अत्यावश्यक असते. जेणेकरून सोयाबिनाची उगवणशक्ती टिकून राहून गुणवत्तासुद्धा चांगली राहते. कापणी व मळणी करण्याच्या पुढील पद्धती आहेत :

हाताने कापणी व मळणी : सोयाबिनाचे क्षेत्र कमी प्रमाणात असेल किंवा बियाणे म्हणून उपयोगात आणावयाचे असल्यास ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते. अशा क्षेत्रातील पीक कापून शेतातच ४-५ दिवस सुकवायला ठेऊन नंतर कोरड्या जागेवर किंवा ताडपत्रीवर छोट्याछोट्या गंज्या काठीने किंवा लाकडी दांड्याने ठोकून घेतात. या क्रियेत बियांना कमी मार लागल्यामुळे सोयाबिनाचे फारच कमी नुकसान होते. म्हणून बियाण्याची गुणवत्ता (उदा., उगवणशक्ती) टिकवून ठेवायची झाल्यास हाताने कापणी व मळणी करणे अत्यावश्यक असते.

हाताने कापणी व मळणी यंत्राद्वारे मळणी : हाताने कापणी केलेल्या सोयाबिनामधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५% असताना यंत्राने मळणी केल्यास बियाण्याची गुणवत्ता चांगली राहते.

संयुक्त यंत्राद्वारे (कम्बाइनरद्वारे) कापणी व मळणी : पूर्वी कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी करणे फारसे प्रचलित नव्हते, परंतु आता काही भागात कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कापून ठेवलेल्या सोयाबिनाची सुद्धा कम्बाइनरद्वारे मळणी करता येते, परंतु यात दाण्यांची डाळ होताना दिसून येते. तसेच बियांच्या कवचाला सुद्धा इजा पोहोचून त्याचा उगवणशक्तीवर परिणाम होतो. ज्या ठिकाणी सोयाबीन हे बीजोत्पादनासाठी घ्यावयाचे असेल त्या ठिकाणी कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी करीत नाहीत. कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी केल्यास ८-१०% बियाण्याची घट होऊ शकते.

कापणी व मळणी झाल्यावर सोयाबिनाचे बियाणे उफणून, चांगले साफ करून व सुकवून मगच साठवितात. बियाणे सुकविताना त्यामधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असते. जास्त ओलावा असल्यास बुरशीची वाढ होऊन बियाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. त्यासाठी साठवण करण्याआधी बियाणे उन्हात वाळविणे अत्यावश्यक असते. सर्वसाधारणपणे दाणे खळ्यावर किंवा ताडपत्रीवर ३-४ दिवस वाळवून घेतात. रात्री बियाणे झाकून ठेवण्याची व्यवस्था करतात.

सोयाबीन बियाणे म्हणून तयार करावयाचे असल्यास १०-१२% ओलाव्याचे प्रमाण असलेले दाणे मशीनद्वारे वेगवेगळ्या चाळण्यांतून तसेच पृथकाद्वारे वेगळे करून पिशव्यांमध्ये साठवितात.

तण व्यवस्थापन : खरीप हंगामात बरेचदा सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकात योग्य वेळी आंतर मशागतीची कामे करणे शक्य होत नाही. तसेच खरीप हंगामात तणांचा प्रादुर्भाव जास्त होत असतो आणि त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट (३०-८०%) होऊ शकते. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सतत प्रयत्नशील असतो. कारण या हंगामात नाना प्रकारची आणि विविध कुलातील तणे पिकांत आढळतात. ती पुढीलप्रमाणे आहेत : (अ) रुंद पानाची तणे उदा., गाजर गवत, कोंबडा इत्यादी. (आ) अरुंद पानाची तणे उदा., हराळी, कुंदा इत्यादी.

सोयाबीन पिकाची मुख्य वाढीची अवस्था ही पेरणीपासून १५-२० दिवसांपर्यंत असते. या कालावधीमध्ये तणाचा पूर्ण बंदोबस्त केला तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते. म्हणून तणनियंत्रण व्यवस्थापन ४५ दिवसांच्या आत करणेच आवश्यक असते. तण व्यवस्थापन पुढील पद्धतींनी करता येते.


 (अ) परंपरागत पद्धत : (१) दोन डवरणी व एक निंदणी ४५ दिवसांच्या आत करतात किंवा पेरणीनंतर ३० व्या दिवशी व ४५ व्या दिवशी दोन निंदणी करतात. (२) तणनियंत्रण व जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी पेरणीनंतर ३० व्या दिवशी तणाचे आच्छादन करतात.

(आ) रासायनिक पद्धत : रासायनिक तणनियंत्रण पद्धतीत पिकामध्ये तणनाशक फवारण्याच्या वेळेनुसार दोन गटांत विभागणी केलेली आहे.

(१) उगवणपूर्व किंवा पेरणीपूर्व तणनाशके : जी तणनाशके शेतात पीक व तण उगवण्याआधी पेरणीपूर्व किंवा पेरणीनंतर लगेच तणाचा बंदोबस्त करण्यासाठी फवारतात, त्यांना उगवणपूर्व तणनाशके असे म्हणतात. उगवणपूर्व किंवा पेरणीपूर्व यांपैकी कोणत्याही एका तण-नाशकाची फवारणी ही तणांचा बंदोबस्त करण्यासाठी केली जाते.

ट्रायफ्ल्युरॅलीन (ट्रॅफलान ४८%) १ किग्रॅ. क्रियाशील घटक प्रति-हेक्टरी (२·५ लि./हे.) ६००-७०० लि. पाण्यात मिसळून वरीलप्रमाणे फवारणी करतात वा वखराची पाळी देऊन जमिनीत मिसळून देतात.

ॲलाक्लोर (लासो ५०%) २ किग्रॅ. क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी म्हणजेच १० लि. पाण्यात ३० मिलि. मेटाक्लोर (ड्युल ५०%), १ किग्रॅ. क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी म्हणजेच २ लि. औषध ६००-७०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करतात (१० लि. पाण्यात ३० मिलि. मेटाक्लोर). पेंडीमिथॅलीन (स्टॉम्प ३० ई. सी.) १० लि. पाण्यात ४५ मिलि. मिसळतात.

(२) उगवणपश्चात तणनाशके : पीक व तण उगवल्यानंतर (१०-२५ दिवसांनंतर) जी तणनाशके पिकामध्ये फवारतात, त्या तण-नाशकांना उगवणपश्चात तणनाशके असे म्हणतात. खाली दिलेल्या तीन पैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी उगवणपश्चात तणनियंत्रणासाठी करतात.

इमॅजीथायपर १०% (परसूट) १०० ग्रॅ. क्रियाशील घटक प्रति-हेक्टरी, क्विझालोफॉप एथिल (टार्गा सुपर ५% ई. सी.) आणि सोबत क्लोरीम्युरॉन एथिल (क्युरीन/क्लोथेन २५%) ही तणनाशके खालीलप्रमाणे वापरतात.

(अ) प्रथम ३३ ग्रॅ. क्युरीन १८ ग्लास पाण्यात मिसळून मूळ द्रावण एक हेक्टराकरिता तयार करतात. (आ) या मूळ द्रावणामधील एक ग्लास द्रावण फवारणी पंपामध्ये घेतात. (इ) या पंपामध्ये ३० मिलि. टार्गा सुपर तणनाशक टाकतात. (ई) सोबत स्टिकर प्रोकौबो ३० मिलि. टाकून द्रावण चांगले हलवून तयार केले जाते. (उ) अशा प्रकारे बनविलेले द्रावण कमीतकमी (१८ फवारणी पंप) एक हेक्टर शेतामध्ये फवारतात.

वरील उगवणपश्चात तणनाशकामुळे अरुंद पानाची तसेच रुंद पानाची तणे यांचा बंदोबस्त होतो व निंदणी करण्याची आवश्यकता भासत नाही.

पाणी व्यवस्थापन : सोयाबीन मुख्यतः कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. पाणी, तापमान व सूर्यप्रकाशाचे तास यांबाबत हे पीक अतिशय संवेदनशील आहे. पीक वाढीच्या काही अवस्था पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. म्हणून अशा परिस्थितीत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असते.

सोयाबीन पिकास वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज

सोयाबीन पिकाची खरीप हंगामातील पाण्याची गरज ४५०-८२५ मिमी. एवढी असते. यामुळे खरीपात हमखास पाऊस असलेल्या प्रदेशात संरक्षक सिंचनाखेरीज पाण्याची गरज पडत नाही. मात्र इतर प्रदेशात निदान २-३ पाण्याच्या पाळ्या देणे अत्यंत आवश्यक असते.

खोल भारी ते मध्यम पोताच्या जमिनीवर घेतलेल्या पिकास चौदा दिवसाच्या अंतराने किंवा हवेतील आर्द्रता व वातावरणामधील तापमान पाहून सिंचनाचे दिवस कमी किंवा जास्त करून सिंचन करतात. सोयाबीन पिकास मुख्यत्वे बीज रुजणे ते रोपावस्था, फुलोरावस्था, शेंगा लागण्याची अवस्था, शेंगा तयार होतानाची अवस्था, दाणे भरतानाची अवस्था या अवस्था सिंचनास अतिशय संवेदनशील असतात. खरीप हंगामात जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फुले लागण्याच्या थोडे अगोदर व शेंगा धरण्यास सुरुवात झाल्यावर सिंचनाच्या दोन पाळ्या दिल्यास हमखास उत्पन्न मिळते. उन्हाळी हंगामात पेरणीपूर्व, फुलोरे लागताना व शेंगा भरताना या अवस्थेत सिंचन दिल्यास चांगले उत्पन्न येते.

कीड व्यवस्थापन : महाराष्ट्रात १९९६-९७ मध्ये ६·८२ लाख हे. क्षेत्रावर सोयाबिनाची लागवड केली गेली होती. ती २००४-०५ या कालावधीत २२·४६ लाख हे. क्षेत्रावर पोहोचली. हे गळिताचे पीक व कडधान्य पीक असल्यामुळे अनेक किडींचा प्रादुर्भाव या पिकावर होतो आणि त्यामुळे ३०-३५ टक्क्यांपर्यंत उत्पन्नात घट येऊ शकते. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी किडींचे योग्य वेळी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पिकावरील महत्त्वाच्या किडी, त्यांची ओळख, प्रादुर्भावाची वेळ, नुकसानीचा प्रकार तद्वतच नियंत्रणाच्या उपायाची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. या पिकावरील किडींचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येते : (अ) खोड व फांद्या पोखरणाऱ्या किडी, (आ) पाने व शेंगा खाणाऱ्या किडी आणि (इ) रस शोषण करणाऱ्या किडी.

(अ) खोड व फांद्या पोखरणाऱ्या किडी : (१) खोडमाशी : या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत झाल्यास त्याचा ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पिकाची पुन्हा पेरणी करावी लागते किंवा उत्पा-दनात जास्त घट येण्याची शक्यता असते. खोडमाशीच्या अळीचा कोष फांद्यात व खोडात असतो. अशा किडग्रस्त रोपावरील फुलांची गळती होते, तसेच शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात १६-३०% घट होते.

(२) चक्रभुंगा : मादी भुंगा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करते. यामध्ये मादी तीन छिद्रे करते आणि त्यांपैकी एकामध्ये अंडी घालते, त्यामुळे चक्राचा वरचा भाग वाळतो. अंड्यातून निघालेली अळी देठ, फांदी व खोड पोखरून पोकळ करीत जाते. चक्रभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्याच्या संख्येत तसेच वजनात अनुक्रमे ५३, ५६ आणि ६६ टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. पूर्ण वाढलेली अळी पोखरलेल्या भागात कोषावस्थेत जाते. लवकर पेरलेल्या सोयाबिनावर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.

या किडीच्या नियंत्रणासाठी ३०% प्रवाही १० मिलि. डायमेथोएट किंवा ३५% प्रवाही १५ मिलि. किंवा ३६% प्रवाही १४ मिलि. एंडोसल्फान १० लि. पाण्यात मिसळून किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच फवारतात.


 (आ) पाने व शेंगा खाणाऱ्या किडी : (१) हिरवी उंट अळी : ही अळी हिरव्या रंगाची असून चालताना उंटासारखा बाक करते. लहान उंट अळ्या प्रथम पानाचा हिरवा भाग खरवडून खातात तर मोठ्या अळ्या पानाचा सर्व भाग खातात.

(२) तंबाखूची पाने खाणारी अळी : पूर्ण वाढलेली अळी ३०-४० मिमी. लांब असते. मादी पतंग पुंजक्याने पानावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकपणे पानांचा हिरवा भाग खातात, त्यामुळे पाने जाळीदार दिसतात.

(३) केसाळ अळी : पूर्ण वाढलेली अळी ४०-४५ मिमी. लांब असून तिची दोन्ही टोके काळी, तर मधला भाग मळकट पिवळा असतो. तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या सामूहिकपणे पानाच्या खालील बाजूवर राहून त्यातील हरितद्रव्य खातात.

पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी पिकावर एंडोसल्फान ३५% प्रवाही १४ मिलि. किंवा फेन्व्हेलरेट २०% प्रवाही ५ मिलि. किंवा क्विनॉलफॉस २५% प्रवाही १६ मिलि. हे १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करतात. मिथिल पॅरॅथिऑन २%, क्विनॉलफॉस १·५% किंवा एंडोसल्फान ४% यांपैकी एका भुकटीची हेक्टरी २० किग्रॅ. धुरळणी करतात. ५% निंबोळी अर्काचा वापर केल्यास पाने खाणाऱ्या अळींचे व्यवस्थापन होऊ शकते.

(४) पाने पोखरणारी अळी : पूर्ण वाढलेली अळी ६-८ मिमी. लांब असून शरीराचा भाग निमुळता असतो. अळी फिकट हिरव्या रंगाची, गर्द डोक्याची असून सुरुवातीस सोयाबिनाची पाने पोखरते. त्यामुळे कीडग्रस्त पान आकसते. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते. या किडीचे नियंत्रणासाठी ३५% प्रवाही १४ मिलि. एंडोसल्फान किंवा ३६% प्रवाही ९ मिलि. मोनोक्रोटोफॉस १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करतात.

(इ) रस शोषण करणाऱ्या किडी : पांढरी माशी : प्रौढ माशी १-२ मिमी. आकाराची, फिकट हिरव्या रंगाची असून तिच्या पंखावर पांढरा मेणचट पातळ थर असतो. हिचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपल्या शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ बाहेर टाकते.

पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी ३०% प्रवाही डायमेथोएट किंवा २५% प्रवाही मिथिलऑक्सिडेमेटॉन १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करतात.

निंबोळी अर्क (५%) तयार करण्याची पद्धत : (१) ५ किग्रॅ. निंबोळी चुरा व ९ लि. पाणी फवारणीचे आदले दिवशी सायंकाळी भिजत ठेवतात आणि १ लि. पाणी व २०० ग्रॅ. साबण चुरा वेगळा भिजत ठेवतात. (२) दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळी अर्क घुसळून फडक्यातून गाळून घेतात. या अर्कात १ लि. पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळतात. (३) १ लि. अर्क व ९ लि. पाणी मिसळून ढवळतात व फवारणीसाठी वापरतात.

रोग व्यवस्थापन : सोयाबीन पिकावर अनेक प्रकारचे रोग आढळतात, त्यामुळे उत्पादन बरेच घटते. जागतिक स्तरावर या पिकावर सु. ४० बुरशीजन्य, १० सूक्ष्मजंतूंपासून (जीवाणूंपासून) होणारे, ७ सूत्रकृमींमुळे होणारे आणि विषाणूजन्य केवडा व पर्णगुच्छ रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. हे पीक ऱ्हायझोबियम जीवाणूला उत्तम प्रतिसाद देणारे असून बीज प्रक्रियामुळे उत्पादनात १०-१२% वाढ होते. विदर्भात या पिकावर ७-८ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

(१) पानावरील जिवाणू ठिपके : हा रोग झँथोमोनास फॅसीओली सीजेन्सीस या जीवाणूमुळे होतो. रोपाच्या पानावर व शिंबांवर (शेंगांवर) त्रिकोणी, चौकोणी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. ठिपक्याभोवती पिवळसर वलय दिसते. ठिपक्यांचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळून पडतात. रोग दिसून येताच पिकावर ३० ग्रॅ. कॉपर ऑक्सिक्लोराइड १० लि. पाण्यात मिसळून फवारतात. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या करतात. पिकाचे रोगट अवशेष गोळा करून जाळतात.

(२) पानावरील बुरशीजन्य ठिपके : हा रोग प्रामुख्याने पानावर फोमा या बुरशीमुळे आढळतो. कधीकधी हा रोग खोड, शेंगा व बियांवरही दिसून येतो. रोगनियंत्रणासाठी पेरणीपूर्वी प्रति किग्रॅ. बियाण्यास ३ ग्रॅ. थायरम किंवा २ ग्रॅ. थायरम व १ ग्रॅ. कार्बेन्डाझीम लावतात. निरोगी बियाणे वापरतात. रोग दिसून येताच पिकावर १० ग्रॅ. कार्बेन्डाझीम किंवा २५ ग्रॅ. कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा २५ ग्रॅ. डायथेन एम-४५ हे १० लि. पाण्यात मिसळून फवारतात.

(३) तांबेरा : हा रोग फकोप्सोरा पॅकिर्‍हिझी या बुरशीमुळे होतो. पानाच्या मागील भागावर तांबडे किंवा फिकट काळपट, विटकरी रंगाचे व सुईच्या टोकाच्या आकाराचे डाग पडतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने गळून पडतात. शेंगा पोचट व दाणे चपटे होऊन उत्पादनात लक्षणीय घट येते.

फुले कल्याणी (डीएस-२२८) आणि फुले आग्रणी (केडीएस-३४४) या तांबेरा प्रतिकारक वाणांची पेरणी करतात. रोगाच्या नियंत्रणाकरिता पेरणीनंतर ३५ दिवसांनी पिकावर २५ ग्रॅ. डायथेन एम-४५ हे १० लि. पाण्यात मिसळून फवारतात. रोगाच्या प्रभावी नियंत्रणा-करिता रोग आढळून येताच १५ दिवसांच्या अंतराने डायफेनोकोनॅझोल (स्कोर) ०·१% किंवा प्रॉपिकोनॅझोल (टिल्ट) ०·०५% या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारतात.

(४) शेंगावरील करपा : पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. बी तयार होण्यावर विपरीत परिणाम होतो.

रोगनियंत्रणासाठी पिकाच्या रोगट अवशेषांचा नाश करणे योग्य असते. ३ ग्रॅ. थायरम प्रतिकिग्रॅ. बियाणे या प्रमाणात बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. फवारणीकरिता २५ ग्रॅ. कॉपरऑक्सिक्लोराइड किंवा २५ ग्रॅ. डायथेन एम-४५ हे १० लि. पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार १०-१५ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारतात.

(५) मूळकूज आणि खोडकूज : रोपावस्थेत या रोगाची लागण जास्त दिसून येते. हा रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या तसेच बियाण्यावर असणाऱ्या ऱ्हायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होतो. रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्नपुरवठा होत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात.

रोगनियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्रॅ. थायरम किंवा कॅप्टन किंवा २ ग्रॅ. थायरम व १ ग्रॅ. कार्बेन्डाझीम लावतात. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची ४ ग्रॅ. प्रतिकिग्रॅ. बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करतात.

(६) कॉलर रॉट : हा रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या स्क्लेरोशियम रोल्फसाय या बुरशीपासून होतो. जमिनीलगतचे खोड व मुख्य मुळे काळपट होऊन सडल्यासारखी दिसतात. त्यांची साल तागाच्या तंतूसारखी निघून जाते. रोगट भागावर व भोवताली कापसाच्या तंतूंसारखी बुरशीची वाढ होते आणि मोहरीसारखे बुरशीपुंज तयार होतात.

(७) बियाण्यावरील जांभळे डाग : सर्कोस्पोरा किकुची या बुरशी-मुळे होणारा हा रोग आहे. हा रोग बी, शेंगा, खोड आणि पाने यांवर दिसून येतो. रोगग्रस्त बियाण्यावर गुलाबी किंवा जांभळट डाग पडतात. रोगट बियांच्या बाह्य आवरणावर भेगा पडतात.


 रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास थायरम व कार्बेन्डाझीम (२:१) ३ ग्रॅ. प्रतिकिग्रॅ. बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करतात. तसेच निरोगी बियाणे वापरतात. रोग दिसून येताच २० ग्रॅ. डायथेन एम-४५ हे १० लि. पाण्यात मिसळून फवारतात. आवश्यकतेनुसार २-३ फवारण्या देतात.

(८) पिवळा मोझॅक : हा विषाणुजन्य रोग आहे. रोगट पानाचा काही भाग पिवळा व काही भाग हिरवा दिसतो. रोगग्रस्त रोपाची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात.

सोयाबिनाच्या संशोधित सुधारित जाती : महाराष्ट्रात विशेषेकरून जळगाव येथील संशोधन केंद्रावर १९६५ पासून सोयाबीन पिकावर प्रयोग करण्यात येत आहेत. १९६७ मध्ये महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी (पुणे) म्हणजेच आजची आघारकर संशोधन संस्था अस्तित्वात आली. आज ही संस्था सोयाबिनाच्या संशोधनात अग्रेसर ठरलेली आहे. या केंद्राने निर्मित केलेल्या जाती प्रामुख्याने एमएसीएस-१३, ५७, ५८, १२४ व ४५० या आहेत. कृषिसंशोधन केंद्र (कसबे डिग्रज) येथे १९८७ पासून या पिकावर संशोधन केले जात आहे. या केंद्राने २००४ मध्ये फुले कल्याणी (डीएस-२२८) आणि २०१३ मध्ये फुले आग्रणी (केडीएस-३४४) हे तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केले आहेत.

साठवण : सोयाबिनाची साठवण करतेवेळी पुढील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. साठवण करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवतात जेणेकरून खालची ओल पिकाला लागणार नाही. पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहील अशा रीतीने पोते ठेवतात. एकावर एक अशी पोत्यांची थप्पी न लावता दोन पोत्यांवर एक अशी पोत्याची थप्पी लावतात. पाच पोत्यांपेक्षा जास्त पोत्यांची थप्पी लावत नाही. आवश्यकतेनुसार भांडाराची साफसफाई व कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे असते. अशा प्रकारे सोयाबिनाची साठवण करून निगा राखली जाते.

संदर्भ : १. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, सोयाबीन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, सातारा, २०११-१२.

           २. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, सोयाबीन लागवड व बीजोत्पादन तंत्र, जून २००७.

           ३. पळसकर, मो. श. मुसांडे, व. ग. सोनुने, शे. पां. सोयाबीनची लागवड, औरंगाबाद, २००६.

गोगटे, बा. चिं. भोसले, रा. जि. वाघ, नितिन भरत