सोडियम : धातुरूप मूलद्रव्य चिन्ह Na अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ११ अणुभार २२·९८९८ आवर्त सारणीच्या [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीच्या ⟶ आवर्त सारर्णी] पहिल्या गटातील अ विभागामधील लिथियमानंतरचे मूलद्रव्य घनता ०·९७ ग्रॅ./घ.सेंमी. (२०० से.ला), ०·९२८ ग्रॅ./घ.सेंमी. (१००० से.ला), ०·७५७ ग्रॅ./घ.सेंमी. (८००० से.ला) वितळबिंदू ९७·८० से., उकळबिंदू ८९२० से. संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) १ विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणुकेंद्राबाहेरील मांडणी) २, ८, १ व IS2 2S2 2P6 3S1 सोडियम मऊ, घनरूप असून त्याची चमक धातवीय, चांदीसारखी पांढरी असते.

लिथियम (Li), सोडियम (Na), पोटॅशियम (K), रुबिडियम (Rb), सिझियम (Cs) व फ्रॅन्सियम (Fr) या धातूंच्या गटाला अल्कली (क्षारीय) धातू म्हणतात. यांपैकी सोडियमाचे पृथ्वीच्या कवचातील प्रमाण २·८३ टक्के असून सोडियम संयुगांच्या रूपात आढळते. भूकवचातील विपुलतेच्या बाबतीत ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह व कॅल्शियम या मूलद्रव्यांनंतर सोडियमाचा सहावा क्रमांक आहे. सागरी पाण्यात सोडियम विपुलतेच्या बाबतीत क्लोरिनानंतर दुसज्या क्रमांकावर असलेले मूलद्रव्य आहे व ते त्यामध्ये संयुगाच्या विद्रावाच्या रूपात आढळते. सोडियम क्लोराइड (सैंधव), सोडियम कार्बोनेट (सोडा व ट्रोना), सोडियम बोरेट (टाकणखार), सोडियम नायट्रेट (चिली सॉल्ट पीटर) व सोडियम सल्फेट ही सोडियमाची निसर्गात आढळणारी प्रमुख लवणे आहेत. ही लवणे सागरी पाण्यात, खारी सरोवरे, क्षारीय सरोवरे व खनिज झरे यांमध्ये आढळतात.

इतिहास : प्राचीन काळापासून सोडियमाची लवणे माहीत आहेत. ओल्ड टेस्टामेंटमध्ये जिुना करार यामध्ये ⟶ बायबर्लें सोडियमाच्या एका लवणाचा नेटर (सोडियम कार्बोनेट) या नावाने उल्लेख आलेला आहे. वनस्पतींच्या राखेतून हे लवण मिळवीत असत.

सर हंफ्री डेव्ही यांनी १८०७ मध्ये ऑक्टोबर महिन्यात प्रथम पोटॅशियम व काही दिवसांनी सोडियम ही मूलद्रव्ये वेगळी शोधून काढली. सोडियम हे नाव इटालियन सोडा या संज्ञेवरून आले असून मध्ययुगात सर्व क्षारांना सोडा म्हणत असत. जर्मन रसायनशास्त्रज्ञ सोडियमासाठी नॅट्रियम हे नाव वापरीत असत व या नावावरून सोडियम धातूचे Na हे रासायनिक चिन्ह आले आहे. एकोणिसाव्या शतकात ॲल्युमिनियम धातूच्या उत्पादनात सोडियम विक्रियाकारक म्हणून वापरीत. ॲल्युमिनियमाच्या शुद्धीकरणाकरिता विद्युत् विच्छेदनाची प्रक्रिया प्रस्थापित झाल्यावर सोडियमाचा असा मोठ्या प्रमाणावरील वापर थांबेल, असे वाटले होते. तथापि, सोडियमाच्या विद्युत् विच्छेदनीय उत्पादनामध्ये सुधारणा झाल्यावर सोडियम उत्पादनाचा खर्च कमी झाला. त्यामुळे सोडियम पेरॉक्साइड निर्मितीच्या प्रक्रियेसारख्या प्रक्रियांमध्ये सोडियम किफायतशीरपणे वापरणे शक्य झाले. विद्युत् विच्छेदनीय प्रक्रियेमधील मुख्य सुधारणा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइडाचे अखंड विद्युत् विच्छेदन हे होय आणि या तंत्राला कास्नर प्रक्रिया म्हणतात. १९२६ मध्ये डाउन्स-विद्युत् घट प्रक्रिया पुढे येईपर्यंत कास्नर प्रक्रिया वापरली जात होती. डाउन्स-विद्युत् घट प्रक्रियेत सोडियम क्लोराइड-कॅल्शियम क्लोराइड या वितळलेल्या मिश्रणाचे विद्युत् विच्छेदन करतात. या प्रक्रियेने सोडियम उत्पादनाच्या जुन्या प्रक्रियेची जागा मोठ्या प्रमाणात घेतली.

आढळ व निर्मिती : सर्व अल्कली धातूंमध्ये सोडियम सर्वांत विपुलपणे आढळते. सोडियम क्लोराइड (मीठ) हे सोडियमाचे सर्वांत सामान्य संयुग आहे. मात्र सोडियमाची इतर संयुगेही परिचित आहेत. फेल्स्पारे व अभ्रके यांसारख्या अनेक सिलिकेटी द्रव्यांचा सोडियम महत्त्वाचा घटक आहे. जगातील विविध प्रदेशांमध्ये सैंधवाचे मोठे निक्षेप (साठे) आढळतात. तसेच चिली व पेरू या देशांमध्ये सोडियम नायट्रेटाचे निक्षेप आहेत. सागरातील सोडियमाचे प्रमाण सु. १·०५ टक्का एवढे असून हे प्रमाण सोडियम हॅलाइडांच्या सु. ३ टक्के संहतीशी तुल्य आहे. तारे व आंतरतारकीय माध्यम या दोन्हींच्या वर्णपटांमध्ये सोडियम आणवीय व आयनी (विद्युत् भारित अणूच्या) या दोन्ही रूपांत असल्याचे आढळले आहे. मअशनींच्या विश्‍लेषणातून त्यात असलेल्या सिलिकेटी द्रव्यात सिलिकॉनाच्या दर १०० अणूंमागे सोडियमाचे सरासरीने सु. ४·६ अणू असतात, असे दिसून आले आहे.

अल्कली धातूंपैकी सोडियम सर्वाधिक व्यापारी महत्त्व असलेली धातू आहे. सोडियम निर्मितीच्या सर्व प्रक्रियांमध्ये सोडियम क्लोराइडाच्या विद्युत् विच्छेदनाचा संबंध येतो. सोडियम मुख्यत: टेट्राएथिल लेड (झल(उ२क५)४ या कार्बनी संयुगाच्या निर्मितीसाठी वापरतात. टेट्राएथिल लेड हे शिशाचे अतिशय विषारी संयुग असून ते पेट्रोलमध्ये अल्प प्रमाणात घातल्यास या इंधनाची आघातरोधी गुणवत्ता वाढते. सोडियमाची क्लोराइड, हायड्रॉक्साइड, कार्बोनेट व सल्फेट ही संयुगे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहेत. उदा., मिठाची मोठी राशी इतर जड (औद्योगिक) रसायनांच्या निर्मितीमध्ये वापरली जाते. सोडियमाची पेरॉक्साइड, सल्फाइड आणि क्लोराइडाशिवाय असलेली हॅलाइडे ही कमी महत्त्वाची संयुगे आहेत.

गुणधर्म : भौतिक : सोडियमाचे काही भौतिकीय गुणधर्म सुरुवातीला आले आहेत. येथे काही इतर महत्त्वाचे गुणधर्म पुढे दिले आहेत. संगलन उष्णता ६२२ कॅ./मोल विशिष्ट उष्णता (द्रव) ०·३३° से. कॅ./ग्रॅ. विद्युतीय रोधकता (०° से.ला) ४.२ मायक्रोओहम-सेंमी. स्फटिक संरचना शरीरकेंद्रित घनीय यामुळे ज्योतीला पिवळा रंग येतो मुख्य वर्णपट उत्सर्जक रेषा ५८९० व ५८९६ चुंबकीय प्रवणता १६·० X १०-६ (सेंमी. ग्रॅ. से.) अणूची त्रिज्या १·८५ अँगस्ट्रॉम, आयनाची (Na’) त्रिज्या ०·९७ अँगस्ट्रॉम धातवीय त्रिज्या (एक बंध) १·५७२ अँगस्ट्रॉम वगैरे. (१ अँगस्ट्रॉम = १०-१० मी.).

रासायनिक : सोडियमाचा रासायनिक अभ्यास पुष्कळ झाला असून सोडियम लिथियमापेक्षा अधिक विक्रियाशील आहे आणि जलीय विद्रावात त्याची विक्रिया होऊन लिथियम हायड्रॉक्साइडापेक्षा (ङळजक) अधिक प्रबल क्षारक तयार होतो. सामान्यपणे सोडियमाची हवेशी विक्रिया होते. हवेतील वाफेच्या प्रमाणावर ही विक्रिया अवलंबून असते. घनरूपातील सोडियमाचे ऑक्सिजनाने संक्षारण (भक्षण) होते व सोडियमातील अल्पशा अशुद्धीमुळे संक्षारणाची गती वाढते. सर्वसाधारण हवेमध्ये सोडियम धातूची विक्रिया होऊन सोडियम हायड्रॉक्साडाचे पटल निर्माण होते हे पटल हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड जलदपणे शोषून घेते व सोडियम बायकार्बोनेट तयार होते. सोडियमाची नायट्रोजनाशी विक्रिया होत नाही. घनरूप सोडियमापेक्षा द्रवरूप सोडियमाची हवेशी अधिक प्रमाणात विक्रिया होते आणि द्रवरूप सोडियम १२५० से. तापमानाला पेटू शकतो. सापेक्षत: शुष्क वातावरणात सोडियमाचे ज्वलन शांतपणे होते आणि त्यातून दाट, दाहक व पांढरा धूर बाहेर पडतो. या धुराने खोकला येऊ शकतो व गुदमरायला होऊ शकते. सोडियमाचे ज्वलनाचे तापमान जलदपणे वाढून ८००० से. पेक्षा अधिक होते आणि अशा परिस्थितीत ही आग विझविणे हे अतिशय अवघड होते.

शुष्क हवेत सोडियमाचे ऑक्सिडीकरण केल्यास सामान्यपणे सोडियम मोनॉक्साइड (Na2O) तयार होते. उच्च दाबयुक्त ऑक्सिजन असलेल्या तापविलेल्या दाबपात्रात (ऑटोक्लेव्हमध्ये) सोडियम धातू ३००० से. पर्यंत तापविल्यास सोडियमाचे सुपरऑक्साइड (Na2O) तयार करता येते. मोठे पृष्ठफळ असलेल्या सोडियम पेरॉक्साइडाचे ऑक्सिडीकरण केल्यासही सोडियम सुपरऑक्साइड तयार होते.


सोडियम मोनॉक्साइडाने मोठ्या प्रमाणात संदूषित झालेला सोडियम गालन क्रियेने सहजपणे शुद्ध करता येतो. कारण वितळलेल्या सोडियमामधील या ऑक्साइडाची विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) कमी असते. मोठ्या द्रवरूप धातू विक्रियाकारक प्रणालींमधील सोडियमाच्या शुद्धीकरण्याच्या अखंड प्रक्रियांमध्ये या कमी विद्राव्यतेचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतात. शीत स्थानबंधन हे सदर ऑक्साइड काढून टाकण्याचे दुसरे तंत्र आहे. या तंत्रात थंड केलेल्या द्रव्याच्या स्थिर बद्ध स्तरातून वितळलेला सोडियम जाऊ देतात. या स्तरावर सदर ऑक्साइडाचे अवक्षेपण होऊ शकते. कार्बोनेट, हायड्रॉक्साइड व हायड्राइड यांच्या समग्र राशी काढून टाकण्यासाठी गालन व शीत स्थानबंधन या क्रिया प्रभावी आहेत.

उच्च पृष्ठीय क्षेत्रफळ असणाज्या द्रवरूप सोडियमाची पाण्याबरोबरची विक्रिया स्फोटक होऊ शकते. सोडियम-पाणी विक्रिया अतिशय ऊष्मोत्सर्जक (उष्णता बाहेर टाकणारी) आहे.

Na2 + H2O ⟶ NaOH + 1/2 H2 + ३३·६७ किकॅ./मोल उष्णता. (२५° से.ला)

 तथापि, सोडियम व पाणी यांचे मिश्रण पुरेसे जलदपणे होऊ शकत नसल्याने आघात तरंग निर्माण होत नाहीत. आघात तरंग हे तीव्र स्फोटक द्रव्यांचे वैशिष्ट्य आहे. या विक्रियेच्या स्फोटक धोक्यांचा संबंध हा तेव्हा तयार होणाऱ्या हायड्रोजन वायूशी असतो.

शुद्ध सोडियम सु. १००° से. तापमानाला लक्षात येईल एवढ्या प्रमाणात हायड्रोजनाचे शोषण करू लागतो. या शोषणाची त्वरा तापमानानुसार वाढत जाते. ३५०° से. पेक्षा अधिक तापमानाला सोडियमाचा उच्च प्रवाह त्वरा असलेल्या हायड्रोजनाशी संपर्क आल्यास शुद्ध सोडियम हायड्राइड तयार होऊ शकते. सोडियम हायड्राइडाचे विदलन (विच्छेदन) लिथियम हायड्राइडापेक्षा पुष्कळच जास्त असते, परंतु पोटॅशियम हायड्राइडाच्या विदलनापेक्षा किंचित कमी असते.

सर्वसाधारणपणे अल्कली धातूंची हॅलोजन वायूंशी (फ्ल्युओरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन व ॲस्टटीन वायूंशी) विक्रिया होते. या विक्रियेची विक्रियाशीलता हॅलोजनांच्या वाढत्या अणुभारांनुसार कमी होत जाते, याला सोडियम अपवाद नाही. विक्रियेच्या विशिष्ट परिस्थितींमध्ये सोडियम व हॅलोजन यांच्या बाष्पांची विक्रिया होऊन प्रकाश निर्माण होतो, ही रासायनिक दीप्ती होय. हायड्रोक्लोरिक अम्लासारख्या हॅलोजन अम्लांची सोडियमाशी जोरदार विक्रिया होऊन सोडियम हॅलाइडे तयार होतात. या विक्रिया अतिशय ऊष्मोत्सर्गी आहेत. हायड्रोफ्ल्युओरिक व हायड्रोक्लोरिक अम्लांबरोबरच्या सोडियमाच्या विक्रियांमधून अनुक्रमे – ७१·८ व -७६.२ किलोकॅलरी उष्णता बाहेर पडते. इतर तीव्र खनिज अम्लांची सोडियमावर विक्रिया होऊन तदनुरूप लवणे तयार होतात. सोडियमाची १५° से. तापमानाला नायट्रिक अम्लाच्या वाफेशी (धुराशी) विक्रिया होऊन सोडियम नायट्रेट तयार होते तर ॲसिटिक व सल्फ्यूरिक अम्लांशी याची विक्रिया होऊन अनुक्रमे सोडियम ॲसिटेट व सोडियम सल्फेट ही लवणे तयार होतात. वितळलेल्या गंधकाबरोबर सोडियमाची जोरदार विक्रिया होऊन पॉलिसल्फाइडे तयार होतात. याहून अधिक नियंत्रित परिस्थितींमध्ये सोडियमाची गंधकाच्या कार्बनी विद्रावांशी विक्रिया होते. द्रवरूप सेलेनियम व टेल्युरियम या दोन्हींची घनरूप सोडियमाशी जोरदार विक्रिया होऊन सेलेनाइडे व टेल्युराइडे तयार होतात.

कार्बनाबरोबरची सोडियमाची विक्रियाशीलता सापेक्षत: थोडीच आढळते. तरीही ग्रॅफाइटापासून बनविलेली NaC64 हे रासायनिक सूत्र असलेली पटलित (स्तरासारखी) द्रव्ये अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. ६२५° से. तापमानाला कार्बन मोनॉक्साइडाबरोबर सोडियमाची विक्रिया होऊन सोडियम कार्बाइड व सोडियम कार्बोनेट ही लवणे तयार होतात.

टिटॅनियम, झिर्कोनियम व हाफ्नियम या धातूंच्या ऑक्साइडांचा अपवाद वगळता सर्व ⇨ संक्रमणी मूलद्रव्यांच्या ऑक्साइडांचे सोडियम मूलद्रव्याने ⇨ क्षपण होऊन संबंधित धातू तयार होतात. धातूंच्या असंख्य हॅलाइडांशीही सोडियमाची विक्रिया होते आणि हॅलाइडातील धातूचे विस्थापन होऊन सोडियम हॅलाइड बनते. ही विक्रिया खुद्द अनेक संक्रमणी धातूंच्या (उदा., टिटॅनियम, टँटॅलम इ.) निर्मितीसाठी वापरतात.

सोडियम द्रवरूप अमोनियात विरघळून प्रखर निळे विद्राव तयार होतात आणि सर्वसाधारण तापमानांना अशा विद्रावांमध्ये मंद विक्रिया होऊन सोडामाइड (NaNH2) व हायड्रोजन तयार होतात. अल्कली धातूंचे त्यांच्या अमाइडांमध्ये परिवर्तन होण्यासाठी लिथियम व सोडियम या धातूंच्या बाबतीत अनेक दिवस लागतात परंतु अधिक जड अल्कली धातूंच्या बाबतीत असे परिवर्तन अर्ध्या तासात किंवा याहून कमी वेळात होते तर सिझियमच्या बाबतीत असे परिवर्तन फक्त १५ मिनिटांत होते. धातूच्या व धातू ऑक्साइडाच्या रूपातील उत्प्रेरक घालून सोडियम व द्रवरूप अमोनिया यांच्यातील विक्रिया उत्पेरित (प्रेरित) करणे शयय आहे. [⟶ उत्प्रेरण].

पुष्कळदा द्रवरूप अमोनिया सोडियमाचा विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) म्हणून वापरतात. त्यामुळे अनेक विक्रिया सर्वसाधारण तापमानाला करणे शयय होते. अन्यथा त्यांसाठी उष्णता लागली असती. उदा., सोडियमाच्या विद्रावांमधून -७७° से. ला ऑक्सिजन पाठवून सोडियम सुपरऑक्साइड तयार करता येऊ शकते. आर्सेनिक, टेल्युरियम, अँटिमनी, बिस्मथ आणि कमी वितळबिंदू असणाज्या इतर अनेक धातूंबरोबरच्या सोडियमाच्या विक्रियांसाठीही अमोनियाचा विद्रावक म्हणून उपयोग होतो.

सोडियमाच्या कार्बनी विक्रियांचा इतर कोणत्याही अल्कली धातूंच्या कार्बनी विक्रियांपेक्षा पुष्कळच अधिक व्यापक अभ्यास झाला आहे. निर्जल अल्कोहॉलांबरोबर सोडियमाची विक्रिया होऊन यथाक्रम अल्कोहॉलेटे तयार होतात. मिथेनॉलाबरोबर होणारी सोडियमाची विक्रिया जोमदार असून अल्कोहॉलाच्या वाढत्या रेणुभारानुसार विक्रियेचा जोम कमी होत जातो. जादा मिथेनॉलाबरोबरच्या सोडियमाच्या विक्रियेद्वारे सोडियम मेथॉक्साइड औद्योगिक पातळीवर निर्माण करतात. कार्बनी अम्लांची सोडियमाबरोबर विक्रिया होऊन सोडियमाची लवणे तयार होतात.


सोडियम हॅलाइडांच्या निर्मितीतून निर्माण होणाज्या उच्च मुक्त ऊर्जेमुळे असंख्य कार्बनी हॅलाइडांचा हॅलोजननिरास होऊ शकतो व सोडियमाचे हॅलाइड होण्यास मदत होते. या तत्त्वावर आधारलेली तथाकथित वुर्ट्झ विक्रिया मोठ्या प्रमाणावर कार्बनी संश्‍लेषणात वापरतात.

2RCI + 2Na ⟶ R – R + 2NaCI

(या प्रक्रियेत ठ हा अल्किल गट दर्शवितो.)

या विक्रियेने ब्रोमोब्युटेन व सोडियम यांच्यापासून ऑयटेन तयार करता येते. व ऑरगॅनोसोडियम (कार्बनी सोडियम) संयुगांमध्ये सोडियम अणू थेट एका कार्बन अणूला बद्ध झालेला असतो उदा., मिथिल सोडियम -३. अशी संयुगे सोडियमाची मयर्युरी डाय-अल्किले किंवा डाय-ॲरिले यांच्यावर विक्रिया करून तयार करता येतात. हे खालील समीकरणात दाखविले आहे.

Hg (CH3)2 + 2Na ⟶ 2NaCH3 + Hg

अनेक हॅलोजनित हायड्रोकार्बनांबरोबर सोडियम जोरदारपणे विक्रिया करते. जेव्हा कार्बन टेट्राक्लोराइड व सोडियम यांच्या मिश्रणावर आघात होतो, तेव्हा जोरदार स्फोट होतो, आणि अगदी सोडियम पारदमेलातील प्रमाणे सोडियम जेव्हा पुष्कळ विरल केला जातो, तेव्हाही त्याची कार्बन टेट्राक्लोराइडाबरोबर जलद विक्रिया होते.

आवर्त सारणीतील सोडियमाच्या खाली असणाज्या पोटॅशियम, रुबिडियम व सिझियम या अल्कली धातूंमध्ये सोडियम पूर्णपणे मिश्रणीय आहे. व्यापारी दृष्ट्या म्हणून ओळखण्यात येणाज्या सोडियम-पोटॅशियम प्रणालीमध्ये -१०° से. ला द्रवणक्रांतिक वितळण्याची क्रिया घडते (जी मिश्रधातू तिच्या घटकांपेक्षा कमी तापमानाला वितळते तिला द्रवणक्रांतिक म्हणतात). या मिश्रधातूचे संघटन अंदाजे ७८ टक्के पोटॅशियम असून ती मिश्रधातू उष्णता संक्रमण (उष्णतांतरण) द्रायू (द्रव अथवा वायू) व कार्बनी विक्रिया घटक म्हणून वापरतात. सोडियम-रुबिडियम आणि सोडियम-सिझियम या द्वि-अंगी प्रणालींमध्ये तयार झालेले द्रवणक्रांतिक अनुक्रमे -४·५° व -३०° से.ला वितळते. NaKCs या त्रि-अंगी मिश्रधातूमध्ये सोडियम ही पोटॅशियम व सिझियम यांच्याबरोबरचा गौण घटक आहे. ही मिश्रधातू -७८° से.ला वितळते. आतापर्यंत अलग केलेल्या सर्वांत कमी तापमानाला वितळणारी ही द्रवरूप मिश्रधातू आहे.

सोडियम क्षारीय मृत्तिका धातूंबरोबरही मिश्रधातू तयार करते. बेरिलियम सु. ८००° से. तापमानाला केवळ काही आणवीय टक्क्यांपर्यंतच सोडियमात विद्राव्य (विरघळणारा) आहे. द्रवरूप सोडियम व मॅग्नेशियम केवळ अंशत: मिश्रणीय आहेत. क्षारीय मृत्तिका धातूंची सोडियमातील विद्राव्यता मात्रा वाढत्या अणुभारानुसार वाढत जाते. परिणामी ७००° से. ला कॅल्शियमाची विद्राव्यता वजनामध्ये १० टक्के आहे. सोडियम-स्ट्राँशियम प्रणालीत मिश्रणीयतेची मात्रा बरीच आहे. सोडियमाची बेरियमाबरोबर अनेक संयुगे तयार होतात आणि या प्रणालीत अनेक द्रवणक्रांतिके आहेत.

चांदी, सोने, प्लॅटिनम, पॅलॅडियम व इंडियम या मौल्यवान धातू आणि शिसे, कथिल, बिस्मथ व अँटिमनी यांच्यासारख्या पांढज्या धातू यांच्या द्रवरूप सोडियमाबरोबर लक्षात येईल इतक्या प्रमाणात मिश्रधातू बनतात. कॅडमियम व पारा यांचीही सोडियमाशी विक्रिया होते आणि या दोन्ही द्वि-अंगी प्रणालीत अनेक संयुगे अस्तित्वात आहेत, सोडियम-पारा संयुगे किंवा पारदमेल (पाज्याबरोबरचा मिश्रधातू) अस्तित्वात असून २ या मिश्रधातूचा वितळबिंदू सर्वाधिक (३५४° से.) आहे. शुद्ध सोडियम मूलद्रव्य ज्या परिस्थितीत जोरदारपणे विक्रियाशील व नियंत्रित करायला अवघड असेल अशा परिस्थितीत मुख्यत: विक्रिया घडवून आणण्यासाठी सोडियम पारदमेल वापरतात. अल्कली धातूंमधील संक्रमणी धातूंची विद्राव्यता सर्वसाधारणपणे कमी आहे. अगदी ५००° से. पेक्षा अधिक तापमानालाही दशलक्ष भागांत पुष्कळदा ही विद्राव्यता १ ते १० भाग एवढीच असते.

अणुकेंद्रीय गुणधर्म : या बाबतीत सोडियम (२३) हा एकच नैसर्गिक समस्थानिक साधा आहे. हा समस्थानिक नैसर्गिक किरणोत्सर्गी नाही, अणुकेंद्रीय विक्रियांनी त्याचे अनेक समस्थानिक तयार करण्यात आले, यांपैकी सोडियम (२२) या किरणोत्सर्गी समस्थानिकाचा अर्धायुकाल सर्वाधिक म्हणजे २·६ वर्षे आहे. १५·५ तास अर्धायुकाल असलेला सोडियम (२४) हा समस्थानिक अणुकेंद्रीय विक्रियकातील (अणुभट्टीतील) किरणीयनाने तयार केला आहे. या विक्रियेमुळे सोडियमाद्वारे शीतन करण्यात येणाऱ्या अणुविक्रियकात दुसरा उष्णता-संक्रमण पाश (वेटोळे) असणे आवश्यक असते. यामुळे किरणोत्सर्गी सोडियम पर्यावरणाच्या संपर्कात येत नाही.

जीववैज्ञानिक गुणधर्म : सोडियम लवणे, विशेषत: सोडियम क्लोराइड जैव द्रव्यात जवळजवळ सर्वत्र आढळतात. जीवनासाठी सोडियम हे पोटॅशियमाप्रमाणे आवश्यक मूलद्रव्य आहे आणि ही दोन्ही मूलद्रव्ये कोशिकेच्या (पेशीच्या) संरचनेमध्ये निश्‍चित समतोल टिकवून ठेवतात. सोडियमाच्या संयुगांचे बहुतेक जीववैज्ञानिक परिणाम हे ऋणायनाचे (सोडियम आयनाचे) परिणाम असतात आणि धनायनाचे यासंबंधातील कार्य प्रभावी नसते, हे उघडच आहे.

मृदांमधील लवणता (खारेपणा) ही पुष्कळदा वनस्पतीच्या वाढीच्या दृष्टीने हानीकारक असते. मृत्तिका जटिलांमध्ये सोडियम आयन कॅल्शियम व इतर आयनांची जागा घेतात. यामुळे मृत्तिकेचे चोपण मातीत परिवर्तन होते. यामुळे तिच्यातून पाण्याचे निचरण तीव्रपणे कमी होते आणि मृदेची क्षारकता लक्षात येईल एवढी वाढते.

लवणतेतील बदलांच्या बाबतीतील माशांची सह्यता पुष्कळदा चांगलीच लक्षात येण्यासारखी असते. अनेक सागरी सूक्ष्मजंतू व डायाटम हे २५ टक्के इतकी जास्त लवणांची संहती सहन करू शकतात. सस्तन प्राण्यांची सोडियमाची किमान गरज आहाराच्या ०·०५ टक्का आहे, असे दिसते. यावरून सामान्य माणसाची मिठाची समतुल्य दैनिक गरज १ ते २ ग्रॅ. येते. परिणामी त्याच्या शरीराच्या ऊतकांतील सोडियमाचे सरासरी प्रमाण ०.२४ टक्का असते. भिन्न ऊतकांतील सोडियमाचे प्रमाण अगदी वेगवेगळे असते. सर्व रक्तात सु. ०·६२ टक्का सोडियम क्लोराइड असते तर त्वचेतील सोडियमाचे प्रमाण ०·१ टक्क्याहून कमी असते. मिठाचे प्रमाण व शरीराचा पाणीविषयक समतोल यांच्यात परस्परसंबंध आहे. लवणग्रहण कमी झाल्यास पाणी कमी होते. त्वचेमधून घामाच्या रूपात सोडियमाची लक्षणीय प्रमाणात हानी होते आणि मूत्रातून लक्षणीय प्रमाणात सोडियमाचे उत्सर्जन होऊ शकते.

संयुगे : सोडियमाची बहुतेक संयुगे पाण्यात विरघळणारी व पांढज्या रंगाची आहेत. ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने समुद्रातील मिठापासून तयार होतात. शिवाय कार्बोनेट व सल्फेट या रूपांतही सोडियमाची संयुगे निसर्गात आढळतात आणि विशेष खास प्रकारे शुद्धीकरण न करताच ती काच, साबण, रंगलेप, कापड व रासायनिक उद्योगांत मोठ्या प्रमाणात वापरतात. पुढे सोडियमाच्या काही महत्त्वाच्या संयुगांची माहिती थोडक्यात दिली आहे. त्यांशिवाय सोडियमाची असंख्य संयुगे आहेत.


सोडियम ॲसिटेट : (NaCooCH3). याचे स्फटिक रंगहीन व फुलारणारे असून हे पाण्यात व ईथरात विरघळते आणि ३२४० से. ला. वितळते. दाहक (कॉस्टिक) सोडा किंवा सोडियम कार्बोनेट यांचे ॲसिटिक अम्लाने मउदासिनीकरण करून अथवा लाकडाच्या भंजक ऊर्ध्वपातनाने मिळणाऱ्या ॲसिटिक अम्लाचे कॅल्शियम ॲसिटेटाद्वारे सोडियम ॲसिटेटात रूपांतर करून हे तयार करतात. औषधे, रंगद्रव्ये, सुके रंग तयार करण्यासाठी, कार्बनी संयुगांच्या निर्मितीत मध्यस्थ पदार्थ म्हणून आणि छायाचित्रणात, तसेच रासायनिक विश्‍लेषणात विक्रियाकारक म्हणून व रंगबंधक म्हणून सोडियम ॲसिटेट वापरतात.

सोडियम अल्कोहॉलेटे : सोडियम व अल्कोहॉल यांच्यातील विक्रियेने तयार होणाऱ्या या संयुगांपैकी सोडियम एथिलेट (NaOC2H2) हे महत्त्वाचे आहे. दाहक सोडा व एथिल अल्कोहॉल यांची बेंझिनाच्या सान्निध्यात विक्रिया करून हे तयार करतात. अनेक कार्बनी संश्‍लेषणांमध्ये संघटनकारक व क्षपणकारक म्हणून हे वापरतात.

सोडियम अमाइड : (NaNH2). याच्या पांढज्या स्फटिकांचे पाण्यात स्फोटक रीतीने अपघटन होते. हे २१०° से.ला. वितळते. सोडियम व अमोनिया यांच्यात २००° – ३००° से. ला होणाज्या विक्रियेतून हे तयार होते. यापासून आगीचे संकट असते. सोडियम सायनाइड, इंडिगो, हायड्रॅझीन इ. तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. याला सोडाअमाइड असेही म्हणतात.

सोडियम कार्बोनेट : (Na2CO3). पांढरे व पाण्यात विरघळणारे चूर्ण असून सु. ८५२° से. ला याचे अपघटन होते. हे विक्रियाकारक म्हणून वापरतात. यापासून मोनोहायड्रेट व डेकॅहायड्रेट संयुगे तयार होतात. [ ⟶ सोडा ॲश].

सोडियम बायकार्बोनेट : (NaHCo3). याचे पांढरे स्फटिक पाण्यात विरघळतात व याला अल्कधर्मी (क्षारीय) चव असते. २७०° से. ला यातून कार्बन डाय-ऑयसाइड निघून जाऊन सोडियम कार्बोनेट तयार होते. उभट पात्रात सोडियम कार्बोनेटचा संपृक्त विद्राव वरून खाली आणि शुद्ध कार्बन डाय-ऑक्साइड ४०° से. ला खालून वरील दिशेत पाठवून शुद्ध सोडियम बायकार्बोनेट तयार करतात. हे औषध व लोण्याचे परिरक्षक म्हणून वापरतात. खाद्य पदार्थ निर्मिती, फसफसणारी पेये व लवणे, मृत्तिका उद्योग, अग्निरोधन, तसेच कापड, कागद इ. उद्योग वगैरेंमध्ये हे वापरतात. याला खाण्याचा किंवा भर्जक (बेकिंग) सोडा असेही म्हणतात.

सोडियम क्लोराइड किंवा मीठ : (NaCI). याचे रंगहीन वा पांढरे स्फटिक पाण्यात व ग्लिसरॉलामध्ये विरघळतात. अल्कोहॉलात हे किंचित विरघळते. ८०४° से. ला हे वितळते. हे खाद्यपदार्थांत वापरतात. तसेच रासायनिक मध्यस्थ पदार्थ व वैश्लेषिक विक्रियाकारक म्हणूनही मीठ वापरतात. [⟶ मीठ].

सोडियम ब्रोमाइड : (NaBr). याचे पांढरे व पाण्यात विरघळणारे स्फटिक कडू व खारट चवीचे असतात. हवेतील आर्द्रता हे शोषून घेते. ७५८° से. ला हे वितळते, दाहक सोड्याचा विद्राव ब्रोमिनाने संपृक्त केल्यास हे मिळते. छायाचित्रण व वैद्यक (शांत झोप येण्यासाठी व मेंदू बधीर होण्यासाठी) यांत हे वापरतात. रासायनिक मध्यस्थ पदार्थ म्हणून व ब्रोमाइडे तयार करण्यासाठी हे वापरतात.

सोडियम आयोडाइड : (Nal). याचे पांढरे व हवेला संवेदनशील असे चूर्ण असते. हे प्रस्वेद्य (चिघळणारे) व कडू चवीचे आहे. पाण्याशिवाय हे इतर द्रवांतही (उदा., अल्कोहॉल, ग्लिसरीन इ.) विरघळते. हे ६५३° से. ला वितळते. छायाचित्रण, वैद्यक (उदा., गलगंड), कार्बनी संयुगांची निर्मिती, खनिजांपासून चांदी तयार करणे यांमध्ये हे वापरतात. वैश्लेषिककारक म्हणूनही याचा उपयोग करतात.

सोडियम फ्ल्युओराइड : (NaF). हे विषारी पाण्यात विरघळणारे पांढरे चूर्ण ९८८० से. ला वितळते. कीटकनाशक, लाकडाचे व अभिलागी (चिकटविणारे पदार्थ) यांचे परिरक्षक म्हणून, तसेच कवकनाशके, काचेसारखी एनॅमले, दंतवैद्यक, दुधी काचेची निर्मिती इत्यादींमध्ये आणि आंबविण्याची क्रिया रोखण्यासाठी याचा उपयोग करतात.

सोडियम बायफ्ल्युओराइड : (NalHF2). विषारी व पाण्यात विरघळणारे याचे पांढरे स्फटिक तापविल्यास अपघटित होतात. धुलाईमध्ये अल्कलीचे प्रमाण अधिक कमी करण्यासाठी व डाग घालविण्यासाठी, दगडी बांधकाम स्वच्छ करण्यासाठी, परिरक्षक व पूतिरोधक म्हणून, काचेवरील कोरण व ती अपारदर्शक करण्यासाठी, कथिलाचा मुलामा देताना व शरीराचे अवयव टिकविण्यासाठी हे वापरतात.

सोडियम हायड्राइड : (NaH). हे पांढरे चूर्ण असून याचे पाण्याने अपघटन होते व आर्द्र हवेत हे पेटते. द्रवरूप सोडियम हायड्रोजन वायूच्या प्रवाहात ३००°-४००° से. तापमानाला सोडून हे तयार करतात. धातूच्या पृष्ठभागावरील (बहुधा ऑक्साइडाचे) कीटन काढून टाकण्यासाठी, कार्बनी संयुगांच्या निर्मितीत, सोडियम बोरोहायड्राइड तयार करण्यासाठी आणि शुष्कक व विक्रियाकारक म्हणून याचा उपयोग करतात.

सोडियम हायड्रॉक्साइड : (NaOH, दाहक सोडा). पांढरे प्रस्वेद्य स्फटिक हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी शोषून घेतात. पाणी, अल्कोहॉल व ग्लिसरॉल यांत हे विरघळते. हे ३१८° से. ला वितळते. वैश्‍लेषिक विक्रियाकारक व रासायनिक मध्यस्थ पदार्थ म्हणून, रबराच्या पुनर्वापरामध्ये, खनिज तेलाच्या परिष्करणात (शुद्धीकरणात) व प्रक्षालकांमध्ये हे वापरतात. [⟶ दाहक सोडा].

सोडियम नायट्रेट : (NaNo3). याचे पारदर्शक, रंगहीन, कडू चवीचे स्फटिक पाण्यात व ग्लिसरॉल यांमध्ये विरघळतात व ३०८० से. ला वितळतात. तापविल्यास याचे अपघटन होते. काचेवरील व मातीच्या भांड्यांवरील एनॅमल तयार करणे, रासायनिक संयुगे तयार करणे, औषधे, स्फोटक मिश्रणे, रंग रसायने बनविणे, ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंचे उष्णता संस्करण इत्यादींत याचा उपयोग होतो. नैसर्गिक सोडियम नायट्रेट म्हणजे चिली सॉल्ट पीटर हे नायट्रिक अम्ल निर्मितीमध्ये वापरतात. याचा खत व खाद्यपदार्थ परिरक्षक म्हणूनही उपयोग होतो.[⟶ सोडा नायटर].

सोडियम नायट्राइट : (NaNo2). हे हवेला संवेदनशील असलेले पिवळे चूर्ण पाण्यात विरघळते व ३२०० से. पेक्षा अधिक तापमानाला याचे अपघटन होते. गंजरोधक म्हणून, रंजक द्रव्यांसाठी मध्यस्थ पदार्थ म्हणून, मांस मुरविण्यासाठी, छायाचित्रणात विरंजनासाठी आणि कापडाच्या रंजनक्रियेत, वैद्यकात व उष्णतावाहक लवणमिश्रणात, हे वापरतात.

सोडियममोनॉक्साइड : (Na2O). हे तीव्र क्षारकीय व पांढरे चूर्ण वितळलेल्या दाहक सोड्यात विरघळते. पाण्यात यापासून सोडियम हायड्रॉक्साइड बनते. निर्जलीकारक व बहुवारिकीकरण कारक म्हणून याचा उपयोग होतो. सोडियम पेरॉक्साइड तयार करण्यासाठी हे वापरतात. याला सोडियम ऑक्साइड असेही म्हणतात.

सोडियमपेरॉक्साइड : (Na2O). हे पांढरे चूर्ण तापविल्यावर पिवळसर होते. तापविल्यावर याचे अपघटन होते. पाण्याच्या संपर्कात आल्यास हे पेटते. ऑक्सिडीकारक व विरंजक म्हणून, वैद्यकीय साबणांत, पेरॉक्सी संयुगे बनविण्यासाठी, कार्बनी विक्रियांमध्ये, श्वसन साहाय्यकारी उपकरणांत कीटनाशक म्हणून आणि रद्दी कागद, गवत, तेले, जिलेटीन, डिंक इत्यादींच्या विरंजनासाठी याचा उपयोग करतात.

सोडियमफेरिसायनाइड : [Na3Fe(CN)6.H2O]. हे विषारी, चिघळणारे व तांबडे चूर्ण पाण्यात विरघळते, मात्र अल्कोहॉलात विरघळत नाही. हे छपाईत व रंगद्रव्यनिर्मितीसाठी वापरतात. याला रेड प्रुसिएट ऑफ सोडा असेही म्हणतात.

सोडियमफेरोसायनाइड : [Na4Fe(CN)6.10H2O]. याचे अर्धपारदर्शक स्फटिक पाण्यात विरघळतात, पण अल्कोहॉलांत विरघळत नाहीत. छायाचित्रण, रंगद्रव्ये, कातडी कमाविणे, नीलप्रत कागद इत्यादींत हे वापरतात. याला यलो प्रूसिएट ऑफ सोडा असेही म्हणतात.

सोडियमथायोसायनेट : (NaSCN). सोडियम सायनाइड व गंधक यांच्यात विक्रिया होऊन हे तयार होते. हे विषारी, चिघळणारे व पांढरे चूर्ण पाण्यात व अल्कोहॉलात विरघळते. हे २८७° से. ला वितळते. विद्रावक (विरघळविणारा पदार्थ), वैश्लेषिक विक्रियाकारक व रासायनिक मध्यस्थ पदार्थ म्हणून, रबरावरील संस्करण, तसेच कापडाची रंगणी व कापडावरील छपाई, रंगीत फिल्मची धुलाई यांत हे वापरतात. याला सोडियम सल्फो-सायनेट असेही म्हणतात.


सोडियमसायनाइड : (NaCN). पाणी, द्रव अमोनिया व मिथेनॉल यांत विरघळणारे हे विषारी व पांढरे चूर्ण ५६३° से. ला वितळते. याचे ठेवलेल्या स्थितीत जलदपणे अपघटन होते. रंगद्रव्यांचे उत्पादन, धातूंचे उष्णता संस्करण (उदा., पोलाद), सोन्याचांदीचे निष्कर्षण, खनिज धातुसल्फाइडांचे अलगीकरण, विद्युत् विलेपन वगैरेंमध्ये याचा उपयोग करतात.

सोडियमहायपोक्लोराइट : (NaOCI). दाहक सोड्याच्या विद्रावांत क्लोरीन वायू सोडून हे तयार करतात. हिरवट व मधुर वासाचे याचे स्फटिक हवेत अस्थिर असतात. थंड पाण्यात हे विरघळते, मात्र गरम पाण्यात याचे अपघटन होते. कागदाचा लगदा व कापड यांच्या विरंजनासाठी, रासायनिक मध्यस्थ पदार्थ म्हणून व वैद्यकात हे वापरतात.

सोडियमपरबोरेट : (NaBo2.H2O2·3H2O). हे खारट चवीचे पांढरे चूर्ण पाण्यात किंचित विरघळते व आर्द्र हवेत अपघटन होते. दुर्गंधीनाशक, दातांचे संघटन इत्यादींमध्ये व जंतुनाशक म्हणून हे वापरतात. ऑक्सिडीकरण (उदा., व्हॅट रंजकद्रव्ये, गंधक), बहुवारिकीकरण, विरंजन व दातांची सफाई यांसाठी हे वापरतात. याला पेरोझायडॉल असेही म्हणतात.

सोडियमसल्फेट : (Na2SO4). पाण्यात विरघळणारे हे स्फटिकी संयुग ८८८° से. ला वितळते. निर्जल, सॉल्ट केक व ग्लाउबर सॉल्ट (Na2SO4·10H2O) हे याचे तीन व्यापारी प्रकार आहेत. मीठ व सल्फ्यूरिक अम्ल यांच्या विक्रियेद्वारे हायड्रोक्लोरिक अम्ल तयार करताना अशुद्ध सोडियम सल्फेट मागे रहाते, त्याला सॉल्ट केक म्हणतात. सोडियम बायक्रोमेटासारख्या संयुगांच्या निर्मितीत व्हिस्कोज तंतू व रेयॉन यांच्या निर्मितीतही तसेच सोडियम सल्फेट उपउत्पादन म्हणून मिळते. ते ग्लाउबर सॉल्टच्या रूपात मिळते. ग्लाउबर सॉल्ट निसर्गात आढळते व सॉल्ट केकपासूनही तयार करता येते. ग्लाउबर सॉल्टमधून पाणी काढून निर्जल सोडियम सल्फेट तयार करतात. कागद, काच, कापड, प्रक्षालके व पुठ्ठा यांच्या उद्योगांत सोडियम सल्फेट वापरतात. गोठण मिश्रणांत, खनिजांतून निकेलाचे निष्कर्षण करताना, ⇨ डबाबंदीकरण उद्योगात सोडियम सल्फेट वापरतात.

सोडियमबायसल्फेट : (Na2SO4). याचे रंगहीन स्फटिक पाण्यात विरघळतात व तीव्र अम्लीय विद्राव तयार होतो. ३१५°  से. ला याचे अपघटन होते. सोडियम नायट्रेट व सल्फ्यूरिक अम्ल यांपासून नायट्रिक अम्ल तयार करताना मागे सोडियम बायसल्फेट (नायटर केक) राहते. खनिजांचे अपघटन करताना ⇨ अभिवाह म्हणून, जंतुनाशक म्हणून, रंजनक्रियेत तसेच मॅग्नेशिया, सिमेंट, सुवासिक द्रव्ये, विटा व सरस यांच्या उत्पादनात स्वच्छताकारक आणि लोकर व कातडी उद्योगात हे वापरतात. याला नायटर केक व सोडियम ॲसिड सल्फेट अशीही नावे आहेत.

सोडियमसल्फाइड : (Na2S). क्षोभकारक, पाण्यात विरघळणारे, पिवळे ते तांबडे व चिघळणारे हे चूर्ण १८०° से. ला वितळते. सोडियम सल्फेट व कोळशाची पूड ९००° – १,०००° से. ला घूर्णी भट्टीत तापविल्याने द्रवरूप सोडियम सल्फाइड मिळते. ते थंड झाल्यावर ब्लॅक ॲश हा अशुद्ध प्रकार मिळतो. तो पाण्याने धुवून बाष्पीभवन करतात व सोडियम सल्फाइडाचे स्फटिक मिळवितात. रासायनिक मध्यस्थ पदार्थ, विद्रावक, क्षपणकारक छायाचित्रीय व वैश्‍लेषिक विक्रियाकारक म्हणून आणि चर्मोद्योगात व कोरीवकामात हे वापरतात. याला सोडियम सल्फ्युरेट असेही म्हणतात.

सोडियमहायड्रोसल्फाइड : (NaHS.2H2O). विषारी, रंगहीन व पाण्यात विरघळणारे याचे सुईसारखे स्फटिक ५५° से. ला वितळतात. याचा विद्राव उकळल्यास हायड्रोजन सल्फाइड वायू निर्माण होतो. कागदाचा लगदा तयार करणे, रंजकद्रव्यांचे संस्करण, कातडीवरील केस काढून टाकणे, विरंजन इत्यादींमध्ये हे वापरतात. याला सोडियम बायसल्फाइड, सोडियम हायड्रोजन सल्फाइड व सोडियम सल्फाहायड्रेट ही पर्यायी नावे आहेत.

सोडियमपॉलिसल्फाइडे : (Na2S). सोडियम डायसल्फाइड (Na2S2), टेट्रासल्फाइड (Na2S5), पेंटॅसल्फाइड (Na2S5) इ. सल्फाइडाच्या विद्रावांत गंधक विरघळून तयार करतात. यांचे पिवळे ते उदी कण असतात. रंजकद्रव्ये, रंग, कीटकनाशके तयार करताना, खनिज तेलातील समावेशक द्रव्ये म्हणून विद्युत् विलेपनात, कृत्रिम रबरनिर्मिती वगैरेंमध्ये यांचा उपयोग होतो.

सोडियमबायसल्फाइट : (NaHSO3). हे रंगहीन व पाण्यात विरघळणारे घनरूप संयुग तापविल्यास त्याचे अपघटन होते. याचा क्षपणकारक, शोषक, विरंजक, परिरक्षक म्हणून उपयोग करतात. याला सोडियम ॲसिड सल्फाइट असेही म्हणतात.

सोडियमसल्फाइट : (Na2SO3). याचे पांढरे स्फटिक असून पाण्यात विरघळणाज्या स्फटिकांची चव गंधकासारखी व खारट असते. तापविल्यास याचे अपघटन होते. मध्यस्थ रासायनिक पदार्थ व अन्न परिरक्षक म्हणून, वैद्यकात व कागदाच्या उत्पादनात, रंजकद्रव्यांसाठी आणि छायाचित्रणातील विकाशनासाठी याचा उपयोग होतो.

 

सोडियमथायोसल्फेट : (Na2S2O35H20). याचे पांढरे व पारभासी स्फटिक किंवा चूर्ण ४८° से. ला वितळते. हे पाण्यात व टर्पेंटाइन तेलात विरघळते. छायाचित्रणात स्थिरीकरणासाठी, धातुकांपासून चांदीचे निष्कर्षण करण्यासाठी व वैद्यकात हे वापरतात. विक्रियाकारक, शोषक, विरंजक, रंगबंधक म्हणून व विद्युत् विलेपनातही याचा उपयोग करतात. याला सोडियम हायपोसल्फाइट व सोडियम सबसल्फाइट अशीही नावे आहेत.

सोडियम परक्लोरेट : (NaCIO4). याचे पांढरे व चिघळणारे स्फटिक पाण्यात व अल्कोहॉलात विरघळतात. हे ४८२° से. ला वितळते. संहत सल्फ्यूरिक अम्लाच्या संपर्कात हे स्फोटक होते. जेट एंजिन इंधनात, विक्रियाकारक म्हणून, स्फोटक द्रव्यांसाठी तसेच परक्लोरिक अम्ल व इतर परक्लोरेट तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो.

सोडियमफॉर्मेट : (HCOONa). हे सौम्य आर्द्रताशोषक व पांढरे चूर्ण पाण्यात विरघळते. हे अल्कोहॉलात थोडे विरघळते. मात्र ग्लिसरिनात विरघळत नाही. याला फॉर्मिक अम्लासारखा वास असतो व हे २४५° से. ला विरघळते. दाहक सोडा व  ⇨ प्रोड्यूसर वायूमधील कार्बन मोनॉयसाइड यांच्या विक्रियेतून हे तयार होते. वैद्यक, भिंतीला लावावयाचे स्वच्छ कागद यांमध्ये तसेच रासायनिक मध्यस्थ पदार्थ व क्षपणकारक म्हणून याचा उपयोग करतात.

सोडियमसायट्रेट : (C6H5Na3O7.2H2O). हे खारट चवीचे पांढरे चूर्ण पाण्यात विरघळते व अल्कोहॉलात किंचित विरघळते. याला अम्लासारखी आंबट चव असून १५०° से. ला यातील पाणी बाहेर पडते. लालबुंद तापल्यास याचे अपघटन होते. वैद्यकात क्लथनरोधक गुठळी होण्यास विरोध करणारे म्हणून, पेये, आइसक्रीम, मुरंबे, जेली, चीजनिर्मिती, विद्युत् विलेपन इत्यादींमध्ये हे वापरतात. याला ट्रायसोडियम सायट्रेट असेही म्हणतात.

सोडियमसिलिकेट : (Na2SiO3). हे करड्या पांढज्या रंगाचे चूर्ण पाण्यात व क्षारकांत विरघळते मात्र अल्कोहॉल व अम्ले यांच्यात विरघळत नाही. हे पायसीकारक आहे [⟶पायस]. खनिज तेल परिष्करणात व पन्हळी पुठ्ठे तयार करण्यासाठी हे वापरतात. आसंजक (चिकटविणारा पदार्थ) म्हणून हे वापरतात. लाकूड व सच्छिद्र खडकांच्या संरक्षणासाठी दगडी वस्तू जोडण्यासाठी, विशिष्ट सिमेंटमध्ये, भिंती बाष्पनिरोधक करण्यासाठी, साबणात पूरण द्रव्य म्हणून, विद्युत् निरोधक म्हणून याचा उपयोग करतात. द्रवरूप वा विद्राव्य काच, सिलिकेट ऑफ सोडा, सोडियम मेटॅसिलिकेट, वॉटर ग्लास ही याची पर्यायी नावे आहेत.


सोडियमफॉस्फेट : सर्वसाधारण संज्ञेमध्ये पुढील संयुगांचा अंतर्भाव करतात. सोडियम हेक्झॅमेटफॉस्फेट, सोडियम मेटाफॉस्फेट, डायबेसिक सोडियम फॉस्फेट, हेमिबेसिक सोडियम फॉस्फेट, मोनोबेसिक सोडियम फॉस्फेट, ट्रायबेसिक सोडियम फॉस्फेट, सोडियम पायरोफॉस्फेट आणि ॲसिड सोडियम पायरोफॉस्फेट.

हाताळणीवसुरक्षितता : सोडियमाची अनेक द्रव्यांबरोबरची विक्रियाशीलता उच्च असते. त्यामुळे त्याच्या हाताळणीविषयी खास विचार करणे आवश्यक असते. खास बनविलेली सामग्री व उचित क्रियापद्धती वापरून लहान व मोठ्या प्रमाणावर सोडियमाची हाताळणी नियमितपणे करतात आणि यात कोणतीही अडचण येत नाही. इतर अनेक औद्योगिक रसायनांच्या तुलनेत सोडियमाच्या हाताळणीत कमी जोखीम असते.

सोडियमाचा त्वचेशी थेट संपर्क आल्यास शरीर खोलवर गंभीरपणे भाजले जाऊ शकते. कारण सोडियमाची आर्द्रतेबरोबर विक्रिया होते व यातून तयार झालेल्या दाहक संयुगाची विनाशक क्रिया होते. डोळ्यात सोडियम गेल्यास अंधत्व येऊ शकते म्हणून सोडियमविषयक काम करणाज्या मंडळींनी काळा चष्मा, तसेच आगनिरोधक हातमोज्यांसारखे संरक्षक कपडे घालायला हवेत.

सोडियमाची पाण्याबरोबर होणारी जोमदार विक्रिया हे सर्वात मोठे संकट ठरते. या विक्रियेतून सोडियम हायड्रॉक्साइड, हायड्रोजन व उष्णता निर्माण होतात. हवा असताना यांच्यामुळे बहुधा स्फोट होऊ शकतो. हवा व ऑक्सिजन नसताना निर्माण झालेल्या हायड्रोजनामुळे दाबात जलदपणे वाढ होऊ शकते. शिवाय हवा असताना होणाज्या या विक्रियेच्या परिणामांविषयी (अंदाज) करता येत नाही.

सुमारे १२०° से. तापमानाला द्रवरूप सोडियम पेटते. पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड व कार्बन टेट्राक्लोराइड यांसारख्या आगप्रतिबंधक द्रव्यांनी ही आग विझत नाही. शुष्क मीठ किंवा अन्य कोरडे, थंड, अक्रिय चूर्ण ही आग विझविण्यासाठी वापरतात. सोडियम योग्य प्रकारे साठविल्यास अशा आगीचा धोका कमी करता येतो.

अभिज्ञानवविश्लेषण : सोडियमाच्या संयुगांमुळे ज्योतीला प्रखर पिवळा रंग प्राप्त होतो व त्याद्वारे सोडियम ओळखणे शक्य होते. वर्णपटामधील सोडियमाच्या वैशिष्ट्यपूर्ण पिवळ्या रेषांवरून सोडियमाची खातरजमा करता येते. मात्र ही परीक्षा अतिशय संवेदनशील असून अनेक द्रव्यांत सोडियम लवणांची लेशमात्र अशुद्धी असल्याने हा सोडियमाच्या अस्तित्वाचा हमखास पुरावा नसतो.

युरॅनिल ॲसिटेट परीक्षेत युरॅनिल ॲसिटेटाबरोबर अविद्राव्य सोडियम लवण साक्याच्या रूपात खाली बसते. या परीक्षेत सुधारणा करण्यात आल्या असून ही सुधारित परीक्षा सोडियमाच्या अस्तित्वाची खातरजमा करणारी प्रमाणभूत परीक्षा आहे. एथिल अल्कोहॉल टाकल्यावर निर्माण होणारा हायड्रोजन मोजून धातुरूप सोडियमाचे प्रमाण पुष्कळशा अचूकतेने ठरविता येते.

सोडियमाच्या पारदमेलाच नमुन्यावर विरल प्रमाणभूत अम्लाच्या मोजलेल्या घनफळाचे संस्करण करून या पारदमेलाच्या विश्लेषण करता येते. हायड्रोजनाची निर्मिती थांबल्यावर जादा अम्लाचे प्रमाण क्षारकाबरोबर ⇨ अनुमापन करतात. या पद्धतीत एकूण क्षारता सोडियम म्हणून हिशोब करून काढतात.

विशिष्ट तरंगलांबीला उत्सर्जित होणारा प्रकाश मोजणारी उत्सर्जन वर्णपटलेखन विश्लेषण ही इतर अल्कली धातूंमधील लेशमात्र सोडियमाचे विश्लेषण करण्याची उपयुक्त पद्धत आहे. प्रकाशमापक पद्धतीने दशलक्ष भागांत सोडियमाचे किती भाग आहेत, हे ठरविता येते. मात्र आधीच्या पद्धतीपेक्षा ही कमी अचूक आहे.

सोडियमाच्या नमुन्यातील ऑक्सिजनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे ठरविता येते. पाज्याच्या मदतीने मुक्त सोडियमाचे निष्कर्षण करतात. मागे राहिलेल्या पाज्यात अविद्राव्य असलेल्या ऑक्साइडांचे व कार्बोनेटांचे नंतर विद्राव पद्धतींनी विश्‍लेषण करतात.

सोडियम नमुन्यांतील कार्बनाचे विश्‍लेषण करण्यासाठी प्रथम सोडियमाचे शुद्ध ऑक्सिजनात ऑक्सिडीकरण करतात. नंतर या ज्वलनातून तयार झालेल्या कार्बन डाय-ऑक्साइडाचे (अवरक्त) मापन करतात.


व्यापारी सोडियमातील कॅल्शियम बहुधा ऑक्झॅलेट स्वरूपात अवक्षेपित करून ठरवितात. सोडियमातील अत्यल्प प्रमाणातील कॅल्शियम आणवीय शोषण वर्णपट प्रकाशमापन पद्धतीने ठरवितात. सोडियमापासून सोडियम ऑक्साइड अलग करण्यासाठी त्यावर पाज्याचे संस्करण करतात. त्यात तयार झालेल्या पारदमेलात हे ऑक्साइड अविद्राव्य असल्याने अलग करता येते. नंतर त्याचे प्रमाण अम्ल अनुमापनाद्वारे ठरवितात.

मिश्रधातू : रासायनिक गुणधर्मांमध्ये सोडियमाच्या मिश्रधातूंची काही माहिती आधी आली आहे. सोडियम द्रवरूप प्रावस्थेतील अनेक धातूंबरोबर मिश्रणीय आहे. यातून मिश्रधातू किंवा संयुगे तयार होऊ शकतात. बेरियम, कॅल्शियम, शिसे, लिथियम, मॅग्नेशियम, पारा, पोटॅशियम, रुबिडियम, थोरियम, कथिल व झिंक यांच्याबरोबरची सोडियमाची संयुगे किंवा मिश्रधातू महत्त्वाची आहेत. सोडियम घातल्यावर धातूंचा ठिसूळपणा पुष्कळदा वाढतो. धातूंमुळे सोडियमाची नैसर्गिक विक्रियाशीलता कमी-जास्त प्रमाणात विरल होते. बहुतेक द्वि-अंगी मिश्रधातू हवेत अस्थिर असून त्यांची पाण्याबरोबर विक्रिया होते. त्रि-अंगी व चतुःअंगी मिश्रधातू अधिक स्थिर असतात. सोडियमाचे शिसे व पोटॅशियम यांच्याबरोबरच्या मिश्रधातूंचे व्यापारी महत्त्व लक्षात आलेले आहे. सोडियमाचा पारदमेल हा पारदमेल प्रक्रियेने सोडियम हायड्रॉक्साइडाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने मोलाचा आहे. ३० टक्के सोडियम असलेल्या शिशाबरोबरच्या मिश्रधातूची पाण्याबरोबर जोरदार विक्रिया होऊन हायड्रोजन मुक्त होतो आणि हा प्रयोगशाळेतील हायड्रोजनाचा सोयीस्कर स्त्रोत आहे. मोठ्या प्रमाणात सोडियम असणाज्या शिशाबरोबरच्या मिश्रधातू कार्बनी द्रवांचे शुष्कन करण्यासाठी वापरतात. क्षारीय मृत्तिका धातूंसारख्या इतर धातू असणाज्या सोडियम-शिसे मिश्रधातू कठीण असून त्यांचा कठीणपणा उच्च तापमानांना टिकून राहतो यामुळे या मिश्रधातू धारव्यांसाठी सोयीस्कर आहेत.

सुमारे ०·६ टक्क्यापर्यंत सोडियम सहजपणे पाज्यात विरघळून पारदमेल बनतात या मिश्रधातू सर्वसाधारण तापमानाला द्रवरूप असतात. दोन टक्क्यांहून अधिक सोडियम असलेले पारदमेल सर्वसाधारण तापमानाला ठिसूळ असतात. घनरूप पारदमेलांचे सहजपणे तुकडे व चूर्ण होते. हे पारदमेल सोडियमाऐवजी अनेक विक्रियांमध्ये उपयुक्त असतात. कारण या विक्रियांचे नियंत्रण करणे अधिक सोपे असते. सोडियम पारदमेल सोडियम हायड्रॉक्साइडाच्या उत्पादनात व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा असतो. सोडियम पोटॅशियम (NaK) मिश्रधातू उष्णता संक्रमणविषयक उपयोगात वापरतात. सोडियम-शिसे मिश्रधातू टेट्राएथिल व टेट्रामिथिल लेड यांच्या उत्पादनात वापरतात.

सोडियम व ॲल्युमिनियम यांचे मिश्रण होत नाही. मात्र ॲल्युमिनियम-सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम-तांबे मिश्रधातूंच्या कणांच्या परिवर्तनासाठी सोडियम वापरतात. सोडियम-सोने मिश्रधातू प्रकाशविद्युतीय दृष्टीने संवेदनशील असून ती प्रकाशविद्युतीय घटांत वापरता येऊ शकते. २ टक्के सोडियम व ९८ टक्के जस्त असलेली मिश्रधातू इतर धातूंसाठी विऑयिसडीकारक (ऑयिसजनाचे प्रमाण कमी करणारे) द्रव्य म्हणून वापरतात. [⟶ मिश्रधातु].

उपयोग : सोडियम सायनाइड व सोडियम पेरॉयसाइड यांचे उत्पादन करणे हे सोडियमाचे सर्वांत आधीचे उपयोग होत. हे उपयोग अजून महत्त्वाचे आहेत. शिसे-सोडियम मिश्रधातूची एथिल क्लोराइडाबरोबर विक्रिया करून टेट्राएथिल लेडचे उत्पादन करणे हा सोडियमाचा प्रमुख उपयोग आहे. कृत्रिम प्रक्षालक उद्योगासाठी सोडियम अल्किल सल्फेटांची निर्मिती करतात. कारण ही सल्फेटे या प्रक्षालकांतील प्रमुख घटक असतात.

सोडियम हायड्राइडाच्या उत्पादनात सोडियम प्रारंभिक द्रव्य म्हणून वापरतात. शिवाय रंगद्रव्ये व रंगद्रव्य मध्यस्थ पदार्थ यांचे उत्पादन सुवासिक द्रव्यांचे आणि कार्बनी क्षपणांच्या व्यापक प्रकारांचे संश्‍लेषण यांमध्ये सोडियम वापरतात. हायड्रोकार्बनांचे परिष्करण व असंतृप्त हायड्रोकार्बनांचे ⇨ बहुवारिकीकरण यांमध्ये सोडियम वापरतात. अनेक कार्बनी उपयोगांमध्ये सोडियम हायड्रोकार्बन द्रवरूप माध्यमातील विसरणांच्या रूपात वापरतात.

सोडियम सर्वोत्कृष्ट उष्णता संक्रमण द्रायू आहे. या गुणधर्मामुळे त्याचे मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्याची शक्यता आहे. द्रुत प्रजनक (फास्ट ब्रीडर) अणुभट्ट्या थंड करण्यासाठी सोडियम वापरतात. सोडियम-पोटॅशियम मिश्रधातू -१०° से. ला वितळते. एकेकाळी याचा अंतःसागर अणुभट्टी प्रणालींमध्ये उष्णता संक्रमण द्रायू म्हणून वापरण्याविषयी विचार झाला होता. नंतर अवकाशातील वापरासाठीच्या अणुभट्टी प्रणालीमध्ये द्वितीयक शीतनक प्रणाली म्हणून सोडियम पोटॅशियम मिश्रधातू वापरण्याविषयी अनुसंधान करण्यात आले. टिटॅनियम तयार करण्याच्या विशिष्ट प्रक्रियांमधील मुशी थंड करण्यासाठीही ही मिश्रधातू वापरतात.

सोडियम सर्वोत्कृष्ट विद्युत् संवाहक असल्याने याचा विद्युतीय संवाहकांसाठी पर्याय म्हणून विचार केला जात आहे. कॅल्शियम, झिर्कोनियम, टिटॅनियम, हाफ्नियम आणि इतर संक्रमणी धातू तयार करताना सोडियमाचा धातुविज्ञानात ऑक्सिजनाचे प्रमाण कमी करणारा व क्षपणकारक म्हणून व्यापक उपयोग होतो. टिटॅनियमाचे व्यापारी उत्पादन करताना टिटॅनियम टेट्राक्लोराइडाचे सोडियमाने क्षपण करतात. कारण या धातूंची अणुऊर्जा व अवकाश कार्यक्रम यांतील मागणी वाढत आहे.

कार्बनीधातू संयुगे, पोटॅशियम, पोटॅशियम-सोडियम मिश्रधातू, कॅल्शियम व कॅल्शियम हायड्राइड, सोडामाइड, सोडियम ॲझाइड, नीळ, तणनाशके, औषधे, औषधी द्रव्ये, बार्बिच्युरेटे, ॲसिटोॲसिटिक एस्टर, सुवासिक द्रव्ये, उत्प्रेरक द्रव्ये, सोडियम बाष्प दिवे इत्यादींच्या निर्मितीत सोडियमाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष उपयोग केला जातो. प्राणिज व वनस्पतिज तेलांचे सोडियमाने क्षपण करून दीर्घ शृंखला मेदाम्ले तयार करतात. ही अल्कोहॉल प्रक्षालकांचा कच्चा माल आहेत.

यांशिवाय सोडियमाची संयुगे विविध कामांसाठी वापरतात. उदा., मासे खारविणे, मांस आवेष्टित करणे, कातडी कमाविणे, गोठण मिश्रणे व अन्न पदार्थ तयार करणे यांसाठी मीठ वापरतात. रसायने, सेल्युलोज पटल (फिल्म), रेयॉन साबण लगदा व कागद यांच्या उत्पादनात सोडियम हायड्रॉक्साइड वापरतात. काचउद्योग आणि साबण, प्रक्षालके, पृष्ठभाग स्वच्छ करणारी द्रव्ये, कागद व कापड, लोहेतर धातू व खनिज तेल उत्पादने यांच्या उत्पादनात सोडियम कार्बोनेट वापरतात. कागद लगदा उद्योग व सपाट काचनिर्मिती यांमध्ये सोडियम सल्फेट म्हणजे सॉल्ट केक वापरतात.

पहा : दाहक सोडा पोटॅशियम मीठ विद्युत् धातुविज्ञान सोडा ॲश सोडा नायटर.

संदर्भ : 1. Clark, G. L., Encyclopedia of Chemistry, 1966.

           2. Cotton, F. a. and others, Advanced Inorganic Chemistry, 1999.

           3. Fatt, I. Tashima, M. Alkali Metal Dispersions, 1961.

          4. Lide, D. R. CRC Handbook of Chemistry and Physics, 2004.

          5. Mausteller, J. W. Tepper, F. Rodgers, S. J. Alkali Metal Handling and Systems Oerating Techniques, 1967.

          6. Paternak, C. A., Ed., Monovalent Cations in Biological Systems, 1990.

          7. Sittig, M. Sodium : Its Manufacture, Properites and Uses, 1965.

          8. Thomson, G. W. Garelis, E. Physical and Thermodynamic Properties of Sodium, 1955.

          9. Vol’nov, I. I. Peroxides, Superoxides and Ozonides of Alkali and Alkaline Earth Metals, 1966.

         10. Weast, R. C., Ed., Handbook of Chemistry and Physics, 1967-1968.

ठाकूर, अ. ना.