सेमिटिक भाषासमूह : साधारणतः उत्तर आफ्रिका व नैर्ऋत्य आशिया या प्रदेशांत बोलल्या जाणाऱ्या भाषांचा गट. ज्या राष्ट्रांचा पूर्वज बायबलमधील कथेनुसार शेम हा परंपरेने मानला गेला, अशा राष्ट्रांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश सामान्यतः या भाषासमूहात केला जातो. सेमिटिक हा शब्दही शेमवरून आला आहे. ⇨ इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबाचा शोध १७८६ मध्ये लागून नंतर त्याचा अभ्यास आकाराला येत असताना तशाच इतर भाषासमूहांचा शोध सुरू झाला आणि त्यासाठी बायबलमधील कथेचा आधार मिळाला. (‘जुना करार’ उत्पत्ती ६:१०, ९:२२-२५, १०:१-३२). आदमचा वंशज नोआ (कुराणात नूह) जगबुडीतून वाचल्यानंतर त्याच्या शेम, हाम आणि जा़फेथ या तीन मुलांचा वंश जगभर पसरला. थोरल्या शेमचे वंशज हिब्रू, अरबी, ॲसिरियन, ॲरेमाइक इ. भाषा बोलणारे म्हणजे सेमिटिक-भाषक हामचे वंशज उत्तर-पूर्व आफ्रिकेतील बर्बर इ. भाषा बोलणारे म्हणजे हॅमिटिक-भाषक अशी प्रथम कल्पना होती. के. आर्. लेप्सियस या जर्मन संशोधकाने १८६० च्या सुमारास हॅमिटो-सेमिटिक भाषासमूहाची कल्पना केली. नंतरच्या संशोधनामुळे हे चित्र बरेच बदलले. [→हॅमिटिक भाषासमूहे].

सेमिटिक भाषा मुख्यतः दक्षिण-पश्चिम आशियात बोलल्या जातात. त्यांच्या चार शाखा मानता येतात : उत्तर-पूर्व, उत्तर-मध्य, दक्षिण-मध्य आणि दक्षिण-पश्चिम. भाषिक परिवर्तन कितपत झाले आहे, याचा विचार करून तीन अवस्था मानता येतात : प्राचीन (इ. स. पू. ३००० पासून) मध्य (इ. स. पू. १४०० पासून) आणि नव्य (इ. स.१७०० पासून). वेगवेगळ्या उपशाखांतून या अवस्थांच्या निश्चित कालसीमा वेगळ्या राहतात.

उत्तर-पूर्व शाखेत प्राचीन अकेडियन किंवा बॅबिलोनियन ही भाषा इ. स. पू. २८००-०१ मध्ये मेसोपोटेमियात बोलली जाई. उत्तर-मध्य शाखेत प्राचीन काननाइट, उगारिटिक, ॲमोराइट या भाषा इ. स. पू. ३००० ते १००० मध्ये सिरिया, पॅलेस्टाइनमध्ये बोलल्या जात. मध्य फिनिशियन-प्यूनिक इ. स. पू २००० ते इ. स. १००० मध्ये भूमध्य समुद्राच्या पूर्व आणि नंतर दक्षिण किनारी बोलल्या जात. हिब्रू, ॲरेमाइक इ. भाषा इ. स. पू. १३०० ते इ. स. १५०० या कालखंडात सिरिया, पॅलेस्टाइनमध्ये बोलल्या जात. (ह्यांपैकी हिब्रू ही १९४८ मध्ये इझ्राएलची राष्ट्रभाषा ठरून सतरा-अठरा शतकांनंतर नित्याच्या व्यवहारात आली). दक्षिण-मध्य शाखेत प्राचीन पुराण अरबी इ. भाषा इ. स. पू. ५०० ते इ. स. ७०० ह्या कालखंडात अरबस्तानात बोलल्या जात. मध्य अभिजात अरबी इ. स. ७०० पासून आजपर्यंत आणि नव्य अरबी इ. स.१७०० पासून अरबस्तानात बोलली जाते. अरब सत्तेबरोबर अरबी भाषेचा विस्तार उत्तर आफ्रिका, सिरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटेमिया या भागांत (पुष्कळदा स्थानिक भाषांच्या जागी) झाला. दक्षिण शाखेत प्राचीन दक्षिण अरबी इ. स. पू. १००० पासून इ. स. १००० या काळात बोलली जाई. मध्य दक्षिण अरबी आणि उत्तर इथिओपियन इ. स. १००० पासून इ. स. १७०० ह्या काळात आणि नव्य दक्षिण अरबी व दक्षिण इथिओपियन इ. स.१७०० पासून दक्षिण अरबस्तानात आणि इथिओपियात बोलल्या जात. दक्षिण इथिओपियनपैकी अम्‌हारिक ही इथिओपियाची राष्ट्रभाषा आहे.

सेमिटिक भाषांच्या वर्णव्यवस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ आ, इ, उ आदी सहा स्वर, व्यंजनांमध्ये ग्रसनीय (जिव्हामूलीय) घर्षक (उदा., अरबी बडी हा आणि ऐन ), कंठीय स्पर्श (उदा., अरबी हम्जा) आणि ग्रसनीरंजित व्यंजनांचा समावेश (उदा., अरबी स्वाद, द्वाद, तोय, जोय इ. ‘मु़फ़ख़मा’ व्यंजने). पद-व्याकरणाची वैशिष्ट्ये म्हणजे दोन-तीन व्यंजनांचे मूळ (रूट) आणि त्यात स्वर व पूर्व, उत्तर प्रत्यय जोडून (वजन) विकार आणि साधना होणे (उदा., अरबी ह् म् द् ‘स्तवन करणे’ पासून हमीद ‘प्रशंसित’, मुहम्मद ‘स्तवन करणारा’, महमूद ‘स्तवन केला गेलेला’), दोन लिंगे (पु. स्त्री.) व तीन वचने (एक, द्वि, बहु), क्रियाव्याप्तिभेद (क्षणिक-सतत किंवा घटित-घटमान) हे क्रियाकालभेदांपेक्षा अगोदरचे असणे, माझा-त्याचा इ. आणि मला-त्याला इ. अनुक्रमे नामाला आणि क्रियापदाला प्रत्यय लावून दर्शविणे, अशी काही आहेत. वाक्य- व्याकरणाची वैशिष्ट्ये म्हणजे ‘आहे’ ची जागा रिक्त असणे (तो माणूस), ‘ह्याने हे खाल्लं’ पासून ‘तो ह्याला खाल्ला’ ह्या प्रकारची रचना स्थिर होणे, अशी काही आहेत. शब्दसंग्रहात परभाषेतून शब्द प्रत्यक्ष उसने न घेता, अनुवादित करण्याची प्रवृत्ती आहे. एकंदरीत, हिब्रू आणि अरबी भाषा ह्या अभिजात स्वरूपात धर्मभाषा आणि साहित्यभाषा म्हणून टिकवून धरण्याची प्रवृत्ती आहे.

अरबी, हिब्रू, अम्‌हारिक यांना आपापल्या लिप्या आहेत. प्राचीन काळात अकेडियन इ. भाषा कीलमुखी म्हणजे ⇨ क्यूनिफॉर्म लिपीत लिहिल्या जात.

हॅमिटो-सेमिटिक भाषासमूहाला आता आफ्रो-आशियाई या नावाने ओळखले जाते. त्यांपैकी सु. २७ कोटी लोक सेमिटिक भाषा बोलतात.

पहा : सेमिटिक लिपि.

संदर्भ : 1. Beer, George Meyer, Rudolf, Hebraische Grammatik, 2 Vols. 1952–55.

           2. Benet, Patrik, Comparative Semitic Linguistics : A Manual, 1998.

           3. Birkeland, Harris, The Language of Jesus, 1954.

           4. Diakonoff, I. M. Semitohamititskie Yazki Trans. Semito-Hamitic Languages, Mosco, 1965.

           5. Dillmann, Christian, Ethiopic Grammar, 1907.

           6. Fleisch, Henri, L’ Arabe Classique, 1956.

           7. Georgio Levi della Vida, Ed. Semitic Linguistics : Present and Future, 1961.

           8. Harris, Zelling S. Development of the Canaanite Dialects, 1939.

           9. Hetjohn, Robort, Ed. The Semitic Languages, London, 1997.

          10. Lipinski, Edward, Semitic Languages : Outlines of A Comparative Grammar (2 Ed.), 2001.

          11. Moascati, Sebatino, An Introduction to the Comparative Grammar of the Semitio Languages, 1964.

केळकर, अशोक रा.