सोलारो देला मार्गारिता, क्लेमेंत कॉन्त : (२१ नोव्हेंबर १७९२-१२ नोव्हेंबर १८६९). पीडमाँटीयन राजनीतिज्ञ. जन्म मोन्दोव्ही येथे. सिएना आणि तूरिन येथे त्याने कायद्याचा अभ्यास केला पण पीडमाँट हे त्यावेळी फ्रेंचांच्या सत्तेखाली होते आणि तो सव्हॉय घराण्याशी एकनिष्ठ होता, म्हणून त्याने पदवी नाकारली. मात्र १७२० मध्ये सव्हॉय व पीडमाँट या दोन प्रदेशांच्या राजास सार्डिनियाच्या राजाचे बिरुद प्राप्त झाले, तेव्हा त्याने पदवी स्वीकारली. तत्पूर्वी त्याने परराष्ट्रीय कार्यालयात नोकरीनिमित्त १८१६ मध्ये प्रवेश केला होता. प्रशासकीय अनुभव घेऊन तो तूरिनला आला. या सुमारास चार्ल्स ॲल्बर्ट (कार. १८३१-४९) गादीवर होता. राजाने सोलारोचे कर्तृत्व व चाणाक्ष बुद्धी लक्षात घेऊन त्यास परराष्ट्रमंत्री केले (१८३५).
सोलारोने सावध तटस्थतेचे धोरण अंगीकारून फ्रान्स व ऑस्ट्रिया या दोनही देशांशी सार्डिनियाचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले मात्र संविधानात्मक सुधारणांना त्याने विरोध केला. तसेच इटालियन एकी-करणाच्या प्रयत्नासही त्याचा विरोध होता. या सुमारास ‘रीसॉर्जमेन्तो’ ही एकीकरणवाद्यांची चळवळ त्याच नावाच्या पत्राद्वारे आघाडीवर होती. त्यामुळे चार्ल्स ॲल्बर्टला सोलारोला पदच्युत करणे क्रमप्राप्त झाले (१८४७). ॲल्बर्टनंतर गादीवर आलेल्या दुसऱ्या व्हिक्टर इमॅन्यूएलच्या कारकिर्दीत (१८४९–६१) कामील्लो काव्हूर पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री झाला (१८५२). इ. स. १८५३ मध्ये सान क्यूरिको शहराचा प्रतिनिधी म्हणून सोलारोची निवड करण्यात आली. नंतर तो पीडमाँट संसदेचा सदस्य झाला (१८५४–६०). हे यश त्याला त्याच्या दृढ इच्छाशक्तीने व चिकाटीने मिळाले होते. तेव्हा त्याने संविधानात्मक सुधारणा आणि इटलीचे एकीकरण यास पीडमाँटच्या संसदेत जोरदार प्रतिकार केला आणि प्रतिगामी विरोधी पक्षाचे नेतृत्व केले पण इटलीचे एकीकरण घडून आले. तेव्हा तिच्या पहिल्या संसदेत तो निवडणूक हरला (१८६०). त्यामुळे राजकारणातून निवृत्त होऊन तो अलिप्त राहिला पण त्याची प्रतिगामी वृत्ती नष्ट झाली नाही. अल्पशा आजाराने त्याचे तूरिन येथे निधन झाले.
सोलारो याचा मेमोरँडम स्टोरिको-पॉलिटीको (१८५१) हा ग्रंथ राजा चार्ल्स ॲल्बर्टच्या कारकिर्दीतील पीडमाँट व इटली यांतील तत्कालीन राजकीय परिस्थितीचा वर्णन करणारा एक विश्वसनीय दस्तऐवज असून त्यात त्याने आपली तात्त्विक भूमिका आणि पीडमाँटचे राजकीय धोरण विशद केले आहे.
पहा : काव्हूर, कामील्लो बेन्सो दी.
गेडाम, आनंद