सेलेस, मोनिका : (२ डिसेंबर १९७३ – ). ख्यातनाम आंतरराष्ट्रीय टेनिसपटू. नोव्ही साद (सर्बिया) येथे एका हंगेरियन कुटुंबात कारोली व एस्थर या दांपत्यापोटी जन्म. वडील कारोली हे क्रीडाप्रेमी आणि व्यावसायिक व्यंगचित्रकार होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मोनिका हिने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच टेनिसमधील प्राथमिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे तिने जेलेना जेनसिक व निक बोलेत्तीएरी या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसमधील आपली कारकीर्द सुरू केली.
मोनिका हिने फ्लॉरिडातील ‘ऑरेंज बोल’ हा सामना जिंकून टेनिसमधील आपले पहिले यश संपादन केले (१९८५). दरम्यान तिचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले (१९८६). तेथे निक बोलेत्तीएरी यांच्या टेनिस अकॅडेमीतून तिने दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतले. १९८८ पासून ती व्यावसायिक टेनिस स्पर्धेत खेळू लागली. व्यावसायिक स्पर्धेतील पहिले विजेतेपद तिने ‘ह्यूस्टन चषक’ जिंकून मिळविले (१९८९). त्याच वर्षीच्या पॅरिस येथील फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत जगज्जेत्या स्टेफी ग्राफकडून तिचा पराभव झाला तथापि त्याच वर्षीच्या जागतिक महिला टेनिसच्या क्रमवारीत तिने सहावा क्रमांक पटकाविला. पुढे ग्रँड स्लॅम एकेरी स्पर्धेत चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपन (१९९१, १९९२, १९९३, १९९६) तीन वेळा फ्रेंच ओपन (१९९०, १९९१, १९९२) दोन वेळा अमेरिकन ओपन (१९९१, १९९२) अशा विविध सामन्यांत तिने विजेतेपद पटकाविले. वयाच्या सोळाव्या वर्षी फ्रेंच ओपन एकेरी स्पर्धेत (१९९०) तिने अजिंक्यपद मिळविल्याची नोंद द गिनिज बुक ऑफ रेकॉर्डस् (१९९९) मध्ये आहे. प्रतिष्ठेच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांत नामवंत खेळाडूंचा पराभव करून जागतिक क्रमवारीत तिने प्रथम स्थान प्राप्त केले. १९९१ ते १९९३ या तीन वर्षांत तिने खेळलेल्या ३४ सामन्यांपैकी ३३ सामन्यांत अंतिम फेरीत ती पोहोचली आणि २२ सामने जिंकले. डाव्या हाताने केलेली भेदक प्रारंभखेळी (सर्व्हिस), दोन्ही हातांनी जोमदार फटके मारण्याची खासियत ही तिच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. ३० एप्रिल १९९३ रोजी जर्मनी येथील हँबर्ग स्पर्धेत उपांत्यपूर्व सामना सुरू असतानाच स्टेफी ग्राफचा एक चाहता गुंटर पार्च या माथेफिरू इसमाने तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिला जखमी केले. या अनपेक्षित हल्ल्याने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि दोन वर्षे तिला टेनिसपासून दूर राहावे लागले. पुढे प्रयत्नपूर्वक स्वत:ला सावरत तिने टेनिसमधील आपली कारकीर्द पुन्हा सुरू केली. कॅनडियन ओपन स्पर्धेत (१९९५) एकेरीत व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत (१९९६) दुहेरीत तिने विजेतेपद पटकाविले. सिडनी येथील ऑलिंपिक स्पर्धेत तिने ब्राँझपदक मिळविले (२०००). १९९४ मध्ये तिला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आणि जून २००७ मध्ये हंगेरियन नागरिकत्वही मिळाले. पुढे २००८ मध्ये तिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली.
टेनिसमधील तिच्या विक्रमी कारकीर्दीमुळे ‘सॅनेक्स हीरो ऑफ द यिअर’ या पुरस्काराची ती प्रथम मानकरी ठरली (२००२). ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’ ह्या संघटनेवर तिची सदस्य म्हणून निवड झाली (२००९). टाइम या नियतकालिकाने महिला टेनिसमधील तीस जागतिक ख्यातकीर्त खेळाडूंमध्ये तिचा समावेश केला (जून, २०११). गेटिंग अ ग्रिप : ऑन माय बॉडी, माय माइंड, मायसेल्फ (२००९) हे तिने लिहिलेले आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
मिठारी, सरोजकुमार