केशवदेव, पी. : (? १९०५–   ). आधुनिक मलयाळम् कथाकार व कादंबरीकार. त्यांचा जन्म केरळमधील पेरूर येथे एका कामगार कुटुंबात झाला. सध्या त्यांचे वास्तव्य त्रिवेंद्रम येथे असून, ललित लेखन हाच त्यांनी आपला व्यवसाय केला आहे.

समाजाच्या खालच्या थरातील व्यक्तींचे जीवन त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून प्रभावीपणे चित्रित केले असून, राजकीय व सामाजिक क्रांतीचा पुरस्कार केला आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे कमालीची वास्तव व जिवंत आहेत. ते स्वतः श्रमिक वर्गातून आल्यामुळे, त्यांच्या कृतींतून स्वानुभवांचा सच्चेपणा विशेषत्वे दिसून येतो. आधुनिक मलयाळम् कथेला त्यांनी नवे वळण दिले. केरळमधील आर्थिक आणि सामाजिक समस्यांवर आपले लक्ष केंद्रित करून, त्यांनी अपार सहानुभूतीने पण परखडपणे आपल्या कथा लिहिल्या. भावीवरन (१९४०), दीनम्मा (१९४५), उषस (१९४८), चित्रशाळा, जीवितचक्रम् (तिसरी आवृ. १९४९), प्रवाहम् (१९५१) हे त्यांचे गुणसंपन्न कथासंग्रह होत. त्यांच्या कादंबऱ्यांत आयालक्कार, ओडयिल निन्नु (१९४२), भ्रांतालयम् (१९४९), उलक्क (१९५१), नटी (दुसरी आवृ. १९५१), ओरू सुंदरीयुत्ते आत्मकथा  ह्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांची ओडयिल निन्नु  ही कादंबरी विशेष गाजली.

कथा-कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक-राजकीय दोषांवर प्रभावी नाटकेही लिहिली आहेत. मंत्रियक्कोळे  (१९५०) आणि ज्ञानीप्पो कम्युनिस्टकम् ही त्यांची नाटके उल्लेखनीय होत. तथापि मलयाळम् साहित्यात कथाकार व कादंबरीकार म्हणूनच त्यांचे स्थान महत्त्वाचे ठरते.  

नायर, एस. के. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)