खिलाफत : खिलाफत ही संज्ञा इस्लामच्या धार्मिक-राजकीय परंपरेस उद्देशून वापरली जाते. खलीफा या शब्दाचा मूळ अर्थ प्रेषिताचा वारस. मुहंमद पैगंबर हे धर्मसंस्थापक आणि राज्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या वारसाला धर्मप्रमुख व राज्यप्रमुख म्हणून दुहेरी अधिकार प्राप्त झाले. मुहंमद पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे वारस म्हणून ⇨ अबू बकर, ⇨ उमर, ⇨ उस्मान व ⇨ अली यांच्याकडे अनुक्रमाने खलिफापद आले. अरब टोळ्यांमध्ये वयाने वडील आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीकडे टोळीचे प्रमुखत्व जात असे, याच न्यायाने मुहंमदांनंतरचे पहिले चार खलीफा निवडण्यात आले.
अबू बकरने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. मक्का व मदीना या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमला नाही. या वेळी इस्लामची स्थिती मोठी चमत्कारिक होती. जे मुहंमदांना अमर समजत, ते त्यांच्या मृत्यूने भांबावले होते. साहजिकच इस्लामचा डोलारा कोसळतो की काय, अशी स्थिती झाली होती. अशा वेळी अबू बकरने आजपर्यंत अज्ञात असलेला कुराणाचा काही भाग प्रसिद्ध केला. मुहंमद जरी मर्त्य असले, तरी अल्ला अमर आहे, तो आपल्या सेवकांवर कृपाछत्र धरतो आणि शत्रूचा निःपात करतो, असा त्या अप्रसिद्ध भागाचा आशय होता. याप्रमाणे लोकांचा विश्वास संपादन करून त्याने सर्व अरबस्तान आपल्या कबजात आणण्याची खटपट सुरू केली. प्रथम इराक घेतले. युफ्रेटीसच्या पश्चिमेकडील सर्व शहरे ताब्यात येताच, त्यांच्या खलिद नावाच्या सेनापतीने इराणी लोकांचा पराभव केला. त्यानंतर त्याने सिरिया काबीज केले. अबू बकर ६३४ मध्ये मरण पावला. त्याच्या इच्छेप्रमाणे उमर या मुहंमदांच्या दुसऱ्या सासऱ्याची खलीफा म्हणून निवड झाली. ख्रिश्चन व ज्यू लोकांनी वेगळा पोशाख करावा, असा त्याचा आदेश होता. त्याने इराणविरुद्ध धर्मयुद्ध पुकारले, तसेच इराकमध्ये सैन्य धाडले. काज या ठिकाणी घनघोर युद्ध झाले. इराणी सैन्य टायग्रिसच्या पूर्वेकडे रेटले गेले. त्याच्या सैन्याने ईजिप्तवर स्वारी केली आणि बहुतेक आफ्रिका खंड पादाक्रांत केला. याच्या राज्याचा विस्तार पूर्वेस सिंधू नदीपासून पश्चिमेस ट्रिपोलीपर्यंत आणि उत्तरेस कॉकेशस पर्वतापासून दक्षिणेस नाईल नदीपर्यंत पसरला होता. एका ख्रिस्ती इराणी गुलामाने उमरला ६४४ मध्ये मशिदीत असता भोसकून ठार केले. त्याने खलीफापदासाठी सहाजणांची नावे सुचविली होती, परंतु प्रत्यक्षात पैगंबरांचा दुसरा जावई उस्मान खलीफा झाला. त्याने आपल्या पूर्वसूरींचे धोरण स्वीकारले तथापि खरी सत्ता त्याचा चुलता व चुलतभाऊ यांच्याकडेच होती. त्यामुळे ईजिप्तमधील एका विरोधी गटाने बंड केले. त्यात बसरा व कूफा येथील काही लोक सामील झाले. ६५६ मध्ये उस्मानचा खून झाला आणि मुहंमदांचा जावई अली याच्याकडे खलीफापद आले.
खलीफा उस्मान याच्या कारकीर्दीपासून अंतःकलह सुरू झाला. सत्तास्पर्धा कळसाला पोहोचली. त्यातून खलीफापद मुहंमदांच्या वंशात रहावे की परंपरागत पद्धतीप्रमाणे कर्तृत्वावर आधारलेले असावे, हा वाद सुरू झाला. यातूनच शिया आणि सुन्नी हे पंथ निघाले. अलीला मुआविया, आयेशा, झुबेर वगैरेंशी शत्रुत्व पतकरावे लागले. पुढे मुआविया व अली यांमध्ये खलीफापदासाठी रस्सीखेच सुरू झाली. अलीचा ६६१ मध्ये खून झाला. अलीचे वंशज सत्तेच्या धुमश्चक्रीत कमकुवत ठरले. त्यांनी आपणास इमाम ही पदवी घेतली. यापूर्वी खलीफांना धर्मनिष्ठांचे सेनापती (कमांडर ऑफ द फेथफूल), असा किताब असे. इमाम या शब्दाला याहून अधिक मोठा अर्थ आहे. इमाम हा प्रेषितांच्या रक्ताचा वारस होय. प्रेषित हे स्वतः सद्गुणांची मूर्ती होते, त्यांना पापाचा स्पर्शही झाला नाही, अशी सर्वसाधारण समजूत होती आणि त्यामुळे त्यांच्या वंशजांतही हे गुण आहेत, असा शियांचा दावा होता. [→ इमाम].
उमय्या खिलाफत: (६६१–७५०). बळी तो कान पिळी या न्यायाने उमय्या घराण्याने खिलाफतीचा ताबा घेतला. प्रथम एकाच वेळी दोन खलीफा होते. कारण अली जिवंत असतानाच मुआवियाने वेगळी खिलाफत स्थापन केली होती. नंतर अलीचा मुलगा हसन याला खलीफा म्हणून निवडले असताही मुआवियाने खिलाफत चालूच ठेवली. अखेर हसन याने खिलाफतीचा त्याग केला. मुआवियाने प्रतिस्पर्ध्यांना खूष ठेवून खिलाफतीचा सांभाळ केला. दमास्कस ही राजधानी केली. या वेळेपासून खलीफा निवडण्याची पद्धत बंद होऊन खलीफापद उमय्या घराण्यात वारसाहक्काने जावयाचे, अशी प्रथा रूढ झाली. मुआवियाच्या मृत्यूनंतर (६८०) त्याच्या मुलाला– यझीदला– खलीफापद मिळाले. तेव्हा कूफा शहराच्या पुढाऱ्यांनी अलीचा दुसरा मुलगा हुसेन याला खलीफा म्हणून निवडले. शेवटी हुसेनचा खून झाला. यझीदची खिलाफत टिकून राहिली.
उमय्यांच्या काळी इस्लामचा पश्चिमेस बराच प्रसार झाला. आशिया मायनरमध्ये ग्रीकांच्या विरुद्धसुद्धा इस्लामी सैन्याने विजय मिळविले. अखेर ६७७ मध्ये त्यांनी ग्रीकांशी तीस वर्षांच्या मुदतीचा तह केला.
या घराण्यात एकंदर चौदा खलीफा होऊन गेले [→ उमय्या खिलाफत].
अब्बासी खिलाफत : (७५०–१२५८). अब्बासी घराण्याचा मूळ पुरुष मुहंमद हा प्रेषितांचा चुलता अब्बास याचा खापरपणतू. त्याने उमय्या घराण्याविरुद्ध बंड केले. नंतर त्याचा मुलगा अबुल अब्बास हा अब्बासी घराण्याचा पहिला खलीफा झाला. ही खिलाफत बगदाद येथे होती, म्हणून तिला बगदादची खिलाफत असेही संबोधितात. अब्बासींनी बहुतेक उमय्या घराणे नष्ट केले. परंतु या घराण्यातील रहमान नावाचा एक राजपुत्र वाचला. त्याने स्पेनमधल्या राज्यपालाकडून राज्य घेतले आणि उमय्या खिलाफत चालू ठेवली. तिला कॉर्दोव्हची खिलाफत असेही म्हणतात.
अबुल अब्बास ७५४ मध्ये मरण पावला. त्याच्यानंतर अब्बासी घराण्यात सु. ३६ खलीफा झाले. त्यांनी इस्लाम धर्माचा प्रसार व राज्यविस्तार यांबरोबरच राज्यकारभारात अनेक चांगल्या सुधारणा केल्या.
अब्बासींच्या वेळी सुन्नी पंथास महत्त्व प्राप्त झाले. काही कट्टर धर्मनिष्ठांपैकी अब्दुल्ला काद्दाह हा होता. अली हा पहिला इमाम धरून इस्माइल हा सातवा इमाम होता, असे त्याने ठरविले. अब्बासींच्या वेळी त्यांचा फार छळ होऊ लागला, म्हणून ते अज्ञातवासात गेले.
या सुमारास इस्माइली पंथ हा शिया पंथाचाच एक उपपंथ उदयास आला. त्याची स्थापना इस्माइलच्या मृत्यूनंतर सु. ७६५ मद्ये झाली. त्याचा प्रसार व प्रचार आठव्या-नवव्या शतकांत मोठ्या प्रमाणावर झाला. [→ इस्माइली पंथ].
इमामपद मुहंमदाच्या वंशजाकडे (रक्ताच्या नातेवाईकांकडे) असले पाहिजे, असे शिया मानीत तर सुन्नी लोक खिलाफत कुरैश या घराण्यातच राहिली पाहिजे, असे प्रतिपादीत. खारिज लोक खलीफाला सर्व मुसलमानांनी निवडावे असे म्हणतात. सुन्नी पंथात ही निवड थोड्या माणसांनी करावी किंवा आधीच्या खलीफाने आपला वारस निश्चित करावा, यावर एकमत आहे. मुहंमदापूर्वी मक्केच्या काबा मंदिराचा कारभार त्यांच्या बनी हाशिम या घराण्यासह दहाबारा घराण्यांकडे असे. या सर्व घराण्यांना मिळून कुरैश असे नाव आहे. या विषयावरही एकमत होण्यास पुढे दोन-अडीचशे वर्षे लागली.
खलीफा मुतवक्किल याचा तुर्की सेनाधिकाऱ्यांनी खून केल्यावर ते म्हणतील त्याची निवड खलीफा म्हणून होई. ८४९ पासून खलीफाच्या हातातील राजसत्ता नाहीशी झाली. फक्त तात्त्विक दृष्ट्या खलीफाचा मान राखला जाई. त्याच्याकडून सुलतान अधिकारपदाची वस्त्रे घेई. नाण्यांवरही खलीफांचे नाव असे. शुक्रवारची सामूहिक प्रार्थना म्हणताना खलीफाचे नावे खुतबा पढत [→ अब्बासी खिलाफत].
स्पेनमधील उमय्या खिलाफत : अब्दुर रहमान याने ७५५ मध्ये कॉर्दोव्हा येथे स्थापन केलेल्या या खिलाफतीला पाश्चिमात्य खिलाफत असेही संबोधितात. ही खिलाफत सु. ३०० वर्षे अधिसत्ता गाजवत होती. अब्दुर रहमानच्या नंतर सु. २० खलिफा झाले. त्यांपैकी काहीजण दोनदा खलीफापदावर आले. या काळात स्पेनमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या अनेक क्षेत्रात प्रगती झाली. तिसऱ्या अब्दुर रहमानच्या कारकीर्दीनंतर स्पेनमधील खिलाफतीचे लहान लहान राज्यांत तुकडे झाले.
फातिमी खिलाफत : (९०९–११७१). उबैदुल्लाने कैरो येथे पैगंबरांच्या मुलीच्या नावाने फातिमी खिलाफतीची स्थापना केली. तिचे खलीफा स्वतःला फातिमेचे वारसदार समजतात. पण अब्बासी नामधारी खिलाफत चालूच राहिली. धार्मिक दृष्ट्या ते शियांप्रमाणेच होते उदा. कर्मती किंवा द्रूस या वंशाचा संस्थापक सय्यद इब्न हुसेन ईशान्य सिरियातील असून कित्येक दिवस तो धार्मिक कार्यात मग्न होता. तो ८९३ मध्ये वायव्य आफ्रिकेत गेला आणि तेथील बर्बर लोकांना त्याने सुन्नी पंथी राजकर्त्यांविरुद्ध बंडास प्रवृत्त केले. एवढेच नव्हे, तर सर्व शिया चळवळीस त्याने प्रोत्साहन दिले. फातिमी खिलाफतीने ट्युनिशिया, सिसिली, ईशान्य अल्जीरिया व वायव्य लिबिया हे प्रदेश हस्तगत केले. त्यामुळे सय्यद इब्न हुसेनचे सर्वत्र स्वागत झाले. त्याने उबैदुल्ला हे नाव धारण करून बगदादच्या खिलाफतीच्या महदिया या राजधानीतून आफ्रिकेच्या उत्तर भागावर वर्चस्व प्रस्थापित केले. त्याच्या मृत्यूच्या वेळी फातिमी खिलाफतीच्या अंमलाखाली माल्टा, सार्डिनिया, कॉर्सिका, जिनीव्हा हे भाग होते. यानंतर पुढील खलीफांनी भाडोत्री सैन्य ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अवनतीस आरंभ झाला. त्यातच हाकीम या सहाव्या खलीफाने ज्यू व ख्रिस्ती यांचा छळ आरंभिला. वझीर हे राज्यपाल शिरजोर झाले. त्यांनी स्वतंत्र राजाचे किताब धारण केले. यामुळे सिरिया, अल्जीरिया व ट्युनिशिया हे प्रदेश स्वतंत्र झाले. या खिलाफतीत १५ खलीफा झाले. पहिले एकदोन वगळता उर्वरित खलिफा विशेष कर्तबगार नव्हते.
खारिजी बंडखोरांनी खलीफा उस्मानच्या कारकीर्दीतच त्याच्याविरुद्ध बंड केले होते. उस्मानच्या गैरकारभारामुळे त्याच्याकडून खलीफापद काढून घेऊन कोणत्याही धर्मश्रद्ध व पुण्यशील मुसलमानाला खलीफा निवडावे, असा त्यांनी आग्रह धरला. यासाठी त्यांनी जवळजवळ १०० वर्षे युद्ध केली पण त्यांचा पराभव झाला. उ. आफ्रिकेत खारिजांचे अनुयायी अजूनही तात्त्विकदृष्ट्या कोणाही श्रद्धाळू, पुण्यवान व चारित्र्यशील मुसलमानाला खलीफा म्हणून निवडण्याचा अधिकार सर्व मुसलमानांना असला पाहिजे, असे मानतात.
शेवटच्या नामधारी खलीफाला मंगोलांनी १२५८ मध्ये ठार केले. त्यावेळी फातिमी खिलाफतही कोलमडली होती. मृत खलीफाचा नातेवाईक ईजिप्तमध्ये पळाला. तेथील लोकांनी त्याला खलीफा म्हणून निवडले परंतु त्याच्या हातात राजसत्ता नव्हती.
तुर्की सुलतानाने १५१७ मध्ये ईजिप्त जिंकल्यावर खलीफाला तुर्कस्तानात नेले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी खलीफापद आपल्याकडे घेतले. ही गोष्ट सुन्नी धर्मशास्त्राविरुद्ध होती. परंतु सत्तेपुढे धर्मशास्त्र टिकाव धरू शकले नाही. १९२४ मध्ये केमालपाशाने म्हणजे तुर्कांनीच खिलाफत नष्ट केली आणि धर्म व राजसत्ता यांच्यामधील दुवा कायमचा तोडून टाकला. हूसैन इब्न अली या अरबस्तानच्या राजाने आपण खलीफा असल्याचे जाहीर केले, पण इब्न सौदने (सौदी अरेबिया) त्याला राज्यत्याग करावयास भाग पाडले. त्यानंतर अनेक सकल इस्लामच्या परिषदांचे योग्य खलीफा निवडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले व अद्यापि खलीफापद निर्माण झाले नाही.
पहा : इस्लाम धर्म.
संदर्भ : 1. Spuler, B Trans. Bagley, F. R. C. The Muslim World, Part 1, The Age of the Caliphs,
Leiden, 1960.
2. Watt, W. The History of Islamic Spain, Edinburgh, 1965.
देशपांडे, सु. र.
“