सोनगाव : पुणे जिल्ह्यातील ताम्रपाषाण संस्कृतीचे एक स्थळ. पुण्यापासून आग्नेयीस सु. ९५ किमी. व बारामतीच्या पश्‍चिमेस १० किमी. वर ते निरा आणि कर्‍हा या नद्यांच्या संगमाजवळ वसले असून येथे पांढरीची दोन टेकाडे आढळली. ही टेकाडे सलग असावीत. यांचे १९६५ साली उत्खनन करण्यात आले. उत्खननात इ.स.पू. सोळावे शतक ते इ.स.पू.सु. १००० या कालातील नवाश्मयुगीन ते ताम्रपाषाणयुगा पर्यंतच्या वस्त्यांचा पुरावा उपलब्ध झाला.

नवाश्मयुगीन वस्तीचे लोक जमिनीमध्ये एक ते दोन मीटर व्यासाचे सु. एक मीटर खोलीचे खड्डे खोदून व त्यावर लाकडी वाश्यांच्या साहाय्याने निमुळते छप्पर उभारून त्यांत राहात असत. यांतील काही खड्डे धान्य साठविण्यासाठी बळदे म्हणूनही उपयोगात आणली जात असावीत. महाराष्ट्रात ⇨ दायमाबाद (अहमदनगर जिल्हा) व इनामगाव (पुणे जिल्हा) येथील उत्खननातही अशा प्रकारचा पुरावा उपलब्ध झाला आहे. हे लोक राखी रंगाची हातबनावटीची आणि साधी अनलंकृत लाल रंगाची मडकी वापरीत असत. या पुराव्यावरून हे लोक नवाश्मयुगीन संस्कृतीचे होते, असे स्पष्ट होते. या कालखंडातील थरात सापडलेल्या कोळशाचे कार्बन १४ पध्दतीने केलेले कालमापन इ.स.पू.सु.चौदावे शतक ते इ.स.पू. नववे शतक असा निश्‍चित करता आलेला आहे.

यानंतरची वस्ती ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या लोकांनी केली. यातही दोन कालखंड दिसून आले. पहिल्या कालखंडात ‘माळवा’ संस्कृतीच्या लोकांनी येथे वसाहत केली. उत्कृष्ट चित्रकारी असलेली आणि विविध आकाराची मडकी यांच्या वापरात होती. याशिवाय आधीच्या कालखंडातील राखी रंगाची मडकीही प्रचलित होती. उत्खनन मर्यादित स्वरूपाचे असल्याने संपूर्ण घरांचे स्वरूप समजू शकले नाही, तरी यानंतरच्या ‘जोर्वे’ संस्कृतीच्या कालखंडातील घरातील माती चोपून केलेल्या व चुन्याचे सारवण केलेल्या जमिनीचे अवशेष स्पष्ट झाले. याच कालखंडातील घरात मडक्यात दफन केलेली चार लहान मुलांची दफने सापडली. ही महाराष्ट्रात या संस्कृतीच्या नेवासे, चांदोली, इनामगाव, दायमाबाद इ. स्थळी सापडलेल्या दफनांसारखीच आहेत. या कालातील वस्तीच्या थरात जळालेला गहू मोठ्या प्रमाणात सापडला. याचे कार्बन-१४ कालमान पध्दतीनुसार इ. स. पू. १२९५-९३ असे झालेले आहे.

तिसऱ्या कालखंडात ‘जोर्वे’ संस्कृतीची अवनती झाल्याचे दिसून आले. मडक्यांच्या आकारात, सुबकपणात आणि चित्रकारीत नेटकेपणा कमी झाला. एका नव्या वर्णाच्या खापरांचा-काळी आणि तांबडी-वापर या कालात सुरू झाला. यांचा काल इ.स.पू.सु. १००० असा अनुमानीत करता येतो. येथील वस्तीचा अंत कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही.

संदर्भ : Deo, S. B. Songaon Excavation : 1967, Pune, 1969.

देव, शां. भा.