सोपारा : महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी, पुरातत्त्वीय शहर व बंदर. ते ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात पश्चिम रेल्वेमार्गावर वसई रेल्वे स्थानकाच्या वायव्येस सु. १० किमी. व विरारच्या नैर्ऋत्येस सु. १० किमी.वर अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे.
प्राचीन साहित्य व कोरीव लेखांत सोपारा, शुपरिक, ऑफिर, सोपारक, शोपरिग, सोपरय, सुपार, औपार, शूर्पारक, सुर्बरह, सुरबथ इ. नावांनी सोपाराचा उल्लेख आढळतो. इ. स. पू. ४००–इ. स. १३०० दरम्यान सोपारा हे कोकणच्या राजधानीचे ठिकाण होते. पूर्व-पश्चिम आशियातील देशांशी येथून व्यापार होत असे. ते एक धार्मिक केंद्र व समृद्ध बंदर होते. येथे लाकूडफाटा मुबलक उपलब्ध असल्यामुळे येथील लोकांच्या इमारती प्रामुख्याने लाकडी व मंदिरे पाषाणात बांधली होती. शहरात उत्तम प्रतीचे कापड विणले जाई आणि चंदनाच्या लाकडाच्या कलाकृती बनविण्यात येत. त्यांपैकी गोशीर्ष कलाकृती विशेष प्रख्यात होती. सोन्याचे चलन व व्यापाऱ्याची श्रेणी, अनेक मठ व बागा शहरात होत्या. मुसलमानांच्या आक्रमणामुळे मध्ययुगात हे शहर उद्ध्वस्त झाले. या ठिकाणी १८८२ मध्ये उत्खनन झाले. त्यात बौद्ध मंदिराच्या काही अवशेषांबरोबरच अशोकाचा शिलालेख व काही खापरे आढळली. तसेच सातवाहनकालीन नाणी मिळाली. त्यावरून इ. स. १६० मध्ये हे बौद्ध धर्माचे केंद्र असावे. त्यावेळी सोपारात कुशल कारागीर, तांबट व सुवर्णकार यांची वसती होती.
सोपाराचा प्राचीन इतिहास वाङ्मयातून–विशेषतः महाभारत, हरिवंश, बौद्ध-जैन लेख आणि कोरीव लेख यांतून–ज्ञात होतो. तत्संबंधी काही दंतकथा व पौराणिक आख्यायिका असून श्रीलंका पादाक्रांत करणाऱ्या विजयने इ. स. पू. ५४० मध्ये सोपाराला भेट दिली होती. सॉलोमनने उल्लेखिलेले ऑफिर म्हणजे सोपारा असावे. एका जैन कथेनुसार श्रीपाल याचा विवाह सोपारकाच्या महासेन राजाच्या तिलकसुंदरीनामक मुलीशी झाला होता. जैन धर्मगुरू जिनप्रभासुरी हे जैनांच्या ८४ पवित्र तीर्थांपैकी एक क्षेत्र म्हणून सोपारक (सोपारा) मानीत आणि तेथे ऋषभनाथ (पहिला तीर्थंकर) याची मूर्ती पाहिल्याचा उल्लेख करतात. सम्राट अशोकाच्या शिलालेखात सोपारा अपरांत प्रदेशाची राजधानी असल्याचा उल्लेख आहे. इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांतील कोरीव लेखांत सोपाराचा उल्लेख आढळतो तो मुख्यत्वे कान्हेरी, कार्ले, नासिक येथील गुहालेखांत आणि नाणेघाटातील कोरीव लेखातही आहे. टॉलेमी (इ. स. सु. ९०-१६९) आणि पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या ग्रंथाचा लेखक सोपाराचा उल्लेख एक समृद्ध शहर असा करतात.
मध्ययुगात अल् मसूदी (?-? ऑक्टोबर ९५६) आणि अल् बीरूनी (४ सप्टेंबर ९७३–? डिसेंबर १०४८ ?) हे प्रवासी सोपाराचा उल्लेख सुबारा असा करतात तर शिलाहारांच्या कोरीव लेखांत त्याचा शुपारक असा उल्लेख असून ते एक व्यापारी बंदर होते. त्यावरून सोपारावर शिलाहारांचा अंमल असावा. पहिला अपारादित्य (कार. १११०-४०) राजाच्या वेळी सोपारातून एक शिष्टमंडळ काश्मीरला साहित्य परिषदेसाठी गेल्याचाही उल्लेख मिळतो. अल् इद्रीसी (१०९९/११००-११६६ ?) हा प्रवासी सोपारा शहर समुद्र किनाऱ्यापासून दोन किमी. आत असूनही व्यापाराचे प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख करतो. पोर्तुगीजांनी तेथे तटबंदी बांधून चार लाकडी मेढेकोट उभारले मात्र पुढे त्याचे व्यापारी महत्त्व अठराव्या शतकात कमी झाल्याचे द्यू पेरँ हा फ्रेंच प्रवासी नोंदवितो. वाऊपेल हा ब्रिटिश अधिकारी १८३७ मध्ये सोपारात आला असता त्याला येथील धान्य, मीठ आणि फळफळावळ यांची निर्यात गुजरात व मुंबईकडे होत असल्याचे जाणवले. येथील बंदरात मच्छीमारांच्या नावा आणि प्रवासी जहाजे यांची बांधणी होत असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस याला एका खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्वातंत्र्योत्तर काळानंतर नालासोपारा या नावाने हे जुळे नगर प्रसिद्धीस आले. ख्रिश्चन लोकसंख्या बहुल असलेल्या या भागात मराठी भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो आणि विभागीय मराठी साहित्य व कविसंमेलने आयोजित केली जातात, हे या भागाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्याच्या परिसरातील भात, केळी, विड्याची पाने (पानमळे), मोलॅसिस ही उत्पादने गुजरात व मुंबईत पाठविली जातात. या शहरांतून प्राथमिकपासून महाविद्यालयीन शिक्षणाच्या सर्व सुविधा असून नगरपालिकेतर्फे पाणी, रस्ते, जलनिःसारण, स्वच्छता वगैरे सर्व कामे केली जातात.
देशपांडे, सु. र.