कुरिया मुरिया:ओमानची अरबी समुद्रातील पाच खडकाळ बेटे. एकूण क्षेत्रफळ ७२ चौ. किमी. लोकवस्ती फक्त ८५ (१९६७ अंदाज), नूस व शर्बतात भूशिरांदरम्यान किनाऱ्यापासून ४० किमी. वरील, पूर्वपश्चिम ८० किमी. पसरलेली ही बेटे सागरी डोंगररांगेची ग्रॅनाइट व चुनखडक यांनी बनलेली शिखरे असून हालनीय या सर्वांत मोठ्या बेटावरील डोंगर ४५० मी. उंच आहे. चाच्यांच्या त्रासामुळे १८१८ मध्ये येथील लोकवस्ती उठून गेली. १८५३ मध्ये एका ब्रिटिश कप्तानाला येथे ग्वानो खताचा साठा आढळला. तेव्हा १०,००० पौंडांस बेटे विकत घेण्याचा ब्रिटनचा इरादा होता. परंतु समुद्री तारेचे ठाणे उभारण्यासाठी १८५४मध्ये सुलतानाने बेटे ब्रिटिशांच्या हवाली केली. १८६१ मध्ये हालनीयावर एक ठाणे उभारले परंतु पुढच्याच वर्षी ते बंद झाले. १९३७ मध्ये ही बेटे एडन वसाहतीत समाविष्ट करण्यात आली. ३० नोव्हेंबर १९६७ रोजी लोकांच्या इच्छेप्रमाणे ती ओमानच्या सुलतानाला परत करण्यात आली. मासेमारी व ग्वानो खत गोळा करणे हे येथील लोकांचे व्यवसाय आहेत.
डिसूझा, आ. रे.