सोंडूर संस्थान : स्वातंत्र्यपूर्वकाळातील मद्रास इलाख्यातील एक भूतपूर्व संस्थान. तत्कालीन मद्रास शासनाच्या (ब्रिटिश) प्रत्यक्ष देखरेखीखाली असलेल्या पाच संस्थांपैकी एक छोटे संस्थान होय. ते क्षेत्रफळ ४२७·५२ किमी. लोकसंख्या सुमारे १६००० (१९४१) व वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये होते. त्यात २० खेडी असून बहुतांश संस्थान जंगलाने (३४८०० हेक्टर) व्यापलेले आणि त्यांपैकी निम्मे ब्रिटिश शासनाला भाड्याने दिलेले होते. संस्थान चारी बाजूंनी बेल्लारी जिल्ह्याने परिवेष्टित होते. घोरपडे कुलोत्पन्न सिदोजीराव याने जरमीच्या बेडर पाळेगाराकडून ते १७२८ मध्ये जिंकून घेतले. सिदोजीच्या वडिलांनी आदिलशाही विरुद्धच्या बंडात विशेष कामगिरी केल्यामुळे त्यांना हिंदुराव व मामलिकत (मम्लूकत) मदार हे किताब प्राप्त झाले होते. ते संस्थानातील राजांनी पुढे धारण केले. सिदोजीचा ज्येष्ठ मुलगा मुरारराव घोरपडे हा गुतीचा असून तो या घराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष होय. हैदर अलीने बेल्लारी व गुत्ती घेऊन त्यास कैद करून १७७५-७६ मध्ये हे संस्थान बळकावले आणि त्यास कब्बालदुग (म्हैसूर) येथे ठेवले. तिथेच तो मरण पावला. हैदरने सोंडूर येथे कृष्णनगर किल्ला बांधला. मुराररावाचे दोन्ही मुलगे अल्पवयीन ठरले. त्याने दत्तक घेतलेला शिवराव पुढे टिपूचा प्रतिकार करताना मारला गेला (१७८५) तेव्हा त्यांचा मुलगा दुसरा सिदोजी लहान असल्याने त्याचा पालक काका वेंकटराव होता. त्याने १७९० मध्ये टिपूच्या अखत्यारीखालील संस्थान स्वारी करून हस्तगत केले पण घोरपडे सोंडूरला राहात नसत. टिपूबरोबरच्या तहानंतर (१७९२) घोरपडे घराण्याची सत्ता सोंडूरवर स्थिरावली. सिदोजी १७९६ मध्ये वारला. तेव्हा त्याच्या पत्नीने शिवराव या पुतण्यास दत्तक घेतले. टिपूच्या मृत्यूनंतर (१७९९) शिवराव वेंगटरावांसोबत सोंडूरला राहावयास गेला दुसऱ्या बाजीराव पेशव्याने सोंडूर घेण्याचा १८१५ मधील प्रयत्न अयशस्वी ठरला. पेशवाईच्या अंतानंतर (१८१८) मद्रास शासनाकडून राजाला नवीन सनद प्राप्त झाली (१८२६) आणि तो सोंडूरमध्ये सुखाने राहू लागला. शिवरावच्या मृत्यूनंतर (१८४०) त्याचा दत्तक पुतण्या वेंकटराव गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर (१८६१) त्याचा मुलगा शिवषण्मुखराव गादीवर आला. ब्रिटिशांनी त्याला राजा हा किताब दिला (१८७६). १८६३–८५ मध्ये शासन जे. मॅकर्टनी या लंडन मिशनरी सोसायटीच्या अधिकाऱ्याच्या हाती होते. शिवषण्मुखरावच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्याचा भाऊ रामचंद्र विठ्ठलराव गादीवर आला. ब्रिटिशांनी त्यास सी. आय्. ई. केले (१८९२) परंतु त्याचे त्याचवर्षी निधन झाले. त्यानंतर रामचंद्राचा मुलगा गादीवर आला. १९३१ मध्ये २५ सदस्यांचे विधिमंडळ व चौघांची कार्यकारिणी होती. १९३४ पासून बेल्लारीचा जिल्हा न्यायाधीश सोंडूरचा मुख्य न्यायाधीश असे. शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात संस्थान मागासलेले होते. संस्थानात सुमारे १/१० लोकसंख्या महाराष्ट्रीयांची होती. १८४७ मध्ये वसवले गेलेले रमणदुर्ग (रामदुर्ग) हे थंड हवेचे ठिकाण, कृष्णनगर किल्ला व सोंडूरपासून दक्षिणेस १० किमीवर असलेले कार्तिकस्वामीचे देऊळ ही येथील प्रेक्षणीय स्थळे प्रसिद्ध आहेत. संस्थानच्या परिसरात हेमॅटाईट सारखे लोह खनिज विपुल आढळले आणि ब्रिटिश संशोधकांना सोन्याच्या खाणींचाही मागोवा लागला होता. संस्थान १ एप्रिल १९४९ मध्ये तत्कालीन मद्रास राज्यात व १ नोव्हें. १९५६ पासून म्हैसूर ( कर्नाटक) राज्यात समाविष्ट झाले.
कुलकर्णी, ना. ह.
“