स्यूनशोथ : सांधे आणि अस्थी ( हाडे ) यांच्या जवळच्या प्रदेशात जेथे दोन ऊतकांमध्ये ( समान रचना व कार्ये असणार्या कोशिकांचा समूह ) अतिरिक्त घर्षण होत असते, तेथे स्यून या नावाने ओळखला जाणारा द्रवयुक्त कोश ( लहानशी पिशवी ) तयार होतो उदा., स्नायू , अस्थिबंध किंवा कंडरा यांचे अस्थीच्या पृष्ठभागाशी होणारे घर्षण. स्यूनाच्या कोशामध्ये अत्यल्प द्रव पदार्थ असतो. सांध्यां-मधील संधिद्रवाप्रमाणेच तो द्रव संघर्षण प्रतिबंधक कार्य करतो. त्यामुळे ऊतके एकमेकांवर घासून त्यांची झीज होत नाही.
स्यून असलेल्या अवयवाची दीर्घ काळ अतिरिक्त हालचाल झाल्या-मुळे त्यावर ताण पडून स्यूनशोथ उद्भवू शकतो. तसेच जंतुसंक्रामण, आघात यांमुळे झालेली दुखापत, संधिवाताभ विकार, ⇨ गाऊट यांसारख्या इतर कारणांनीही अशी स्थिती निर्माण होते. शोथप्रवण स्थानांमध्ये खांदा, कोपर, कंबरेच्या आसपासचे ( श्रोणीचे ) सांधे, गुडघा, टाच आणि पायाची बोटे इ. अवयव प्रामुख्याने येतात. स्यूनाच्या कोशामध्ये द्रवाची आधिक्याने निर्मिती, वेदना, सूज आणि हालचालीं-वर मर्यादा पडणे ही लक्षणे शोथात आढळतात.
अल्पकालिक तीव्र स्यूनशोथात अचानक तीव्र वेदना जाणवते. तेथील पृष्ठभागावर ( त्वचेवर ) लाली येऊन ती सुजल्यासारखी दिसते व स्पर्श असह्य होतो. किंचित हालचालीनेही तीव्र वेदना झाल्यामुळे अवयव आखडल्यासारखा होतो उदा., टाच न टेकता येणे किंवा खांद्यापासून हात हलविणे अशक्य होणे. दीर्घकालिक शोथात वारंवार दुखापत झाल्याने किंवा तीव्र शोथाचे प्रसंग अनेक वेळा निर्माण झाल्यामुळे स्यूनाच्या कोशांचे आवरण जाड झालेले असते. हालचालीवर दीर्घकाळ मर्यादा पडल्यामुळे आसपासचे स्नायू बारीक व अशक्त होतात. तसेच या कोशाच्या आत खडूसारखा कॅल्शियमयुक्त घट्ट द्रव पदार्थाचा थर निर्माण होऊ शकतो. असा शोथ अनेक आठवडे टिकू शकतो.
स्यूनशोथाचे निदान कोशातील द्रवाच्या तपासणीने होऊ शकते. त्यामध्ये कॅल्शियम निक्षेप असल्यास क्ष-किरण चित्रणात त्याचे अस्तित्व कळून येते. जाड सुई घालून अतिरिक्त द्रव काढून टाकणे, पूर्ण विश्रांती आणि वेदनाहारक औषधे यांमुळे त्वरित आराम वाटू लागतो. जंतुसंक्रमण असल्यास प्रतिजैविकांचा उपयोग मुखावाटे किंवा कोशात अंतःक्षेपण देऊन करावा लागतो. तीव्र वेदनांसाठी बधीर करणारी द्रव्ये आणि कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा अन्य शोथहारक औषधे यांचा अवलंब करणे भाग पडते. कॅल्शियम क्षारांचे थर काढण्यासाठी द्रव पदार्थाने स्यूनाचा कोश धुवून काढणे किंवा त्याचा छेद घेवून अंतर्भाग स्वच्छ करणे किंवा पूर्ण कोश काढून टाकणे यांसारखे मार्ग वापरता येतात. तीव्र शोथाची अवस्था संपल्यानंतर हालचाल सुधारण्यासाठी विशेष प्रकारचे व्यायाम आणि भौतिकी उपचार सुरू करता येतात उदा., शेकणे, ऊतकतापन चिकित्सा ( डायाथर्मी ) इत्यादी.
श्रोत्री, दि. शं.
“