सोपानदेव : (१२७७-१२९६). मराठी संतकवी. ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे आपेगाव येथे जन्मली असे सर्वसाधारणपणे मानण्यात येत होते. तथापि नामदेवांच्या अभंगांतील काही निर्देशांवरून असे दिसते, की ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे आपल्या आईवडिलांच्या निधनानंतर आळंदीसच आपल्या सासज्यांच्या घरी येऊन राहिले. त्यामुळे ज्ञानदेवादी भावंडे आळंदीसच जन्मली असे मानता येते. तथापि, पक्क्या पुराव्याच्या अभावी ह्याबाबत सर्वसंमती होणे कठीण आहे. ज्ञानदेवादी भावंडांच्या समाधीचे सन सर्वमान्य असले, तरी त्यांच्या जन्मसनांबाबत मात्र दोन मते आहेत. पहिल्या मतानुसार सोपानदेवांचा जन्म शके ११९९ मध्ये म्हणजे १२७७ साली झाला, तर दुसऱ्या मतानुसार तो शके ११९६ मध्ये म्हणजे १२७४ साली झाला. ज्ञानदेवादी चार भावंडांमध्ये निवृत्तिनाथ हे सर्वांत वडील होते. त्यांनी नाथपंथीय सत्पुरुष गैनीनाथ वा गहिनीनाथ ह्यांच्याकडून गुरुपदेश घेतला होता. तोच त्यांनी आपल्या धाकट्या भावंडांनाही दिला. त्यामुळे सोपानदेवांची गुरुपरंपरा आदिनाथ ⟶ मच्छिंद्रनाथ ⟶ गोरक्षनाथ ⟶ गैनीनाथ ⟶ निवृत्तिनाथ ⟶ सोपानदेव अशी आहे.

विठ्ठलपंतांनी गृहत्याग करून काशीच्या ज्या श्रीपादस्वामींकडून संन्यासदीक्षा घेतली होती, त्यांच्याच आदेशानुसार आळंदीला येऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला होता. हे लोकांना रुचलेले नव्हते. त्यामुळे ‘संन्याशाची मुले’ म्हणून ह्या भावंडांना जे सोसावे लागले ते सोपानदेवांनीही सोसले.

सोपानदेवांच्या रचनेत पंचीकरण, नमन, हरिपाठ, प्राकृत गीता इ. प्रकरणे, तसेच सोपानदेवी ही गीतेवरील टीका, अभंग, पदे ह्यांचा समावेश होतो. पंचीकरण, प्राकृत गीता आणि सोपानदेवी ह्या रचना सोपानदेवांच्याच असे निश्‍चयाने सांगता येत नाही, असे एक मत मांडले गेले आहे. सोपानदेवांची अभंगरचना थोडी असली, तरी गोड आहे. मुळात उपलब्ध असलेल्या त्यांच्या सु. ६० अभंगांत ज. बा. कुलकर्णी ह्या संशोधकांनी पुणे आणि धुळे येथील जुनी बाडे पाहून सोपानदेवांचे म्हणून ३४ अभंग शोधून काढले. सोपानदेवांच्या गाथेतल्या अभंगांचे स्वरूप पाहता, हे ३४ अभंग सोपानदेवांचेच असावेत. त्यांच्या गाथेतल्या अभंगांशी ह्या अभंगांचे खूपच साम्य जाणवते. त्यांच्या अभंगांवर ज्ञानेश्वरांचा प्रभाव आहे. परखडपणा हा त्यांच्या अभंगांचा एक विशेष आहे पण त्याबरोबरच त्यांच्या मनाचा हळुवारपणाही त्यांतून प्रकट होतो.

सोपानदेवांनी सासवड येथे समाधी घेतली.

संदर्भ : १. खानोलकर, गं. दे. मराठी वाङ्मयकोश, खंड पहिला, मुंबई, १९७७.

           २. तुळपुळे, शं. गो. संपा. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड पहिला, पुणे, १९८४.

           ३. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, खंड १, आवृ. सहावी, मुंबई, १९८२.

           ४. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, खंड २, आवृ. सहावी, तुळपुळे, शं. गो. ह्यांच्या पुरवणीसह, मुंबई १९८३.

कुलकर्णी, अ. र.