स्फिंक्स : सामान्यतः मानवी मुख आणि सिंहाचे शरीर असलेली संमिश्र प्राणिशिल्पे. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक व्याकरणातील स्फिंगेन (Sphingein) या क्रियापदापासून झाली असून त्याचा अर्थ ‘ एकत्र बांधणे ’ असा आहे. कलात्मक संकल्पना-शिल्पांची निर्मिती प्रामुख्याने ईजिप्तमध्येच झाली असली, तरी अनेक प्राचीन संस्कृतींत प्रदेशपरत्वे त्यांची भिन्न रूपे आणि सार्थकता आढळते. ईजिप्तमध्ये प्राचीन कलेत फेअरो किंवा राजा याची तुलना सिंहाबरोबर एक सामर्थ्यशाली सत्ताधीशाचे प्रतीक म्हणून प्रचलित झाली आणि त्याचे कलात्मक रूप स्फिंक्समध्ये दृग्गोचर झाले. ती अतिमानुष शक्तीचे प्रतीक मानली जाऊ लागली. यांतील गीझा (ईजिप्त) येथील स्फिंक्स इ. स. पू. २६५० वर्षांपूर्वीचे सर्वांत प्राचीन असून ते नैसर्गिक खडकात खोदलेले आहे.ते कूफूच्या पहिल्या पिरॅमिडच्या आग्नेयीस आहे. त्याचे मुख कॅफ्रे या फेअरोचे असून उंची २१ मी. व लांबी ७४ मी. आहे. पुढे हे स्फिंक्स ‘ रे ’ (सूर्य) देवतेचे स्मारक म्हणून प्रचलित झाले. ईजिप्तमध्ये काही ठिकाणी स्फिंक्सच्या रांगा आढळतात. यांतील ईजिप्तखालोखाल थीब्झ (ग्रीस) येथील स्फिंक्स विशेष प्रसिद्ध आहेत. थीब्झ येथील मंदिरांभोवती ही स्फिंक्सशिल्पे असून यांतील काही एडक्याच्या मुखाची आहेत. ग्रीक स्फिंक्स स्त्रीमुखी व पंखयुक्त असल्यामुळे त्यांचे वेगळेपण जाणवते. त्यांचा पौराणिक वाङ्मयात उल्लेख येतो. मिनोअन कलेत हस्तिदंत, अस्थी, काच आणि सोन्यावरही यांचे चित्रण उपलब्ध आहे.
या शिल्पांची निर्मिती विशेषत्वाने ‘मिडल किंगडम’ च्या काळात (इ. स. पू. २१००—१७००) झाली. बहुसंख्य स्फिंक्स पुरुषमुखी आहेत. हॅटशेपसूट राणीचे (इ. स. पू. सोळावे शतक) मुख असलेला स्फिंक्स अत्यंत कलात्मक आहे. सूर्यास्ताच्या द्वाराचे रक्षण करणारा अशी याबद्दल मूळ कल्पना असली, तरी पिरॅमिड व मंदिरांचा रक्षक म्हणूनही स्फिंक्सची योजना केली गेली असावी. कालौघात वाळूच्या वादळांनी या स्फिंक्सची नासधूस बरीच झालेली असली, तरी मानवानेही याला हातभार लावलेला आहे. तोफेचे गोळे सोडूनही याचा विध्वंस केला गेला आहे. इ. स. पू. पंधराव्या शतकात चौथा थटमोझ याने गीझा येथील स्फिंक्सवरील वाळू दूर करण्याचा प्रयत्न केला. रोमनांनी इ. स. दुसर्या-तिसर्या शतकांत याभोवती संरक्षक भिंत बांधली. एकोणिसाव्या शतकात दोन वेळा वाळू दूर करण्याचे प्रयत्न झाले. १९२५-२६ मध्ये बारेज याने वाळू दूर करून स्फिंक्सची डागडूजी केली.
संदर्भ : 1. Aldred, C. The Egyptians, New York, 1961.
2. Hassan, S. Excavations at Giza, Vol. 8 : The Great Sphinx and Its Secrets, Oxford, 1953.
3. Tarchi, Ugo, The Architecture and the Art of Ancient Egypt, London, 1983.
देशपांडे, सु. र.
“