केसरी : (शेंदरी हिं. लटकन क. रंगमल्ली सं. सिंदुरी इं. ॲनाटो लॅ. बिक्सा ओरेलॅना कुल-बिक्सेसी). सुमारे २–१० मी. उंचीच्या या लहान सदापर्णी वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका असून भारतात (विशेषतः दक्षिणेत) सर्वत्र लावलेला आढळतो. कोवळ्या भागांवर तांबूस लव असते. पाने लांब देठाची, साधी, एकाआड एक, हृदयाकृती (१०–३० सेंमी. लांब) फुले मोठी, पांढरी किंवा फिकट लालसर जांभळी असून फांद्यांच्या टोकास ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये परिमंजरीत येतात.

बोंडे गोलसर, टोकदार, तांबूस भुरी, मऊ व काटेरी असून बियांभोवती लालसर शेंदरी अध्यावरण (बीजाच्या देठापासून किंवा त्यावरील सूक्ष्म छिद्राच्या जवळील भागापासून तयार झालेली वाढ) असते. फळ तडकल्यावर दोन शकले होतात.

याचे फळ स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे) व रेचक असून मुळांची साल पाळीच्या तापावर देतात. बिया बलवर्धक, स्तंभक, पौष्टिक व ज्वरनाशी असून परम्यावरही गुणकारी असतात. पाने काविळीवर वापरतात. बियांच्या अध्यावरणात बिक्सिन (C25H30O4) हे लाल रंगद्रव्य असते ते बाजारात ‘ॲनाटो’ किंवा ‘ओरेलीन’ या नावाने विकतात. त्याचा उपयोग सामान्यतः सूत, रेशीम, तूप, लोणी, चीज, मेवामिठाई, चॉकोलेट, मार्गारीन, केसाची तेले, बूट पॉलिश, रोगण, लोकर, पिसे, साबण, औषधी मलमे इ. रंगविण्यास करतात. सालीपासून वाख व दोऱ्या बनवितात. नवीन लागवड कलमे लावून किंवा बियांपासून करतात.

जमदाडे, ज. वि.

केसरी (उजव्या बाजूला तळाशी बोंड)