खारमोर : हा पक्षी ओटिडिडी या पक्षिकुलातला आहे. याचे शास्त्रीय नाव सिफिओटायडिस इंडिका  असे आहे. हा भारताच्या सपाट प्रदेशात (आसामखेरीज) सगळीकडे आढळतो. बंगाली खारमोर म्हणून याची एक मोठी जात आहे. ती हिमालयाचा पायथा आणि गंगा नदी यांच्या मधल्या प्रदेशात आणि आसाममध्ये आढळते.

खारमोरखारमोर पाळीव कोंबडीएवढा असतो, पण मान आणि पाय तिच्यापेक्षा लांब असतात. मादी आणि प्रजोत्पादनाचा काळ वगळून नर यांची लक्षणे : डोक्याचा माथा काळा, त्यावर धूसर रेषा बाकीचे डोके व मान यांवर काळ्या रेषा पाठ काळी, तिच्यावर पांढरे ठिपके शेपटी पांढरट पिवळी, तिच्यावर काळे ठिपके व पट्टे मानेचा व छातीचा वरचा भाग पांढरा, त्यावर काळ्या रेघा, बाकीचा खालचा भाग धूसर पांढरा डोळे पिवळे चोच लांब पिवळसर पाय लांब मळकट पांढरे पिवळे. प्रजोत्पादनाच्या काळात नराचे डोके, मान, शरीराची खालची बाजू काळी हनुवटी व गळ्याचा थोडा भाग पांढरा मानेच्या बुडाशी आडवा पांढरा पट्टा दोन्ही कानांच्या मागे सु. १० सेंमी. लांबीच्या काळ्या पिसांचा झुपका पाठ काळी, तिच्यावर पांढरे ठिपके, शेपटी पांढुरकी, तिच्यावर काळे ठिपसे व पट्टे असतात.

उंच गवत वाढलेल्या सपाट प्रदेशात आणि उभ्या पिकात हा नेहमी राहतो. हे पक्षी एकेकटेच असतात. धान्य, टोळ व इतर किडे आणि बिया हे यांचे भक्ष्य होय. यांची एक विचित्र सवय म्हणजे गवतातून हिंडत असताना हा मधूनच हवेत उंच उडी घेतो. उडी घेताना प्रत्येक वेळी बेडकाच्या ओरडण्यासारखा आवाज काढतो. विणीच्या हंगामात नर वरचेवर अशा उड्या घेताना दिसतात. मादीचे मन आकर्षित करण्याकरिता त्यांचा हा खटाटोप असतो अशी समजूत आहे.

प्रजोत्पादनाचा काळ जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत असतो. हा पक्षी घरटे तयार करीत नाही. मादी गवत वाढलेल्या किंवा पीक उभे असलेल्या जमिनीवरच हिरवट तपकिरी रंगाची ३-४ अंडी घालते. अंडी उबविणे आणि पिल्लांना खाऊ घालणे ही कामे फक्त मादी करते.

यांचे मांस रुचकर असल्यामुळे शिकारी लोक विणीच्या काळात यांची शिकार करतात. यामुळे या सुंदर पक्ष्यांची संख्या बरीच कमी झाली आहे.

कर्वे, ज. नी.