केशभूषा : आकर्षक केशरचना. स्त्रीपुरूष या दोहोंनाही केशभूषेचे आकर्षण असते. केस कापणे, धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे करणे व विविध उपायांनी केसांचे सौदर्य वाढविणे यांसारख्या गोष्टी केशभूषेत अंतर्भूत होतात. आकर्षकता किंवा सौंदर्य वाढविणे हा जरी केशभूषेचा प्रमुख उद्देश असला, तरी सामाजिक संकेतांनुसार खाजगी व सार्वजनिक समारंभ, धार्मिक विधी व उत्सव त्याचप्रमाणे इतरही प्रकारची प्रतीकात्मता यांसाठी केशभूषेच्या विविध शैली रूढ झालेल्या आढळतात. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्य दाखविण्याकरिता त्यात विजयचिन्हे आणि पदके लावीत. केशभूषेचा उगम यातूनच झाला असावा. तसेच केस इतरांना दिसू न देण्याचा पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी.
जुन्या काळातील केशभूषाही पारंपरिक कल्पनांवर आधारित असे. पिसांचे गुच्छ किंवा मुकुट केसात खोवण्याची वन्य लोकांची प्रथा, चिनी लोकांची शेंडीची वेणी घालण्याची पद्धती, धर्ममार्तंडांची मुंडनपद्धती ही पारंपरिक केशभूषेची काही उदाहरणे आहेत. केस स्वच्छ करणे, रंगविणे, सुगंधित करणे, कमी करणे, कापणे, वेणी घालणे, गंगावनासारख्या कृत्रिम केसांचा वापर करणे, केसांचा टोप घालणे, जाळी किंवा झिरझिरीत कापडाने केस झाकणे, त्याचप्रमाणे हिरे, मोती, पिना, पीस, रंगीबेरंगी फीत, कृत्रिम किंवा नैसर्गिक फुले इत्यादींनी केसांची सजावट करणे, यांसारखे प्रकार फार पुरातन काळापासून रूढ असल्याचे दिसते. असे असले, तरी केशभूषेच्या शैलीत मात्र कालमानाप्रमाणे व बदलत्या सौंदर्यद्दष्टीप्रमाणे सतत बदल होत गेला आहे. विविध देशांतील जातीजमातींतील केशभूषेचा आढावा घेतला, तर हीच गोष्ट दिसून येते.
ऐतिहासिक आढावा: केशसंवर्धन, केशवपन आणि केशभूषा यांविषयी जगातील निरनिराळ्या देशांत विविध प्रथा आढळून येतात. पुरुषांनी केस कापणे, स्त्रियांनी ते वाढविणे, असेच सामान्यतः आढळून येते. केसांना तेले, प्रसाधने लावून व त्यांची विविध वळणे, वलये साधून ते शोभायमान व आकर्षक बनविण्याची विविध तंत्रे सर्वत्र थोड्याफार फरकांनी सारखीच आढळतात.
भारतात प्राचीन काळी स्त्रिया व पुरुष केस वाढवून अनेक प्रकारच्या केशरचना आकर्षक पद्धतीने करीत. त्या काळात पुरुषही स्त्रियांप्रमाणे आपल्या केसांची वेणी घालीत. अशा केसांच्या वेणी बांधण्याच्या प्रकाराला कैदर्प म्हणत. प्रत्येक कुळातील लोक आपापल्या कुल-पद्धतीप्रमाणे केशरचना करीत. तत्कालीन स्त्रिया या आकर्षक केशरचनेत कुशल होत्या.
रामायणकाळात केसांचे उत्तम संगोपन व वाढ करून मनोहर केशरचना करीत. ती फुलांनी वा सुगंधांनी शृंगारण्यावर विशेष भर दिला जात असे. सुंदर, काळ्या व कुरळ्या केसांचे रामायणकाळात लोकांना आकर्षण वाटे. नितंबापर्यंत नागिणीप्रमाणे लोंबणारी वेणी हा स्त्रियांच्या केशरचनेचा आदर्श होता. या काळात पुरुष आपले केस वाढवून त्याची गाठ किंवा वलये करून डोक्यावर बांधीत. तपस्वी, ऋषिमुनी जटा बांधण्यासाठी विशिष्ट वृक्षांचा चीक वापरत असत.
स्त्रिया अनेक प्रकारच्या वेण्या घालीत व त्यावर रत्नमाला जडवीत. नितंबापर्यंत रुळणाऱ्या वेणीस प्रवेणी म्हणत. वेणीसाठी सोन्यात जडविलेला मोत्यांचागोंडाही त्या वापरत. फाशाप्रमाणे केलेल्या केशरचनेस केशपाश म्हणत. या केशपाशावर फुलांचा गजरा गुंडाळत. पुष्कळदा केस मुकुटासारखे डोक्यावर उभे बांधून ते पुष्पमालांनी किंवा रत्नमालांनी सजवीत. मऊ व काळ्याभोर केसांची प्रशंसा त्या काळाच्या वाङ्मयात आढळते. केस काळे, मऊ व सुगंधित होण्यासाठी विविध प्रसाधनांचा उपयोग केला जाई. प्राचीन कोरीव लेण्यांत प्राचीन भारतातील स्त्रियांच्या केशररचनेचे विविध प्रकार आढळतात. त्यांतही अजिंठा, वेरूळ, कोनारक, खजुराहो येथील शिल्पाकृतींत आढळणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचे अनुकरणही आधुनिक भारतीय स्त्रिया करताना आढळतात.
भरताने आपल्या नाट्यशास्त्रात नाटकातील निरनिराळ्या पात्रांनी करावयाच्या विविध केशरचनांची माहिती दिलेली आहे. ग्रीक लोकांत पुरुषांचे केस आखूड ठेवण्याची प्रथा होती. परंतु ते काळजीपूर्वक विंचरलेले किंवा कुरळे केलेले असत. स्त्रिया आपल्या केसांचा मधोमध भांग पाडून ते पाठीमागे घेऊन बांधीत. यासाठी डोक्याभोवती एक फीत बांधून बाजूचे केस त्यात गुंतवीत. स्त्रीपुरुषांत केस कुरळे करण्याची प्रथा होती, असे दिसते. ग्रीक साहित्यिक व विचारवंत मात्र लांब केस ठेवत व दाढीमिशाही राखत.
रोमन लोकांत पुरुष आपले केस सर्वसामान्य ग्रीक लोकांप्रमाणे आखूडच ठेवत. स्त्रियांची केशभूषा प्रारंभी ग्रीक स्त्रियांप्रमाणेच असे. परंतु नंतर केस कुरळे करून त्यामध्ये काही कृत्रिम कडक पदार्थ ठेवत व विविध आकारांची केशभूषा करीत. विशेषतः डोक्याच्या पाठीमागे केसांची अंबाड्याप्रमाणे गाठ मारीत. केसांच्या वेण्याही रोमन स्त्रिया घालीत. डोक्यापाठीमागे बांधलेल्या वेणीच्या गुंडाळ्यावर भरतकाम केलेले कापड बांधलेले असे. स्त्रिया केस रंगवीतही असत.
रोमन लोकांच्या आक्रमणानंतर फ्रान्स व इंग्लंडमधील लोकांत रोमन केशरचनेचा प्रभाव प्रारंभी दिसून येतो. नंतर अँग्लो-सॅक्सन व नॉर्मन लोकांच्या आक्रमणानंतर त्यात फरक पडत गेला व लांब केस वाढविण्याची प्रथा पुरुषांमध्ये रूढ होऊ लागली. मध्ययुगात पुन्हा स्त्रीपुरुषांच्या केशरचनांत फरक पडत गेला. या काळात आखूड केस हे गुलामगिरीचे द्योतक समजले जाई, म्हणून पुरुषही लांब केस ठेवीत. स्त्रिया केसांची लांब वेणी घालत आणि डोक्यावर एक प्रकारचा कापडी पातळसा घुंघट घालत. अशा तऱ्हेची स्त्रियांची घुंघट घालण्याची प्रथा बरीच शतके यूरोपीय राष्ट्रांत आढळते. चौदाव्या शतकानंतर ही घुंघटपद्धती कमी होत गेली. पंधराव्या शतकात अत्यंत पातळ व झिरझिरीत कापड केसांना बांधण्याची प्रथा दिसून येते. या काळात पुरुषवर्ग लांब केस ठेवत असे. पुढे शिरस्त्राण प्रचारात येऊ लागल्यामुळे पुन्हा पुरुष सोयीसाठी आखूड केस ठेवू लागले. सोळाव्या शतकानंतर पुन्हा लांब केसांची पद्धती रूढ झाली. या शतकांच्या पूर्वार्धात स्त्रियांचे केस कापडी आवरणात लपलेले असत. ते उत्तरार्धात फ्रान्समधील स्त्रियांप्रमाणे मध्यभागी भांग पाडून मागे बांधलेल्या स्थितीत आढळतात. सोळाव्या शतकाच्या शेवटी एलिझाबेथच्या काळात स्त्रियांच्या डोक्यावरील कापडाचे आच्छादन गेले व स्त्रिया मुक्तपणे विविध प्रकारच्या अभिनव केशरचना करू लागल्या. मध्यभागी केसांचा भांग पाडून ते एका कृत्रिम तगडावरून वळवून मागे बांधत. मागील केशबंधनावर कापडी आच्छादन असे. सोळाव्या शतकानंतर पुरुषवर्गात कृत्रिम केसांचे टोप वापरण्याची प्रथा सुरू झालेली आढळते. विशेषतः सरदार, उमराव, न्यायाधीश कुरळ्या केसांचे टोप वापरीत असत. ही प्रथा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत प्रचलित होती.
प्राचीन ॲसिरियन लोक आपले केस कुरळे करून ते खांद्यावर रुळत ठेवत व त्यांवर उंच शिरस्त्राण वा टोप घालीत. ॲसिरियन स्त्रिया आपले केस सोनेरी पट्ट्याने बांधीत, तर ज्यू स्त्रिया चंद्राच्या आकाराची केशभूषा करीत व तीवर जाळे बांधीत. ईजिप्शियन स्त्रियांना आपले केस कुरळे कसे करावेत ही कला अवगत होती असे दिसते. त्या आपले केस आकड्यांचा वापर करून चापूनचोपून बसवीत. ईजिप्शियन लोक, केसांचे टोप बहुधा मेंढीच्या लोकरीपासून अगर मानवी केसापासून बनवीत.
चीनमधील मांचू राजांच्या कालात झालेल्या मंगोलियन व तार्तर आक्रमणानंतर चिनी लोक, मंगोलियन तार्तर लोकांप्रमाणे केस ठेवून त्यांच्या वेण्या बांधीत व त्या डोक्याच्या मागे सोडत. जपानी लोक मात्र केस ठेवत. जपानी स्त्रिया मात्र– विशेषतः गेशा– लांब केस ठेवून त्यांची आकर्षक व चित्तवेधक रचना करीत. तार्तर, मंगोलियन स्त्रिया केस लांब वाढवीत व त्याच्या वेण्या पाठीवर सोडीत असत. त्यांचा पुरुषवर्ग आखूड केस राखत असे.
आफ्रिकेतील निग्रो लोकांचे केस जात्याच कुरळे व आखूड असतात. पूर्व आफ्रिकेतील मसाई जमातीतील फक्त योद्धे केस ठेवतात व इतर स्त्रीपुरुष मुंडन करतात. काही निग्रो जमातींत केसांना जनावरांची चरबी व तांबडी माती लावण्याची प्रथा आढळते. पश्चिम आफ्रिकेतील स्त्रिया त्यांच्या सामाजिक दर्जाप्रमाणे कमी-अधिक केस ठेवतात, तर मुलींचे मुंडन करतात. नायजेरियात नाण्याप्रमाणे डोक्यावर चपट्या आकाराची केशरचना करतात. रुआंडातील लोक नागमोडी पद्धतीने केस कापतात व उरलेले केस एकत्र करून उभे डोक्यावर बांधतात. उत्तर काँगोमध्ये डोक्यावर लहान मुलाची कवटी ठेवून तीवर केस पिरगळून बांधतात व उभी केशरचना करतात.
आधुनिक केशभूषा: एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून केशभूषा व केसांची जोपासना या बाबतीत बरीच प्रगती झालेली आहे. पुरुषवर्गात बहुतेक सर्व आफ्रो-आशियाई देशांत यूरोपीय केशरचनेच्या विविध पद्धतींचे अनुकरण केले जात असलेले दिसते. स्त्रियांच्या केशभूषेवर मात्र यूरोपीय प्रभाव कमी प्रमाणात आढळतो. सामान्यतः त्या त्या देशांतील आवडीनिवडीप्रमाणे केशभूषेत आकर्षक बदल होत जातात व नव्या नव्या फॅशन रूढ होतात.
केसांची निगा : यात केस कापणे, साफ करणे, त्याचप्रमाणे केसांना विविध रंग देणे, केस कुरळे करणे, कृत्रिम केस वापरून केसांची शोभा व आकार वाढविणे, केसांना विवध प्रकारची तेले, द्रव्ये (पोमेड, ब्रिलियंटाईन, क्रीम) लावून ते चमकदार दिसतील असे करणे इत्यादींचा अंतर्भाव होतो. केसांची वाढ ही मुख्यतः शारीरिक आरोग्यावर अवलंबून असली, तरी आनुवंशिकता, वय यांवरही ती अंशतः अवलंबून असते. वयोमानाप्रमाणे केस गळणे, टक्कल पडणे, केस पिकणे या क्रिया चालू असतात. अकाली केस पिकलेल्या व्यक्तींना केस काळे करण्यासाठी विविध प्रकारचे कलप वा रंग यांची आवश्यकता भासते. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे कलप व रंग तयार मिळतात. केसप्रसाधनालयात हव्या असलेल्या छटात वा रंगात केस रंगवून मिळतात. केशकर्तनालयात पाहिजे त्या प्रकारे केस कापून मिळतात. तसेच सौंदर्यालयात केस कुरळे करणे, विविध प्रकारच्या तात्पुरत्या केशरचना करणे, केस रंगविणे इ. क्रियाही केल्या जातात. केस हे घामाने खराब होतात व धुळीने मळतात, म्हणून स्त्रीपुरुषांनी नियमितपणे ते स्वच्छ धुणे आवश्यक असते. त्यासाठी रिठे, शिकेकाई, उटणी इ. देशी साधने किंवा तयार प्रसाधनद्रव्ये (उदा., शांपू) मिळतात. त्यामुळे केस साफ होऊन त्यांची तकाकी वाढते. केस कोरडे असल्यास त्यांना विविध प्रकारची तेले लावून त्यांची कांती वाढविता येते. फणीने किंवा ब्रशाने विंचरून ते दररोज साफ ठेवता येतात.
केशरचना : कोणत्याही प्रकारची केशरचना करण्यापूर्वी चार प्रमुख गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. त्या म्हणजे (१) आपले केस निरोगी ठेवणे, (२) केस नियमितपणे विंचरून स्वच्छ ठेवणे, (३) आपल्या चेहऱ्याला शोभेल अशी केशभूषा करणे, (४) केशभूषेवर योग्य अलंकार घालून त्यांची शोभा वाढविणे. केशरचना अशा रीतीने केलेली असावी, की ती समोरून, पाठीमागून किंवा कोणत्याही बाजूने पाहिल्यास आकर्षक दिसावी. केस लांब असोत वा आखूड असोत, या दोन्ही प्रकारांत आकर्षक केशरचनेच्या अनेक शैली आढळतात. बॉब कट, अश्वपुच्छाकृती केशरचना, मुकुटाकार ऊर्ध्वरचना यांसारख्या केशरचना आपल्याकडील स्त्रियांतही रूढ आहेत.
केसांचे खरे सौंदर्य शरीरारोग्य व स्वच्छता या गोष्टींवरच अवलंबून असते. व्यक्तीच्या चेहऱ्याचे रंग, रूप व आकार, केसांची निसर्गदत्त ठेवण व मोडणी इत्यादींचा विचार करून केशभूषा करणे आवश्यक असते. एकास शोभून दिसणारी केशभूषा दुसऱ्यास शोभून दिसेलच, असे नाही. आपला चेहरामोहरा व केसांची नैसर्गिक ठेवण लक्षात घेऊन प्रत्येकाने केशभूषा केली पाहिजे.
संदर्भ: कोकड, अ. दि. आकर्षक केशरचना, पुणे, १९६९.
शहाणे, शा, वि.
“