स्त्रीमदजन : ( इस्ट्रोजेन ). प्रामुख्याने अंडाशय आणि अपरा ( वार ) या ठिकाणी उत्पन्न होणार्‍या आणि स्त्रियांमधील गौण लैंगिक लक्षणे उत्पन्न करून टिकविणार्‍या हॉर्मोनांना ( वाहिनीविहीन ग्रंथीपासून निघणार्‍या व रक्तात थेट मिसळणार्‍या उत्तेजक स्रावांना ) स्त्रीमदजन असे म्हणतात.

  निम्न वर्गाच्या प्राण्यांमध्ये ठराविक काळात उत्पन्न होणार्‍या लैंगिक उत्तेजनाला मद म्हणतात. मानवी स्त्रीमध्ये असा ठराविक वेळी उत्पन्न होणारा मद नसतो. म्हणून तेथे स्त्रीमदजन हा शब्द अगदी सार्थ नाही परंतु मानवी स्त्रीच्या आर्तवचक्राशी त्यांचा निकटचा संबंध असल्यामुळे हा शब्द प्रचारात आलेला आहे. आर्तवचक्राच्या पहिल्या विभागात स्त्रीमदजनाची उत्पत्ती अधिक प्रमाणात होत असते आणि त्यामुळे गर्भाशयादी गर्भधारणेतील महत्त्वाच्या इंद्रियांत विशिष्ट फरक पडून गर्भ-धारणेसाठी ती इंद्रिये कार्यक्षम होत असतात तसेच वयात येण्याचे सुमारास मुलींच्या गौण लैंगिक इंद्रियांची वाढ होऊन आर्तवचक्र सुरू होते, ते या स्त्रीमदजन हॉर्मोनामुळेच होत असते. ऋतुनिवृत्तीच्या वेळी ही हॉर्मोने उत्पन्न होण्याचे थांबल्यामुळेच ऋतुनिवृत्ती होते.

  रासायनिक दृष्टीने स्त्रीमदजने स्टेरॉइड संयुगांशी संबंधित असून त्यांचे तीन प्रमुख प्रकार आहेत. (१) सर्वांत अधिक प्रभावी इस्ट्राडिऑल, (२) इस्ट्रोन आणि (३) इस्ट्रिऑल अशी तीन स्त्रीमदजने असून दुसरे व तिसरे मूळ इस्ट्राडिऑलापासूनच उत्पन्न होत असावे असे मानतात. त्यांची रासायनिक संरचना सूत्रे आकृतीमध्ये दर्शविली आहेत.

आ. १. इस्ट्राडिऑल

उत्पत्तिस्थाने : स्त्रीमदजन हॉर्मोने अंडाशयातील कोशिकांत, अंड-पुटकांत व पीतपुट-कांत विपुल प्रमाणात उत्पन्न होऊन थेट रक्तात मिसळतात. गर्भधारणेनंतर गर्भा-शयातील अपरेत तसेच अधिवृक्क-बाह्यक व पुरुषांच्या वृषणांतही ती उत्पन्न होतात. 

  निसर्गतः काही वनस्पतींत स्त्रीमदजन-सम द्रव्ये सापडतात. त्यांना फायटोइस्ट्रोजेन्स असे म्हणतात. ऋतु-निवृत्तीच्या   वेळी होणार्‍या त्रासासाठी अशा द्रव्यांचा वापर केला जातो.

आ.२. इस्ट्रोन

उत्पन्न होणार्‍या एकूण स्त्रीम द जनांपै की १०% प्रमाण मूत्रमार्गे बाहेर पडते बाकीचे ९०% यकृतात नष्ट होते. स्त्रीमूत्रात ती नेहमीच उत्सर्जित होत असली तरी अंडाशयातून अंड तयार होऊन बाहेर पडण्याचे वेळी त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. गर्भधारणा झाल्यानंतर पीतपुटकांतही स्त्रीमदजने उत्पन्न होतात व पुढे अपरेत त्यांची उत्पत्ती होत राहते. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत त्यांचे प्रमाण वाढते ते बहुधा अपरेत उत्पन्न होणार्‍या स्त्रीमदजनामुळेच असावे, कारण अपरेच्या आकारानुसार त्यांचे प्रमाण कमी-अधिक होते. प्रसूतीनंतर (  वार पडून गेल्यानंतर ) त्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते.

आ.३. इस्ट्रिऑल

अधिवृक्क-बाह्यक आणि वृषण या ठिकाणी उत्पन्न होणार्‍या स्त्री-मदजनांसंबंधी अजून निश्चित ज्ञान झालेले नाही. रजोदर्शनापूर्वी मुलींत आणि ऋतुनिवृत्तीनंतर प्रौढ स्त्रियांत स्त्रीमदजने उत्पन्न होत नाहीत.

  कृत्रिम स्त्रीमदजने : स्त्रीमदजनासारखी क्रिया असलेले अनेक पदार्थ ( हॉर्मोने ) कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात यश मिळाले असून ते विविध विकारांत गुणकारी ठरलेले आहेत. या कृत्रिम पदार्थांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या गोळ्या पोटात दिल्या तरी गुणकारी ठरतात. या कृत्रिम स्त्रीमदजनांना अनेक नावे दिलेली असली तरी त्यांपैकी स्टिलबेस्ट्रॉल ( एथिनिल इस्ट्राडिऑल ) हे अधिक प्रचारात दिसते. नैसर्गिक स्त्रीमदजने टोचूनच द्यावी लागतात.

  कार्य : निम्न वर्गाच्या प्राण्यांत या हॉर्मोनांमुळे मद उत्पन्न होतो. योनी, गर्भाशय वगैरे अवयवांकडे अधिक रक्त वाहत जाऊन त्या ठिकाणी जलाचे प्रमाण फार वाढते. गर्भाशय आणि अंडवाहिनीचे स्नायू अधिक पुष्ट होऊन योनी वगैरे भाग अधिक लाल व फुगीर होतात. मानवी स्त्रीच्या आर्तवचक्रांतील पहिल्या १० — १२ दिवसांत गर्भाशय, योनिमार्ग वगैरे भागांतही असे स्थित्यंतर दिसू लागते. स्तन ग्रंथीतील दुग्धवाहिन्यांची वाढ होते. अंडाची पूर्ण वाढ होऊन ते अंडाशयातून बाहेर पडेपर्यंत हे फरक होत राहतात. त्यानंतर गर्भधारणा झाली, तर पीतपुटकाच्या हॉर्मोनाच्या ( गर्भरक्षक हॉर्मोने ) प्रमाणांत वाढ होऊन गर्भ गर्भाशयांत घट्ट बसून वाढीला लागतो. स्त्रीमदजनाचे कार्य म्हणजे गर्भाशयाच्या अंतःस्तराचीगर्भधारणेसाठी तयारी करणे हे होय.

  पुरुषांना स्त्रीमदजने दिल्यास त्यांच्या स्तन ग्रंथींची वाढ स्त्रियांप्रमाणेच होते. तसेच पोष ग्रंथींच्या अग्रखंडातील जनन ग्रंथि-उत्तेजक हॉर्मोनांची उत्पत्ती कमी पडून पुरुष व स्त्री यांच्या जनन ग्रंथींची वाढ खुंटते.


उपयोग : लहान मुलींना १० — १४ वर्षांत रजोदर्शन होते. तसे ते न झाल्यास त्याचे कारण शोधण्यासाठी स्त्रीमदजने वापरली जातात. ऋतुनिवृत्तीच्या वेळेच्या लक्षणांचा परिहार करण्यासाठी स्त्रीमदजनांचा उपयोग होतो. 

  वृद्धावस्थेत योनिमार्ग कोरडा पडून कंड सुटणे वगैरे लक्षणे उत्पन्न होतात, त्यांवर स्त्रीमदजने चांगला परिणाम घडवितात. पीनस या नासारोगात आणि अष्ठीला ग्रंथीच्या कर्करोगांत स्त्रीमदजनांचा चांगला उपयोग होतो. अनेक ऋतुदोषांत या हॉर्मोनांचा उपयोग करतात.

  स्त्रीमदजन्य द्रव्ये : अविकसित सस्तन प्राण्यांतील माद्यांमध्ये काही विशिष्ट काळीच समागमेच्छा निर्माण होते. हे कार्य त्यावेळी अंडा-शयातून परस्पर रक्तात जाणार्‍या स्त्रीमदजन्य स्रावांमुळे होते. मानवी स्त्री-शरीरात मात्र हे स्राव मुख्यतः अंडाशयातून सतत रक्तात मिसळत असतात. मासिक पाळीनंतर १४-१५ दिवसांनी म्हणजेच अंडनिर्मितीचे काळी यांचे प्रमाण सर्वोच्च आढळते. तसेच पुढील मासिक पाळीपूर्वी काही दिवस यांचे प्रमाण अल्पसे वाढलेले आढळते. अधिवृक्क ग्रंथी व पुरुषातील अंड-ग्रंथीतही यांचा स्राव अल्प प्रमाणात आढळतो. गर्भावस्थेमध्ये वारेमधून यांचा स्राव रक्तात मिसळतो.

स्त्रीमदजनाचे कार्य करणारे, परंतु रासायनिक संरचना वेगळे असणारे अनेक कृत्रिम पदार्थ तयार करण्यात आले आहेत. हे पदार्थ स्वस्त असतात व पोटातून घेता येतात.

कार्य : (१) स्त्री वयात येतेवेळी होणारे बदल [ पोष ( पिट्युटरी ) व अधिवृक्क ( ॲड्रीनल ) — बाह्यक ( कॉर्टेक्स ) यांच्या स्रावांचे मदतीने ] घडवून आणणे. गर्भाशय व योनिमार्ग यांची पूर्ण वाढ, स्तनांची वाढ, मासिक स्राव, रोमराजी, वयानुसार मानसिक बदल इत्यादी. (२) मासिक पाळी-नंतरच्या १५ दिवसांत गर्भाशयाच्या आंतरावरणाची वृद्धी घडवून आणणे.

वयाच्या सु. ४५ व्या वर्षी हे स्राव निर्माण होण्याचे बंद होते. त्यानंतर मासिक पाळी बंद होते व अंडाशय क्षय पावतात.

स्त्रीमदजन्य द्रव्यांचा औषधी उपयोग त्यांच्या कार्यानुसार पुढील विकृतींत करतात : (१) गर्भाशय व जननमार्गाची अपूर्ण वाढ, (२) योग्य वयात मासिक पाळी सुरू न होणे, (३) मासिक पाळी बंद होण्याचे वेळी त्रासदायक लक्षणे, (४) अष्ठीला ग्रंथींचा कर्करोग, (५) स्तन्यस्राव कमी करण्यासाठी, (६) स्त्रीमदजनांवर पोसल्या जाणार्‍या स्तनकर्कां-मध्ये स्त्रीमदजनर्‍हास वापरली जाणारी द्रव्ये, (७) इतर काही व्याधीं-मध्ये होणारा योनिगत रक्तस्राव कमी करण्यासाठी, (८) पुरुषांमधील अतिकामेच्छा कमी करण्यासाठी.

स्त्रीमदजनांचे दुष्परिणाम : अशा प्रकारच्या औषधांमुळे आंतर-क्लथन ( रक्ताच्या गुठळ्या तयार ) होण्याची शक्यता वाढते. या गुठळ्या रक्तप्रवाहगत होऊन अन्य अवयवांत जाऊ शकतात (आंतरकीलन). खूप दिवस अशी द्रव्ये घेतल्यास गर्भाशय अंतःस्तराचा आणि स्तनाचा कर्करोग जडण्याची शक्यता वाढते.

पहा : हॉर्मोने.

संदर्भ : 1. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976. 

           2. James, V. H. Pasqualini, J. R. (Eds.), Hormonal Steroids, 1984. 

भालेराव, कमल य.