खारवेल : (इ.स.पू.सु.पहिले शतक). प्राचीन कलिंगदेशाचा चेदिवंशातील चक्रवर्ती राजा. अशोकाच्या कारकीर्दीत कलिंगदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला होता, पण अशोकाचे वंशज दुर्बल झाल्यामुळे तो त्यांच्या अंमलाखाली फार काळ राहिला नाही. महामेघवाहन नामक चेदिवंशातील राजाने अशोकाच्या निधनानंतर लवकरच आपले स्वातंत्र्य पुकारले आणि खारवेलाने तर मोठे राज्य निर्माण केले. त्याची माहिती ओरिसातील भुवनेश्वरपासून जवळच असलेल्या हाथीगुंफा येथे छतावर कोरलेल्या भग्न लेखांवरून प्राप्त होते. खारवेलाने आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत लेखन, अर्थव्यवस्था, हिशोबव्यवहार इ. शिक्षण घेऊन युवराजपद मिळविले. नऊ वर्षे राज्यशासनाचा अनुभव घेतल्यानंतर त्याला राज्याभिषेक करण्यात आला. नंतर त्याने दूरदूरच्या देशांवर स्वाऱ्या करण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्या वर्षी भयंकर वादळाने उद्ध्वस्त झालेल्या आपल्या राजधानीच्या तटाची दुरूस्ती केली. दुसऱ्या वर्षी सातकर्णीला न जुमानता त्याने आपले चतुरंग सैन्य पश्चिम दिशेला पाठविले. हे सैन्य कण्हवेण्णा (नागपूरजवळच्या कन्हान) नदीजवळ पोहोचताच ऋषिक (खानदेश) देशाच्या लोकांत भीतीने धडकी भरली. तिसऱ्या वर्षी तर यापुढेही जाऊन त्याने राष्ट्रीक आणि भोजक या मध्य महाराष्ट्रातील अधिपतींचा पराभव केला. पाचव्या वर्षी त्याने १०३ (काहींच्या मते ३००) वर्षांपूर्वी नंदराजाने खोदलेला कालवा आपल्या राजधानीपर्यंत आणून लोकांची पाण्याची टंचाई दूर केली तसेच लोकांवरील करभार दूर करून त्यांना सुखी केले. आठव्या वर्षी गोरथगिरी (गयेजवळची बराबर टेकडी) पर्यंत स्वारी करून त्याने राजगृहाला वेढा घातला. त्यामुळे तेथपर्यंत चालून आलेला यवन ग्रीक सत्ताधारी दिमित (डीमीट्रिअस) याला मथुरेपर्यंत पळ काढावा लागला. नवव्या वर्षी त्याने प्राची नदीच्या तीरावर महाविजयप्रासाद नामक राजवाडा बांधला. दहाव्या वर्षी याने पुन्हा उत्तर भारतावर स्वारी केली. पुढील वर्षी याने दक्षिणेत पांड्य राजाचा पराभव करून हत्ती, घोडे, रत्ने, मोती अशी विविध खंडणी जमा केली. तसेच याने पुन्हा मगधावर स्वारी करून बहसतिमित्र (बृहस्पति मित्र) राजाचा पराजय केला व त्याला आपल्यापुढे नम्र होण्यास भाग पाडले तसेच नंद राजाने पूर्वी कलिंगातून नेलेली जिनाची मूर्ती परत आणली.
खारवेलाच्या काळाविषयी विद्वानांत मतैक्य नाही. कोणी तो ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकाच्या आरंभी, तर इतर तो पहिल्या शतकाच्या शेवटच्या वादात झाला असे म्हणतात. त्याने उत्तर भारतावर तीनदा स्वाऱ्या केल्या त्या शुंग पुष्यमित्राच्या उदयापूर्वी झाल्या असाव्यात. दिमित व सातकर्णी यांच्याही उल्लेखांवरून खारवेल ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकाच्या आरंभी होऊन गेला, असेच अनुमान संभवते.
खारवेल जैनधर्मी होता. त्याने जैन यतींकरिता विशाल आणि सुंदर इमारती बांधल्या, त्यांना उंची वस्त्रे अर्पण केली आणि त्यांच्या निर्वाहाची व्यवस्था केली. त्याने इतर धार्मिक पंथीयांनाही त्याच आदराने वागविले आणि त्यांच्या देवालयांची दुरुस्ती केली.
खारवेलाच्या उदय उल्केप्रमाणे आकस्मिक झाला. त्याच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या राजांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1960.
2. Sastri, K. A. N. A Comprehensive History of India, 2 vols., Bombay, 1957.
मिराशी, वा. वि.