खाणकाम : मानवी जीवनास अन्न, वस्त्र व निवारा तसेच सुखसोयीच्या वस्तू आणि प्रवास व वाहतुकीची साधने यांची नेहमी आवश्यकता असते. या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी शेती व खाणकाम यांच्यापासून मिळविलेले पदार्थ वापरावे लागतात. या दोन मूलोद्योगांच्या जोरावरच अभिनव संस्कृतीची प्रगती झपाट्याने होत गेली आहे. पैकी शेती करण्यासाठी देखील जी अवजारे, यंत्रे, खते इ. लागतात ती तयार करण्यासाठी खाणकाम करून मिळविलेली खनिजे, धातुके (कच्च्या धातू), खडक, माती इत्यादींवर अवलंबून राहवे लागते. शेतीपासून मानवाला अन्न आणि काही प्रमाणात वस्त्र व निवारा तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ मिळतात, तर खाणकामापासून पुढील पदार्थ मिळतात : (१) दगड, वाळू, मृत्तिका आणि सिमेंट बनविण्यास लागणारे पदार्थ वगैरे बांधकामास उपयोगी पडणारे पदार्थ (२) नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू), दगडी कोळसा, खनिज तेल, किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणारे) पदार्थ ही इंधने (३) गार्नेट, कुरुविंद (कोरंडम) यांसारखे अपघर्षक (घासून वा खरवडून पृष्ठ गुळगुळीत करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ) (४) हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज यांसारखी रत्ने (५) पोटॅश, फॉस्फेटे, नायट्रेटे यांसारखे खते बनविण्यास उपयोगी पदार्थ (६) गंधक, ग्रॅफाइट, टाकणखार, अभ्रक ॲस्बेस्टस यांसारखे औद्योगिक पदार्थ (७) सोने, चांदी, तांबे, जस्त, शिसे, लोह, ॲल्युमिनियम इ. धातूंची धातुके वगैरे. या निरनिराळ्या पदार्थांपासून युद्धाच्या व शांततेच्या काळी अतिशय महत्त्वाच्या व गरजेच्या वस्तू, अस्त्रे, वाहने वगैरे बनविली जातात.
मानवास उपयोगी असणारी बहुतेक सर्व खनिजे, खडक व धातुके पृथ्वीच्या अगदी वरच्या भागात म्हणजे भूकवचाच्या खडकांत सापडतात. हे पदार्थ जेव्हा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्रित स्वरूपात आढळतात, तेव्हा त्यांना त्या पदार्थाचे निक्षेप (साठे) असे म्हणतात. बहुतेक सर्व निक्षेप घट्ट व कठीण अशा खडकांत असतात. असे निक्षेप ज्या ठिकाणी फोडून मूळच्या खडकापासून खणून काढले जातात, त्यास खाण असे म्हणतात. पूर्वी भूपृष्ठापासून ते निक्षेप असणाऱ्या जागी जाणाऱ्या कूपकासच (विहिरीसारख्या भोकालाच) खाण असे म्हणत. परंतु हल्ली ‘खाण’ या शब्दामध्ये ज्या ठिकाणी जमिनीतून खनिज फोडून काढतात तो भाग आणि त्याच्या वरच्या बाजूस किंवा जवळच आसपास असणारा गुदामांचा, फोडलेल्या निक्षेपापासून उपयुक्त धातुके किंवा खनिजे बाहेर काढण्याच्या कारखान्याचा, कधीकधी धातुकापासून धातू गाळण्याच्या कारखान्याचा भाग इत्यादींचा समावेश होतो. (१) इतर खडकांमध्ये असणारा निक्षेपाचा खडक फोडून तो बाजूला करणे, (२) हा फोडलेला माल खाणीतील वाहतुकीच्या साधनांवर चढविणे व (३) तेथून तो भूपृष्ठावरील गुदामांपर्यंत नेऊन टाकणे या कार्यांना खाणकाम म्हणतात. समुद्र आणि वातावरण यांच्यातील घन, द्रव किंवा वायू यांपैकी कुठल्याही स्वरूपाची उपयुक्त द्रव्ये मिळविण्याच्या क्रियेचा काही लोक खाणकामामध्ये समावेश करतात. मात्र खाणकाम म्हटल्यावर सामान्यतः जमिनीतील खडक फोडून त्यांतील घनरूप खनिजे बाहेर काढणे हेच आपल्या डोळ्यासमोर येते व त्याचीच विस्तृत माहिती येथे दिली आहे.
खाणकामाची साखळी : बहुतेक सर्व प्रकारांच्या खाणकामांमध्ये मुख्यत्वेकरून पुढील गोष्टी असणारी साखळी चालू असते : (१) निक्षेप फोडणे, (२) फोडलेला माल वाहनांवर चढविणे व (३) त्याची वाहतूक करणे. निक्षेपांच्या प्रकारांतील विविधतेमुळे तसेच खाणी विस्तृत व खोल झाल्यामुळे कधीकधी वरील तिन्ही कार्यांची आवश्यकता पडत नाही, तर बऱ्याच ठिकाणी या तीन कार्यांशिवाय बरीच इतरही कामे करावी लागतात. काही सुट्या प्रकारचे निक्षेप सुरुंग लावून फोडावे लागत नाहीत. निक्षेप फावड्यांनी किंवा यंत्रांनी उचलून सरळ वाहनांवर चढविता येतो. जर खाण भूपृष्ठावरच किंवा उथळ जागी उघडी असेल, तर उच्चालक यंत्र वापरून खाणीतून माल वर चढवावा लागत नाही. तसेच खाणीतून उत्पादन होणारा माल खाणीच्या ठिकाणीच उपयोगात आणला जात असेल, तर वाहतुकीचा प्रश्नच येत नाही. जसजसे खाणीचे क्षेत्र विस्तृत होते किंवा खाणी अधिक खोलवर जातात त्यावेळी या साखळीतील नेहमीच्या खाणकामाच्या कामांव्यतिरिक्त इतर बरीच कामे करावी लागतात. उदा., (१) जर खाणकाम भूमिगत व खोल असेल, तर फोडलेला माल बाहेर काढते वेळी व काढल्यावर बाजूच्या भिंतींना व छताला लाकूड, पोलाद किंवा दगड-विटा यांच्या बांधकामाचा आधार द्यावा लागतो. कित्येकदा खाणकाम चालू असलेल्या भागातील छतामध्ये आट्यांचे लांब गज पिळून घट्ट बसवितात. त्यामुळे छताजवळचे थर वरच्या खडकांशी घट्टपणे संलग्न होऊन छत कोसळण्याचा धोका बराच टाळता येतो. (२) खाण उघडताना व खाणकाम चालू असताना निर्माण झालेला खडकांचा चुरा, दगड, माती इ. अनावश्यक मालाची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावावी लागते. (३) खाणीतील मार्ग, बोगदे व कूपक तयार केल्यावर मालाची वाहतूक व मजुरांची ने-आण करण्याकरिता वेगवेगळ्या वाहनांची सोय करावी लागते. (४) तसेच खाणीतील मार्गात व खाणकामाच्या जागी यंत्रे व वाहने चालविण्यासाठी वीज किंवा इतर ऊर्जा पुरविणे. (५) खाणीताल सर्व जागी उजेडाची व्यवस्था करणे. (६) खाणीच्या सर्व भागांत शुद्ध व पुरेशी हवा खेळविणे. (७) खाणीत दूषित वायू असल्यास ते घालवून देणे. (८) निरनिराळ्या प्रकारांनी खाणीत येणाऱ्या अनावश्यक व घाण पाण्याचा निचरा करणे. (९) जर खाण बरीच खोल असेल व खाणकामाच्या जागी तापमान बरेच असेल, तर तेथे थंड हवा पुरविणे किंवा वातानुकूलन करणे इत्यादी.
एकंदरीत खाणीत काम करावयाच्या जागेचे वातावरण सुसह्य व सुरक्षित करून कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढविण्यासाठी बऱ्याच प्रकारची कामे करावी लागतात.
खाणकाम उद्योगधंदे : खाणकाम उद्योगधंद्यांमध्ये वर नमूद केलेल्या प्रत्यक्ष खाणकामाव्यतिरिक्त इतर संबंधित असे अनेक धंदे येतात. खाणकाम उद्योगधंद्याची सुरुवात खनिज निक्षेपांच्या पूर्वेक्षणाच्या (आधीच्या पाहणीच्या) कामापासून होते. पूर्वेक्षणाने एकदा निक्षेपाचा शोध लागल्यावर सखोल पाहणी करून त्याच्या विस्ताराची व आर्थिक मूल्याची सविस्तर माहिती मिळवितात. निक्षेपाचे खाणकाम करणे फायद्याचे आहे असे सिद्ध झाले की, मग भूपृष्ठापासून ते खनिज निक्षेपापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वतयारीची कामे करतात. या कामांत उथळ निक्षेपावरील इतर खडक फोडून किंवा उकरून बाजूला सारतात किंवा निक्षेप खोल असेल तर कूपक, रस्ते व बोगदे खणून काढणे इ. गोष्टी करतात. निक्षेप फोडून तयार झालेल्या चुऱ्यात सामान्यतः इतर खडकांचे अनावश्यक तुकडे मिसळलेले असतात. धातुकाच्या मौल्यवान भागातील निरुपयोगी चुरा बाजूला करून त्यातील धातुकाचे प्रमाण वाढवितात. बऱ्याच वेळा खाणीत फोडलेला निक्षेपाचा चुरा हा मोठ्या तुकड्यांचा व भरड असतो. अशा वेळी दगड भरडण्याच्या मोठाल्या गिरण्यांत या चुऱ्याचे दळून चूर्ण करणे, निक्षेपाचे बारीक चूर्ण पाण्यामध्ये धुऊन व प्लवन (तरंगविण्याची क्रिया) करून त्यातील धातुकाचे एकत्रीकरण करणे, या धातुकापासून विद्युत् ⇨ क्षपण करून अथवा प्रथम अतिशय तापवून विगालन करून (वितळवून) व नंतर क्षपण करून धातू गाळणे, धातूचे शुद्धीकरण करणे इ. कामे खाणकाम उद्योगधद्यांत येतात.
इतिहास : अश्मयुगाच्या अगदी सुरुवातीस खनिजापासून तयार केलेली आयुधे मानव वापरीत असत म्हणजे त्यापूर्वी खाणकामास सुरुवात झाली असावी. ज्ञात प्राचीन संस्कृतीच्या पूर्वीपासून गाळातून सोने काढले जात होते. तांब्याच्या धातुकापासून धातू गाळीत असत व जळण म्हणून बिट्युमेन वापरले जात होते. सुमारे साडेचार लाख वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वपुराणाश्मयुगामध्ये मनुष्य फ्लिंटची आयुधे वापरत होता. अगदी सुरुवातीला खाणकाम चर खणून किंवा उघडे खड्डे खणून होत होते. नंतर पुढे सु. १६–१७ मी. खोल खड्डे खणून व या खोल जागेवरून फ्लिंटच्या निक्षेपापर्यंत बोगदे खोदून फ्लिंट खणून काढीत असत. या काळी कुदळ, छिन्न्या व घण यांचा उपयोग खणण्यासाठी करीत, तसेच फ्लिंटच्या पाचरी आणि हातोडेदेखील खाणकामासाठी वापरीत. थोडे खणावयाचे असल्यास काळविटासारख्या प्राण्यांच्या शिंगांचा उपयोग करीत.
आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे तुंगभद्रेच्या काठी इ.स.पू. २५००० वर्षापूर्वींची अश्मयुगीन आयुधे उपलब्ध झाली आहेत. आणखी विस्तृत उत्खनन केल्यानंतर कदाचित यापूर्वीचीही आयुधे सापडतील असे तज्ञांना वाटते. आदिमानवाने वापरलेले बहुतेक सर्व खनिज पदार्थ हे अधातू होते. शस्त्रे, हत्यारे, अवजारे, भांडीकुंडी, कोरीव कामाकरिता वापरलेले पदार्थ यांसाठी फ्लिंट, चर्ट, क्वॉर्ट्झ अशी खनिजे व क्वॉर्ट्झाइट, संगजिरे व चुनखडीचे दगड यांसारखे काही कठीण तर काही मऊ खडक तो वापरीत असे. सुरुवातीला भांडीकुंडी बनविण्यासाठी आणि पुढे विटा तयार करण्यासाठी मृत्तिका फार मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. इ.स.पू. ३०००० ते २०००० या काळातील भाजून तयार केलेले मातीचे पुतळे मोरेव्हियामध्ये, तसेच इ.स.पू. १०००० या काळातील उत्तरपुराणाश्मयुगातील सोलुट्रीन काळांतील दगडांची भांडीकुंडी ईजिप्तमध्ये सापडली आहेत. इ. स.पू.सु. २६०० मध्ये पिरॅमिडांचे बांधकाम झाले त्यावेळी दगडाच्या प्रचंड खाणी चालू होत्या असे दिसते, कारण फक्त एकट्या गीझाच्या पिरॅमिडमध्ये प्रत्येकी अडीच टन वजनाचे चौरस आकाराचे तेवीस लाख दगड आहेत. इ.स.पू. १०००००० ते ७००० पर्यंतच्या पुराणाश्मयुगीन मानवाने पुढील बारा खनिजे वापरल्याचे आढळले आहे : कॅल्सेडोनी, क्वॉर्ट्झ, रॉक क्रिस्टल, सर्पेंटाइन, ज्वालाकाच, सुवर्णमाक्षिक, जमुनिया (ॲमेथिस्ट), संगजिरे, अंबर, जेडाइट, कॅल्साइट व फ्ल्युओरस्पार. नवाश्मयुगीन मानवाने सोने आणि तांबे वापरण्यास सुरुवात केली होती व नेफ्राइट, सिलिमनाइट आणि पिरोजा (टर्कॉइज) ही खनिजे वापरली होती.
खाणकामाबद्दल अगदी सुरुवातीची नोंद (इ. स. पू. सु. २००० वर्षे) सिनाई द्वीपकल्पातील ईजिप्शियनांच्या पिरोजाच्या खाणीची आढळते. तांबड्या समुद्राच्या ईजिप्तच्या बाजूच्या किनाऱ्यावर ईजिप्शियनांनी इ.स.पू. १९२५ पासून पाचू मिळविण्यासाठी शेकडो कूपक खणले होते. त्यांपैकी काही सु. २७० मी. खोल व एकावेळी चारशे माणसे काम करू शकतील एवढे मोठे होते.
सुरुवातीला वापरात असलेल्या बहुतेक धातू शुद्ध धातूच्या रूपात पाण्याच्या प्रवाहात सापडलेल्या असाव्यात. सोने बहुधा तांब्याच्या अगोदरपासून वापरात असावे आणि काहींच्या मते तांब्याचा शोध इ. स. पू. १८००० च्या सुमारास लागला असावा. ईजिप्शियनांना इ. स. पू. १२००० पासून तांबे माहीत असल्याचे आढळते. इ. स. पू. २६०० पासून चांदी, सोने आणि तांबे ह्या धातू देवघेवीसाठी वापरात होत्या. सिंधू संस्कृतीत सापडलेल्या काशाच्या नृत्यांगनेच्या मूर्तीवरून भारतात त्या काळी म्हणजे इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकात काशाचा उपयोग होत होता असे दिसते. कासे ही मुख्यत्वेकरून तांबे व कमी प्रमाणात कथिल असलेली मिश्रधातू होय. इ. स. पू. २००० मध्ये भारतात तांबे वापरात असल्याचे पुरावे सापडले आहेत. या काळचे तांब्याचे अवशेष गंगा-यमुनेच्या दुआबात तसेच आंध्र प्रदेशात कल्लूर जवळ सापडले आहेत. या अवशेषांत तांबे व काशाची शस्त्रास्त्रे, भांडी, उपकरणे इ. आहेत. प्राचीन काळी सोने प्रामुख्याने सूदानमधील न्यूबिया या ठिकाणाहून येत होते. हे सोने गाळाच्या खडकांतून काढीत असत. २५० चौ. किमी.पेक्षा थोड्या अधिक क्षेत्रातील सु. २·५ मी खोलीपर्यंतची वाळू उकरून ती लाकडाच्या परातीसारख्या खोलगट रोळ्या वापरून रोळून सोने गोळा करीत. हे खाणकाम सु. ४००० वर्षांपूर्वी सुरू झाले असावे. सोन्याचांदीच्या धातुकांचे जवळजवळ आधुनिक पद्धतीने खाणकाम ग्रीसमधील कॅसँद्रा येथे इ.स.पू. २५०० ते ३५६ पर्यंत चालू होते.
सुरुवातीला वापरले गेलेले लोह बहुधा अशनींपासून (उल्कांच्या पृथ्वीवर पोहोचणाऱ्या भागांपासून) मिळविलेले असावे. ट्रॉय येथे सापडलेले शिशाचे गोळे इ.स.पू. २५०० च्या सुमारास तयार केलेले असावेत. इ. स. पू. सहाव्या शतकापूर्वीच्या ऐतिहासिक अवशेषांत जस्त सापडले आहे. निसर्गात जस्त शुद्ध धातूच्या स्वरूपात सापडत नाही, ते त्याच्या धातुकापासून काढावे लागते.
हीरॉडोटस (इ.स.पू. ४८४ ? ते ४२४) यांनी ग्रीसमध्ये क्रिसिटेस जिल्ह्यात क्वॉर्ट्झाच्या शिरेत सोन्याचा आढळ असल्याचे नमूद केले आहे. ॲरिस्टॉटल यांचे शिष्य थीओफ्रॅस्टस (इ.स.पू. ३७२ ते २८७) यांनी लिहिलेल्या खनिजविज्ञानाच्या पहिल्या पुस्तकात सोळा खनिजांचे धातू, खडक व माती असे वर्गीकरण केले आहे.
प्राचीन काळी खनिजांचे महत्त्व पटले होते, तरी त्यावेळी बहुतेक सर्व कामांसाठी मानवी श्रमाचाच वापर केला जात असल्यामुळे खाणकामाची प्रगती झपाट्याने होऊ शकली नाही. एकोणिसाव्या शतकात सोने आणि हिरे यांच्या खाणींचा ठिकठिकाणी शोध लागला. या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीपासून खऱ्या अर्थाने खनिजे शोधणे आणि खाणी उघडून त्यांचे उत्पादन करणे सुरू झाले. नवीन खनिजांचे शोध लागले व त्यांचे नवे नवे उपयोग कळू लागले. या क्रांतीनंतरच्या शंभर वर्षांत कच्च्या लोखंडाचे उत्पादन १०० पटींनी, खनिज इंधनांचे ७५ पटींनी व तांब्याचे ६३ पटींनी वाढले. हे सर्व होत असताना (१) खाणकामाच्या अधिक कार्यक्षम पद्धती, (२) खाणकाम करावयाच्या जागी मजुरांना योग्य त्या सुखसोयी उपलब्ध करुन देणे, (३) मानवी श्रम वापरण्याऐवजी यंत्रांचा अधिकाधिक उपयोग करणे, (४) यंत्राच्या शक्तीमध्ये वाढ घडवून आणणे, (५) यंत्राच्या कार्यशक्तीत व कार्य प्रकारात योग्य ते बदल घडविणे या सुधारणांमुळे मानवाचे श्रम कमी झाले असून कमी खर्चात अधिक सुरक्षितपणे खाणकाम होऊ लागले आहे. मानवाची जागा ठिकठिकाणी यंत्राने घेतली असल्यामुळे मानवी अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रगत देशांत खाणकाम हा एक इतका यांत्रिकीकरण झालेला व्यवसाय आहे की, मनुष्याला प्रत्यक्ष खाणकाम चालू असते त्या ठिकाणी न जाता दूरचित्रवाणीच्या साहाय्याने नुसते विजेचे बटण दाबून खाणकाम नियंत्रित करता येते. काही खाणींत तर मोठ्यात मोठ्या यंत्रांचा उपयोग करतात. काही यंत्रे जहाजापेक्षा प्रचंड असतात. उदा., मोठाल्या टाक्यांसारख्या बादल्या असलेले रहाट दर ताशी बारा हजार टन माल हाताळतात, काही यांत्रिक फावडी प्रत्येक वेळी दोनशे घ. मी. माल उचलून घेऊ शकतात. काही ट्रक अडीचशे टन माल वाहून नेऊ शकतात. या सर्व सोयींमुळे खाणीचा उभा, आडवा आणि खोल विस्तार करणे सहज शक्य झाले आहे. ब्यूट (अमेरिका) येथील भूमिगत खाण दीड किमी. खोल आहे. या खाणीत पाच हजार किमी.पेक्षा अधिक लांबीचे रस्ते आहेत. हे रस्ते ३ किमी. पूर्व-पश्चिम व १·५ किमी. दक्षिण-उत्तर अशा विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेले आहेत. कित्येक भूमिगत खाणी २,००० मी.पेक्षा अधिक खोल आहेत. भारतातील कोलार येथील सोन्याच्या खाणीची खोली सु. ३·५ किमी. आहे. दक्षिण आफ्रिकेतील व्हिटवॉटर्सरँड येथील सोन्याची खाणदेखील जवळजवळ ३·५ किमी. खोल गेली आहे. मिसूरीतील (अमेरिका) सेंट जोसेफ लेंड कंपनीची भूमिगत खाण वेगवेगळ्या ठिकाणांवरील २·२ आणि १·४७ हेक्टर आकाराच्या दोन कर्मशालांतून चालविली जाते. दोन स्थानकांतील अंतर ९ किमी. असून ती भूमिगत बोगद्यांनी जोडली आहेत. जवळजवळ सर्व प्रकारची हत्यारे व यंत्रे या खाणीत वापरली जातात. बऱ्याचशा खाणी लहान ते मध्यम आकाराच्या आहेत, पण हल्ली मोठाल्या खाणी चालविण्याची प्रवृत्ती वाढत आहे आणि बहुतेक मोठाल्या खाणी उघड्या प्रकारच्या आहेत. सर्वांत मोठ्या कोळशाच्या किंवा धातुकाच्या उघड्या खाणीत दररोज तीन लाख टन माल हाताळला जातो सर्वांत मोठ्या कोळशाच्या भूमिगत खाणीत दररोज अठरा हजार टन आणि धातुकाच्या भूमिगत खाणीत पन्नास हजार टन माल हाताळला जातो.
खनिजे शोधण्याच्या निमित्ताने भटकताना दूरवरचे प्रवास व देश पर्यटने झाली. यांमुळे नवीन प्रदेश सापडून अनेक नव्या वस्त्या आणि निरनिराळी राष्ट्रे निर्माण झाली. ज्या देशांत विपुल खनिज संपत्ती सापडली त्यांना व्यापारात व राजकारणात उच्च स्थान प्राप्त झाले आणि त्यांची मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रगती झाली. काही देशांजवळ खनिजे विपुल तर इतर काहींजवळ ती अजिबात नसणे यांमुळे मोठाल्या लढाया आणि महायुद्धे झाली. ज्या उद्योगधंद्यांवर राष्ट्रांची औद्योगिक प्रगती व आर्थिक स्थैर्य ही बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असतात, अशांपैकी खाणकाम हा एक महत्त्वाचा धंदा होय. काही राष्ट्रांतील तज्ञ व कसबी लोकांनी इतर राष्ट्रांतील खाणकामाची प्रगती करण्यास मोठी मदत केली. कॅनडा, मेक्सिको, व्हेनेझुएला, ब्राझील, पेरू, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, ऱ्होडेशिया, ब्रह्मदेश, भारत इ. अनेक देशांतील खाणकामाचे क्षेत्र वाढत असून विसाव्या शतकाच्या मध्यापासून टिटॅनियम, निकेल, कोबाल्ट यांसारख्या उपयुक्त धातू तसेच युरेनियम व तत्सम किरणोत्सर्गी धातू शोधण्याचे आणि त्यांचे उत्पादन वाढविण्याचे जगभर सतत प्रयत्न चालू आहेत.
खाण उघडणे : खाणकाम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी खाणीतून माल खणून काढून उत्पादन करणे, या कामाबरोबरच इतर संबंधित अशा अनेक उद्योगांचा विचार करावा लागतो. रेल्वेने किंवा अन्य वाहनांनी मालाची वाहतूक करणे, वीज आणि पाणी पुरवठा करणे, अनावश्यक व घाण पाण्याचा निचरा करणे, मजूर मिळविणे, मजुरांच्या निवाऱ्याची सोय करणे, रस्ते बांधणे, फोडलेल्या खनिजातील अनावश्यक आणि टाकाऊ खडकांचा भाग बाजूला करुन उच्च प्रतीचा खनिजाचा भाग एकत्र करणे, या भागाचे शुद्धीकरण करणे, धातुकापासून धातू गाळणे, धातूचे शुद्धीकरण करणे इ. अनेक बाबींचा विचार प्रत्यक्ष खाणकामाबरोबर करावा लागतो.
मोठ्या विस्तीर्ण निक्षेपाचे खाणकामाचे सोयीस्कर असे विभाग ठरविणे, निरनिराळ्या कामांचा अनुक्रम व खाणकामाची पद्धत कोठली असावी हे ठरविणे, पूर्वतयारीच्या व खाणकामातील निरनिराळ्या घटकांचा अनुक्रम ठरविणे तसेच इतर अनेक आवश्यक अशा बांधकामांचा विचार करणे ही सर्व माहिती गोळा केल्यावर संपूर्ण खाणकामाचा उद्योग कसा चालवावा हे कळते.
एखाद्या ठिकाणी धातुकाचा निक्षेप आहे, अशी माहिती पू्र्वेक्षणात मिळाल्यावर सविस्तर अन्वेषणास (संशोधनास) महत्त्व येते. अन्वेषणात वापरल्या जाणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने खडकात वेधन छिद्रे कोठे कोठे पाडावयाची व ती किती खोल खणायची हे ठरविता येते. या छिद्रांतून काढलेल्या खडकांवरून खनिज निक्षेपाची जमिनीखालची स्थिती समजून येते. म्हणजे निक्षेपाचा विस्तार व आजूबाजूच्या खडकांचा प्रकार व त्यांची स्थिती समजते. या माहितीपासून निक्षेपाचे नकाशे व नील प्रती काढतात. नकाशांवरून खाणमजूर व माल यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा मुख्य कूपक कोठे खणावयाचा ते ठरविता येते.
जर खाण आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व्हावयाची असेल, तर पुढील गोष्टींचा समतोल साधलेला असणे आवश्यक असते : (१) निक्षेपाचे आकारमान व निक्षेपातील खनिजाचा दर्जा, (२) वाहतुकीची सुलभता, (३) योग्य बाजारपेठ व बाजारभाव, (४) कुशल, निष्णात व कार्यक्षम मजूरवर्ग, (५) शासकीय स्थैर्य. आज टाकाऊ अथवा निरुपयोगी वाटणारे निक्षेप यांत्रिक प्रगती झाल्यावर व कुशल आणि सापेक्षतः स्वस्त मजूर मिळाल्यावर भविष्य काळात महत्त्वाचे व फायदेशीर होऊ शकतात. एखादी खाण फायदेशीर होण्यासाठी योग्य अशी परिस्थिती वेगवेगळ्या देशांत त्या त्या देशातील यंत्र आणि तंत्र यांच्या प्रगतीनुसार निरनिराळी असते. उदा., कुशल, कार्यक्षम मजूर तसेच अतिशय प्रगत असे यांत्रिकीकरण अमेरिकेत असल्यामुळे हलक्या प्रतीचे तांब्याचे निक्षेप तेथे किफायतशीरपणे खणून काढता येतात. याउलट सापेक्षतः उच्च दर्जाचे तांब्याचे निक्षेप इतर काही अप्रगत देशांत फायदेशीरपणे खणता येत नाहीत. सामान्यतः एखादा निक्षेप खाणकाम करण्यास योग्य आहे किंवा नाही, हे निक्षेपातील खनिजाच्या किंवा धातुकाच्या किंमतीवर अवलंबून असते. जर खनिज कमी किंमतीचे असेल, तर निक्षेपात त्याचे प्रमाण उच्च असावे लागते. अर्थातच एखादा निक्षेप फायदेशीर होण्यासाठी त्यात एखादे धातुक किती प्रमाणात असावे हे प्रमाण प्रत्येक धातुकाच्या बाबतीत निरनिराळे असते. उदा., लोह धातुकात २५ ते ६५ टक्के लोखंड, बॉक्साइटात ३० ते ३५ टक्के ॲल्युमिनियम, युरेनियम ऑक्साइड खनिजात ०·२ ते २ टक्के युरेनियम, तांब्याच्या धातुकात ०·६ ते १५ टक्के तांबे, जस्त व शिसे यांच्या धातुकांत ३ ते ५ टक्के धातू ही असावी लागतात. दगडाच्या सु. एक लाख कणांत जरी सोन्याचा एक कण असला, तरी निक्षेपातून सोने काढणे फायदेशीर होते.
उघड्या खाणी व भूमिगत खाणी : जे निक्षेप भूपृष्ठावर असतात किंवा भूपृष्ठापासून फार खोल नसतात अशांचे खाणकाम उघड्या खाणी चालवून करतात. निक्षेपावरील इतर खडकांचे
किती जाडीचे ओझे उकरून फायदेशीर खाणकाम करता येईल, हे निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विचारांनी व मर्यादांनी ठरविले जाते. ज्या देशांत यांत्रिकीकरण प्रगत आहे, जेथे अधिक शक्तीची विजेची व इतर हत्यारे व उपकरणे वापरून काम चालते, तेथे थोड्या अधिक खोलीवरच्या निक्षेपांचे खाणकामदेखील वरच्या खडकांचे ओझे उकरून उघड्या प्रकाराने करतात. निक्षेपाची खोली जास्त असेल, तर भूमिगत खाणकाम करतात. सामान्यतः ३० ते ३५ मी. खोलीपर्यंत असणाऱ्या निक्षेपांचे खाणकाम उघड्या पद्धतीने करतात. काही प्रगत देशांत ६० ते ७० मी. खोलीपर्यंत असणारे निक्षेपदेखील उघड्या प्रकारचे खाणकाम करून बाहेर काढतात. भूपृष्ठावर यदृच्छया दृश्यांश सापडून खाणी उघडणे हे दृश्यांश संपुष्टात आल्यामुळे जसजसे अशक्य होऊ लागले किंवा खोली वाढत गेल्यामुळे उघड्या खाणी चालवून खाणकाम करणे धोक्याचे, महाग व अव्यवहार्य होऊ लागले तसतसे भूमिगत खनिज संपत्ती शोधून काढण्याचे व भूमिगत खाणकाम करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे अधिकाधिक खोल भागातील निक्षेपांचा शोध लागू लागला.
आ. १ मध्ये वरच्या डाव्या कोपऱ्याजवळ निक्षेपाचा– कोळशाचा- लांबच लांब पट्टा जमिनीवर उघडा पडला आहे, तो अगदी पातळ अशा दुसऱ्या खडकाच्या थराखाली आहे. हा भाग उघड्या खाणी चालवून खणून काढतात. जमिनीखाली खोल जागी असणारा निक्षेपाचा भाग खणून काढण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे भूमिगत मार्ग खणून काढावे लागतात. त्यांपैकी काही उभे (अब, कड, पफ), काही क्षैतिज (जझ, तथ), तर काही उतरणीचे असतात (गह, दध, यर, तज). खाणीतील उभ्या मार्गांना कूपक व क्षैतिज (आडव्या) मार्गांना बोगदे असे म्हणतात. यांपैकी काही भूपृष्ठापर्यंत थेट वर येतात, तर काही एकमेकांस जोडलेले असून अप्रत्यक्ष रीतीने वर येतात (कड, यर, गह, पफ). पफ या भूमिगत कूपकातून फोडलेला माल खाली फ कडे आणला जातो, कड या कूपकातून त्या भागातला माल वर क कडे नेला जातो. अशा रीतीने दोन वरच्या व खालच्या भागांतील माल जझ या पातळीच्या बोगद्यात आणला जातो. क व फ येथून तो स येथे अब या मुख्य कूपकात आणला जातो. तेथून तो पृष्ठभागावर चढविला जातो.
निक्षेपाचे खाणकाम सुरू करण्यापूर्वी निक्षेपाच्या एका बाजूकडील इतर खडक फोडून व तो बाजूला सारून निक्षेपाचा काही भाग उघडा करावा लागतो. या भागापासून निक्षेपाचे खाणकाम पुढच्या दिशेत विकसित होत जाते. निक्षेपाच्या या भागास ‘पृष्ठ’ असे म्हणतात. ज्या पृष्ठाजवळ खाणकाम चालू असते त्यास ‘चालू कामाचे पृष्ठ’ म्हणतात. खाणकामाच्या जागी असणाऱ्या बाजूच्या खडकांच्या पृष्ठभागांना ‘बाजू’ असे म्हणतात. कोळशाच्या खाणीत त्यांना ‘बरगड्या’ म्हणतात. वरच्या पृष्ठाला कोळशाच्या खाणीत ‘छत’ तर धातुकाच्या खाणीत ‘पाठ’ म्हणतात व खालच्या जमिनीस ‘तळ’ म्हणतात.
निक्षेपाच्या भूसंरचनेला म्हणजे नतिलंबास (खडाकाच्या थराच्या कलास म्हणजे नतीस काटकोनात असलेल्या दिशेस) म्हणजेच निक्षेपाच्या सर्वांत लांब दिशेस समांतर क्षैतिज मार्ग खणून काढला, तर त्यास ‘सरळ किंवा समांतर बोगदा’ (ड्रिफ्ट) म्हणतात आणि जर संरचनेला छेदून जाणारा म्हणजे सरळ बोगद्यांना काटकोन करुन निक्षेपास छेदून जाणारा क्षैतिज मार्ग खणून काढला, तर त्यास ‘आडवा बोगदा’ (क्रॉसकट) म्हणतात. क्षैतिज बोगद्यांना ‘पातळ्या’ असेही म्हणतात. कधीकधी डोंगराळ भागातील उतारावर असणाऱ्या ठिकाणापासून डोंगरात आतल्या बाजूस असणाऱ्या निक्षेपाकडे जाणारे बोगदे खणून काढतात. अशा बोगद्यांना ‘निक्षेपगामी बोगदे’ (ॲडिट) म्हणतात. दोन भिन्न पातळ्यांवरील कामाच्या जागा वर-खाली जाणाऱ्या उभ्या किंवा थोड्याशा तिरक्या कूपकांनी जोडलेल्या असतात. जर खालच्या पातळीवरील बोगद्यापासून कूपक वरच्या बाजूकडे जात असेल, तर त्यास ‘ऊर्ध्वगामी कूपक’ (रेझ) आणि वरच्या पातळीवरील बोगद्यापासून खालच्या बाजूकडे जात असेल, तर त्यास ‘अधोगामी कूपक’ (विंझ) असे म्हणतात. एकापेक्षा अधिक कूपकांना, बोगद्यांना किंवा उतरणी कूपकांना एकमेकांस जोडणाऱ्या क्षैतिज किंवा थोड्या उतरत्या मार्गांना ‘जोडणारे रस्ते’ (कनेक्शन) म्हणतात. मालाची वाहतूक, मजूरांची ये-जा, वायुवीजन (हवा खेळती ठेवणे) वगैरेंसाठी हे मार्ग वापरतात. ज्या ठिकाणी खणण्याचे काम चालले आहे, त्या निखननाच्या गाळ्यापर्यंत (स्टोपपर्यंत) वरील सर्व प्रकारचे मार्ग पोहोचण्याची सोय करतात. तसेच खणलेला माल निखननाच्या गाळ्यापासून ते अगदी भूपृष्ठावर त्याच्यातून वाहून नेता येतो.
निखननाच्या गाळ्यात फोडून तयार झालेला माल वरच्या पातळीवरून खालच्या पातळीकडे गुरुत्वाकर्षणाने म्हणजे स्वतःच्या वजनाने आपोआप गडगडत ढकलून देण्यासाठी तयार केलेल्या दोन पातळ्यांमधील उभ्या किंवा थोड्या तिरक्या कूपकास ‘नाली’ (शूट) असे म्हणतात. धातुकाच्या खाणकामात या कूपकांना धातुक मार्ग किंवा धातुक नाली म्हणतात (आ.२). नालीचे बऱ्याच वेळा दोन भाग पाडलेले असतात. एकातून मालाची वाहतूक केली जाते व दुसरा भाग मजूरांची ने-आण करण्यासाठी, हत्यारे, सामग्री, यंत्रे, लाकूड, भरीचा माल वगैरे नेण्यासाठी वापरतात.
मालवाहक मार्गातून मजुरांनी ये-जा करणे बऱ्याच वेळा धोक्याचे ठरते म्हणून कित्येक ठिकाणी मजुरांसाठी वेगळे मार्ग ठेवणे हे कायद्याने आवश्यक असते. प्रवासाचे मार्ग मालवाहक कूपकांच्या किंवा उतरणीच्या शेजारीच तयार केलेले असतात. फोडलेला माल वाहून नेण्याचे कार्य सोडून इतर काही थोड्या हलक्या कामांसाठीसुद्धा ते वापरले जातात.
उतरणी कूपक : (इन्क्लाइन किंवा इन्क्लाइण्ड शॅफ्ट). तिरपे किंवा उतरणी कूपक खडकातून किंवा खनिजातून खणून काढतात. सामान्यतः कमी नती (कल) असलेल्या थरांचे खाणकाम उतरणी कूपक वापरुन करतात. अशा वेळी बहुतेक करून निक्षेपाच्या थरातूनच व विशेषतः थराच्या तळाच्या बाजूला उतरणी कूपक खणून काढतात. काही उतरणी कूपक झाकलेले म्हणजे भूमिगत असतात, ते भूपृष्ठापर्यंत येत नाहीत. भूपृष्ठापासून खणून काढलेल्या उतरणी कूपकांना उतार किंवा उताराचे बोगदे असेही म्हणतात. या कूपकांचा तिरकेपणा वा उतार सोडल्यास खणण्याचे काम, बांधकाम, उपयोग इ. बाबतींत ते उभ्या कूपकांसारखे किंवा पातळ्यांवरील बोगद्यांसारखे असतात.
आरोध-उतरणी कूपक : (ब्रेक इन्क्लाइन). तिरप्या खनिज निक्षेपातून खणून काढलेल्या व वरच्या पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत माल वाहून नेण्यासाठी तयार केलेल्या उतरणी कूपकास ‘आरोध उतरणी कूपक’ म्हणतात. आ. ३ मध्ये एक मालाने भरलेली ग व एक रिकामी वाघीण घ दाखविली आहे. क हा लोखंडी दोरखंड ख या कप्पीवरून जातो. या दोरखंडाच्या एका टोकाला जोडलेली ग ही मालाने भरलेली वाघीण वरच्या बाजूस आहे आणि दुसऱ्या टोकास खालच्या बाजूस असणारी घ ही वाघीण रिकामी आहे. ग ही भरलेली वाघीण आपल्या वजनाने खाली जाते व त्यामुळे घ ही रिकामी वाघीण वर येते. कित्येकदा माल वाहक पट्टेदेखील अशाच प्रकारे गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर चालविले जातात. अशा वेळी आरोध-उतरणी म्हणजे गुरुत्वाकर्षाणाच्या तत्त्वावर चालणारा वाहक पट्टा असलेला उतार असतो.
मालवाहक उच्चालक उतरणी कूपक : (हॉलेज इन्क्लाइन). खालच्या पातळीवरून वरच्या भागाकडे माल यांत्रिक पद्धतीने ज्या कूपकातून वाहून नेला जातो, त्यास ‘मालवाहक
उच्चालक उतरणी कूपक’ म्हणतात. रिकाम्या व मालाने भरलेल्या गाड्या उच्चालक उतरणी कूपकात व आरोध-उतरणी कूपकात विरुद्ध दिशांना वाहतुकीचे काम करतात. उच्चालक कूपकात भरलेल्या गाड्या खालून वरच्या दिशेस, तर आरोध कूपकात वरून खालच्या दिशेस जातात व याच्या उलट दिशांना रिकाम्या गाड्या जातात (आ. ४).
खनिज निक्षेपाच्या विस्ताराची कल्पना आल्यावर निक्षेपामध्ये मालाचा एकूण साठा किती आहे व ठराविक प्रमाणात तो उकरून काढल्यास खाण किती वर्षे चालू शकेल, याचा अंदाज येतो. बाजारातील मालाच्या मागणीतील तेजी-मंदीमुळे उत्पादन कमी जास्त करावे लागते. त्यानुसार खाणीच्या आयुष्यमानात वधघट होते. यावरून एक गोष्ट सहज लक्षात येते की, निक्षेपाचा सर्वच्या सर्व भाग एकदम खणण्यास सुरुवात करावी लागत नाही, किंबहुना तसे करता येत नाही.
तसेच अगदी सुरुवातीपासून निक्षेपाच्या अगदी खोल भागापर्यंत जाऊन खाणकाम करावे लागत नाही. प्रत्यक्ष व्यवहारात निक्षेपाचे विभाग पाडावे लागतात व कित्येक विभाग अजिबात हात न लावता अगदी गरजेच्या वेळी लागणारे राखीव साठे म्हणून तसेच ठेवून द्यावे लागतात. एका पातळीवरील अनेक विभागांमध्ये एकाच वेळी खाणकाम सुरू करता येते. तसेच ज्या विभागांत खाणकाम करावयाचे त्यांची निवड निरनिराळ्या प्रकारांनी वाटेल तशी करता येते. जेव्हा निक्षेप तिरपा असतो तेव्हा नतिलंबाला समांतर असे विभाग पाडण्यात येतात, त्यांना ‘क्षैतिज विभाग’ किंवा ‘क्षितिजे’ असे म्हणतात. नत असलेल्या निक्षेपाच्या नतिलंबाच्या दिशेत एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंतच्या व नतीच्या दिशेत खालच्या वा वरच्या अशा कोणत्याही लगतच्या दोन पातळ्यांमध्ये असणाऱ्या निक्षेपाच्या भागाला ‘क्षैतिज विभाग’ म्हणतात. खाणकामाचा प्रकार व अपेक्षित उत्पादन यांनुसार क्षैतिज विभागाची नतीच्या दिशेतील लांबी ठरवितात. अपेक्षित उत्पादन होण्यासाठी खणावयाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, मालवाहक रस्त्यांच्या भिंतींची रुंदी, वायुवीजनाच्या मार्गांची व मध्यंतरी असणाऱ्या पातळ्यांची रुंदी आणि आधारासाठी सोडलेल्या खडकांच्या खांबांची जाडी या सर्व गोष्टींचा विचार करून क्षैतिज विभागाची रुंदी (नतीच्या दिशेतील लांबी) ठरवितात.
निक्षेप उघडणे : भूपृष्ठापासून निक्षेपापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी मार्ग खणून काढणे म्हणजे निक्षेप उघडणे होय. खाणकाम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी ज्या मार्गापासून पुढे जेथून खाणकाम सुरू करायचे ते पृष्ठ उघडण्याकरिता सरळ व आडवे बोगदे, विस्तीर्ण अशा निक्षेपाचे क्षैतिज विभाग पाडण्यासाठी सरळ आणि आडवे बोगदे, निरनिराळ्या पातळ्यांचे व उपपातळ्यांचे रस्ते, ऊर्ध्वगामी व अधोगामी रस्ते इ. खणून पूर्वतयारीची कामे करतात. एखाद्या खाणीच्या क्षेत्रात असणाऱ्या खनिज निक्षेपातील खनिजांच्या थरांची संख्या किंवा धातुक शिरांची संख्या, या थरांतील किंवा शिरांतील अंतरे, त्यांची जाडी, एकूण खोली व नती इ. गोष्टींचा विचार करून एक किंवा अधिक कूपक खणून खाणकाम करतात. फायदेशीर व आवश्याक असल्यास प्रत्येक खनिज थरासाठी किंवा धातुक शिरेसाठी स्वतंत्र कूपक असू शकतो किंवा एका उभ्या मुख्य कूपकापासून बोगदे खणून किंवा उभ्या कूपकाशी संलग्न असे भूमिगत लहान लहान उपकूपक खणून सर्व थर किंवा शिरा खणून काढतात. एखाद्या भागात एकच तिरपा थर असेल, तर उतरणी कूपक खणून किंवा उभा कूपक खणून खाण उघडतात. कुठलाही निक्षेप खणून काढताना उभ्या कूपकापेक्षा उतरणी कृपकाची लांबी नेहमीच जास्त असते. अर्थातच उतरणी कूपक खणण्याचा खर्च जास्त येतो. मात्र निक्षेपातूनच उदा., कोळशाच्या थरातून जेव्हा उतरणी कूपक खणतात तेव्हा तो खणत असतानाच खनिजाचे उत्पादन सुरू होते आणि उतरणी कूपक खणण्यासाठी जादा खर्च न येता ते उलट फायद्याचे होते. जर निक्षेपाची नती १८० पेक्षा कमी असेल, तर उतरणी कृपकांचा आणखी एक उपयोग होतो. तो म्हणजे निक्षेप खणण्याच्या जागेपासून ते थेट भूपृष्ठाच्या वरील मालगाड्यांत माल चढविण्याच्या धक्क्यापर्यंत फोडलेला माल वाहक पट्ट्यावरून वाहून नेता येतो.
कमी नती असलेल्या निक्षेपाचे खाणकाम उभा कूपक खणून कसे करता येते, ते आ. ५ मध्ये दर्शविले आहे. आकृतीमध्ये भृपृष्ठापासून सु.१५० मी. खोलीपर्यंत जाणारा कमी नती असलेला
निक्षेपाचा थर दर्शविला आहे. या थरात दर ३० मी. खोलीवर एक याप्रमाणे चार क्षितीजे आहेत. दृश्यांशापासून निक्षेपाच्या दिशेत उभा कूपक जसजसा दूर अंतरावर म्हणजेच अधिकाधिक खोल खणला असता खाणकामात काय फेरफार करावे लागतील ते दिसून येते. (अ) मध्ये कूपक दृश्यांसाजवळ व पहिल्या क्षितिजापर्यंत आहे. हा कूपक ज्या ठिकाणी निक्षेपात पोहोचतो तेथून खालच्या भागाचे खाणकाम निक्षेपात उतरणी कूपक खणून करतात. त्या वरचा भाग उथळ असल्यामुळे तो सामान्यत: उघड्या खाणी उघडून खणून काढतात. (आ) मधील कूपक दूसऱ्या क्षितिजापर्यंत आहे. (इ) मधील कूपक चौथ्या क्षितिजापर्यंत व अधिक खोल आहे. येथून पुढे कूपक जसजसा खोल होत जातो तसतसे ज्या ठिकाणी कूपक निक्षेपात पोहोचतो त्याच्या वरच्या भागातील निक्षेपाचे खाणकाम आरोध-उतरणी कूपक वापरून व खालच्या भागाचे खाणकाम उच्चालक कूपक वापरून करतात. (ई) मध्ये कूपक दृश्यांशाजवळ आजूबाजूच्या खडकांत व बराच खोल खणलेला आहे. या कूपकापासून खाली ठराविक क्षितिजावर निक्षेपापर्यंत पोहोचणारे आडवे बोगदे खणून खाणकाम करतात. उभा कूपक कुठल्या खोलीपर्यंत खणायचा हे कूपक निरनिराळ्या खोलीपर्यंत नेला असता त्या जागेपासून (१) वाहतुकीचा खर्च, (२) मिगत खणण्याचा खर्च, (३) रस्ते चालू ठेवण्याचा खर्च, (४) खाणीच्या क्षेत्रात पाणी असल्यास पंप चालविण्याचा खर्च किती येईल यांचा अंदाज काढून ठरवावे लागते. डोंगराळ भागातील निक्षेप जमिणीवरून डोंगरात सरळ वा निक्षेपगामी बोगदे खणून उघडतात. जेव्हा भूपृष्ठावरून बोगदा खणून खाणकाम करतात तेव्हा या बोगद्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या निक्षेपाचे खाणकाम निक्षेपाला समांतर मालवाहक उतरणी कूपक (आ. ६ मध्ये खघ) खणून किंवा भूमिगत उभे कूपक (आ. ६ मध्ये खग) म्हणून करतात.
एखाद्या खाणीच्या क्षेत्रात निक्षेपाचे उथळ व कमी नती असलेले बरेच थर असतील, तर बऱ्याच वेळा वेगवेगळे कूपक खणून त्यांचे खाणकाम करतात. (आ. ७) हे कूपक उभे किंवा उतरणीचे असू शकतात. परंतु अशा परिस्थितीत एकच उभा कूपक मध्यवर्ती भागात उघडून व खालच्या भागात त्यापासून निक्षेपाला समांतर व आडवे भूमिगत बोगदे खणून खाणकाम करणे सोयीचे असते (आ. ८). अशा प्रकाराने खाणकाम केल्यास येणारा खर्च प्रत्येक थराला एक स्वतंत्र कूपक उघडून केलेल्या खाणकामाच्या खर्चापेक्षा कमी असतो.
मुख्य कूपकापासून दोन प्रकारांनी बोगदे उघडून खाणकाम करतात. पहिल्या प्रकारात एकच बोगदा फक्त एकाच क्षितिजातून जाणारा व दुसऱ्या प्रकारात प्रत्येक क्षितिज विभागातून स्वतंत्र बोगदा उघडून खाणकाम करतात. या दोन्ही प्रकारांत मुख्य उभा कूपक अगदी खालच्या बोगद्यापर्यंत खणून थांबत नाहीत, तर तो त्याखाली असणाऱ्या आणखी एका क्षितिज विभागापर्यंत खणतात. कूपक खालच्या भागात ज्या ठिकाणी संपतो त्याच्या वरच्या विभागाचे उघडणे व खाणकाम हे कायम स्वरूपाचे आरोध-उतरणी कूपक चालवून व खालच्या भागाचे कायम स्वरूपाचे मालवाहक उच्चालक कूपक उघडून करतात.
खनिज शिरा सरळ उभ्या किंवा जवळजवळ उभ्या असतात. त्यांचे खाणकाम मोठा उतार असणाऱ्या निक्षेपाच्या खाणकामाप्रमाणे करतात. सामान्यतः तळाकडील खडकांमध्ये कूपक खणून त्यांचे खाणकाम करतात. खनिज शिरेतील निक्षेप खणून काढल्यावर निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये कधीकधी वरचे खडक खचण्याची शक्यता असते. जमीन खचल्यामुळे पडझड होऊन भूपृष्ठावरील कूपकस्थानक, लोखंडी दोर गुंडाळण्याची यंत्रणा असलेली इमारत, यंत्रगृह व इतर इमारतींचे नुकसान होण्याची शक्यता असते. तळाकडच्या बाजूच्या भागात उभा कूपक खणल्यास व त्या भागातच इतर इमारतींचे बांधकाम केल्यास हा संभाव्य धोका टळतो.
जर धातुक निक्षेपाची शीर बरीच खोल जात असेल व तिची नती सापेक्षतः कमी असेल, तर पायाकडील खडकात उघडलेल्या कूपकापासून बऱ्याच लांबीचे भूमिगत बोगदे सरळ आणि आडव्या दिशांना खणावे लागतात. हे टाळण्यासाठी शिरेमध्ये किंवा पायाकडील भिंतीत उतरणी कूपक खणून काढतात. खनिज शीर कमकुवत असेल व तळाकडील जमीन वेडीवाकडी असेल, तर तळाकडील जमिनीतच कूपक खणावे लागतात (आ. ९). धातुकाची किंमत कोळशाच्या किंमतीपेक्षा सामान्यतः बरीच जास्त असते, त्यामुळे कोळशाच्या खाणीत असे कोळशाचेच जाड खांब आधार देण्यासाठी सोडून देतात तसे धातुकाचे सहसा सोडून देत नाहीत. जर उभे किंवा उतरणीचे कूपक खनिज शिरेच्या पायाच्या बाजूला खणून काढले, तर कूपकाच्या दोन्ही बाजूंना आधारासाठी धातुकाचे खांब सोडण्याचा प्रश्नच येत नाही.
खाणकाम करण्याची पद्धत कुठल्या प्रकारची असावी व त्या प्रकारामध्ये कुठल्या क्रिया समाविष्ट असाव्यात, त्यांच्यात काय फेरफार अथवा सुधारणा करणे आवश्यक आहे, हे मुख्यत्वेकरून पाच गोष्टींवर अवलंबून असते.
(१) निक्षेपाची जाडी : निक्षेप ३·५ मी. पेक्षा जास्त जाडीचा असल्यास एकाच टप्यात सर्वच्या सर्व जाडी खणून काढायची ठरविली, तर ते काम धोक्याचे होते. काही खनिजांच्या बाबतीत
असे करणे गैरसोयीचे होते. उदा., कोळशाचा इतक्या जाडीचा थर असल्यास त्यातील धूळ व कधीकधी काही अपायकारक वायू वगैरे खाणकामाच्या वेळी एकदम बाहेर येऊन मजुरांना त्रास होतो. खाणकाम करण्याच्या दृष्टीने निक्षेपाच्या जाडीचे पुढील तीन गट पाडतात : अतिपातळ ०·५ मी. पेक्षा कमी जाडीचे, पातळ ०·५ ते १·३ मी. जाडीचे व जाड म्हणजे ३.५ मी. पेक्षा अधिक जाडीचे. जाडी जास्त असल्यास उप-पातळ्या उघडून टप्याटप्यांनी खाणकाम करावे लागते. तसेच खाणीतून माल बाहेर काढल्यावर वेळोवेळी छताला व भिंतीना आधार देण्याची कामे करावी लागतात.
(२) निक्षेपाची नती : (उतार). नतीचे पुढील तीन प्रकार ठरविण्यात आलेले आहेत : सौम्य नती २५° पेक्षा कमी, मध्यम नती २५° ते ४५° व तीव्र नती ४५° ते ९०° (म्हणजे उभे). नती ज्या प्रकारची असेल त्याप्रमाणे निक्षेपाची खोली बदलते. उथळ निक्षेप उघड्या खाणी चालवून, तिरपे निक्षेप उतरणी कूपक खणून व तीव्र नतीचे किंवा उभे निक्षेप उभे कूपक खणून खाणकाम करतात.
(३) निक्षेपाचे गुणधर्म व त्याची संरचना : यामध्ये निक्षेपाच्या थरांतील खडकांचे बल तसेच थरांमध्ये असणाऱ्या इतर टाकाऊ पदार्थांचे लहान लहान थर यांचा विचार करतात. अधिक जाडीच्या व नती असलेल्या थरांमध्ये मातीचे, राखेचे किंवा इतर अगदी पातळ थर असले, तर थोडा माल खणून काढल्यावर या ढिल्या व अलग अशा थराच्या पृष्ठापासून खालचा सगळा भाग सुटून कोसळण्याची शक्यता असते. कोळशाच्या थरांमध्ये अशा प्रकारचे मातीचे आणि राखेचे थर विशेष करून आढळतात. या परिस्थितीमध्ये खनिज निक्षेप फोडण्याची दिशा बदलून व आधार देऊन थर ढासळणे थांबविता येते. कोळशाच्या थरात दगडाचे थर असतील, तर ते त्रासदायक ठरतात. मोठ्या थरात इतर पदार्थांचे ०·५ मी. पेक्षा जाड थर असल्यास खाणकाम विभाग ठरविण्यास मदत होते. मात्र ५ सेंमी. पेक्षा पातळ थर निक्षेपात असतील, तर ते बाजूला करणे कठीण होते. मऊ पदार्थांच्या निक्षेपात कठीण पदार्थांचे थर असले, तर खाणकामाच्या यंत्रांना अडथळा आणि फुटीतुटीचा धोका निर्माण होतो.
(४) आजूबाजूच्या म्हणजे निक्षेपाच्या पायाकडील व छताकडील खडकांचे गुणधर्म : भूमिगत खाणकाम करीत असताना जसजसा खणलेला माल निखननाच्या गाळ्यातून बाहेर काढला जातो, तसतशी खाणकाम चालू असलेल्या पृष्ठासमोर पोकळी तयार होते. निक्षेपाच्या छताचे व भिंतीचे खडक खाणकाम चालू असलेल्या पृष्ठाच्या समोर तयार झालेल्या पोकळीत किती अंतरापर्यंत कुठलाही आधार न घेता स्वतःच्या बलावर जागच्या जागी टिकून राहतील, त्यास खडकांचे बल म्हणतात. या गुणधर्मांनुसार खडकांचे पुढील तीन वर्ग पडतात. (१) दुर्बल : जे खडक खाणकामाच्या पृष्ठाच्या समोर ५ मी. पेक्षा कमी अंतर मोकळे झाले असता कोसळून पडतात. (२) मध्यम : जे खणण्याच्या पृष्ठापासून ५ ते १० मी. अंतराची पोकळी तयार झाली असता कोसळून पडतात. (३) प्रबल : जे खडक १० मी. पेक्षाही अधिक पोकळी तयार झाली, तरी न कोसळता जागच्या जागी टिकून राहतात. हे वर्गीकरण अगदी कृत्रिम आणि कामचलाऊ आहे. खडकांचे बल समजण्यासाठी इतरही काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दुर्बल पृष्ठे अथवा भेगा असलेले खडक दुर्बल असतात. छताच्या खडकांतील भेगांचे प्रकार व त्यांच्या दिशा पाहून खाणकाम करावयाच्या पृष्ठ भागाची दिशा ठरवितात. तळाची जमीन कधीकधी दुर्बल असते म्हणजे ती फुगून वर येणारी किंवा खाली खचणारी असू शकते. छताला खांबांचा आधार देताना आधाराचे खांब खाली खचून छत परत अधांतरी लोंबकळत राहू नये म्हणून व उत्तरोत्तर वरच्या बाजूस प्रगत होत जाणाऱ्या खणण्याच्या कामासाठी बऱ्याच वेळा कामगारांना उभे राहण्यासाठी तळाच्या जमिनीवर माचे बांधावे लागतात. हे माचे पक्के व न खचणारे असणे आवश्यक असते. म्हणून तळाच्या जमिनीच्या दुर्बलतेचा विचार करावा लागतो.
(५) खाणकाम करावयाच्या जागी असणारे अपायकारक वातावरण : खाणीमध्ये विषारी वायू असतील, तर बंदिस्त भाग अथवा मार्ग कमीत कमी असावेत. वायू हलके असतील,
तर वरच्या बाजू उघड्या असाव्यात. प्रत्यक्ष खाणकामाच्या जागी पुढील खाणकाम करण्यासाठी तयार करावयाच्या पूर्वतयारीच्या कामाच्या जागी मोकळी आणि स्वच्छ हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत कधीकधी मालाच्या वाहतुकीसाठी व मजुरांना येण्या-जाण्यासाठी तसेच केवळ वायुवीजनासाठी जादा रस्ते व बोगदे खणून काढावे लागतात. काही विशिष्ट परिस्थितींत खडकांचे किंवा कोळशाच्या खाणीत कोळशाचे व निरनिराळ्या वायूंचे कधीकधी स्फोट होतात. या संभाव्य अपघाताची तत्परतेने सूचना देण्याची व वायुवीजनाची व्यवस्था करणे, आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यक्षम ठेवणे यांसाठी काटेकोर व्यवस्था करावी लागते.
खाणीतील निक्षेप म्हणजे घटत जाणारी संपत्ती होय, हे लक्षात घेऊन नैसर्गिक खनिज संपत्तीचे संरक्षण करणे व ती जपून वापरणे या गोष्टी खाणकाम करताना काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतात. एकदा खनिज जमिनीतून खणून काढले की, ते पिकासारखे परत उगवत नाही. यामुळे एकदा खाणकाम सुरू केले की, निक्षेपाचा शक्य असेल तितका जास्तीत जास्त भाग खणून काढता येईल, अशा प्रकारची खाणकामाची पद्धत असावी लागते. उरलेला निक्षेप अथवा कनिष्ठ प्रकारचा धातुकाचा भाग खणून काढण्यासाठी एकदा बंद केलेल्या जुन्या खाणीत परत खाणकाम सुरू करणे सहसा फायदेशीर होत नाही. म्हणून खनिज पदार्थाचे महत्त्व, त्याची किंमत, निक्षेपाची जाडी, खोली, विस्तार वगैरे विचारात घेऊन कमीत कमी खर्चाचा, सुरक्षिततेचा आणि उच्च कार्यक्षमतेचा खाणकामाचा प्रकार निवडतात.
खाणकामाचे प्रकार
उघड्या खाणकामाचे प्रकार (विस्तीर्ण सपाट खाणी किंवा पट्ट्याच्या खाणी चालवून) पुढीलप्रमाणे आहेत. (१) पायऱ्या खणून (२) ग्लोरी होल खाणकाम (३) प्लेसराचे खाणकाम : (अ) जलदाबाच्या साहाय्याने, (आ) गाळाचा उपसा करून.
भूमीगत खाणकामाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. (१) छातीसमोर होणारे किंवा अभिमुख खाणकाम (ठोकळ्याच्या आकाराच्या निक्षेपाचे) : (अ) सलग अखंड पातळीवरील खाणकाम, (आ) निक्षेपाला समांतर सरळ बोगदे उघडून, (इ) निक्षेपाचेच खांब अधूनमधून न फोडता सोडून देऊन, (ई) खोल्या आणि खांब.
(२) हाताखाली किंवा खाली वाकून होणारे खाणकाम (खनिज शिरा किंवा मोठे निक्षेप यांचे) : (अ) खांब सोडून ग्लोरी होल पद्धत (आ) उघडे निखननाचे गाळे चालवून, (इ) तुळ्या आणि कैच्या वापरून, (ई) लाकडाचे चौरस सांगाडे वापरून.
(३) खालून वरच्या दिशेस होणारे खाणकाम (उभट शिरांचे किंवा थरांचे) : (अ) उघडे निखननाचे गाळे : (अ१) खांब सोडून, (अ२) तुळ्या आणि कैच्या वापरून, (अ३) चौरस सांगाडे वापरून
(आ) निखननाचे गाळे भर घालून बुजवून : (अ१) क्षैतिज खणणे व भर घालणे, (अ२) तिरपे खणणे व भर घालणे, (अ३) लाकडाचे चौरस सांगाडे वापरून, (अ४) रेस्यूइंग प्रकाराने किंवा पट्टे कापून.
(४) आकसत जाणारे निखननाचे गाळे.
(५) उप-पातळ्या उघडून होणारे खाणकाम.
(६) वरच्या भागाचे काप घेण्याची पद्धत (रुंद शिरा आणि जाड निक्षेप) : (अ) सलग पातळीवरील होणारे, (आ) लांबट चौकोनी दालने (पॅनेल) कापून होणारे, (इ) मोठ्या ठोकळ्यांच्या आकारमानाचे काप घेऊन, (ई) तिरपे काप घेऊन.
(७) खालून पोखरून ढासळून देण्याची पद्धत : (अ) उपपातळ्या उघडून खालून पोखरून ढासळवून देणे (आ) खंडच्या खंड ढासळवून देणे : (आ१) मुख्य पातळीपासून खालून पोखरण्याची सुरुवात करून, (आ२) उप-पातळीपासून खालून पोखरण्याची सुरुवात करून, (आ३) नालींमध्ये खंड पोखरून ढासळवून टाकणे, (आ४) ऊर्ध्वगामी कूपकांच्या शाखा उघडून त्यांतून खंड पोखरून ढासळवून टाकणे.
धातुक मौल्यवान असेल, तर निक्षेपाचा जास्तीत जास्त भाग खणून काढता येणारी व प्रसंगी खर्चिक अशी खाणकामाची पद्धत वापरावी लागते. वरच्या भागाचे काप घेण्याच्या पद्धतीने भेसळ न होता स्वच्छ धातुक मिळते. खालच्या बाजूने निक्षेप पोखरून व वरचा भाग ढासळवून पाडण्याच्या पद्धतीत धातुकाचा एक तर अपव्यय होतो व दुसरे म्हणजे धातुकामध्ये इतर खडकांच्या अनावश्यक चुऱ्याची भेसळ होते. अनियमित आकाराच्या निक्षेपासाठी वापरल्या जाणाऱ्या कापणे आणि भर घालणे या पद्धतीने सुद्धा निर्भेळ धातुक मिळविता येते. काही खनिजे व धातुके (उदा., सल्फाइड धातुके) खाणकामाच्या गाळ्यात फोडून उघडी टाकली, तर त्यांचे ⇨ ऑक्सिडीभवन होऊन नुकसान होते. प्लवन करून धातुक मिळविताना त्यांच्या उत्पादनात घट होते. अशा धातुकांचे खाणकाम झाल्याबरोबर त्यांना ताबडतोब शुद्धीकरण व धातू गाळणे वगैरे क्रिया चालणाऱ्या कारखान्यांकडे पाठविणे आवश्यक असते. नियमित स्वरुपाचा आढळ असणाऱ्या व सामान्यतः हलक्या दर्जाच्या धातुकाचे खाणकाम कुठलेही फेरफार न करता सरळ खालून पोखरून ढासळून पाडण्याच्या किंवा आकसत जाणाऱ्या पद्धतीनेच करावे लागते. पण ज्या ठिकाणी धातुक अनियमित, वेड्यावाकड्या व फाटे असलेल्या शिरांच्या स्वरूपात असते, तेव्हा खाणकामाच्या निवडक प्रकारांनी (उदा., उघडे निखनन, कापणे व भर घालणे, लाकडाचे चौरस सांगाडे वापरणे इत्यादींनी) खाणकाम करावे लागते. कधीकधी धातुकाचे एकाच भागात असणारे परंतु भिन्न दर्जाचे भाग स्वतंत्रपणे खाणकाम करून वेगवेगळे ठेवणे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे असते. खाणकामाच्या काही प्रकारांत, उदा., खंड ढासळून पाडणे, उप-पातळ्या खणून खाणकाम करणे, वरच्या बाजूने काप कापत जाणे यांसारखी पूर्वतयारीची पुष्कळ कामे करावी लागतात व त्यांत बरेच भांडवल गुंतवावे लागते. साध्या पद्धती वापरल्यास हा खर्च टाळता येतो किंवा कमी करता येतो. उपलब्ध भांडवल अगदी मर्यादित असेल, तर उघडे निखनन किंवा आकसत जाणारे निखनन करणे योग्य ठरते. कारण या प्रकारात पूर्वतयारीची कामे अगदी थोडी करावी लागतात व एकदा निक्षेपापर्यंत जाऊन पोहोचले की, खाणकामात ताबडतोब सुरुवात करता येते. इतर कुठल्याही प्रकारापेक्षा उप-पातळ्या उघडून खाणकाम करण्यासाठी पूर्वतयारीची कामे जास्त करावी लागतात. कापणे आणि भरणे अथवा उप-पातळ्या खणून खाणकाम करणे या प्रकारांनी जास्तीत जास्त व निर्भेळ धातुक खणून काढता येते, पण हे प्रकार महाग असतात. भांडवलाच्या अभावी बऱ्याच वेळा या प्रकारांऎवजी आकसत जाणाऱ्या खाणकामाचा वापर करावा लागतो. तर काही ठिकाणी आकसत जाणाऱ्या पद्धतीचा उपयोग करणे हे अगदी योग्य असले, तरी पुरेशा भांडवलाच्या अभावी उघड्या प्रकाराचे निखनन केले जाते. अधूनमधून बाजारातील गरजा व मागणीनुसार मालाचा पुरवठा कमीजास्त करावा लागतो, तर कधी कमी प्रतीचा मालदेखील खपवून घेतला जातो. मागणी वाढणार असली व कुठल्याही प्रकाराने खाणकाम व्हायचे असले, तर अगोदरच पूर्वतयारीची कामे करून ठेवलेली असल्यास एकदम खाणकाम वाढविण्याची तसेच एकाच वेळी अनेक ठिकाणी खाणकाम करण्याची शक्यता निर्माण होते. मात्र असे करीत असताना बरेच भांडवल अगोदर अडकवावे लागते व ते किती काळ अडकून पडणार याची कधीकधी कल्पना येऊ शकत नाही. तसेच पूर्वतयारीची केलेली कामे चालू स्थितीत ठेवण्यासाठी वरचेवर खर्च करावा लागतो. अगोदर उघडलेले खाणकामाचे गाळे काम न करता तसेच उघडे पडू दिले, तर तेथील एकूण परिस्थिती फायद्याच्या दृष्टीने खालावत जाते. उघड्या पद्धतीने निखनन होणाऱ्या बहुतेक निक्षेपाच्या भिंती व छप्पर ही मजबूत असल्यामुळे खणण्याच्या कामात काही कारणांनी कपात केली, तर नुकसान कमीतकमी होते.
उघड्या खाणी : खनिज निक्षेप भूपृष्ठावर किंवा कमी खोलीवर असतो तेव्हा उघड्या प्रकारच्या खाणी चालवून त्याचे खाणकाम करतात. उघड्या खाणीत तिच्या नावाप्रमाणेच खणण्याचे व टाकाऊ खडकांचा ढीग रचण्याचे काम तसेच खाणकाम करण्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री ही सर्व जमिनीवर अगदी उघड्यावर असतात. सामान्यतः अशा प्रकारचे खाणकाम करण्यासाठी (१) निक्षेप फार मोठ्या आकारमानाचे असावेत, (२) त्यांच्यापासून दररोज फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्यासारखे असावे, (३) शक्यतो असे निक्षेप भूपृष्ठावर उघडे असावेत आणि त्यांच्यावर इतर खडकांचे ओझे असू नये किंवा असल्यास थोड्या प्रमाणात असावे आणि (४) असे निक्षेप विस्तृत क्षेत्रात पसरलेले असावेत म्हणजे ते क्षैतिज असावेत अथवा तिरपे असल्यास त्यांची नती ४-५ अंश इतकीच म्हणजे अगदी कमी असावी लागते.
उघड्या खाणी सामान्यतः विस्तृत म्हणजे लांब व रुंद असतात, पण लांबीरुंदीच्या मानाने उथळ असतात. बहुतेक उघड्या खाणी छाटलेल्या उघड्या शंकूच्या आकाराच्या असतात. मोठाल्या उघड्या खाणी चौकोनी द्रोणीसारख्या असतात. मात्र चौकोनाचे कोपरे गोल केलेले असतात. म्हणजेच उघड्या खाणी वरून खाली निमुळत्या होत गेलेल्या असतात. याला अपवाद म्हणजे टेकड्यांच्या किंवा डोंगराच्या आकाराच्या निक्षेपांचे खाणकाम होय. अशा ठिकाणी टेकडीच्या कडेकडेने पायऱ्या कापत जाऊन रुंद पाया खालच्या बाजूस व निमुळती बाजू वरच्या बाजूस असते. दोन्ही प्रकारांत पायऱ्या खणून खाणकाम केले जाते. अशा प्रकाराने खाण उघडण्यामुळे अनेक फायदे होतात. उदा., (१) निक्षेपाची एक एक पायरी खणून काढता येते, (२) पाण्याचा निचरा करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेता येतो व (३) त्यांवरून वाहन मार्ग टाकता येतो. आ. १० मध्ये उघड्या खाणीतील वाहतुकीचे तीन प्रकार दाखविले आहेत. (अ) मध्ये भूपृष्ठावरुव सरळ खाली जाणारा मार्ग आहे, (आ) मध्ये भूपृष्ठापासून नागमोडी वळणे घेत खाणीच्या अगदी तळापर्यंत कसे जाता येते ते दाखविले आहे व (इ) मध्ये मालगाड्या मागे पुढे करीत वरून खाली किंवा खालून वर कशा जातात ते दाखविले आहे. यांपैकी (आ) प्रकार जास्त प्रमाणात वापरात असलेला आढळतो. या प्रकारात निक्षेपाच्या आकारानुसार उघडे खाणकाम सुरू करतात. प्रथम निक्षेपावरील इतर खडकांचे ओझे उकरून बाजूला सारतात. नंतर पायऱ्या पायऱ्यांनी किंवा एका खाली एक मंच तयार करून निक्षेप खणून काढतात. या पायऱ्या किंवा मंच निक्षेपाच्या सभोवर खणून नागमोडी पद्धतीने वळणे घेत सलग जातात म्हणजे खालची पायरी ही अगदी वरच्या पायरीपर्यंत वळणे घेत घेत सलग रीतीने जोडलेली असते.
खनिज निक्षेपावरील वरच्या खडकांचे ओझे : खनिज निक्षेपाच्या वर असणाऱ्या अनावश्यक व निरुपयोगी खडकांना व सुट्या दगड, माती, गोटे यांच्या थरांना ‘वरचे ओझे’ अथवा ‘वरचा भार’ असे म्हणतात. कारण (१) खाणकाम करताना त्याची अडचण होते, (२) ते बाजूला सारल्याशिवाय निक्षेप खणून बाहेर काढता येत नाही व (३) आर्थिक दृष्टीने वरच्या ओझ्याला मुळीच किंमत नसते. वरचे ओझे सुटे व मोकळे असेल, तर सुरुंग वगैरे लावून अगोदर फोडावे लागत नाही, हल्ली विजेवर अथवा डीझेलवर चालणाऱ्या मोठाल्या शक्तिशाली फावड्यांनी व खोऱ्यांनी सुट्या प्रकारच्या पदार्थांचा सहज लचका तोडून, उचलून घेऊन तो बाजूला टाकता येतो. अशा प्रकाराने खणून काढलेला माल वाहून नेण्यासाठी लहान लहान रेल्वे मालगाड्यांची किंवा ट्रॅमगाड्यांचीही सोय केलेली काही ठिकाणी आढळते. तसेच काही ठिकाणी वाहक पट्टे माल वाहून नेण्याचे काम एकसारखे करीत असतात. घट्ट पक्क्या व कठीण खडकांचे वरचे ओझे यंत्रे वापरून दूर करण्यापूर्वी अगोदर सुरुंगाने फोडून सुटे करावे लागते. तसेच सुरुंग उडविल्यावर तयार झालेल्या खडकांच्या मोठाल्या तुकड्यांचे परत फोडून लहान लहान तुकडे करावे लागतात. कारण फोडून तयार झालेल्या खडकांच्या तुकड्यांचे आकारमान हे यांत्रिक फावड्याच्या आकारमानापेक्षा लहान असावे लागते.
खनिज निक्षेपावरील किती ओझे उकरून काढणे किफायतशीर होईल, हे अनुमान वेगवेगळ्या ठिकाणी तेथील परिस्थितीनुसार निरनिराळे असते. पूर्वी हाताने खाणकाम होत असताना कोळशाच्या थराची जाडी वरच्या ओझ्याच्या जाडीपेक्षा जास्त असली, तरच वरचा भाग उकरून खालचा माल खणून काढीत. खाणकामाचे यांत्रिकीकरण झाल्यापासून वरचा थर व कोळशाचा थर यांच्या जाडीचे प्रमाण भारतात ५ : १ आहे, अमेरिकेत १० : १ आहे, तर काही ठिकाणी अजस्र यंत्रांच्या उपयोगामुळे हे प्रमाण २०:१ पर्यंत नेलेले आहे. सामान्यतः ३० ते ३५ मी. जाडीचे वरचे ओझे बाजूला करून उघड्या प्रकाराने खाणकाम करतात. परंतु काही ठिकाणी क्वचित १०० मी. जाडीच्या ओझ्याखालच्या निक्षेपांचे देखील उघड्या प्रकाराने खाणकाम केल्याची उदाहरणे आहेत.
जमिनीवरील लहान उघड्या खाणी : (क्वारीज). मुख्यतः इमारतीसाठी किंवा बांधकामासाठी लागणारा दगड हाच भूपृष्ठावरील लहान उघड्या खाणीतून खणून काढण्यात येतो. अग्निज खडकांपैकी ग्रॅनाइट, सायेनाइट व बेसाल्ट अवसादी खडकांपैकी चुनखडीचा दगड, वालुकाश्म आणि शेल तसेच रूपांतरित खडकांपैकी संगमरवर हे सर्व बांधकामास उपयोगी व पैसा मिळवून देणारे दगड, अशा खाणी चालवून खणून काढतात. दगडाच्या खाणीतून खडकाचा चुरा व मोठाल्या आकारमानाचे प्रचंड तुकडे मिळतात. मोठाल्या तुकड्यांना हवा तो आकार देता येतो व शिल्पासाठी किंवा इमारती बांधण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. दगडांचा चुरा सामान्यतः रस्ते बांधण्यासाठी किंवा भरीसाठी वापरतात. बांधकामाच्या दगडांव्यतिरिक्त कित्येक खनिज निक्षेप उघड्या प्रकारच्या लहान मोठ्या खाणी उघडून मिळवितात. उदा., कोळसा, तांब्याचे, लोहाचे वा मँगॅनिजाचे धातुक. चांगल्या खडकाचा किंवा खनिज निक्षेपाचा शोध लागल्यावर प्रथम निक्षेपावरील केरकचरा, दगड, माती वगैरे उकरून बाजूला करतात. नंतर निक्षेप फोडण्यास सुरुवात करतात. मालाचे मोठे तुकडे हवे असतील, तर सौम्य प्रकारचे सुरुंग वापरतात. कित्येकदा चुनखडीच्या दगडात किंवा संगमरवरात लहान सुरुंग उडविण्यापूर्वी दगड कापण्याच्या यंत्राने काप घेतात. दगड कापण्याची यंत्रे ५-६ सेंमी. रुंद काप कापून खडकात कित्येक मीटर खोलपर्यंत तितक्या रुंदीची फट पाडू शकतात. यामुळे फोडावयाचा खंड मूळच्या खडकापासून विभक्त होतो. ग्रॅनाइटासारख्या कठीण खडकात काप घेणे अवघड असते. अशा वेळी कठीण खडकात एका रांगेत अनेक भोके पाडून भोकांच्या दिशेत एक कमजोर पृष्ठ तयार करतात. मग या पृष्ठावरून काप घेतात किंवा हलका सुरुंग उडवून भोके पाडलेला भाग सुटा करतात. निक्षेपामध्ये क्षैतिज स्तरतल (थरांचा सांधा) किंवा संधिपृष्ठे (भेगा) नसतील, तर वेधन करून त्यात क्षैतिज भोकेदेखील पाडून त्यांना समांतर कमजोर पातळ्या तयार करतात. खडकात उभी व आडवी कमजोर पृष्ठे तयार केल्यामुळे निक्षेपाचे मोठाले ठोकळ्याच्या आकाराचे तुकडे पाडता येतात. कधीकधी तारेच्या किंवा साखळीच्या करवती खडक कापण्यासाठी वापरतात.
ठोकळ्याच्या किंवा इतर आकाराच्या दगडापेक्षा दगडाचा चुरा जास्त प्रमाणात वापरला जातो. बांधकाम, सिमेंट क्राँक्रीट, रुळमार्ग (रेल्वे), रस्ते, पूल, धरणे वगैरेंसाठी भर म्हणून खडकांचा चुरा वापरतात. खडक फोडून त्याचा चुरा करण्यासाठी प्रथम वेधन यंत्राने त्यात एका रेषेत भोके पाडतात. ही भोके सु. १५ सेंमी. व्यासाची आणि सु. १६ ते १८ मी. खोल असतात. मोठ्या खाणीत प्रत्येक रांगेत १२ ते २० किंवा अधिक भोके असलेल्या दोन किंवा अधिक रांगा तयार करतात. मग सर्व भोकांत सुरुंग भरून एकाच वेळी उडवून देतात. अशा प्रकाराने सर्व सुरुंग एकदम उडवून देताच कित्येक ठिकाणी एकावेळी वीस हजार टनांपेक्षा अधिक फोडलेला माल मिळतो. मोठे तुकडे असलेला माल पुढे ठराविक आकारमानाचे तुकडे फोडणाऱ्या यंत्रात घालून त्याचे इच्छित आकारमानाचे तुकडे करतात.
विस्तीर्ण उघड्या खाणी : निक्षेपाचा विस्तार, त्याची जाडी व एकूण खोली, निक्षेपातील धातुकाची किंवा खनिजाची किंमत, खाणकामास येणारा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करून काही उघड्या खाणी सु. ३५ मी. पासून ते १,००० मी. पर्यंत खोल खणण्यात आलेल्या आहेत. काही उघड्या खाणींत प्रचंड प्रमाणात खाणकाम होत आहे. उदा., अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील लोखंडाच्या खाणी, भारतातील बिहार-बंगालमधील व इतर कोळशाच्या खाणी, नेव्हेलीची लिग्नाइटाची खाण, शहाबाद येथल्यासारख्या चुनखडकांच्या खाणी इत्यादी.
पायऱ्यांवरील खाणकाम : विस्तीर्ण उघड्या खाणीतील खाणकाम एका खाली एक अशा पायऱ्या खणून केले जाते. प्रत्येक वरच्या बाजूची पायरी ही खालच्या पायरीस विजेच्या पाळण्याच्या साहाय्याने किंवा इतर सोयीस्कर यांत्रिक पद्धतीने जोडलेली असते, पण बहुतेक वेळा वरपासून खालपर्यंतच्या सर्व पायऱ्या एकमेकींना नागमोडी वळणे देत जोडलेल्या असतात. उघडी खाण सुरू करण्यापूर्वी पूर्वतयारीची कामे करताना पायऱ्यांच्या संरचनेचा म्हणजे पायऱ्यांची संख्या, त्यांची रुंदी, उंची, उतार, पायऱ्यांच्या उभ्या भिंतींचा उतार या गोष्टींचा विचार करावा लागतो. या सर्व गोष्टी खनिज निक्षेपाचा प्रकार आणि विस्तार, खाणकामासाठी वापरावयाच्या यंत्रसामग्रीचे आकारमान, पायरीच्या पृष्ठभागावर टाकावयाचा रूळमार्ग, हवामान वगैरेंचा विचार करून ठरवितात.
पायऱ्यांची संख्या व उंची : निक्षेप विशेष जाडीचा नसेल, तर एकाच पायरीत तो खणून काढता येतो. अशा प्रकारे एकाच पातळीवर पायरी खणून बऱ्याच कोळशाच्या थरांचे खाणकाम केले जाते कारण कोळशाचे थर हे सामान्यत: १७ मी. पेक्षा कमी जाडीचे असतात. पायरीची उंची जास्त ठेवली, तर (१) एकाच उंचीवरून बराच निक्षेप खणून काढता येतो, (२) एकूण पायऱ्यांची संख्या कमी होते, (३) मोठल्या अवजड शक्तिशाली यंत्रांना कमीत कमी हलवावे लागते, (४) एकाच ठिकाणी अजस्त्र शक्तिशाली फावड्यांनी काम करण्यास जास्त वेळ मिळतो. या विचारानुसार काही धातुकांच्या खाणींत ७५ मी. उंचीच्या पायऱ्या खणून खाणकाम करतात. पण अशा उंच पायऱ्या धोक्याच्या असतात. निक्षेपाची एकूण जाडी, त्याचे भौतिक गुणधर्म, हवामान, सुरुंग वगैरे स्फोटक पदार्थ उडवून देण्याचा प्रकार, निक्षेप फुटण्याचा प्रकार यांवरून पायऱ्यांची उंची ठरविली जाते. कोरड्या हवामानामध्ये निक्षेपाच्या पायऱ्यांच्या उभ्या भिंती व फोडलेले निक्षेपाचे भाग उभ्या किंवा जास्त अंशाच्या उतरणीवर न घसरता जागेवर राहू शकतात, पण ओल्या किंवा पावसाळी हवेत फोडलेला चुरा सरपटत खाली घसरण्याची शक्यता असते, उभ्या भिंती ढासळून कोसळू शकतात व कधीकधी विभंगाच्या (भेगेच्या) कमजोर पृष्ठापासून भूमिसर्पणास (खडकाचा भाग खाली कोसळण्यास) सुरुवात होते. बहुतेक खाणींतील पायऱ्यांची उंची ४ ते २५ मी. च्या दरम्यान असते.
पायऱ्यांची रुंदी : पायऱ्यांवर ज्या प्रकाराने काम व वाहतूक चालणार असेल त्याप्रमाणात उघड्या खाणीतील पायऱ्या असाव्या लागतात. या पायऱ्यांवरून मोठाल्या खाणींत मालवाहू ट्रकगाड्या, रूळमार्गी मालगाड्या, ट्रॅमगाड्या इ. ये-जा करीत असतात. मोठाल्या खाणींत अजस्त्र अशी यंत्रे पायऱ्यांवर काम करीत असतात. शक्तिशाली फावडी, खोरी इत्यादींना पायऱ्यांवर उभे राहण्याकरिता जागा असावी लागते. सुरुंग उडवून खाणकाम होणार असेल, तर सुरुंग उडविल्यावर पायरीच्या बाजूच्या भिंतीचा फुटून निघालेला माल खाली पडून त्याखाली रूळ अथवा इतर वाहतुकीचे मार्ग गाडले जाऊ नयेत तसेच खालच्या पायरीवर अपघात न होईल अथवा तेथील खाणकाम बंद होणार नाही, इतकी तरी पायरी रुंद असणे आवश्यक असते. सामान्यतः पायरीची रुंदी १० मी. पेक्षा जास्त असावी लागते.
पायऱ्यांचा उतार : पायरीची म्हणजे समोर काम करावयाच्या भिंतीची उंची जास्त असेल, तर ती भिंत उभी असण्याऎवजी उतरती असणे हिताचे असते. ती जितकी उंच तितकी अधिक तिरपी असणे बरे असते. खाली असणाऱ्या खडकाच्या प्रकारावर व त्याच्या बलावर उताराचा कोन अवलंबून असतो. विभंग, संधिरेषा, स्तरतल व भूमिजल ही उतार द्यावयाच्या खडकात असली. तर अर्थातच खालच्या जमिनीचे बल कमी होते व मग भूमिसर्पण होते किंवा खडक ढासळून पडतात. पायऱ्यांच्या उभ्या भिंतीचा उतार निरनिराळ्या खाणींत वेगवेगळा म्हणजे २२ ते ६० अंशांपर्यंत असतो. मात्र सामान्यतः या भिंती एकास एक प्रमाणात म्हणजे ४५ अंशांनी उतरत्या असतात. उतार यापेक्षा जास्त असल्यास काम अशक्य होते. प्रत्येक पायरीची उंची व रुंदी लक्षात घेऊन सर्व पायऱ्यांचा एकत्रित विचार केल्यास संपूर्ण खाणीचा एकंदरीत उतार कळून येतो. एकंदरीत उतार प्रत्येक पायरीच्या टोकाला जोडून जाणाऱ्या रेषेवरून ठरवितात. किती अंशापेक्षा जास्त उताराचा कोन असल्यास धातुकाचा फोडलेला भाग आपोआप गुरुत्वाकर्षणाने घसरू लागेल, हे प्रत्येक धातुकांच्या बाबतीत वेगळे असते. हा उतार धातुक निक्षेपाच्या गुणधर्मांनुसार कमीअधीक असतो.
भूपृष्ठावर पट्टे कापून उघड्या प्रकाराने चालणारे खाणकाम : (स्ट्रिप मायनिंग) सामान्यतः भूपृष्ठावरील किंवा कमी खोलीवरील विस्तीर्ण निक्षेपांचे पट्टे कापून उघड्या प्रकाराने खाण काम करतात. खाणकामाचे पट्टे बहुतेककरून निक्षेपाच्या लांबट दिशेला समांतर असतात. हल्ली ३० ते ५० मी. पर्यंत खोल असणाऱ्या निक्षेपांचे या प्रकाराने खाणकाम करणे अगदी सर्वसामान्य झाले आहे. काही थोड्या ठिकाणी उघड्या पट्ट्यांच्या खाणी ७० मी. खोलीपर्यंत गेल्या आहेत. या प्रकाराने खाणकाम करण्यासाठी देखील निक्षेपाचा थर क्षैतिज अथवा अगदी कमी नती असलेला असावा लागतो. खाणकाम उघड्या पद्धतीने होत असल्यामुळे कामगार, अवजारे, यंत्रे, वाहतुकीचे साधने यांच्यावर छप्पर कोसळून अपघात होत नाहीत. भूमिगत खाणकामात निक्षेपाचे–मुख्यतः कोळशाचे– स्तंभ जागच्या जागी जसे सोडावे लागतात तसे या पद्धतीत सोडावे लागत नाहीत, म्हणजेच सर्वच्या सर्व निक्षेप खणून बाहेर काढता येतो. ६० ते १०० मी. च्या मर्यादेत निक्षेप असेल, तर भूमिगत पद्धतीने खाणकाम करणे बरेच धोक्याचे असते कारण अशा परिस्थितीत वरचे छप्पर आधार न देता जागच्या जागी उभे राहू शकत नाही. उथळ निक्षेपांचे छप्पर भूमिगत खाणकामासाठी दुर्बल असते, पण हेच दुर्बल छप्पर उघड्या खाणीचे पट्टे कापण्याच्या दृष्टीने सोयीचे असते.
पट्ट्याच्या पद्धतीने खाणकाम करण्यासाठी निक्षेप जर उघडा नसेल, तर त्यावरचे आवरण उकरून बाजूला करून तो उघडा करावा लागतो. प्रचंड व शक्तिशाली खोरी, ओढदोरीयुक्त याऱ्या, बुलडोझर आणि दगड माती उकरून बाजूला हलविणारी इतर यंत्रे वरच्या दगड, माती व खडकांचा काप निक्षेपांच्या थरापर्यंत कापतात. या कापाची रुंदी यंत्राच्या ताकदीनुसार आणि आकारमानाप्रमाणे अंदाजे १३ ते ५० मी. असते. यांत्रिक खोरी व फावडी निक्षेपाच्या पातळीवर उभी राहून काम करतात, तर ओढदोरीयुक्त यारी खणावयाच्या पट्ट्यालगत भूपृष्ठावर राहून उकरून खणून काढण्याचे, खणलेला माल गोळा करण्याचे आणि तो वाहून दुसरीकडे टाकण्याचे काम करीत असते. विसाव्या शतकाच्या मध्यानंतर वापरात असलेली व शक्तीवर चालणारी कित्येक फावडी व खोरी बारा मजली इमारती इतकी उंच आहेत आणि एका लचक्यात ती सु. ११५ घ. मी. माल उचलून घेऊ शकतात. रहाटगाडग्याप्रमाणे चाकाभोवती फिरत असणाऱ्या साखळीवर असलेल्या बादल्यांतून ओढदोरीयुक्त याऱ्या दर ताशी सु. ३,५०० घ. मी. माल उकरून वाहक पट्ट्यांच्या साहाय्याने दुसरीकडे टाकू शकतात. ज्या बाजूला खाणकामासाठी नवीन पट्टा उघडावयाचा असतो, त्या बाजूच्या उभ्या पृष्ठभागाला ‘वरची भिंत’ किंवा ‘उंच भिंत’ असे म्हणतात व त्या विरुद्ध बाजूला म्हणजे निक्षेपाच्या वरच्या टाकाऊ खडकांचा चुरा जिकडे लांबट ढिगासारखा रचतात त्यास ‘कचरा’ म्हणतात. पहिला पट्टा कापताना हल्ली वरच्या बाजूला असलेली शेतमाती स्वतंत्रपणे एका ठिकाणी बाजूला ढीग करून रचून ठेवतात. मग पट्ट्याच्या ज्या बाजूला खाणकाम होणार नसेल त्या बाजूला व पट्ट्यास समांतर असा खालच्या खडकांच्या चुऱ्याचा लांबट तालीसारखा ढीग रचीत जातात. अशा रीतीने वरचे ओझे बाजूला सारल्यावर खनिज निक्षेप फोडण्यास सुरुवात करण्यापूर्वी निक्षेपावर उरलेला बारीकसारीक कचरा व खडकाचा चुरा हलक्या वजनाच्या फिरत्या खराट्यांनी झाडून काढतात किंवा बुलडोझराने बाजूला करून पृष्ठभाग स्वच्छ करतात. मग पट्ट्यातील सर्वच्या सर्व निक्षेप खणून काढतात. त्यानंतर दुसरा पट्टा कापण्यास सुरुवात करतात. या वेळीही प्रथम वरच्या शेतमातीचा ढीग स्वतंत्रपणे एका बाजूला करून ठेवतात. त्यानंतर निघणारा खडकाचा चुरा अगोदर खनिज निक्षेप खणून बाहेर काढल्यानंतर मोकळ्या झालेल्या पहिल्या पट्ट्यात ओतण्यास सुरुवात करतात. पहिला पट्टा जवळजवळ भरत आल्यावर तो शक्य तितका
सपाट करतात व त्यावर सगळीकडे पहिल्या पट्ट्यावरची एका बाजूला राखून ठेवलेली शेतमाती पसरतात व परत सर्व भाग जवळजवळ सपाट करून शेतीस वा इतर उपयोगी कार्यांसाठी उपलब्ध करून ठेवतात व याच पद्धतीने पुढच्या पट्ट्याचे खाणकाम करतात. जर अशा प्रकारे पट्टे भरून काढले नाहीत, तर जमीन ओसाड होते, म्हणून कित्येक ठिकाणी पट्टे भरल्यानंतर तयार झालेल्या जमिनीवर शेतमाती पसरणे कायद्याने सक्तीचे केलेले आहे.
बऱ्याचशा पट्ट्याच्या खाणी कोळशाच्या आहेत. कोळशाच्या थरात ठराविक अंतरावर रांगेने लहान लहान भोके पाडून त्यात कमी शक्तीचे सुरुंग भरून उडवून देतात. अशा रीतीने फोडलेला कोळसा ०·५. ते ५·० घ.मी. आकारमानाच्या खोऱ्यांनी गोळा करून ट्रकवर किंवा मालगाड्यांवर चढवितात. बहुतेक सर्व प्रकारच्या पट्ट्याच्या खाणींत एकाच प्रकारची यंत्रणा व तंत्र वापरण्यात येते. पण खाणीची जागा सपाटीवर आहे, का टेकड्यांच्या आणि डोंगराळ भागात आहे यांनुसार यंत्रांच्या आकारमानात व शक्तीत फेरफार असणे शक्य असते. निक्षेपावरील खडकांचे ओझे जर मोकळ्या सुट्या पदार्थाचे असेल, तर जोरदार दाबयुक्त पाण्याच्या प्रभावी झोताने ते बाजूला ढकलून देण्याची पद्धती अलास्कात वापरतात. अशा वरच्या खडकांवर वेगवान व दाबयुक्त पाण्याचा झोत उडवितात. यामुळे मोकळे सुटे असलेले पदार्थ अधिकच सुटे होतात आणि पाण्याबरोबर वाहत जातात. बऱ्याच ठिकाणी जवळच असणाऱ्या ओढे, नाले व नद्या यांमध्ये हा माल टाकला जाऊन तो पुढे सहज वाहून नेला जातो. टेकड्या व डोंगर यांच्याखाली असणारा बहुतेक सर्व कोळसा सामान्यतः भूमिगत खाणकाम करून काढतात. मात्र दृश्यांशापासून ते अंदाजे ५० मी. पर्यंत खोल असणारा कोळसा उघड्या पट्ट्याच्या खाणी उघडून काढतात. हे काम १३ ते १६ मी. रुंदीचे फक्त दोन-तीन पट्टे उघडल्यानंतर संपुष्टात येते. फक्त ५ घ.मी. आकारमानाचे ओझे गोळा करणारी सापेक्षतः कमी शक्तीची परंतु एका जागेहून दुसरीकडे सहज हलविता येणारी खोरी अशा डोंगराळ भागात वापरतात. केवळ एक दोन ठिकाणी सु. १३० मी. खोल असलेला उच्च दर्जाचा कोळसा (अँथ्रॅसाइट) हा ओढदोरीयुक्त याऱ्या वापरुन पट्ट्याच्या खाणी उघडून काढल्याची उदाहरणे आहेत.
प्लेसर निक्षेपांचे खाणकाम : काही खडकांमध्ये मौल्यवान धातू, धातुके किंवा खनिजे सापेक्षतः विरळ प्रमाणात विखुरलेली असतात. वातावरणक्रिया, क्षरण (झीज) व निक्षेपण यांच्यामुळे अशा खडकांतील मौल्यवान पदार्थांचे नैसर्गिक रीत्या एकत्रीकरण होते. वाळू, रेती व खडकांचा चुरा यांच्याबरोबर मौल्यवान धातू, धातुके किंवा खनिजे एकत्रित होतात आणि त्यांचे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असे सुट्ट्या व मोकळ्या ढिगांच्या अथवा थरांच्या स्वरुपाचे निक्षेप तयार होतात. अशा निक्षेपांना प्लेसर निक्षेप म्हणतात. वातावरणक्रियेने अपघटन (घटक द्रव्ये सुटी होणे) होत असताना खडकांचे निरनिराळे भाग तडा जाऊन, भेगा पडून सुटे होतात व क्षरणामुळे खडकांची बारीक कवचे निघून त्यांचे लहान लहान तुकडे सुटून मोकळे होतात. सामान्यतः खडकातील कठीण व अपघटनरोधी धातुकांच्या व खनिजांच्या आजूबाजूला असणारा मऊ व हलका भाग अगदी प्रथम वाऱ्याने किंवा वाहत्या पाण्याबरोबर इतरत्र वाहून नेला जातो. यामुळे खडकातील कठीण, जड व अपघटनरोधी खनिजे विभक्त होऊन मोकळी होतात. ती एक तर जागच्या जागी राहून किंवा पावसाच्या पाण्यामुळे किंवा जमिनीच्या उतारामुळे जवळच टाकली जाऊन त्यांचे एकत्रीकरण होते आणि प्लेसर निक्षेप तयार होतात. ही सुटी झालेली खनिजे वाहत्या पाण्यात पडत राहिली, तर ती पाण्याबरोबर वाहत जाऊन इतर ठिकाणी टाकली जातात. पाण्याबरोबर वाहत जात असताना निरनिराळ्या आकारमानांचे आणि घनतेचे भाग वेगवेगळे होतात. जड व मोठ्या आकारमानाचे भाग मूळ खडकाच्या जवळच टाकले जातात व जसजसे दूर जावे तसतसे अधिक हलके व लहान आकारमानाचे भाग सापडतात. जेव्हा मूळच्या खडकातील मऊ, हलका, निरुपयोगी भाग सुटा होऊन बाजूला नेला जातो आणि मौल्यवान धातुकाचा जागच्या जागी निक्षेप तयार होतो, तेव्हा त्यास ‘अवशिष्ट प्लेसर’ असे म्हणतात. प्लेसर निक्षेप मूळच्या खडकाजवळच तयार झाले तर त्यास ‘अनूढ प्लेसर’ असे म्हणतात. टेकड्यांच्या किंवा डोंगराच्या उतरणीवर धातुक शिरेच्या मूळ खडकालगत तयार झालेले निक्षेप हे अनूढ होत. नद्या, सरोवरे आणि समुद्रकिनाऱ्याच्या हालचाल करणाऱ्या किंवा वाहत्या पाण्यामुळे तयार झालेल्या प्लेसरांना ‘जलोढ प्लेसर निक्षेप’ म्हणतात.
सोने, प्लॅटिनम, कॅसिटेराइट, मॅग्नेटाइट, मोनॅझाइट, कोलंबाइट, इल्मेनाइट, झिर्कॉन, हिरे, नील आणि इतर काही रत्ने प्लेसरांमधून मिळवितात. बिस्मथ, तांबे, चांदी या धातू, हिंगूळ व इतर काही कणखर व वातावरणक्रिया सहन करू शकणारी खनिजे कित्येकदा प्लेसरांमधून काढण्यात येतात. खोल जागी असाणाऱ्या प्लेसरांचे खाणकाम क्वचित भूमिगत प्रकारांनी केले जाते. समुद्रकिनाऱ्यालगतच्या उथळ तळावरील गाळातून सोने, हिरे, लोह धातुक, चुनखडी आणि ऑयस्टर शिंपले यांच्या प्लेसरांचे खाणकाम पाण्याखालील गाळाचा उपसा करुन करण्यात येते. प्लेसरांच्या खाणकामांचे पुढील मुख्य प्रकार आहेत : (१) लहान खाणीत मानवी श्रम वापरुन काम करणे, (२) मोठाल्या निक्षेपांचे यंत्रे वापरून खाणकाम करणे, (३) जोरदार दाबाच्या पाण्याच्या झोताने निक्षेप फोडून वाहून नेणे, (४) गाळाचा उपसा करून त्यातील खनिज अथवा धातुक बाजूला काढणे व (५) टेकडीमध्ये खोल जागी असणाऱ्या निक्षेपात टेकडीच्या उतारावरुन क्षैतिज बोगदे खणून खाणकाम करणे.
पाण्यातून वाहून येणाऱ्या गाळातील सोने मिळविण्यासाठी पूर्वी निरनिराळे प्रकार उपयोगात होते. ते मिळविण्याचा अगदी साधा व सोपा मार्ग म्हणजे परातीसारख्या खोलगट थाळ्यांमध्ये सोन्याचे कण असलेला गाळ घेणे व पाणी वापरून तो धुऊन आणि रोळून त्यातील सोन्याचे कण तळाशी गोळा करणे. या थाळ्या सामान्यतः १५ ते ४५ सेंमी. व्यासाच्या व ५ ते ८ सेंमी. खोल असतात. थाळीच्या कडेकडून मध्याकडे ३० ते ४० अंशांचा उतार असतो. अशाच प्रकारचे बाटीया नावाचे ३० ते ७५ सेंमी. व्यासाचे लाकडाचे शंकूच्या आकाराचे उपकरण रोळण्यासाठी वापरतात. याच्या टोकाचा कोन १५० अंशांचा असतो. सोन्याचे कण असलेला गाळ परातीत घेऊन त्यात पाणी ओतल्यावर सर्व गाळ ढवळतात. तसेच काही चिकटून एकत्र राहिलेले गोळे हाताने चुरून सुटे करतात. सोन्याचे कण जड असल्यामुळे तळाकडे जाऊ लागतात. हलका, मऊ व सूक्ष्म गाळ वरच्या बाजूला तरंगू लागतो तो ओतून देतात. परत परत स्वच्छ पाणी परातीत ओतून हलका गाळ व कचरा शक्य तितका धुऊन काढतात. मग उरलेल्या भागातील अनावश्यक भाग, जो सापेक्षतः जड पण सोन्यापेक्षा हलका असतो तो परातीत पाणी ओतल्यावर ढवळून व परात थोडी वेडीवाकडी पण गोल गोल फिरवून पाण्याच्या गतीमुळे तरंगत ठेवतात व अधूनमधून हेलकावे देऊन वरचा तरंगता भाग बाहेर उडवून देतात. सोन्याचे कण मात्र तळावर व विशेषकरून तळाच्या खडबडीत भागाला चिकटून राहतात. प्लेसर निक्षेपातील सुवर्णकण जमा करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मागे-पुढे व थोडे वर-खाली हालणारा पाळणा म्हणजे एक लाकडी खोके मागे-पुढे वेड्यावाकड्या हलणाऱ्या गजांवर बसविलेले असते. खोक्यात पाणी असते. हालचाली व हिसके यांमुळे सोन्याचे कण खडकाच्या चुऱ्यातून मोकळे होऊन बुडून तळावर पडतात. निष्णात कारागीर थाळी वापरून व रोळण्याचे काम करून दहा तासांत सु. १ घ. मी. गाळ हातावेगळा करू शकतो. तर हिसके खाणारा पाळणा वापरून दोन कामगार त्याच काळात ३-५ घ. मी. गाळ हाताळू शकतात. ज्या ठिकाणी मोठाली यंत्रे वापरणे शक्य नसते तेथे काही वेळा प्लेसरांचे खाणकामच हिसके खाणारे लाकडी पाळणे वापरून करतात. उदा., नोम, अलास्का येथील समुद्रकिनाऱ्यावर सोन्याच्या प्लेसरांचे लाकडी पाळणे वापरून पूर्वी खाणकाम करण्यात आले. हल्ली या कामासाठी विजेवर किंवा अन्य प्रकारच्या शक्तीवर चालणारी, फोडणारी, ढवळणारी, हिसके देणारी व रोळून मौल्यवान धातुके एकत्र करणारी अनेक प्रकारची यंत्रे उपयोगात आहेत.
लहान प्रमाणात प्लेसर निक्षेप हाताळण्याचे इतर प्रकार म्हणजे प्लेसरांचा चुरा फावडी-खोरी यांनी गोळा करून तो मौल्यवान धातुके व खनिजे वेगळी करणाऱ्या टाक्यांत आणून टाकणे. या बहुतेक टाक्या पाण्याने भरलेल्या असतात, पण कधीकधी निर्जल धुलाईचे तंत्रदेखील वापरण्यात येते. पाण्याच्या प्रवाहात येणाऱ्या प्लेसराच्या चुऱ्यातील उपयुक्त खनिज, धातू अथवा धातक वेगळे करून बाजूला एकत्र करण्यासाठी ‘लाँग टॉम’ ही उघडी पेटी वापरतात. ती ३ ते ४ मी. लांब व वरच्या बाजूस ३५ ते ५० सेंमी. आणि तळाच्या बाजूस ७० ते १०० सेंमी. रुंद असते. तळावर १·२५ सेंमी. व्यासाची भोके असणारी जाळी बसविलेली असते. या जाळीच्या खालच्या बाजूस थोडी अधिक रुंदीची दुसरी पेटी बसविलेली असते. तिच्या तळावर निरनिराळे पदार्थ वापरून वेगवेगळ्या प्रकारचे आडवे कप्पे अथवा अटकाव तयार केलेले असतात. सामान्यतः हे अटकाव लाकडाच्या पट्ट्या किंवा रिफाडे आडवी ठोकून तयार केलेले असतात. या दोन्ही पेट्या एकीवर एक रचून सु. तिसात अडीच ते चार या प्रमाणाच्या उतारात कलत्या ठेवलेल्या असतात. लाँग टॉमच्या वरच्या बाजूकडून वाहते पाणी आत सोडतात व त्याबरोबर प्लेसर निक्षेपाचा गाळ आत ढकलतात. पाण्यात भिजून गाळाचे निरनिराळ्या आकारमानांचे कण सुटे व मोकळे होतात. ज्यात सोन्याचे कण असतात तो लहान आकारमानाचा गाळ वरच्या पेटीच्या तळाशी असणाऱ्या जाळीतून आडवे अटकाव असणाऱ्या खालच्या भागात पडतो. वरच्या भागातील भरड भाग जसजसा साचत जातो तसतसा तो खरडून बाहेर काढतात व नवीन गाळ आत ओतत जातात. लाँग टॉम वापरून दोन मजूर दहा तासांत सु. ६ घ. मी. सुट्या प्रकारचा गाळ हाताळू शकतात.
प्लेसरांच्या चुऱ्यातील मौल्यवान पदार्थ बाजूला करण्यासाठी काही पेट्यांत खडबडीत चटया वापरतात व सोने असलेला प्लेसराचा गाळ हाताळायचा असेल, तर पेट्यांमध्ये पारदमेलनासाठी (पाऱ्याबरोबरची मिश्रधातू तयार करण्यासाठी) पत्रे बसविलेले असतात. या व्यतिरिक्त (१) कृत्रिम रीतीने डबकी व लहान तळी तयार करण्यासाठी पेट्या वापरतात, (२) निर्जल धुलाईचे तंत्र उपयोगात आणतात, (३) प्लेसरावर व त्याच्या चुर्यावर पाण्याच्या लाटा आदळतील अशी योजना करून धुलाई करतात आणि (४) कधीकधी केवळ प्लेसराचे खाणकाम करणारी लहान आकारमानाची यंत्रेही वापरतात.
पाण्याच्या झोताने प्लेसरांचे खाणकाम : पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध असेल आणि ते खाणकामास वापरण्यापूर्वी व निक्षेपाचा चुरा वाहून नेल्यानंतर दूषित होणार नसेल, तर पाण्याच्या मोठ्या झोताने धूऊन काढून व प्रचंड दाबाच्या पाण्याच्या झोताने प्लेसरांचे खाणकाम करणे हे अगदी सुलभ व स्वस्त ठरते. पाण्याच्या झोताने धुऊन काढण्याच्या प्रकारात प्लेसरांची वाळू लहान गाड्यांनी, खर्ड्यांनी किंवा ओढदोरीयुक्त यारी वापरून टाक्यांत नेऊन टाकतात व नंतर वाहते पाणी वापरून टाक्यांमध्ये तिच्यातील मौल्यवान जड पदार्थ गोळा करतात. नैसर्गिक रीत्या ज्या ठिकाणी अतिशय मोठ्या दाबाखाली असलेले पाणी मिळणे शक्य असेल तेथे किंवा पंप वापरून जेथे पाणी अतिशय मोठ्या दाबाने झोताच्या स्वरूपात निक्षेपावर फेकता येईल तेथे पाण्याच्या जोरदार झोताने प्लेसरांचे खाणकाम करतात. प्लेसर निक्षेप फोडण्यासाठी व फुटलेला भाग वाहून नेण्यासाठी या प्रकारात अतिशय दाबाखाली असलेले पाणी मोठ्या पिचकारीसारख्या तोटीतून निक्षेपावर फेकण्यात येते. निक्षेपाचा फुटून मोकळा झालेला चुरा याच पाण्याबरोबर वाहत जातो. हे गाळयुक्त पाणी पुढे या गाळातील उपयुक्त धातुक अथवा खनिज ज्या ठिकाणी गोळा करतात त्या टाकीमध्ये सोडण्यात येते. प्लेसर निक्षेप फोडण्यासाठी पाण्याच्या झोताचा जर परिणामकारक आघात व्हायचा असेल, तर या पाण्याचे जलशीर्ष (स्तंभ) ६६ मी. पेक्षा अधिक असावे लागते. म्हणजेच पाण्याचा कमीत कमी दाब दर चौ. सेंमी. वर सु. ६ किग्रॅ. असावा लागतो.
वरील दोन्ही प्रकारांत निक्षेपाचा चुरा वाहून नेणाऱ्या पाण्याच्या मार्गात लाकडाची एक किंचित तिरकी टाकी ठेवतात किंवा निक्षेपापुढील लगतच्या कठीण खडकात मोठा तिरपा उतरता खड्डा खणून त्याचीच टाकी तयार करतात. गाळातील मौल्यवान पदार्थ गोळा करण्यासाठी अटकाव म्हणून या टाक्यांच्या तळावर वाहत्या पाण्याच्या दिशेस काटकोन करून दगडगोट्यांच्या रांगा आडव्या मांडलेल्या असतात किंवा लोखंडी रूळ, लाकडाचे ओंडके किंवा लाकडी खांब आडवे ठोकलेले असतात. या आडव्या अडथळ्यांमुळे वाहत्या पाण्यामध्ये भोवरे निर्माण होतात व पाण्याची गती कमी होते. यामुळे पाण्यातील जड मौल्यवान पदार्थ बुडू लागतात आणि अडथळ्यांमध्ये अडकून तळावर पडून राहतात. प्लेसरांमधील खनिजे अशा प्रकाराने गोळा करणाऱ्या टाक्यांची रुंदी ०·३ मी. ते २ मी. व खोली ०·३ मी. ते सु.१·२५ मी. असते. त्यांची लांबी मात्र वाहत्या पाण्यातील प्लेसराचा चुरा सुटा मोकळा होऊन त्यातील खनिज (सोने) ज्या अंतरावर खाली बुडू शकेल, इतकी तरी असावी लागते. सामान्यतः पहिल्या ३० ते १०० मी. अंतरात खनिज तळावर पडते.
गाळाचा उपसा करून त्यातील खनिज बाजूला काढणे : या प्रकाराने प्लेसरांचे खाणकाम करण्यासाठी गाळबोटी वापरतात. हा खाणकामाचा प्रकार अगदी प्रथम वापरात येऊ लागला त्यावेळी नद्यांच्या व सरोवरांच्या तळांवर किंवा समुद्रकिनाऱ्यावर उथळ जागी असलेल्या म्हणजेच नैसर्गिक रीत्या पाण्याच्या खाली असणाऱ्या प्लेसर निक्षेपांचे खाणकाम गाळबोटी वापरून करीत असत. पण पुढे जेथे शक्य असेल तेथे निक्षेपाच्या वरच्या बाजूस कृत्रिम रीतीने तळी तयार करून गाळबोटी वापरण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करुनही या पद्धतीने खाणकाम होऊ लागले.
गाळबोटी म्हणजे सतत व सलग फिरत राहू शकणाऱ्या अनेक गाळ वाहू पोहऱ्यांची किंवा बादल्यांची रहाटगाडग्याप्रमाणे माळ असणारी डीझेलवर किंवा विजेवर चालणारी मोठी यंत्रे होत. या बादल्या एका पाठोपाठ एक गाळ खरडून भरून घेतात व तो वाहक पट्ट्यांच्या साहाय्याने किंवा वाहतुकीच्या अन्य साधनांनी योग्य ठिकाणी पोहोचवितात. प्रथम वरच्या खडकांचा निरुपयोगी गाळ उपसून कचऱ्याच्या ढिगात नेऊन टाकतात. मौल्यवान पदार्थ असलेला प्लेसरांचा गाळ मात्र ज्या टाक्यांत त्यातील मौल्यवान धातू, धातुक वा खनिज बाजूला काढतात तेथे नेऊन टाकतात. खरडणारी, उपसा करणारी, धुणारी, गाळातून खनिज वेगळे करून निरुपयोगी भाग बाजूस टाकणारी इ. सर्व प्रकारची यंत्रणा एका भव्य तरंगत्या धक्क्यावर केलेली असते. यामुळे काम जसजसे पुढच्या बाजूस विकसित होते तसतशी ही यंत्रणा तरंगत पुढे पुढे जाते.
गाळवाहू बादल्यांची शिडी असणारे उपसा यंत्र : विशेषकरून समुद्राच्या किंवा मोठाल्या सरोवराच्या किनाऱ्यावरील प्लेसरांचे खाणकाम करण्यासाठी हे यंत्र वापरतात. केवळ एक मोठे फावडे-खोरे असणाऱ्या किंवा फावड्याचे काम करणाऱ्या थोड्या बादल्या असणाऱ्या उपसा करण्याच्या यंत्रापेक्षा या यंत्राने फार मोठ्या प्रमाणात बऱ्याच वजनाचा माल सापेक्षतः थोड्या वेळात हातावेगळा करता येतो. सध्या वापरात असलेली अशा प्रकारची काही यंत्रे ५० मी. खोलीपर्यंत उपसा करू शकतात व २४ तासांत १०,००० घ. मी. किंवा अधिक आकारमानाचा गाळ हाताळू शकतात. ही यंत्रे पूल बांधावयाच्या तराफ्यासारख्या व यंत्राने मागेपुढे चालणाऱ्या धक्क्यावर बसविलेली असतात. जसजसे उपसा करणारे यंत्र एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वळते तसतसे एका वळशात रहाटगाडग्यासारख्या फिरत असणाऱ्या सर्व बादल्या गाळ खरवडून व भरून वर येतात. यंत्राच्या एका वळशाच्या शेवटी सर्व बादल्या त्यांच्यातला गाळ योग्य अशा ठरलेल्या ठिकाणी टाकून देतात. टाकाऊ गाळ दूर नेऊन टाकण्यात येतो, तर प्लेसर खनिज असलेला गाळ खनिज ज्या ठिकाणी वेगळे केले जाते त्या टाक्यांत (हॉपरमध्ये) टाकण्यात येतो. या टाक्यांमध्ये अगोदर वर्णन केलेल्या प्रकारचे अटकाव असतात. त्यांत जड आणि मौल्यवान खनिजे अडकून पडतात. हॉपर म्हणजे एक जाळीदार पिंप असून ते तिरप्या अक्षावर गोल फिरत असते. पिंपाच्या पृष्ठभागावरील भोके सु. ०·५ ते २·५ सेंमी. व्यासाची असतात. या पिंपावर वरच्या बाजूने पिंपाच्या लांबीला समांतर व एका रेषेत असणाऱ्या अनेक भोकांतून पाण्याचे जोरदार फवारे मारण्यात येतात. या पाण्याचा दाब दर चौ. सेंमी. ला ६ कि. ग्रॅ. असतो. पिंप फिरत असल्यामुळे व तोट्यांतून जोराने होणाऱ्या पाण्याच्या वर्षावामुळे गाळातील वाळू, गोटे धुऊन निघतात. बारीक कण आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या धातू, धातुके किंवा खनिजे ही छिद्रांतून बाहेर पडून अटकाव असलेल्या दुसऱ्या टाक्यांमध्ये किंवा मेजावर पडतात. खाणकामात निघालेले वाळू, दगड, गोटे परत पाण्यात टाकतात. पिंपाच्या भोकांतून खाली बाहेर न पडणारा भरड भाग सतत फिरत असणाऱ्या वाहक पट्ट्यावरून खालच्या बाजूकडून उपसा करणाऱ्या यंत्राच्या मागच्या बाजूस टाकून त्याचे ढीग तयार करतात. टाक्यांतून भरून वरून वाहणारे गढूळ पाणी खाणकामाच्या जागेपासून दूर ठिकाणी नेऊन सोडतात.
ओढदोरीयुक्त उपसा यंत्र : या यंत्रात प्लेसर गाळाचा उपसा करण्यासाठी प्रथम फावडी गाळाचा लचका उचलून घेण्याचे काम करतात किंवा रहाटगाडग्याप्रमाणे असणाऱ्या बादल्या गाळाने भरून एकसारख्या वर येत राहतात. नंतर हा गाळ ज्या टाक्यांत धातुके वेगळी केली जातात त्यांत टाकला जातो. धातुके-खनिजे बाजूला काढल्यावर उरलेला टाकाऊ गाळ दुसरीकडे वाहून नेला जातो. हे सर्व काम ओढदोरी जोडल्यास अविरत चालू राहते. सतत फिरत असलेल्या वाहक पट्ट्यावरून टाकाऊ गाळ वाहून नेला जाऊन त्याचा दुसऱ्या बाजूला ढीग रचला जातो. वरील सर्व कार्यांची यंत्रणा, उदा., फावडी, ओढदोरीचा पट्टा इ., एकाच मंचावर बसविलेली असते.
क्षैतिज बोगदे खणून प्लेसरांचे खाणकाम : जेव्हा प्लेसर निक्षेप इतर खडकांच्या खाली खोल जागी असतात तेव्हा एक उभा कूपक खणून व या उभ्या कूपकाच्या तळाच्या भागापासून निक्षेपाकडे क्षैतिज सरळ आणि आडवे बोगदे खणून इतर भूमिगत खाणकामाप्रमाणे प्लेसरांचे खाणकाम करतात, पण हा प्रकार तितकासा प्रचारात नाही. उभ्या कूपकाची म्हणजेच निक्षेपाची खोली सामान्यतः ८० ते १०० मी. इतकीच असते.
ग्लोरी होल खाणकामाची पद्धत : ग्लोरी होल म्हणजे भूपृष्ठापासून खाली जाणारा, खडकामध्ये खणून काढलेला, स्थूलमानाने मोठ्या नरसाळ्याच्या आकाराचा उभा कूपक होय. त्याचा उपयोग खाणकाम करताना फोडून तयार झालेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी करतात. या प्रकारात प्रथम भूपृष्ठाखाली सु. १६-१६ मी. खोलीच्या अंतरावर माल वाहून नेण्यासाठी बोगदे खणून काढतात. मग या बोगद्यांपासून भूपृष्ठापर्यंत जाणारे ऊर्ध्वगामी कूपक खणून काढतात. या ऊर्ध्वगामी कूपकांच्या वरच्या बाजूस सभोवर वेधन करून, सुरुंग उडवून आणि पायऱ्या कापीत खनिज निक्षेपाचे खाणकाम करतात. यामुळे ऊर्ध्वगामी कूपकाचा वरचा भाग पसरट होतो आणि त्याला नरसाळ्याचा आकार येतो. या प्रकाराला दळणे-भरडणे असेही म्हणतात व खणून काढलेल्या भागाला म्हणजे ग्लोरी होलला ‘गिरणीचे भोक’ किंवा फक्त ‘गिरणी’ असे म्हणतात. ग्लोरी होलच्या वरच्या पसरट भागाचा उतार हा निक्षेपाचा फोडलेला भाग आपोआप खाली घसरून खालच्या बाजूस असणाऱ्या ऊर्ध्वगामी कूपकात पडेल इतकाच असतो. हा उतार जास्त असला, तर खाणमजुरांना सुरक्षिततेसाठी स्वतःला दोरांनी बांधून घ्यावे लागते तसेच खाणकाम धोक्याचेही बनते.
मोठ्या आणि विस्तीर्ण अशा निक्षेपात एका शेजारी एक असे अनेक ग्लोरी होल कूपक रांगेत खणून काढतात. नंतर एका शेजारी एक अशा रांगांमुळे त्यांचे जाळे तयार होते. शेजारी शेजारी असणारे कूपक जसजसे मोठे आणि वरच्या बाजूला रुंद होतात तसतसे एकमेकांना छेदू लागतात. यानंतर मधल्या भागातील निक्षेपाचे खाणकाम लहान कूपक खणून करतात.
ग्लोरी होलच्या खालच्या बाजूस असणारी व जेथून माल गोळा करून बाहेर नेतात ती पातळी सामान्यतः १६ मी.पेक्षा जास्त खोल नसते. कारण जर ग्लोरी होलचा ऊर्ध्वगामी कूपक १६ मी.पेक्षा जास्त उंच झाला, तर त्यात फोडलेला माल अडकून तो बंद होण्याची शक्यता निर्माण होते. जर निक्षेप जाड व विस्तीर्ण असतील आणि त्यांचे योग्य अशा आकारमानाचे तुकडे फुटणार असतील तर ही पद्धत खाणकाम करणे, तसेच माल गाड्यावर चढविणे आणि त्याची वाहतूक करणे या दृष्टींनी अगदी कमी खर्चाची ठरते. मात्र फार मोटाले ग्लोरी होल कूपक उघडून खाणकाम करणे धोक्याचे असते.
भूमिगत खाणकाम : जमिनीखाली असणारे खनिज प्रत्यक्ष बाहेर काढण्यापूर्वी (१) ते असलेल्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी योग्य अशा प्रकारचा मार्ग तयार करावा लागतो, (२) खनिज निक्षेपाचा भाग फोडून तो इतर खडकांपासून वेगळा करावा लागतो आणि (३) भूमिगत जागेपासून फोडलेला माल निरनिराळ्या प्रकारची वाहने वापरून भूपृष्ठावरील गुदामात किंवा शुद्धीकरणाच्या जागी आणावा लागतो. खाणकाम आणि खाणीचे उत्पादन यांचे पुढील तीन ठळक भाग पडतात. पहिल्या भागाच्या कामामध्ये बरेच भांडवल गुंतून राहते. हा खर्च भूपृष्ठावरील जमिनीपासून निक्षेपापर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेल्या मार्गासाठी होतो. दुसऱ्या भागात पूर्वतयारीची कामे करण्यासाठी खर्च होतो. पूर्वतयारीची कामे म्हणजे जेथून खाणकाम सुरू करावयाचे तो निक्षेपाचा पृष्ठभाग उघडा करून ठेवण्यासाठी केलेली कामे होत. तिसरा भाग म्हणजे उत्पादनाचा होय. निक्षेपाच्या उघड्या केलेल्या पृष्ठभागापासून निक्षेपात खणून प्रत्यक्ष माल बाहेर काढण्याच्या कामाला पृष्ठावरील काम किंवा उत्पादनाचे काम म्हणतात. भूमिगत निक्षेपापर्यंत जाण्यासाठी अगदी प्रथम एक उभा अथवा तिरपा कूपक खणून काढतात. या कूपकापासून निघणारे आणि इतर अनेक भूमिगत बोगदे खणून निक्षेपाचे खाणकाम करतात.
बहुतेक खाणींत मुख्य किंवा माल वर आणणारा आणि दुय्यम असे दोन कूपक असतात. या दोन कूपकांचा उपयोग एकाच वेळी एकातून खाली जाण्यासाठी होतो, तर दुसऱ्याचा वर येण्यासाठी होतो. बऱ्याच ठिकाणी मुख्य कूपक सामान्यतः खणलेला माल वर आणण्यासाठी वापरतात, पण त्याचे इतरही उपयोग होतात. दुय्यम कूपक मालवाहतुकीच्या कामाव्यतिरिक्त इतर कामे म्हणजे खाणमजुरांची ने-आण, यंत्रे, सामग्री, इमारती लाकूड, भरीचे पदार्थ वगैरेंची वाहतूक करणे यांच्यासाठी वापरतात. उपयोगानुसार काही कूपकांना वायुवीजनाचे कूपक, भरीचा माल वाहून नेण्याचे कूपक अशी नावे देतात. भूमिगत खाणकामाचा जो भाग भूपृष्ठापर्यंत येतो, त्यास म्हणजेच खाणीत जाणाऱ्या उभ्या कूपकाच्या भूपृष्ठावरच्या स्थानकास कूपकाचे मुख (कॉलर) असे म्हणतात. या मुखाच्या भागात कूपकातून मालाची वाहतूक व मजुरांची ने-आण करणारे पाळणे ज्या दोरांच्या साहाय्याने खाली-वर जात-येत असतात, ते गुंडाळणारी यंत्रणा असते तसेच खाणकामासाठी लागणारी वीज पुरविणारे विद्युत् गृह असते. सर्वांत खालचा बोगदा उभ्या कूपकास येऊन ज्या ठिकाणी मिळतो तेथे चढण्या-उतरण्याचा धक्का असतो. त्यापेक्षाही थोडे खाली असणाऱ्या उभ्या कूपकाच्या अगदी तळाच्या भागास निर्गत कुंड असे म्हणतात.
मुख्य कूपकाच्या जागेची निवड : मुख्य कूपक निश्चित कोठे खणावा हे ठरविण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करतात : (१) जवळपास वीज उपलब्ध होण्याची शक्यता. (२) खनिजे (उदा., कोळसा) धुण्याकरिता, खाणमजुराच्या स्नानगृहासाठी व इतर घरगुती व खाणीतील उपयोगांसाठी तसेच काही ठिकाणी आवश्यकता असल्यास वीजनिर्मितीसाठी पाण्याचा भरपूर साठा किंवा नदी वगैरे जवळपास असणे. (३) मालवाहतुकीच्या सोयी (उदा., रूळमार्ग, मोटारींचे रस्ते अथवा नदी व खाड्यांतून, नावांतून, पडावांतून वाहतूक इ.) कूपकाच्या जागेजवळ असणे. (४) खाणीच्या आवाराच्या बाहेर परंतु जवळच गावे किंवा शहरे असणे. गावे किंवा शहरे जवळ असल्यास मजुरांच्या राहण्याची, जेवणाखाण्याची सोय होऊ शकते. कित्येकदा शहरात खाणीच्या मालाला बाजारपेठही मिळते. (५) कूपकाच्या सभोवतालची बरीचशी जमीन कठीण व मजबूत असावी लागते कारण या भागात खाणीच्या इमारती, मालाची गुदामे, खाणकामगारांची घरे, रूळमार्ग व मोटारींचे मार्ग वगैरे असतात. ही जमीन मजबूत नसल्यास खाणीतून जमिनीखालचा माल बाहेर काढल्यावर ती खचण्याची शक्यता असते. (६) ज्या कारणांनी कूपक खणण्याचा खर्च वाढेल अथवा कूपक खणल्यावर सुरक्षितता नाहीशी होऊन अपघात होतील, असे विभंग किंवा इतर नैसर्गिक संचरनात्मक गोष्टी कूपकाच्या क्षेत्रात नसाव्यात. (७) कूपकाच्या आजूबाजूला तसेच खाणकाम चालू असलेल्या कूपकाच्या जवळच्या भागात भूमिगत पाणी वाहत येत नसावे आणि ते येत असल्यास कमी खर्चात व सहज उपसून टाकता येण्यासारखे असावे. (८) निक्षेपाचा संपूर्ण विस्तार पाहून मुख्य कूपक निक्षेपाच्या मध्यभागाजवळ असावा त्यामुळे लांबच लांब भूमिगत बोगदे खणावे लागत नाहीत. (९) निक्षेपाच्या नतीचा विचार करून कूपक कोठे खणावा हे ठरवावे लागते. (१०) मालाची भूमिगत वाहतूक व खाणीत कृत्रिम रीतीने वायुवीजन करण्याचा खर्च.
कूपकाचे आणि त्याच्यातील पाळण्याचे किंवा पिंजऱ्याचे आकारमान पुढील गोष्टींवरून ठरवितात : (१) प्रत्येक खेपेत वाहून नेल्या जाणाऱ्या मालाचे वजन. हे वजन दर तासाला किती उत्पादन होते त्यावरून ठरवितात, (२) कूपकाची एकूण खोली, (३) पाळणे खालीवर नेण्याचा वेग, (४) पाळणे खाली-वर नेण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी दोर गुंडाळण्याची पद्धत, (५) पाळण्यातून माल वाहण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंचे (उदा., मोठाले पेटारे किंवा मालगाडीचे डबे किंवा ट्रॅम इत्यादींचे) आकारमान, (६) विजेच्या तारा, नळ्या व कूपकातून खाली सोडलेली इतर साधने व उपकरणे यांना लागणारी जागा व (७) कूपकाच्या मोकळ्या जागेतून वाहत असणारी जास्तीत जास्त हवा. ज्या कूपकातून अतिशय मोठ्या प्रमाणात कृत्रिम रीतीने हवा खेळवावी लागते तेथे कूपकाचा आकार व आकारमान ही दोन्ही महत्त्वाची असतात. वायुवीजनाची क्षमता कमी न होता जरूर असेल तितक्या प्रमाणात व योग्य अशा गतीने हवा सहज वाहू शकेल इतके तरी हे कूपक रुंद असावे लागतात. कूपक चौकोनी, अष्टकोनी, लंबवर्तुळाकार किंवा गोलाकार असतात. पण सामान्यतः ते गोलाकार असतात कारण पृष्ठभाग गोलाकार असल्यास वर नमूद केलेल्या बऱ्याच अडचणी दूर होतात. कूपक खणण्यासाठी पुढील कामे करावी लागतात. सुरुंग लावून खडक फोडणे खडक उकरून काढणे फोडलेला माल गोळा करून बाहेर वाहून नेणे हवा, पाणी व उजेड यांची सोय करणे मैलापाणी वाहून नेणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खणलेल्या कूपकाच्या भिंती बांधकाम करून मजबूत आणि सुरक्षित करणे. कूपकाचे बहुतेक एकापेक्षा अधिक उपयोग करतात म्हणून त्यामध्ये दोन-तीन कप्पे केलेले असतात. उदा., आ. १४ मधील आडव्य छेदात गोलाकार कूपकाचे तीन कप्पे केलेले आहेत. पहिल्या (१) या कप्प्यामध्ये दोन भाग असून त्यातून (अ) व (आ) हे दोन मालवाहक डबे वर-खाली ये-जा करीत असतात. (२) हा कप्पा (१) मधील डब्यांच्या व मालाच्या ओझ्याला प्रतिबल म्हणून काम करतो. यातून मजुरांची ने-आण व आधाराच्या कामासाठी लागणारे लाकूड, भरीसाठी वापरात येणारे पदार्थ, यंत्रे व इतर सामग्री यांची वाहतूक करतात. (३) हा कप्पा शिड्या बांधून किंवा जिना बांधून तयार केलेला असतो. काही कारणांनी (१) व (२) कप्प्यांतले पाळणे बंद पडले अथवा इतर अपघात झाले, तर धोक्याच्या वेळी मजुरांना शिड्यांनी बाहेर येता येते.
भूमिगत खाणकामाचे प्रकार : खनिज वा धातुक निक्षेपाच्या आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या फायदेशीर अशा भूमिगत खणण्याच्या कामाला व उत्पादनाला सामान्यतः ‘निखनन’ असे म्हणतात. ज्या भूमिगत खोलीसारख्या ठिकाणी खाणकाम चालते त्यास ‘निखननाचा गाळा’ असे म्हणतात.
छातीसमोर होणारे निखनन : (ब्रेस्ट स्टोपिंग). क्षैतिज किंवा अगदी थोड्या अंशांनी तिरप्या असलेल्या कमी जाडीच्या खनिज शिरांचे खाणकाम करण्यासाठी हा प्रकार वापरतात. सामान्यतः ४ मी. पर्यंत जाडी असलेल्या निक्षेपांचे या पद्धतीने खाणकाम करतात. परंतु कधीकधी थोडेफार फेरफार करून सु. २४ मी. पर्यंत जाडीचे निक्षेप देखील या पद्धतीने खणून काढतात. कमी जाडीचे थर एका सपाट्यात संपूर्ण जाडी फोडून काढता येतात. जाडी जास्त असेल, तर एका खाली एक अशा ओबडधोबड पायऱ्या कापून त्यांवर खाणकाम करतात.
सलग पातळीचे खाणकाम : या प्रकारामध्ये एकाच पातळीवरील लांबच लांब पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी एकाच वेळी खणण्याचे काम केले जाते.
निक्षेपास समांतर बोगदे खणून खाणकाम : हा छातीसमोर होणाऱ्या खाणकामाचा एक प्रकार होय. उघड्या खाणींमध्येही अशा प्रकाराने खाणकाम केले जाते. या प्रकारात प्रथम निक्षेपाजवळ व त्याला समांतर बोगदे खणून काढतात. बोगदे खणताना व पूर्वतयारीची कामे करताना तयार झालेला कचरा व खडकाचा निरुपयोगी चुरा रुळावरून धावणाऱ्या लहान मालगाड्या वापरून बाहेर नेतात. खणून रिकामी झालेली जागा तशीच मोकळी सोडून किंवा तिच्यात खडकांचा चुरा किंवा इतर भरीचा माल घालून ती बुजवून टाकून अशा दोन प्रकारांनी खाणकाम करता येते. भर घालण्याचे काम केले नाही तर खाणकाम लवकर होते, पण असे अनेक मोकळे गाळे एकमेकांशेजारी असले, तर वरच्या खडकांच्या ओझ्याने छप्पर कोसळण्याची शक्यता असते. या गोष्टीचा आणि निक्षेपाच्या एकूण जाडीचा व त्याच्या नतीचा विचार करून खाणकामाची पद्धत ठरवितात. सामान्यतः ५ मी. जाडी पर्यंतच्या थरांचे खाणकाम उघडे निखननाचे गाळे वापरून करतात. निखननाच्या गाळ्याची लांबी व रुंदी ५ मी.पेक्षा जास्त ठेवीत नाहीत. कारण निक्षेप खणून काढल्यावर मोकळ्या झालेल्या जागी जर छताला आधार देण्यासाठी किंवा माचे बांधण्यासाठी लाकडाचे खांब वापरण्याचा प्रसंग आला, तर जमिनीखाली ५ मी.पेक्षा जास्त लांबीचे खांब हाताळणे कठीण होते. तसेच ४० अंशांपेक्षा जास्त नती असलेल्या निक्षेपात सहसा उघडे निखननाचे गाळे वापरीत नाहीत. कारण जास्त नती असल्यास निक्षेपाचा किंवा इतर खडकांचा फोडलेला चुरा गुरुत्वाकर्षणामुळे खडबडीत पृष्ठावरूनदेखील खाली घसरण्याची शक्यता असते. निक्षेपावरील छत सुट्या कणांच्या खडकांचे बनलेले असेल आणि जर वरच्या भागातील सुटी वाळू किंवा खडकांचे इतर सुटे भाग घरंगळत इकडे तिकडे पसरण्यासारखे असतील, तर प्रथम लाकडाचे खांब एकमेकांजवळ अगदी घट्ट आणि पक्के ठोकून तसेच छतावर फळ्या ठोकून मगच खाणकामाला सुरुवात करतात.
अमेरिकेतील मिसूरी राज्यातील जस्त व शिशाच्या खाणींत निक्षेपाचेच खांब अधूनमधून सोडून खाणकाम केले जाते. अनियमितपणे अधूनमधून सोडलेले निक्षेपाचे खांब ३ ते १४ मी. व्यासाचे असतात. खाणीतील जमिनीचे बल, तिचा ठिसूळपणा किंवा तिची कठिनता तसेच छताची आधाराशिवाय राहण्याची शक्यता व खांबांनी तोलून धरावयाचे एकूण वजन या सर्व गोष्टींनुसार निक्षेपाच्या सोडलेल्या खांबांची जाडी ठरविली जाते. साधारणपणे १० ते १७ टक्के निक्षेप या खांबांमध्ये राहून जातो. या प्रकाराच्या खाणकामात फोडलेला माल गोळा करण्यासाठी आणि तो माल वाहतुकीच्या वाहनावर चढविण्यासाठी विजेवर चालणारी लहान आकाराची व मध्यम शक्तीची फावडी-खोरी वापरतात.
खोल्या व खांब पद्धत : या प्रकारात निक्षेपाचे चौरस वा चौकोनी खांब नियमितपणे सोडून मधल्या गाळ्यातील निक्षेप खणून काढतात. बऱ्याच वेळा सुरुवातीला जवळजवळ ५० टक्के माल काही काळ खांबांमध्ये तसाच राहू देणे व्यवहार्य असते. वेळोवेळी ठिकठिकाणी अशा प्रकारे सोडलेले निक्षेपाचे खांब शेवटी शक्य तितके जास्तीत जास्त खणून काढून घेतले जातात.
खालच्या हाताच्या पद्धतीन निखनन : (अंडरहँड स्टोपिंग). या पद्धतीत उभ्या किंवा जवळजवळ उभ्या अशा खनिज निक्षेपांचे हाताखाली अथवा खाली वाकून वरच्या बाजूपासून
खाली खाणकाम प्रगत होत जाते. प्रथम निखननाच्या गाळ्याच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी तळापासून एक ऊर्ध्वगामी कूपक खणून काढतात व खालच्या हाताच्या पद्धतीने होणाऱ्या खाणकामाची सुरुवात निखननाच्या गाळ्याच्या माथ्यापासून करतात. वरच्या बाजूला निक्षेप फोडून झाल्यावर तो फावडी-खोरी वापरून एकत्र करतात व वरपासून तळापर्यंत जाणाऱ्या नालीत अधोगामी कूपकात ढकलतात. त्यांच्या तळाशी असलेल्या बोगद्यामध्ये रूळमार्गी छोट्या मालगाड्या, ट्रॅमगाड्या किंवा लहान ट्रक ये-जा करीत असतात. नालीच्या किंवा कूपकाच्या खालच्या टोकाखाली मालगाड्यांचे रिकामे डबे उभे करतात. वरच्या भागातून ढकललेला माल आपोआप या डब्यांत येऊन पडतो. ज्या ठिकाणी बऱ्याच पातळ्यांवर खाणकाम चाललेले असते अशा ठिकाणी काही ठराविक पातळ्या माल गोळा करण्यासाठी तसेच त्याची वाहतूक करून तो वर जमिनीवर चढविण्याची सोय करण्यासाठी ठरवून दिलेल्या असतात. बऱ्याच वेळा या पातळ्यांवर फोडलेल्या गाळ्यांतील चांगल्या प्रतीचा धातुकाचा भाग व अनावश्यक दगडगोटे आणि खडकांचे तुक़डे वेगळे करण्यासाठी सोय केलेली असते. यामुळे फक्त योग्य असा उच्च प्रतीचा मालच वर चढवितात व खर्चामध्ये बचत करतात. या प्रकाराने निखननाच्या गाळ्याच्या माथ्यापासून तळाकडे खाणकाम प्रगत होत असताना एका खाली एक असे काप फोडून खाणकाम करतात. हे काप
अशा रीतीने फोडलेले असतात की, हा उरलेला न खणलेला भाग ओबडधोबड पायऱ्यांच्या जिन्यासारखा होतो. जेथे माल गोळा करून त्याची वाहतूक केली जाते ती खालची पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मालगाड्यांची वाहतूक व्यवस्थित व अविरत चालू ठेवण्यासाठी एक तर त्या पातळीच्या छताला लाकडाच्या खांबांचा आणि फळ्यांचा आधार देतात किंवा तिच्या वरच्या अगदी लगतच्या भागातील खनिज निक्षेपाचा लांबट ठोकळ्यासारखा एक क्षैतिज भाग तसाच सलग सोडून देतात. मात्र या सलग भागामध्ये अधूनमधून नाल्यांची किंवा कूपकांची भोके असतात. खाणकाम पुढीलप्रमाणे करतात. प्रथम निक्षेपाच्या वरच्या भागामध्ये वेधनाने भोके पाडतात. या भोकांत सुरुंग भरून ते उडवून देतात व अशा रीतीने वरच्या भागाचा एक खंड (काप) फोडून काढतात. पुढील खालचा खंड फोडण्यापूर्वी वरचा फोडलेला माल वाहून नेतात व परत वेधनाच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी वरचा भाग स्वच्छ झाडून काढतात. ही पद्धत सोन्याच्या खाणीत विशेषेकरून फायद्याची होते कारण सोन्याचे कण खालच्या जमिनीवर चिकटून राहतात, ते झाडलोट करून काढल्याशिवाय निघत नाहीत. वरचा सुरुवातीचा पृष्ठभाग स्वच्छ केल्यावर मात्र पुढील नवीन कापांचे वरचे पृष्ठभाग परत परत स्वच्छ करावे लागत नाहीत कारण पुढच्या प्रत्येक वेळी फक्त निक्षेपाचेच काप कापले जातात.
वरच्या हाताच्या पद्धतीने निखनन : (ओव्हरहँड स्टोपिंग). या पद्धतीत उघड्या प्रकारचे निखननाचे गाळे उघडून खाणकाम करतात. खनिज निक्षेपाचे उभे, आडवे व क्षैतिज छेद कापतात आणि ठोकळ्याच्या आकाराचे काप खणून काढतात. हे खाणकाम निखननाच्या गाळ्याच्या तळाकडून वरच्या दिशेकडे क्रमाक्रमाने केले जाते.
कुठल्याही निखननाच्या गाळ्यातील खाणकामाची सुरुवात ऊर्ध्वगामी कूपकाच्या तळापासून सुरू करतात. हे काम निक्षेपाचा लहानसा चौथऱ्यासारखा खांब ठेवून सुरू करतात वा तळापासून सरळ सुरू करतात. तळापासून खाणकामास सुरुवात केली, तर खालच्या पातळीचे म्हणजे पर्यायाने पातळीवरली उघड्या मार्गाचे संरक्षण लाकडी खांब, कमानी वा चौकोनी सांगाडे वापरून करतात. जसजसे खाणकाम वरवर जाते तसतसे खाणमजुरांना उभा राहण्यासाठी लाकडाच्या किंवा फोडलेल्या मालाच्या अधिकाधिक उंच माच्यांची सोय करावी लागते. धातुक शिरेची नती ४०° पेक्षा कमी असेल, तर खाणमजूर शिरेच्या पायाकडील भिंतीवर उभे राहून सहज खाणकाम करू शकतात पण अधिक नती असलेल्या किंवा उभ्या शिरांच्या खाणकामामध्ये मात्र खाणीत फोडलेल्या तुकड्याताकड्यांनी झाकलेल्या लाकडी ओंडक्यांच्या किंवा ठोकळ्यांच्या माच्यावर उभे राहून खाणकाम करतात. जर निक्षेपाच्या भिंती कमकुवत असतील व निक्षेपाचा काप खाली पाडल्यानंतर त्या लवकरच आपोआप खाली ढासळणार असतील तर निखननाच्या गाळ्यात खडकांचे तुकडे, भुगा इ. भर घालून खाणकाम करतात.
क्षैतिज काप घेण्याची व भर घालण्याची पद्धत : (सपाट छत कापण्याची पद्धत). आ. १६ मधील क्ष या ठिकाणी प्रथम एक क्षैतिज छेद घेतात. फ या ठिकाणी असलेल्या फोडलेल्या धातुकाच्या ढिगाऱ्यावर उभे राहून खाणमजूर वरच्या बाजूला असणाऱ्या धातुक निक्षेपामध्ये छेद कापण्यासाठी वेधन करतात. न या ठिकाणी असलेल्या नाल्यांतून फोडलेला माल खालच्या पातळीवर वाहून नेला जातो. खणण्याचे काम जसजसे वरवर जाते तसतशी मालवाहतुकीच्या नाल्यांची उंची पण वाढवितात व ती टाकाऊ मालाच्या भरीच्या ढिगापेक्षा थोडी जास्त ठेवतात. भरीसाठी वापरण्यात येणारा खडकाचा चुरा ऊर्ध्वगामी कूपकातून वरच्या बाजूस नेतात आणि तेथून तो ज्या नालीतून फक्त भरीचा मालच हाताळतात तिच्यात ओततात. ज्या ठिकाणी खाणकाम चाललेले असते त्या गाळ्यात हा भरीचा माल नालीतून खाली येताच तो खालच्या बाजूला खणून रिकाम्या झालेल्या तळावर भर म्हणून पसरतात. मग या ढिगाऱ्यावर उभे राहून पुढच्या कामास सुरुवात करतात. जसजसे खाणकाम क्षैतिज दिशेत प्रगत होते व मुख्य ऊर्ध्वगामी कूपकापासून दूर जाते तसतसे लांबवर वाहतुकीचे श्रम व खर्च कमी करण्यासाठी नवी ऊर्ध्वगामी कूपक खणून काढतात. वरच्या बाजूच्या निक्षेपाचा नवा काप कापण्यापूर्वी खालच्या तळावरील भरीचा भाग शक्य तितका सपाट करतात व त्यावर लाकडाच्या फळ्या किंवा बांबूच्या जाड चटया पसरतात. नंतर निक्षेपाचा नवा काप फोडून या चटयांवर पाडतात. हा निक्षेपाचा फोडलेला भाग नाल्यांतून खालच्या बाजूला मालवाहतुकीच्या पातळीवर पोहोचवितात. फोडलेला निक्षेपाचा भाग बाजूला नेल्यावर भर घालण्याचे काम करतात, पण त्यापूर्वी लाकडाच्या फळ्या व चटया काढून घेतात. या लाकडी फळ्यांचा आणि चटयांचा उपयोग दोन प्रकारांनी होतो. एक म्हणजे पहिल्या कापानंतर पुढच्या प्रत्येक कापाच्या वेळी फक्त निक्षेपाचेच छेद फोडले जातात व ते या चटयांवर पडत राहिल्यामुळे खालच्या व आजूबाजूच्या खडकांच्या चुऱ्याची त्यात भेसळ होत नाही. दुसरे म्हणजे या चटयांवर निक्षेपाच्या फोडलेल्या चुऱ्यातील उच्च प्रतीच्या भागाची व निकृष्ट वा अनावश्यक भागाची वेगवेगळी वेचणी करता येते व चांगला माल एका नालीतून तर निकृष्ट दुसरीतून असा वेगवेगळा पाठविता येतो. क्ष येथे सुरू केलेल्या क्षैतिज कापाचे खनन समोर येणाऱ्या पहिल्या ऊर्ध्वगामी कूपकापर्यंत गेल्यावर थांबवतात. नंतर दुसरा काप घेण्यास सुरुवात करतात. या प्रकारामध्ये कुठल्याही निखननाच्या गाळ्यात दोन ऊर्ध्वगामी कूपकांच्या मधल्या भागात एकाच वेळी अनेक खाणमजूर ठिकठिकाणी खाणकाम करू शकतात. बऱ्याच वेळा नाल्यांच्या भिंतींचे तसेच आधार देण्यासाठी केलेले बांधकाम हे खाणकाम करताना निघालेले आजूबाजूच्या खडकांचे तुकडे वापरून करतात. आधार देण्याचे काम कधीकधी लाकडाचे लांबट चोकौनी ठोकळे एकावर एक आडवे आणि उभे रचून त्यांचे खांब तयार करुन करतात. सामान्यतः हे दगडाचे किंवा लाकडाचे खांब तळावर असणाऱ्या खडकाच्या चुऱ्याच्या सपाट केलेल्या ढिगाऱ्यावरच रचतात. या खांबांमध्ये फार मोठे ओझे तोलून धरण्याची शक्ती नसते.
तिरपा काप कापण्याची व भर घालण्याची पद्धत : या पद्धतीतदेखील खाली उभे राहून वरच्या बाजूच्या निक्षेपाचे छेद घेऊन काप कापतात. खणून व फोडून खाली पडलेल्या खडकांच्या चुऱ्यावर उभे राहून कामगार काम करतात. मात्र छेद क्षैतिज न कापता तिरपा कापतात. खाणकामाची सुरुवात निखननाच्या गाळ्याच्या तळाकडून म्हणजे खालच्या बाजूकडून वरच्या बाजूकडे किंवा गाळ्याच्या माथ्यापासून तळाकडे म्हणजे वरून खालच्या बाजूकडे पाहिजे तशी करतात. ज्या ठिकाणी निक्षेप पक्के व मजबूत असतात तसेच निक्षेपाच्या आजूबाजूचे खडक मजबूत व नियमित संरचनेचे असतात तेथे ही पद्धत अगदी योग्य असते. निक्षेपाचा काप फोडल्यावर तो तिरप्या तळावर पडतो. त्यातील धातुकाचा भाग एका उतरणी कूपकातून बाजूला नेला जातो. खडकाचा चुरा दुसऱ्या कूपकातून प्रथम खालच्या पातळीवर नेतात आणि भरीसाठी परत ऊर्ध्वगामी कूपकातून वरच्या बाजूस नेतात व तेथून तो अगोदरच तयार झालेल्या खडकाच्या चुऱ्याच्या ढिगाऱ्याच्या तिरप्या पृष्ठभागावर ओततात. गुरुत्वाकर्षणामुळे हा नवा भरीचा माल उतरणीवर घसरून परत तिरपा पृष्ठभाग तयार होतो. या तिरप्या पृष्ठभागावर मग लाकडाच्या फळ्या किंवा जाड चटया पसरतात व नंतर नवा छेद कापण्यास सुरुवात करतात. हा कापलेला भाग फळ्यांवर पडताच धातुकाचा चांगला भाग व टाकाऊ खडकांचा चुरा हे वेगळे करुन दोन स्वतंत्र नाल्यांतून बाहेर नेतात. मग फळ्या व चटया काढून घेतात आणि परत भरीच्या मालाचा चुरा वरच्या बाजूने उतरणीवर सोडतात. नंतर या उतरत्या पृष्ठभागावर परत लाकडाच्या फळ्या व चटया पसरून नवीन काप कापण्यास सुरुवात करतात व याच क्रमाने पुढील खाणकाम करतात. या प्रकारच्या कामामध्ये धातुक व टाकाऊ चुरा हे कमीत कमी हाताळावे लागतात. आ. १७ मध्ये ख या ठिकाणी दाखविल्याप्रमाणे छताला आधार देण्यासाठी लाकडाचे उभे व आडवे खांब ठोकतात. खणून फोडलेला निक्षेपाचा चुरा आकृतीत टाकाऊ खडकांच्या चुऱ्याच्या उतरणीवर मांडलेल्या फळ्यांवर पडलेला दर्शविला आहे. या प्रकारचे खाणकाम जसजसे प्रगत होत जाते तसतसा उतरत्या भागाचा अंगठा म्हणजे खाणकामाचा अगदी खालचा भाग ऊर्ध्वगामी कूपकापासून दूरदूर जाऊ लागतो.निखननाचा गाळा मोठा झाल्यास छत कोसळून पडण्याची शक्यता वाढते म्हणून अशा प्रकारच्या खाणकामातील निखननाच्या गाळ्याची लांबी जास्तीत जास्त १६ ते २० मी. असते.
फोडलेला निक्षेप वाहून नेणाऱ्या नालीची सुरुवात खणलेल्या भागाच्या अंगठ्यापासून करतात व जसजशी जमिनीवरील भरीची उंची वाढत जाते, तसतशी या नालीची उंचीदेखील वाढवीत जातात. नवीन काप घेण्यापूर्वी कधकधी खालच्या भरीच्या उतरत्या ढिगाऱ्यावर फळ्या वा चटया अंथरत नाहीत मात्र त्यावर फक्त भरपूर पाणी शिंपून, चोपून जवळ जवळ पक्का असा उतरता पृष्ठभाग तयार करतात व त्यावर नवीन फोडलेला निक्षेपाचा चुरा पडू देतात. या चुऱ्याचा वरच्या बाजूचा व भरड भाग खालच्या बाजूकडील नालीमध्ये सहज ढकलता येतो व तळावर उरलेला बारीक भाग काळजीपूर्वक खरवडून घ्यावा लागतो. त्यानंतर उतरत्या पृष्ठभागावर नवीन भर ओतून झाल्यावर पुढचा काप घेण्यास सुरुवात करतात व याच क्रमाने खाणकाम करतात.
वरील प्रकारापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये निखननाच्या गाळ्याच्या तळाकडून खाणकाम जसजसे वरच्या बाजूला प्रगत होत जाते तसतसे सगळ्या मोकळ्या जागी इमारती लाकडाचे चौरस सांगाडे वापरतात (आ. १८). प्रत्येक सांगाड्यात १२ लांबट चौकोनी ठोकळे असतात. सांगाड्याचा आकार चौरस पेटीसारखा असतो. मात्र आतला भाग रिकामा असतो. असे सांगाडे उभ्या व आडव्या दिशांना एकावर एक तसेच एका शेजारी एक रचून हवी तितकी उंची अथवा आडवी मोकळी जागा भरता येते.
रेस्युइंग खाणकाम किंवा पट्टे कापून खाणकाम : अरुंद व पातळ खनिज शिरांचे किंवा ज्या मोठ्या शिरांमध्ये निक्षेप अरुंद पट्ट्यात एकत्रित झाले असतील, त्यांचे खाणकाम ह्या प्रकाराने करतात. इतर साध्या प्रकारांनी खाणकाम केल्यास बऱ्याच वेळा आजूबाजूचे खडक फुटून निक्षेपाच्या तुकड्यांमध्ये मिसळतात. इतर खडकांचे तुकडे मोठ्या आकारमानाचे व वेगळ्या रंगाचे किंवा स्वरूपाचे नसल्यास ते निक्षेपाच्या चुऱ्यापासून वेगळे करणे कठीण किंवा अशक्य होते. पट्टा कापून खाणकाम करण्याचे कारण म्हणजे निव्वळ उच्च प्रतीच्या धातुकाचे उत्खनन करून व टाकाऊ भाग शक्य तितका कमी खणून किंवा संपूर्ण टाळून फक्त चांगला उच्च प्रतीचा माल बाहेर काढणे हे होय. या प्रकाराने खाणकाम करताना प्रथम निक्षेपरहित भागात किंवा अगदी खालच्या प्रतीच्या धातुकाच्या भागात एक पट्टा खणून काढतात व हा फोडलेला माल बाहेर काढतात आणि तळावरचा पृष्ठभाग अगदी स्वच्छ करतात. मग उच्च प्रतीचा व समृद्ध असा निक्षेपाचा भाग दुसरा स्वतंत्र पट्टा कापून खणून काढतात. यामुळे धातुकाचा मौल्यवान भाग वेगळा मिळतो. हलक्या प्रकाराचा माल खाणीतून धातू गाळण्याच्या कारखान्याकडे नेला जात नाही. त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येतो व धातू गाळणेही सापेक्षतः कमी खर्चाचे होते.
आकसत जाणारे-आकुंचित होत जाणारे-खाणकाम (निखनन) : वरच्या हाताच्या पद्धतीने म्हणजे निखननाच्या गाळ्याच्या तळाकडून छताकडे प्रगत होत जाणाऱ्या खाणकामाच्या प्रकारांपैकीच आकसत जाणारे खाणकाम हा एक प्रकार आहे. उघड्या प्रकारच्या खाणकामात जसजसे खालून वर काप कापीत जातात तसतसे खाणमजुरांना उभे राहून काम करण्यासाठी खालच्या भागात माचे बांधावे लागतात. परंतु बऱ्याच वेळा निक्षेपाचा काप कापून फोडून तळावर पडल्यानंतर प्रत्येक वेळी त्या फोडलेल्या मालावरच उभे राहून मजुरांना वरच्या भागाचे खाणकाम करता येईल इतका फोडीचा भाग निखननाच्या गाळ्यात तसाच सोडून फक्त बाकीचाच फोडलेला भाग बाहेर नेऊन खाणकाम करतात. यालाच आकसत जाणारे खाणकाम असे म्हणतात. फोडलेला खडकाचा चुरा हा मूळ जागी असलेल्या खडकापेक्षा ६० टक्के जास्त जागा व्यापतो म्हणून प्रत्येक वेळी उघड्या जागेच्या एक तृतीयांश आकारमानाचा निक्षेपाचा भाग फोडावा लागतो. निखननाच्या गाळ्यामध्ये सु. ८ ते १८ मी. अंतरावर फोडलेला माल वाहून नेण्याकरिता नाल्या तयार केलेल्या असतात. निखननाच्या गाळ्याची लांबी गाळ्याच्या दोन बाजूंस असणाऱ्या ऊर्ध्वगामी कूपकांवरून ठरविली जाते. या दोन कूपकांपैकी एक मजुरांच्या येण्याजाण्यासाठी असतो, तर दुसरा हवा व पाणी खेळविणाऱ्या नळांसाठी व इतर वाहतुकीसाठी असतो.
आ. १९ मध्ये मोठ्या आकारमानाच्या निक्षेपाचे आकसत जाणाऱ्या पद्धतीने होणारे खाणकाम दाखविले आहे. खालची पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी मोठाले स्तंभ सोडलेले असतात. त्यांच्यामध्ये फोडलेला निक्षेपाचा भाग वाहून नेण्यासाठी नाल्या असतात. या नाल्या सु. ८ मी. अंतरावर असतात. खाणकाम करण्यासाठी निखननाच्या गाळ्यात जाण्यासाठी म या ठिकाणी दाखविल्याप्रमाणे क्षैतिज रस्ते अधिक वर वर उघडत जातात. नाल्यांमध्ये मोठाले तुकडे पडून त्या तुंबू नयेत म्हणून त्यांच्या तोंडावरच्या भागात आकृतीत ज येथे दाखविल्याप्रमाणे गजांच्या जाळ्या बसविलेल्या असतात. वरची पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी प या जागेच्या वरच्या बाजूच्या निक्षेपाचा पट्टा न खणता तसाच सोडून देतात. खाणकाम जवळजवळ संपत आल्यावर शेवटी आधारासाठी सोडलेले निक्षेपाचे खांब वेगळ्या पद्धतीने काढून घेतात.
या पद्धतीत खाणकाम करताना प्रत्येक वेळी फोडलेल्या मालाचा एक तृतीयांश ते अर्धा भागच निखननाच्या गाळ्यातून बाहेर नेला जातो व बाकीचा भाग संपूर्ण गाळ्यातील खाणकाम होईपर्यंत तसाच ठेवून द्यावा लागतो. जोपर्यंत पाठीकडील किंवा छतावरील भाग आधार न देता स्वतःच्या बलावर जागच्या जागी टिकून राहतो किंवा जोपर्यंत बाजूच्या भिंतींचे खडक फोडलेल्या निक्षेपामध्ये पडून निक्षेपाची प्रत व किंमत कमी होत नाहीत, तोपर्यंत आकसत जाणाऱ्या पद्धतीने खाणकाम करता येते. ही नैसर्गिक मर्यादा कृत्रिम आधार देऊन वाढविता येते. आकसत जाणारे खाणकाम होणाऱ्या निखननाच्या गाळ्यांची रांग तयार झाली आणि त्यांतले काही गाळे खणून पूर्णपणे संपले की, नवीन फोडलेला माल साठविण्यासाठी भरपूर रिकामी जागा उपलब्ध होते. यामुळे दुसऱ्या कुठल्याही पद्धतीपेक्षा या पद्धतीत मालाचा पुरवठा अगदी सहज हवा तसा कमीजास्त करता येतो. मात्र या पद्धतीत निक्षेपाचा फोडलेला भाग निखननाच्या गाळ्यात बराच काळपर्यंत पडून राहत असल्यामुळे भांडवल बराच काळपर्यंत अडकून पडते.
उप-पातळ्या उघडून खाणकाम (निखनन) करण्याची पद्धत : नेहमीच्या खाणकामाच्या मुख्य पातळ्या ३० ते ५० मी. अंतरावर असून त्या जागोजागी ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी कूपकांनी जोडलेल्या असतात. उप-पातळ्या उघडून निखनन करताना मधल्या भागामध्ये ६ ते ८ मी. अंतरावर २·५ ते ३ मी. उंचीचे बोगदे उभ्या कूपकापासून ते निखननाच्या गाळ्याच्या टोकापर्यंत खणून काढतात. त्यांना उप-पातळ्या असे म्हणतात. आ. २० मधील उप-पातळी क्र. १ च्या टोकापासून बोगदे निखननाच्या गाळ्याच्या टोकापर्यंत खणून काढतात. सुमारे ८ ते १० मी. अंतरावर या उप-पातळीपासून खालच्या मुख्य आणि मालवाहतुकीच्या पातळीपर्यंत नरसाळ्याच्या आकाराच्या नाल्या खणून काढतात. जसजसे खाणकाम प्रगत होत जाते तसतसे प्रत्येक उप-पातळीवरील खणलेला भाग मागे सरकत जातो कारण प्रत्येक उप-पातळीवरील खाणकाम हे पायरी-पायरीने मागे असते. उदा., उप-पातळी क्र. १ मध्ये खाणकाम सुरू झाल्यावर उप-पातळी क्र. २ मध्ये पातळी बोगद्याच्या टोकापासून आडवे बोगदे निखननाच्या गाळ्यात सीमेपर्यंत खणून काढतात. नंतर त्या उप-पातळीच्या तळावर भोके खणण्यास सुरुवात करतात व खालच्या बाजूला सोडलेल्या खांबांचे थोडे थोडे आणि छताकडे जाणाऱ्या खांबांचे निम्मे भाग खणून काढतात. अशा रीतीने उप-पातळी क्र. २ मधील खाणमजूर मुख्य ऊर्ध्वगामी कूपकाकडे मागे मागे येत असताना व चकतीमध्ये खालच्या भागात भोके पाडीत व खणत जातात आणि वरच्या बाजूला ड येथे खणण्याचे काम करतात. असाच उपक्रम उप-पातळी क्र. ३ मध्येही केला जातो. खाली पडणारा माल नरसाळ्याच्या आकाराच्या नाल्यांत पडतो. निखननाचा गाळा मोठा १३ ते ३५ मी. रुंद असेल, तर खणलेला माल गोळा करून वाहून नेण्याकरिता मालवाहतुकीचे दोन समांतर बोगदे खालच्या पातळीवर उघडतात. असे बोगदे अ या ठिकाणी दाखविल्याप्रमाणे अधूनमधून आडवे बोगदे खणून एकमेकांशी जोडलेले असतात. ही पद्धत वापरावयाची झाल्यास पूर्वतयारीच्या कामांसाठी अधिक खर्च करावा लागतो, पण नंतर आधार देण्यासाठी फार थोडी कामे करावी लागतात. तसेच या प्रकाराने उत्पादन बरेच होते व एकाच वेळी अनेक ठिकाणी खाणकाम करता येते.
वरच्या पृष्ठभागापासून काप कापून खाणकाम : खनिज निक्षेपाच्या शिखरापासून खालच्या दिशेकडे काम करताना ३ ते ४ मी. जाडीचे क्षैतिज काप कापून व खणून काढतात. एका संपूर्ण पातळीवर सलग असा हा छेद घेतात. पहिला छेद निक्षेपाच्या माथ्यावरील खडकाच्या तळापासून सुरू करतात आणि वरच्या खडकाला आधार देण्यासाठी लाकडाचा उपयोग करतात. वरच्या कापातील धातुकाचा भाग बाहेर काढल्यावर खालच्या पृष्ठभागावर लाकडी फळ्यांचे वा चटयांचे आवरण घालतात व खालचा निक्षेप अगदी घट्ट झाकून घेतात. नंतर पहिल्या कापातील आधारासाठी सोडलेले निक्षेप खांब फोडतात. हा फोडलेला माल जमिनीवरील फळ्यांच्या आवरणावर पडतो, त्यात छताचा काही भागही खाली पडतो. हे फळ्यांचे आवरण दुसऱ्या चकतीचा काप घेण्याच्या वेळेपर्यंत तात्पुरते लाकडाचे खांब वापरून तोलून धरतात. दुसऱ्या कापाचा फोडलेला माल वाहून नेल्यावर खालच्या जमिनीवर फळ्यांचे आवरण घट्टपणे ठोकतात व आधारासाठी सोडलेले निक्षेपाचे खांब उडवून देतात. लाकडी फळ्यांमुळे धातुकाच्या चुऱ्यामध्ये इतर खडकांचे तुकडे पडत नाहीत. जसजसे पुढचे काप कापले जातात तसतशी या फळ्यांवर अधिक भर पडत जाते. या प्रकाराने खाणकाम करण्यासाठी मालाची वाहतूक होणाऱ्या खालच्या पातळीपासून ऊर्ध्वगामी कूपक खणून काढलेले असतात. या कूपकामध्ये खणलेला माल वाहून नेण्यासाठी एक आणि मजुरांना ये-जा करण्यासाठी दुसरा असे दोन भाग असतात. निखननाच्या गाळ्याच्या सीमेजवळून मुख्य बोगदे लांबट बाजूला समांतर खणून काढतात व या बोगद्यांना काटकोन करून जाणारे आडवे रस्ते निखननाच्या गाळ्याच्या दोन्ही टोकांपर्यंत खणतात. छातीसमोर होणाऱ्या पद्धतीने निक्षेप फोडून काढतात, फावडी व खोरी यांच्या साहाय्याने तो गाड्यांत भरतात व नाल्यांतून त्याची वाहतूक करतात. एकदा आडव्या बोगद्याचा मार्ग तयार झाला की, जमिनीवर लाकडांच्या फळ्यांचे आवरण घालतात आणि मग आधारासाठी सोडलेले खांब उडवून देतात. कधीकधी या पद्धतीमध्ये फेरफार करून म्हणजे चौरस सांगाडे आधारासाठी वापरून खाणकाम करतात. अशा वेळी एका पाठोपाठचे काप दोन सांगाड्यांइतके रुंद आणि दोन-तीन सांगड्यांइतके उंच असतात.
कधीकधी मोठाले निक्षेप एकाच लांबच लांब सलग पातळीच्या पद्धतीने खणून काढीत नाहीत, तर आडवे किंवा निरनिराळ्या प्रकारचे लांबट चौकोनी काप घेऊन अनेक खंडांमध्ये विभागून त्यांचे खाणकाम करतात. या प्रकारात तिरपे छेद घेऊन निक्षेपाचे काप कापतात. त्यामुळे फोडलेला माल गोळा करण्यासाठी फावडी आणि खोरी यांची जरूरी भासत नाही. हे काप मालाची वाहतूक ज्या नालीतून होते तिच्या मुखाशी ३३ अंशांचा कोन करून तिरपे उभे असतात. फोडलेला माल या उतरत्या पृष्ठावरून गुरुत्वाकर्षणाने आपोआप घसरून खाली नालीमध्ये पडतो. या पद्धती बऱ्याच सुरक्षित असून त्यांनी निक्षेपाचा ९८ टक्क्यांपर्यंतचा भाग खणून काढता येतो. या पद्धतीमध्ये निखननाच्या गाळ्यात निक्षेपाच्या चांगल्या प्रतीच्या भागाची वेगळी वेचणी करता येत नाही. क्षैतिज छेद घेऊन कापणी करण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत अधिक अवघड असते. (१) आजूबाजूचे खडक कमकुवत असलेले सापेक्षतः कमी मौल्यवान, विरळ व दुर्बल निक्षेप व (२) माथ्यावर धलप्या पडून सहज खाली पडू शकतील असे खडक असणारे लांबच लांब विस्तार असलेले क्षैतिज निक्षेप यांच्या खाणकामासाठी वरच्या भागांचे काप कापण्याच्या पद्धती उत्कृष्ट होत.
पोखरून ढासळून खाणकाम करण्याचे प्रकार : या प्रकारातील उप-पातळ्या तयार करून धातुक निक्षेप खालून उकरून ढासळून पाडण्याची पद्धत ही सामान्यतः ज्या निक्षेपाच्या माथ्यावरचे खडक धलप्या पडून सहज कोसळू शकतील अशा व ज्या निक्षेपाच्या सीमा नियमित स्वरूपात असतात अशा कठीण निक्षेपासाठी अगदी योग्य असते. आ. २१ मध्ये ही पद्धत ढोबळमानाने दर्शविली आहे. या पद्धतीमधील घटनांमध्ये आणि त्यांच्या अनुक्रमांमध्ये फेरफार करून ही पद्धत निरनिराळ्या ठिकाणी वापरतात. मालवाहतुकीच्या पातळीवरील बोगद्यापासून सु. दर १६-१७ मी. अंतरावर ऊर्ध्वगामी कूपक खणून काढतात. या कूपकापासून वर ५ ते ६ मी.च्या अंतरावर उप-पातळ्या खणून काढतात. हे करीत असताना दोन पातळ्यांमध्ये सु. ३ मी. जाडीचा निक्षेपाचा पट्टा तसाच राहतो. या प्रकारच्या खाणकामाची पूर्वतयारी म्हणजे निक्षेपाला समांतर १, २, ३, ४ हे क्रमांक असलेले उप-पातळीचे बोगदे खणणे व त्यांना काटकोन करून जाणारे ड हे आडवे बोगदे खणून उघडणे. आडवे बोगदे साधारणपणे १६ मी. अंतरावर असतात. खाणकामाची सुरुवात अगदी वरच्या (आकृतीतील क्र. ४ च्या) उप-पातळीपासून करतात. उप-पातळीच्या टोकाला ब या जागी निखननाच्या गाळ्याला लंबरूप असा आणि ड येथील बोगद्यांना समांतर असा बोगदा खणतात. हे बोगदे लाकडाच्या तीन तीन जाड खांबांच्या कमानी ठोकून सुरक्षित करतात. लाकडी कमानीच्या वरच्या बाजूस लाकडाच्या फळ्या ठोकून कमानीच्या मधले छत झाकून टाकतात. नंतर ब बोगद्याला चिकटून व त्याला समांतर अ हा बोगदा खणून काढतात. अ आणि ब हे बोगदे एकमेकांना चिकटून असल्यामुळे मधले खांब बहुतेक वेळा समाईक असतात. पहिल्या म्हणजे ब बोगद्याच्या छतावरील फळ्या काढून घेऊन निक्षेपामध्ये भोके पाडून तो उडवून देतात. शेजारच्या बोगद्यात काम करणारे मजूर हा फोडलेला माल गाड्यांवर चढवून नाल्यांतून व ऊर्ध्वगामी कूपकांतून बाहेर पोहोचविण्याचे काम करतात. हा फोडलेला माल वाहून नेल्यावर पहिल्या बोगद्याच्या तळावर लाकडाच्या फळ्या अंथरतात व नवा म्हणजे तिसरा बोगदा खणण्यास सुरुवात करतात. मग पहिल्या बोगद्याप्रमाणे धातुक निक्षेप फोडून काढतात. अशा रीतीने माथ्यावरचा भाग मागे मागे सरकत जातो. फोडलेला माल जसजसा तळावरच्या फळ्यांच्या चटईवर पडत जातो तसतसा निक्षेपाच्या खालच्या पट्ट्यावरचा दाब वाढत जाऊन तो दुर्बल होत जातो व तो फोडण्यास पुढे फार श्रम पडत नाहीत. आ. २१ मध्ये अ बोगद्याच्या माथ्यावरील निक्षेप फोडून काढलेला आहे. ब बोगद्यातील मजुरांनी फोडलेला माल वाहून नेला आहे व तळाच्या जमिनीवर लाकडाच्या फळ्या पसरल्या आहेत. ब बोगद्याच्या शेजारी त्याला समांतर नवा बोगदा खणून काढल्यावर ब बोगद्यावरील निक्षेप फोडण्यास सुरुवात करतात. उप-पातळीवरील निखननाच्या दुसऱ्या प्रकाराप्रमाणे उकरण्याचे व ढासळण्याचे काम या प्रकारातही अनुक्रमाने पायऱ्या-पायऱ्यांनी करतात. वरील खणण्याची कामे झाल्यावर धातुक निक्षेपाचा निम्मा ते दोन तृतीयांश भाग उकरण्याच्या व पोखरण्याच्या प्रकारामुळे आपोआप ढासळून व कोसळून खाली पडतो.
पोखरून ढासळून खाणकाम करण्याची दुसरी पद्धत म्हणजे ठोकळे पोखरून व फोडून काढण्याची पद्धत होय. अगोदर खालच्या बाजूला छेद घेऊन कापलेल्या पोकळीमध्ये चौकाेनी आकाराचा धातुक निक्षेपाचा ठोकळा पोखरून व फोडून कोसळू देतात. छतापासून खाली तळावर कोसळून पडण्याचे अंतर जरी कमी असले, तरी वरून पडणाऱ्या निक्षेपाच्या ठोकळ्याचे अनेक तुकडे पडतात. अशा प्रकाराने खाणकाम करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक असतात : (१) धातुक निक्षेप मोठा असणे, (२) खालचा भाग उकरून काढीत असताना वरच्या बाजूला लोंबकळत राहणारा निक्षेप जागच्या जागी पक्का टिकून राहण्याइतका एकसंध व मजबूत असणे, (३) परंतु तो खाली कोसळून जमिनीवर पडल्यावर त्याचे सहज तुकडे तुकडे होण्याइतका ठिसूळ असणे व (४) माथ्यावरील खडकाचा तळाचा भागदेखील ढलपी पडून आपोआप खाली कोसळण्यासारखा असणे. फोडलेला माल खालच्या पातळीवरून वाहून नेला जातो. पोखरण्याच्या कामाला मुख्य पातळीपासून सुरुवात केली, तर निक्षेपामध्ये सरळ आणि आडवे बोगदे खणून अनेक चौरस खांब तयार करतात. सुरक्षिततेचा विचार करून शक्य तितक्या लहान आकारमानाचे खांब सोडतात. नंतर या खांबांमध्ये भोके पाडून छोटे छोटे सुरुंग वापरून ते उडवून देतात. यानंतर धातुक निक्षेपाच्या खंडाला जमिनीवर पडून स्थिर होण्यासाठी योग्य इतका वेळ देतात. निक्षेपाच्या मोठमोठ्या तुकड्यांचे बारीक तुकडे करून ते आडव्या रस्त्यांच्या टोकाला नेऊन तेथून नालीतून खालच्या वाहतुकीच्या पातळीवर टाकतात व तेथून वर भूपृष्ठावर चढवितात. निक्षेपाच्या फोडलेल्या मालात आजूबाजूच्या खडकांचे टाकाऊ तुकडे आढळू लागले की, दुसऱ्या मागच्या बाजूच्या मार्गावरील भाग फोडण्यास सुरुवात करतात. अशा रीतीने खाणकाम मागे मागे सरकत जाते. निखननाच्या गाळ्याची सुरुवात उप-पातळीपासून केली असेल, तर खाणकाम करण्याची पद्धत जवळजवळ वरीलप्रमाणेच असते. एखाद्या ठराविक पातळीवरील वाहतुकीच्या मुख्य बोगद्यापासून निखननाच्या गाळ्याच्या सीमेपर्यंत अंदाजे १७-१७ मी. अंतरावर काटकोन करून आडवे मार्ग खणून काढतात. मुख्य पातळीच्या वरच्या बाजूस एक उप-पातळी खणून काढतात. या उप-पातळीवर निक्षेपाच्या खालच्या बाजूकडून पोखरण्यास सुरुवात करतात. यासाठी एकमेकांना छेदून जाणारे अनेक सरळ (ड) व आडवे बोगदे खणून काढतात. उप-पातळी आणि वाहतुकीची मुख्य पातळी यांना जोडणार्या अनेक नाल्या जागोजागी खणलेल्या असतात. सरळ आणि आडवे मार्ग खणून काढल्यानंतर त्यांच्यामधील निक्षेपाचे चौरस खंड फोडून काढतात व नाल्यांतून वाहून नेतात. तांब्याच्या कित्येक मोठ्या खाणींत ही पद्धती वापरात आहे. एकमेकांस जोडणारे आणि शाखांसारखे पसरलेले ऊर्ध्वगामी कूपक खणून काढून ठोकळ्याच्या आकाराचे छेद घेऊन धातुक निक्षेप खाली ढासळून देतात. वाहतुकीच्या मुख्य पातळीपासून ठराविक अंतरावर जागोजागी म या तिरक्या नाल्या ग या मधल्या (गिर्झा) पातळीपर्यंत खणून काढतात. या मधल्या पातळीवर रांगेत असणाऱ्या नाल्यांच्या मुखांना लागून म्हणजे त्यांना जोडत जाणारे आडवे बोगदे खणतात. या सर्व नाल्यांच्या मुखांवर लोखंडी रूळ सरळ व आडवे पसरून एक प्रकारचे जाळीदार झाकण तयार करतात. यामुळे फोडलेल्या निक्षेपाचे मोठे तुकडे नाल्यांत पडत नाहीत व त्या तुंबत नाहीत. या मधल्या पातळीपासून वर जाणाऱ्या क या तिरक्या नाली अशा रीतीने खणून काढतात की, त्यांचे स या जागी चौरस संच तयार होतात. चौक तयार होणाऱ्या स या भागापासून पुढे वरच्या बाजूस निक्षेपाच्या तळाच्या पातळीपर्यंत जाणारे दोन दोन किंवा चार चार ब हे हाताच्या बोटांसारखे दिसणारे ऊर्ध्वगामी कूपक खणून काढतात. सर्वांत वरच्या ऊर्ध्वगामी कूपकांची वरच्या बाजूची तोंडे सु. ४-४ मी. अंतरावर असतात. त्यामुळे पोखरून कोसळू दिलेल्या निक्षेपाच्या मालाची वाहतुक करण्यासाठी शेजारी शेजारी अनेक मार्ग उपलब्ध होतात.
निक्षेपाचे खालच्या बाजूचे पोखरण्याचे काम सु. ८-८ मी. अंतरावर आडवे बोगदे खणून करतात. हे बोगदे निखननाच्या गाळ्याच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत खणलेले असतात आणि ते गाळ्याच्या सीमेजवळ रुंद केलेले असतात. नंतर मधल्या जागेत असलेल्या निक्षेपाच्या खंडांमध्ये तसेच वरच्या छतामध्ये सुरुंग लावून पोखरण्याच्या व ढासळून देण्याच्या कामाला सुरुवात करतात. निखननाच्या गाळ्याच्या सीमांजवळ प्रथम सरळ व आडव्या दिशांमध्ये आकसत जाणारे किंवा लहान लहान गाळे उघडून खाणकाम करतात. यामुळे खाणकामाचा मुख्य खंड आजूबाजूच्या भिंतींपासून मोकळा होऊन ढासळून खाणकाम करण्यासाठी योग्य होतो. हे केल्यानंतर निखननाच्या मुख्य गाळ्याच्या खालच्या बाजूस छेद घेण्यास व पोखरण्यास सुरुवात करतात. ही पद्धत वापरण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात : (१) धातुक निक्षेप मऊ किंवा मध्यम कठिनतेचा असावा (२) निक्षेप सलग, विस्तृत व विपुल असावा (३) निक्षेपात इतर खडकांचा अनावश्यक भाग अजिबात नसावा किंवा असल्यास अत्यल्प असावा (४) निक्षेपाच्या छताचा खालचा भाग सहज कोसळून खाली पडण्याजोगा असावा व (५) निक्षेपाच्या ढासळून खाली पडणाऱ्या मोठाल्या भागांचे खाली पडल्यावर नाल्यांतून सहज खाली जातील असे बारीक तुकडे व्हावेत. निक्षेप अतिशय जाड व प्रचंड असेल, तर वाहतुकीच्या एकापेक्षा अधिक पातळ्या खणून माल भूपृष्ठापर्यंत चढविण्याची सोय करतात.
कुठल्याही एका ठराविक प्रकारच्या पोखरून व ढासळून देण्याच्या पद्धतीने खाण सुरू करण्याच्या पूर्वतयारीच्या कामाचा विचार केल्यास पुढील गोष्टी आढळतात. मालाची खाली-वर वाहतूक करणारा एकच कूपक वापरला, तर तो जसजसा जास्त खोल जातो व त्याचा अधिक उपयोग होतो तसतसा पूर्वतयारीच्या कामाचा खर्च सापेक्षतः कमी होत जातो. कारण कूपक खणण्याचा खर्च हा मोठ्या भागाच्या खाणकामाच्या खर्चावर सारखा वाटला जातो. हे जरी सर्वसामान्यपणे खरे असले, तरी निक्षेपाचा विस्तार, त्याचे आर्थिक महत्त्व व संभाव्य आयुष्य यांचा विचार करून कधीकधी अनेक कूपक उघडून खाणकाम करावे लागते. १ ते २ टक्के तांबे असलेल्या कमी दर्जाच्या धातुकाचे खाणकाम करण्यासाठी ही पद्धत वापरली जात असल्यामुळे आजूबाजूच्या खडकांचा अनावश्यक चुरा निक्षेपाच्या चुऱ्यामध्ये आणखी मिसळू नये म्हणून विशेष खबरदारी घ्यावी लागते. निक्षेपाच्या फोडलेल्या भागाचा उतार ४० ते ७० अंशांचा असतो. यामुळे निक्षेपाचा चुरा नाल्यांमध्ये किंवा अधोगामी कूपकांत सहज जाऊन पडतो.
प्रत्येक धातुक किंवा खनिज निक्षेप परस्परांहून वेगळा असतो. प्रत्येकाची तऱ्हा आणि प्रकार, त्याचे गुणधर्म ही वेगवेगळी असतात. त्यामुळे वर वर्णन केलेल्या निरनिराळ्या पद्धतींपैकी कुठल्या तरी योग्य अशा पद्धतीने एखाद्या निक्षेपाचे खाणकाम करतात. कित्येक वेळा एकाहून अधिक पद्धतींचा समन्वय करून खाणकाम करतात किंवा प्रसंगी एखादी वेगळीच योग्य अशी पद्धत तयार करून खाणकाम करतात.
कोळशाचे खाणकाम : कोळशाच्या निक्षेपामध्ये संरचनेच्या व आढळाच्या बाबतीत बरीच विविधता दिसून येते. कोळशाचे बहुतेक निक्षेप थरांचे असतात. पैकी बहुतेक थर क्षैतिज किंवा थोडे तिरके असतात, तर काही उभे किंवा जवळजवळ उभे असतात. तसेच काही थर भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाखाली कमी खोलीवर आढळतात, काही मध्यम खोलीवर, तर काही बऱ्याच म्हणजे २-३ किमी. पेक्षा अधिक खोलीवर असतात. कित्येकदा भूपृष्ठावर ज्यांचा काही भाग उघडा पडलेला असतो असे भिन्न उतार असणारे थर वरपासून ते थेट २-३ किमी. खोलीपर्यंत सलग गेलेले असतात. अशा प्रकारच्या विविधतेमुळे कोळशाचे खाणकाम परिस्थितीनुसार निरनिराळ्या प्रकारांनी केले जाते. कोळशाच्या निक्षेपाचा एकूण साठा, त्याच्या थरांची व थरांवरील इतर खडकांची जाडी व नती, खाणकामाच्या संभाव्य जागेच्या वरच्या बाजूस असणाऱ्या जमिनीची किंमत आणि इतर आर्थिक गोष्टी यांचा विचार करून सर्वांत योग्य व अत्यंत कार्यक्षम असा खाणकामाचा प्रकार निवडतात. भूपृष्ठावरील व कमी खोलीवरचे कोळशाचे निक्षेप दोन प्रकारच्या उघड्या खाणी चालवून खणून काढतात. एक म्हणजे सामान्यतः वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार आकाराची खाण उघडून अशा खाणीत बहुतेककरून खाणीच्या सीमेच्या कडेकडेने वळणे घेत रस्ते वरपासून खाली खाणकाम चाललेल्या जागेपर्यंत जातात. दुसऱ्या प्रकारात विस्तीर्ण निक्षेपांचे पट्टे कापून खाणकाम करतात. अमेरिकेतील काही राज्यांत ७० टक्के कोळसा भूमिगत पद्धतीने व जवळजवळ ३० टक्के कोळसा पट्टे कापून मिळवितात. काही राज्यांत ही टक्केवारी ५० : ५० वर आली आहे.
भूमिगत खाणकामाचे प्रकार : भूमिगत कोळशाचे निक्षेप खणून काढण्यासाठी प्रथम पुढीलपैकी एका प्रकाराने पूर्वतयारीची कामे करावी लागतात. (१) निक्षेप केवळ खोल जागीच असेल, तर भूपृष्ठापासून ते कोळशाच्या थरापर्यंत जाण्या-येण्यासाठी उभा कूपक खणून काढतात. (२) कोळशाच्या तिरप्या थरांच्या खाणकामासाठी भूपृष्ठापासून १५ ते ३५ अंशांचा कोन करून उतरणी कूपक खणून काढतात. तो सामान्यतः कोळशाच्या थराला समांतर असतो. थराची नती २५ अंशांपर्यंत असल्यास बऱ्याच वेळा तो थरातूनच उकरून काढलेला असतो. याच उतरणी कूपकातून मालाची वाहतूक व मजुरांची येण्याजाण्याची सोय करतात. (३) टेकड्यांच्या किंवा डोंगराच्या आत असणाऱ्या निक्षेपापर्यंत उतारावर किंवा दरीत असणाऱ्या जागेपासून सरळ म्हणजे निक्षेपगामी बोगदा खणून काढतात.
कोळसा प्रत्यक्ष खणून काढण्याचे काम मुख्यत्वेकरून (१) खोल्या आणि खांब व (२) सलग लांब भिंतीच्या पद्धतीने केले जाते. या दोन प्रकारांमध्ये फेरफार करून व ते एकत्र करून खाणकामाचे निरनिराळे प्रकार तयार होतात. कोळशाचा थर सापेक्षतः उथळ जागी असेल आणि तो सलग व विस्तृत असून १·५ मी. पेक्षा अधिक जाड असेल तर खोल्या आणि खांब पद्धतीने खाणकाम करतात. कोळशाच्या बहुतेक खाणींत सलग लांब भिंतीची पद्धत वापरतात. या पद्धतीने अधिक खोलीवरचे थरदेखील खणून काढता येतात. ही पद्धत पुढे पुढे प्रगत होत जाणारी किंवा सीमेकडून पिछेहाट करत येणारी असते.
खोल्या आणि खांब प्रकारच्या पद्धतीत कोळशाच्या थरामध्ये एकमेकींना काटकोन करून जाणाऱ्या दोन दिशांमध्ये अनेक बोगदे खणून कोळसा प्रथम बाहेर काढतात. काटकोन करून जाणाऱ्या दोन दिशांपैकी एक कोळशाच्या थराला म्हणजे त्याच्या नतिलंबाला समांतर असते. कोळशाच्या थरातून अशा रीतीने बोगदे खणल्यावर राहिलेल्या कोळशाचे चौकोनी आकाराचे अनेक खंड पडतात. बोगद्यांच्या रिकाम्या पोकळ्या म्हणजे खोल्या व त्यांच्या बाजूला असणारे चौकोनी खंड म्हणजे खांब होत. बोगद्याची उंची कोळशाच्या थराच्या जाडीवरून ठरविली जाते. बोगद्याचा अनुप्रस्थ छेद जितका मोठा तितका उत्पादनाचा खर्च कमी येतो. यामुळे सुरक्षिततेच्या मर्यादा सांभाळून किंवा आधाराची कामे करून बोगदे जास्तीत जास्त रुंदीचे काढणे इष्ट असते. वरच्या छताचे ओझे तोलून धरू शकतील इतकेच मोठे कोळशाचे मधले खांब सोडावे लागतात. शेवटी हे खांबदेखील खणून काढतात. कोळशाच्या एकूण निक्षेपाचा किती टक्के भाग खणून बाहेर काढता येईल, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. छताला आधार देण्यासाठी किती मोठ्या आकाराचे व एकूण किती खांब सोडावे लागतील यांवर ही टक्केवारी अवलंबून असते. शेतीची, शहरी किंवा कारखान्याची जमीन निक्षेपाच्या वरच्या बाजूस असल्यास त्या जमिनीचे संरक्षण व ती खचू नये म्हणून प्रयत्न करावे लागतात. वरच्या बाजूस नुसते माळरानच असेल, तर १०० टक्के निक्षेप खणण्यास हरकत नसते. तेथे शेती, शहरे, उद्योगधंदे असल्यास सु. ५० टक्के कोळसा बाहेर काढता येतो. काही ठिकाणी काहीही व कशीही परिस्थिती असली, तरी सर्वच्या सर्व कोळसा खणून काढण्याची आवश्यकता असते. अशा ठिकाणी कोळसा खणून रिकाम्या झालेल्या जागी दगडाचा चुरा, वाळू इत्यादींची भर घालून तसेच छतास लाकडाच्या सांगाड्यांचा किंवा सिमेंट काँक्रीट व दगडाच्या बांधकामाचा आधार देऊन सर्वच्या सर्व कोळसा खणून काढतात. काही ठिकाणी खाणीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते. उदा., ब्रिटनमध्ये समुद्राच्या तळाखाली खाणकाम केले जाते. तेथे किती टक्के कोळसा बाहेर काढता येईल यावर सरकारी नियंत्रण असते. समुद्र तळाखालच्या निक्षेपातील काही अरुंद पट्टेच खणून काढण्यास परवानगी देण्यात येते व बाकीचा कोळसा लांबट स्तंभांच्या स्वरूपात तसाच सोडावा लागतो. समोरच्या दिशेत पुढे पुढे विकसित होत जाणाऱ्या सलग लांब भिंतीच्या पद्धतीमध्ये एका ठराविक खंडातला कोळशाच्या थराचा भाग अगदी सतत खाणकाम करून काढून घेतला जातो. खंडामध्ये एका पाठोपाठ एक असे संपूर्ण लांबीचे काप कापून काढतात. खंडाची लांबी ८० ते १५० मी. असते. पुढील प्रकाराने खाणकाम होते. समजा दर दिवसाला काही ठराविक टन उत्पादन करण्यासाठी १०० मी. लांबीचे पृष्ठ समोर असणे आवश्यक आहे, तर मग वाहतुकीच्या मुख्य बोगद्यापासून सामान्यतः काटकोन करून आडवे जाणारे दोन समांतर बोगदे १०० मी. अंतरावर खणून काढतात. त्यांना द्वार रस्ते म्हणतात. हे रस्ते पुढे मजूर, अवजारे, यंत्रे व खणलेला माल यांच्या वाहतुकीसाठी वापरावयाचे असल्यामुळे ते बरेच मोठे व रुंद खणून काढतात. कोळशाच्या थराची जाडी दोन मी. पेक्षा कमी असेल, तर छताच्या खडकाचा काही भाग फोडून बोगद्यातून सहज चालता येईल इतका तो उंच करतात. हे द्वार बोगदे काही अंतरापर्यंत गेल्यावर दुसरा एक बोगदा व बोगद्यांना काटकोन करुन व पहिल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्याला समांतर खणून सलग लांब भिंतीचा खंड तयार करतात. या खंडाची लांबी अर्थातच दोन द्वार बोगद्यांमधील अंतराइतकी म्हणजे १०० मी. असते. खंडाचे छत प्रथम आधार देऊन पक्के करतात. काटेकोर सलग लांब भिंतीच्या पद्धतीत कोळशामध्ये सु. १२ सेंमी जाडीचा व सु. २ मी. खोलीचा काप कापणाऱ्या विशेष प्रकारच्या यंत्राने कोळशाच्या थराचा खालचा भाग कापून काढतात. मग कोळशामध्ये सुरुंग उडवून देतात. त्यामुळे अगोदरच खालून कापून काढलेल्या कोळशाच्या खंडाचे तुकडे तुकडे होऊन ते खाली पडतात. हा खणलेला माल मग हाताने, यंत्राने किंवा वाहक पट्ट्याच्या साहाय्याने वाहून नेण्यास सुरुवात होते. प्रथम हा माल खाणकाम चाललेल्या भागाच्या लांबीच्या दिशेत असणाऱ्या बोगद्यातून ज्या द्वार बोगद्यात अगोदरच रूळमार्ग, वाहकपट्टे इ. वाहतुकीची सोय केलेली असते तिकडे नेला जातो. द्वार बोगद्यामधील वाहक पट्ट्यावरून कोळसा मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर पोहोचविला जातो. एका संपूर्ण खंडाचा माल वाहून नेल्यावर काम करावयाच्या पृष्ठाजवळचा वाहक पट्टा व तेथील आधाराचे सामान एक खंडाच्या रुंदीच्या अंतराइतके पुढे नेतात. तसेच मुख्य द्वार बोगद्यातील पट्टेही तितक्याच अंतराने पुढे वाढविले जातात. या वाढविलेल्या मार्गावर पक्के आधाराचे खांब, कमानी वगैरे उभारतात. इतके झाल्यावर कामाचे एक चक्र पूर्ण होते व नंतर तसेच दुसरे चक्र सुरू होते. सामान्यतः (१) छेद कापून खंड फोडून काढणे (२) खणून मोकळ्या झालेल्या भागात टाकाऊ मालाची भर घालणे आणि (३) खाणकाम करावयाच्या पृष्ठाजवळची यंत्रसामग्री, अवजारे, तसेच वाहक पट्टे वगैरे पुढे सरकविणे ही कामे एका पाठोपाठ केली जातात. सुमारे चोवीस तासांत एक चक्र पूर्ण होते. एक घ.मी. कोळसा सु. ०·९५ टन वजनाचा असतो. १·२५ मी. जाडीचा १०० मी. लांब व २ मी. खोलीचा खंड कापून दर दिवसाला सु. २१० टन उत्पादन करता येते. या कामासाठी प्रत्येक खंडात सु. ६० कामगार लागतात.
खाणकाम पुढे सरकल्यावर मागे जी पडीक मोकळी जागा राहते ती अंशतः किंवा पूर्णपणे खडकांचे तुकडे टाकून भरून काढतात. पोकळी अंशतः भरून काढताना दगडाच्या भिंती बांधून एकाआड एक असणाऱ्या लांबट पट्ट्यासारख्या भागांमध्ये भर ओततात. कोळशाच्या आजूबाजूच्या व छताच्या खडकांचे बल विचारात घेऊन भरीचे पट्टेदेखील कधीकधी पूर्णपणे भरतात किंवा त्यांत आडवे कप्पे करुन ते एकाआड एक भरतात. खाणीच्या वरच्या भागातील जमीन ओसाड असेल आणि ती खचली तरी चालणार असेल, तर कित्येकदा खणून मोकळ्या झालेल्या खंडातले छप्पर फुटून खाली कोसळू दिले जाते. या पद्धतीला ढासळून देण्याची किंवा पोखरण्याची सलग लांब भिंतीची पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत रस्ता मजबूत व सुरक्षित रहावा म्हणून द्वार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बांधलेल्या दगडाच्या भिंतीच काय त्या आधारासाठी म्हणून राहतात. कधी कधी सलग लांब भिंतीचे खाणकाम पिछेहाटीच्या पद्धतीने केले जाते. मुख्य वाहतुकीच्या रस्त्यापासून निघणारे द्वार रस्त्याचे बोगदे कोळशाच्या थराच्या सीमेपर्यंत नेतात. सीमेजवळ खाणकाम करण्यासाठी सलग लांब खंड वरच्याप्रमाणे कापून खणून काढतात. त्यानंतर एका पाठीमागचा एक असे खंड खणत मुख्य वाहतुकीच्या रस्त्याकडे मागे मागे येतात.
वरील दोन्ही प्रकारच्या सलग लांब भिंतीच्या पद्धती कोळशाच्या विविध प्रकारच्या थरांमध्ये वापरता येतात. ब्रिटनमध्ये ३० सेंमी. पासून ते १३-१४ मी. पर्यंत जाडीचे थर या पद्धतीने खणून काढतात. तसेच ४५ अंशांहून थोडी अधिक नती असलेले थरदेखील या पद्धतीत थोडेफार फेरफार करून खणून काढण्यात आलेले आहेत. जास्त खोलीवरचे कोळशाचे थर शक्यतो या पद्धतीने खणून काढावे लागतात कारण रिकाम्या खोल्या व खांब पद्धतीने त्यांचे खाणकाम केल्यास खांब वरच्या थराचे ओझे पेलू शकत नाही आणि छप्पर कोसळण्याची किंवा वरची जमीन खचण्याची शक्यता असते. इतर कुठल्याही पद्धतीपेक्षा सलग लांब भिंतीच्या पद्धतीने अधिक प्रमाणात कोळसा खणून बाहेर काढता येतो व रोजचे उत्पादनही बरेच करता येते.
खाणकामातील छताला व भिंतींना आधार देण्याची कामे : भूमिगत खाणकाम करून माल बाहेर काढल्यावर पोकळी निर्माण होते. बऱ्याच वेळा अशा पोकळीमध्ये छतास व भिंतींना आधार देण्याची कामे न केल्यामुळे किंवा ती व्यवस्थित व योग्य प्रमाणात न केल्यामुळे वरची जमीन खाली खचून खाणीत व खाणीच्या वरच्या बाजूस भूपृष्ठावर नुकसान होण्याची व कधी कधी प्राणहानीदेखील होण्याची शक्यता असते. जमीन थोडी खचली तर खाणीच्या इमारती, पाण्याचे आणि वायूचे नळ, रस्ते, रूळमार्ग इत्यादींचे नुकसान होऊ शकते. निक्षेप थरांचा बनलेला असेल व एक थर खणून काढल्यावर जमीन खचून ढासळू लागली, तर दुसरे थर खणून काढणे अवघड व कधी कधी अशक्य होते. काही थोड्या निक्षेपांच्या छताच्या जागी क्वॉर्ट्झाइट किंवा घट्ट मजबूत चुनखडीचे खडक यांसारखे खडक असल्यामुळे बाहेरचा कृत्रिम आधार न देता निखननाचे गाळे उघडून सुरक्षितपणे व यशस्वीरीत्या खाणकाम केल्याची उदाहरणे आहेत. परंतु सामान्यतः भूमिगत खाणकाम करताना भिंतींना, छताला तसेच निखननाच्या गाळ्यांच्या पाठीकडच्या बाजूंना आधार देण्यासाठी थोडी फार तरी कामे करावीच लागतात.
आधार देण्याचे पदार्थ : भूपृष्ठावर करण्यात येणाऱ्या निरनिराळ्या बांधकामासाठी ज्या प्रकारचे पदार्थ वापरले जातात, तेच पदार्थ भूमिगत खाणकामात आधार देण्याच्या कामासाठी वापरतात. मात्र भूमिगत जागी परिस्थिती वेगळी असल्यामुळे हे पदार्थ काही विशिष्ट प्रकाराने वापरावे लागतात. खडकांचा दाब व तापमान खोलीनुसार बदलतात. तसेच आधारासाठी वापरण्यात येणार्या पदार्थांवर खाणीतील हवा व पाणी यांची विक्रिया होते. यामुळे भूमिगत खाणीत आधार देण्याची कामे करताना बऱ्याच प्रमाणात अधिक खबरदारी घ्यावी लागते व भूपृष्ठावरील कामात वापरण्यात येणाऱ्या मालापेक्षा अधिक माल वापरावा लागतो. खाणकाम केल्यानंतर उघड्या पडलेल्या जागी सामान्यतः वापरण्यात येणारे पदार्थ म्हणजे लाकूड, दगड, विटा, वाळू, सिमेंट व पोलाद हे होत.
लाकूड : अगदी सुरुवातीच्या काळी बहुतेक खाणींत लाकडाचाच जास्त उपयोग होत होता कारण लाकूड मिळविणे सहज शक्य होते. लाकडाचे हव्या त्या आकाराचे सांगाडे करणेही सोपे असते. तसेच लाकडामध्ये त्याच्या वजनाच्या मानाने सापेक्षतः बरेच बल व काठिण्य असते. आधारासाठी वापरावयाच्या लाकडात फटी, कीड वगैरे नसाव्यात आणि ते सुके व जड असावे. आधाराच्या कामामध्ये उपयोग करताना लाकडाचे खांब, तुळया व फळ्या वापरतात. खांबांच्या व तुळयांच्या कमानी करून वापरतात. जाड खांब किंवा ओंडके सरळ व आडवे एकावर एक रचून त्यांचे उंच स्तंभ करून आधार देतात किंवा लाकडी खांबांचे चौरस सांगाडे करून वापरतात. लाकूड महाग होऊ लागल्यानंतर इतर पदार्थांचा आधाराच्या कामासाठी उपयोग होऊ लागला. बऱ्याच खाणींत काही काळ दगड आणि विटा वापरीत, पण हल्ली जगभर प्रबलित (पोलादी सळयांनी अधिक बलयुक्त केलेले) काँक्रीट आणि पोलादी खांब यांचा कायम टिकणाऱ्या आधारांच्या कामासाठी उपयोग होऊ लागला आहे.
प्रबलित काँक्रीट : खाणीच्या मुख्य कूपकांच्या भिंतींच्या बांधकामासाठी प्रबलित काँक्रीट मोठ्या प्रमाणात वापरतात. बऱ्याच कूपकांत हे बांधकाम तळापासून अगदी वरपर्यंत केलेले असते पण जर कूपक अगदी कठीण, मजबूत खडकात असेल, तर कूपकात खालून वरपर्यंत मधेमधे काही अंतर सोडून प्रबलित काँक्रिटाची कूपकाच्या आकाराची अनेक कडी तयार करून बसवितात. खाणीतील बोगदे आणि इतर काही उघड्या जागीदेखील काँक्रिटाचे बांधकाम करतात. निरनिराळ्या पातळ्यांवर असणारी मालवाहतुकीची स्थानके आणि धक्के काँक्रिटाचे बांधलेले असतात.
पोलाद : पोलादाचे खांब व तुळया कूपकांमध्ये तसेच बोगद्यांमध्ये आधारासाठी वापरतात. I अशा आकाराचे अनुप्रस्थ छेद असलेले खांब तुळयासाठी व H अशा आकाराचे छेद असलेले खांब उभे आधाराचे खांब म्हणून वापरतात. कोलारच्या सोन्याच्या खाणीत अगोदर इतर कामांसाठी वापरून टाकाऊ झालेले रूळमार्गाचे रूळ आधाराच्या कामासाठी वापरतात. दोन रूळ एकत्र जोडून लंबवर्तुळ तयार करतात आणि ते कूपकांच्या व बोगद्यांच्या भिंतींमध्ये ठोकून बसवितात.
खडकाच्या चुऱ्याची भर : भूमिगत खाणकाम करताना खणलेला भाग बाहेर काढल्यावर छत कोसळू नये व वरची जमीन खचू नये म्हणून कायम स्वरूपाचा आधार देणे आवश्यक असते. अशा वेळी दगड, गोटे, माती व खाणकामाच्या पूर्वतयारीच्या व प्रत्यक्ष कामाच्या वेळी तयार झालेला आजूबाजूच्या खडकाचा चुरा मोकळ्या झालेल्या जागेत भर म्हणून ओततात. कित्येक खाणींमध्ये खणून रिकाम्या झालेल्या मोकळ्या जागी नदीतून वाहत आलेली वाळू, रेती वगैरे भर म्हणून ओततात. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा वगैरे नद्यांच्या खोऱ्यांत वाळू विपुल प्रमाणात आढळते व नद्यांबरोबर सतत वाहून येणाऱ्या नव्या गाळामुळे तिच्यामध्ये अधिकच भर पडत असते. बिहार, बंगाल वगैरे ठिकाणच्या भूमिगत खाणींत उदा., दामोदर नदीच्या खोऱ्यातील कोळशाच्या अनेक खाणींत, खाणींच्या जवळपास असणाऱ्या नद्यांतील वाळू खणून रिकाम्या झालेल्या निखननाच्या गाळ्यांत ओतून ते भरून काढतात. ही वाळू सामान्यत: बारीक ते मध्यम आकारमानाची असते. वाळू व पाणी यांचे मिश्रण मोठाल्या नळातून खाणकामाच्या जागी पोहोचविण्यात येते. वाळूतील पाणी झिरपून खाली निघून जाते किंवा वाहून इतरत्र जाते. बऱ्याच वेळा वाळू सुकताना पाण्यात असलेल्या सिलिकामय अथवा कार्बोनेटी संयोजकांनी (सिमेंटांनी) ती संयोजित केली जाते व पक्की होते.
खाणीतील कृत्रिम वायुवीजन : जसजसे खाणकाम खोल जाऊ लागते आणि त्याचा विस्तार वाढत जातो तसतसे खाणीत चांगली शुद्ध हवा खेळविण्याचे काम वाढत जाते आणि ते अधिक अवघड व गुंतागुंतीचे होऊन बसते. खाणकामाच्या जागी वापरात येणाऱ्या एंजिनांतून, यंत्रांतून अपायकारक वायू व धूर बाहेर टाकले जातात. कधी कधी खाणीतील निक्षेपातूनच विषारी वायू बाहेर पडतात. जसजसे खोल जावे तसतसे खाणीतील तापमान पुढील कारणांनी वाढत जाते : (१) हवेच्या अक्रमी (उष्णता दिली व घेतली न जाता) संपीडनामुळे (दाबली जाण्याने) दर किमी. खोलीला सरासरी ३०° से. इतकी तापमानात वाढ होते. (२) मजुरांचा श्वासोच्छ्वास, यंत्रे व दिवे यांच्यापासून निर्माण झालेली उष्णता, (३) सुरुंग वगैरे स्फोटक द्रव्यांच्या स्फोटांतून तयार झालेली उष्णता व (४) पायराइटासारख्या पदार्थांचे ऑक्सिडीकरण झाल्यामुळे बाहेर पडणारी उष्णता. उच्च तापमान व उच्च आर्द्रता यांमुळे मानवाची सहनशक्ती आणि कार्यक्षमता मर्यादित होतात. काही गरम खाणींमध्ये कामगाराची कार्यक्षमता अगदी थोड्या वेळात जवळजवळ नाहीशी होते. अशा वेळी खाणीतील हवा कृत्रिम रीतीने थंड करावी लागते. शुद्ध हवा खाणीत खेळविण्यापूर्वी खाणीत जर अपायकारक विषारी किंवा घातक वायू असतील, तर ते अपायकारक न होतील इतके विरळ करावे लागतात किंवा पूर्णपणे बाहेर घालवून द्यावे लागतात. स्फोटामुळे तयार होणारी धूळ व गरम वायू बाहेर काढून टाकावी लागतात. अधिक खोलीवरच्या खाणीत नुसती साधी हवा पुरवून भागत नाही, तर ती थंड करण्याची व्यवस्थादेखील करावी लागते. यासाठी भूमिगत ठिकाणी ज्या नळांच्या भोवती थंड पाणी वाहत असते अशा उष्णतेचा विनिमय करणाऱ्या नळांतून हवा फुंकून तिचे वातानुकूलन करावे लागते किंवा हवा थंड करणारे मनोरे वा थंड फवारे उडविणारे मनोरे वापरावे लागतात. ही यंत्रे विजेवर किंवा डीझेलावर चालतात. खाणीत हवा खेळविण्याच्या बाबतीत पुढील तीन मुख्य तत्त्वे ध्यानात घ्यावी लागतात : (१) हवा आत जाण्याच्या व बाहेर येण्याच्या जागी असलेल्या दाबांमध्ये फरक असेल, तर हवेचा झोत वाहण्यास सुरुवात होते (२) खाणीतील भिंती, खांब व इतर बांधकाम यांमुळे वाहत्या हवेला अडथळा निर्माण होऊन तिचा दाब कमी होतो आणि (३) हवा नेहमी उच्च दाबाच्या जागेपासून कमी दाबाच्या जागेकडे वाहते. शिवाय खाणीत वाहणारा हवेचा प्रवाह हा विक्षुब्ध असतो म्हणजे हवेचे आकारमान व तिचा दाब यांच्यातील संबंध वर्गाच्या पटीचा असतो. दुप्पट आकारमानाची हवा पाहिजे असल्यास चौपट दाब वाढवावा लागतो. वायुवीजनातील पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुरक्षित व आरोग्यदायक वातावरण खाणीच्या जागी निर्माण करायला किती हवा लागेल, हे माहीत करून घेणे. प्रत्येक माणसाला दर मिनिटाला सामान्यतः २·८३ ते ५·६५ घ. मी. ताजी हवा लागते. काही गोष्टींमुळे यापेक्षा कमीअधीक हवादेखील चालू शकते. रस्त्यात येणारे अडथळे, भिंतीवरील घर्षण, रस्त्यांची वळणे इत्यादींमुळे प्रतिकार होऊन कमी होणाऱ्या दाबास पुरून उरण्याइतका दाब खाणीत हवा खेळविताना निर्माण करावा लागतो. मुख्य पंख्यांमुळे किंवा साहाय्यक पंख्यांमुळे साहाय्यक वायुवीजन निर्माण होते. भूमिगत जागी असणारे अधिक हवा खेळविणारे साहाय्यक पंखे हे वरच्या मुख्य पंख्यांना एकसरीत जोडलेले असतात, म्हणजे हे सर्व पंखे एकाच वेळी चालू होतात. या पंख्यांमुळे खाणीतील प्रतिगामी दाब कमी होतो व मुबलक हवा सगळीकडे खेळविली जाते. साहाय्यक पंखा लहान असतो व त्याचा दुसरा उपयोग वाऱ्याच्या झोताची दिशा बदलण्यासाठी होतो. त्यामुळे आडवे बोगदे, सरळ रस्ते, ऊर्ध्वगामी व अद्योगामी कूपक आणि खाणकामाचे गाळे या भागांमध्ये हवा खेळविली जाते. खाणींमध्ये हवेची हालचाल घडवून आणण्यासाठी व तिचे झोत निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे म्हणजे विमानांच्या परिचालकाच्या (रेटा निर्माण करणाऱ्या स्क्रूसारख्या पंख्याच्या) पात्यांप्रमाणे असणारे स्क्रू, केंद्रोत्सारी (हवा केंद्रापासून दूर ढकलणारे) पंखे, फिरणाऱ्या फुंकण्या, हवा आत ढकलणाऱ्या फुंकण्या, हवा खेळविणाऱ्या शेगड्या, मोकळी व गरम हवा सोडणाऱ्या शेगड्या, पाण्याचे फवारे, हवा वाहण्याची दिशा बदलणारे सुकाणू किंवा तत्सम यंत्र ही होत.
भूमिगत वाहतूक : ट्रॅमगाड्या, रूळमार्गी मालगाड्या किंवा लोखंडी तारांच्या दोराने ओढण्यात येणाऱ्या मालगाड्या यांचा उपयोग खाणीतील मालवाहतुकीसाठी पूर्वी बराच होत असे. त्यांच्याऐवजी हल्ली डीझेलवर किंवा विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा जास्त उपयोग होऊ लागला आहे. काही खनिजांच्या खाणींत, विशेषतः कोळशाच्या खाणीत, हल्ली वाहक पट्टे अगदी खाणकामाच्या जागेपासून ते भूपृष्ठावर, जेथे चांगल्या प्रतीच्या खनिजांचे एकत्रीकरण, शुद्धीकरण वगैरे करतात तेथपर्यंत मालाची वाहतूक करतात. ज्या खाणींमध्ये वाहक पट्टे वापरून मालाची वाहतूक करतात तेथे इतर माल, यंत्रे, अवजारे इ. खाणकामाच्या जागी नेण्यासाठी मात्र अडचणी निर्माण होतात. काही खाणींत सापेक्षतः मोठे बोगदे खणून ह्यांच्या तळाजवळच्या भागातून पट्ट्यांच्या किंवा इतर साहाय्याने मालाची वाहतूक करतात आणि छतापासून लटकत असणाऱ्या विजेच्या तारांवरून लोंबत्या पाळण्यातून मजुरांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करतात. सामान्यतः माणसांची ये-जा विशेष प्रकारच्या सुरक्षित अशा पाळण्यांतून किंवा डब्यांतून केली जाते. काही ठिकाणी सहज हालचाल करू शकणार्या किंवा वळणे घेऊ शकणाऱ्या गाड्या उदा., एकरुळी आगगाडी, डीझेलाचे ट्रॅक्टर, लहान बसगाड्या इ. मजुरांसाठी वापरतात.
खाणीत फोडलेल्या मालाचे भूपृष्ठाकडे उच्चालन : एक किंवा अधिक कप्पे अथवा मजले असलेल्या तसेच मजल्याचा प्रत्येक कप्पा एक किंवा दोन मालडबे वाहून नेऊ शकेल अशा पाळण्यातून खाणीतून फोडलेला माल खालून वर भूपृष्ठावर वाहून नेतात. कधी कधी फोडलेला माल हा मालगाडीच्या डब्यांतून न वाहता मोठाल्या पेट्यांतून वाहतात. सामान्यतः प्रत्येक कूपकात अशा प्रकारचे दोन दोन पाळणे एकाच वेळी वर खाली ये-जा करीत असतात. हे पाळणे लोखंडी तारांच्या एका लांब दोराच्या टोकांना बांधलेले असतात. हा मजबूत दोर एका मोठ्या वृत्तचितीभोवती (सिलिंडराभोवती) गुंडाळलेला असतो. विजेच्या साहाय्याने वृत्तचिती फिरत असताना तो एका बाजूने गुंडाळला जातो, तर दुसऱ्या बाजूने उलगडला जातो. त्यामुळे एका बाजूचा भरलेला पाळणा वर येत असतो, तर दुसऱ्या बाजूचा रिकामा पाळणा खाली जात असतो. पुढच्या फेरीमध्ये पाळण्याची ये-जा उलट होते.
खाणीतील दिवाबत्ती : टोपीमधील दिवे, झोत दिवे, हातातून सहज नेता येण्यासारख्या विजेऱ्या, मालवाहक गाड्यांवरील व हालचाल करणाऱ्या यंत्रांवरील दिवे ही खाणीतील प्रकाशाची चल साधने होत. पूर्वी उघड्या ज्योतीचे कार्बाइडाचे दिवे, कंदील वगैरे वापरीत असत. परंतु कित्येकदा अशा दिव्यांमुळे मोठे स्फोट होऊन आगी लागून मोठे नुकसान आणि प्राणहानी होई. पुढे सुरक्षित असा डेव्ही यांचा संरक्षक दिवा वापरात आला. हल्ली विद्युत् घटावर चालणारे दिवेच बहुतेककरून वापरतात. स्थिर जागी म्हणजे कूपकात, बोगद्यात, स्थानकांच्या ठिकाणी, खाणकामाच्या गाळ्यात विजेचे दिवे किंवा नळ्या वापरून उजेडाची व्यवस्था करतात.
खाणीतील पाण्याचा निचरा : भूपृष्ठावरून आणि भूमिगत पाण्याच्या साठ्यापासून खाणीमध्ये पाणी वाहत येऊ न देण्यासाठी प्रथम खबरदारी घ्यावी लागते. असे पाणी योग्य प्रकारे वाहून नेणे व शेवटी संपूर्ण काढून टाकणे ही कामे खाणीतील पाण्याच्या निकासासाठी (निचऱ्यासाठी) करावी लागतात. ही निकासाची कामे करण्यापूर्वी खाणीतील पाण्याच्या गुणधर्मांची तपासणी करावी लागते. (१) पाण्याच्या आढळाचा प्रकार, (२) त्याचे संक्षारक व अपरदनकारी (गंजण्यास व झीज होण्यास कारणीभूत होणारे) गुणधर्म, (३) एकूण हाताळावयाच्या पाण्याचे प्रमाण, (४) स्वस्त पद्धतीने पाण्याची विल्हेवाट लावण्याचे मार्ग इ. गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्या लागतात. पाणी अडविण्यासाठी भिंती बांधणे, लहान मोठ्या टाक्या बांधणे, पाट काढणे इ. गोष्टी स्वस्तात करता येतात. काही ठिकाणी भिंतींना व छतांना सिमेंट काँक्रिटाचे पक्के गिलावे करून पाण्याचे झिरपणे बंद करता येते. कधी कधी पाणी वाहून नेण्यासाठी गटारे व बोगदेदेखील खणून काढावे लागतात. खाणीतील पाणी पिण्यालायक असेल, तर ते मलरहित राखण्यासाठी काळजी घ्यावी लागते. वरील उपायानंतरही जास्त पाणी साचत व वाहत असेल, तर ते पंपांनी उपसून बाहेर काढावे लागते. यासाठी कित्येकदा वाहते पाणी अडवून साठविण्यासाठी टाकी बांधावी लागते तसेच खाणीत ठिकठिकाणी आढळणारे पाणी गटारे, नळ किंवा बोगदे यांच्यातून टाकीत आणून सोडावे लागते. कधी कधी अनेक पंप एकमेकांना जोडून पाणी उपसण्याचे काम करावे लागते.
काही खनिज निक्षेपांखाली, विशेषतः थरांच्या निक्षेपांखाली, प्रचंड दाब असलेले पाणी मोठ्या प्रमाणात भूमिजलाच्या स्वरूपात साठत असते. या पाण्याला रिकामी पोकळी मिळाल्यास ते मोठ्या जोराने झोताच्या स्वरूपात भूपृष्ठावर उसळून येते व त्याची कारंजी निर्माण होतात. या प्रकाराला आर्टेशियन विहिरी असे म्हणतात. भारतातील नेव्हेली येथील लिग्नाइटाच्या थराखाली असे पाणी अतिशय मोठ्या प्रमाणात व प्रचंड दाबाखाली आहे. तेथे १४·३ चौ.किमी. क्षेत्रात पसरलेला सु. २० कोटी टन वजनाचा लिग्नाइटाचा भूमिगत साठा आहे. लिग्नाइटाच्या थराची जाडी सरासरी १५ मी. असून त्यावर ५५ ते ७० मी. जाडीचे इतर खडकांचे, गाळाचे व मृदेचे थर आहेत. येथील खाणकाम पट्ट्याच्या खाणी उघडून केले जाते. वरच्या ओझ्यापैकी ३०–४० मी. जाडीचा खंड कापून खणून काढल्यास खालच्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे आगळीच अडचण निर्माण होऊन त्रास होतो. सुरुवातीला अशा रीतीने वरचे ओझे खणून बाजूला सरकविताना असे आढळून आले की, खालचे प्रचंड दाब असलेले पाणी हे लिग्नाइटाचा थर व उरलेला न खणलेला वरच्या खडकांचा थर उद्ध्वस्त करून, उसळी मारून वर येते आणि खणलेल्या भागात पूर येतो व खाणकाम करणे अशक्य होते. यामुळे लिग्नाइटाच्या थराखाली असणारे पाणी पंप वापरून उपसा करण्याची प्रथम सोय करावी लागते. १९६३ साली सु. ५० पंप या पाण्याचा उपसा करण्यासाठी बसविण्यात आले. तेव्हापासून हे पंप दर मिनिटाला सु. १,९८,००० लि. पाणी सतत उपसत आहेत. खाणीचा विस्तार पूर्ण झाल्यावर दर मिनिटाला सु. २,१६,००० ते २,३४,००० लि. पाणी उपसावे लागेल व त्यासाठी अधिक पंप वापरावे लागतील.
अनावश्यक मालाची विल्हेवाट : खाणकाम करीत असताना, धातुकाचे शुद्धीकरण करताना, तसेच धातुकातून धातू गाळताना तयार होणारा खडकाचा चुरा आणि निक्षेपातील अनावश्यक गाळ हे कसे व कोठे नेऊन टाकावेत आणि त्यांची विल्हेवाट कशी लावावी, हा एक त्रासदायक प्रश्न खाणकामाच्या धंद्यात हाताळावा लागतो. सामान्यतः असला रद्दी माल खाणीच्या जवळच्या भागात नेऊन ओतणे व त्याचे ढीग रचणे, हा स्वस्त व साधा मार्ग असतो पण खाणीचा विस्तार मोठा होणार असेल तर हा माल दूर नेऊन टाकावा लागतो. अशा प्रकारच्या रद्दी मालात कधीकधी गाळून घेतलेल्या धातुव्यतिरिक्त इतर धातूंची विद्राव्य (विरघळणारी) संयुगे असतात व पुढे मागे ती उपयोगात आणता येतात. भविष्य काळात हे पदार्थ वापरता यावेत आणि ते जागच्या जागी टिकून रहावेत, म्हणून सुरक्षित व पक्क्या जागी अशा मालाचे ढीग रचणे योग्य ठरते. ढीग रचावयाची जागा भुसभुशीत किंवा सच्छिद्र नसावी तसेच या जागेच्या जवळपास स्वच्छ व शुद्ध पाण्याचे झरे, ओढे, नद्या इ. असल्यास तू दूषित होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. शेतीची चांगली जमीन या निरुपयोगी कामासाठी वापरली जाऊ नये किंवा पिकाला अपायकारक पदार्थ शेतजमिनीत जाऊन पडू नयेत अशी काळजी घ्यावी लागते.
खाणीतील शक्ती पुरवठा : पुढील पाच निरनिराळ्या प्रकारांनी खाणकामासाठी शक्तीचा पुरवठा करण्यात येतो : (१) वीज, (२) डीझेल तेल, (३) संपीडित हवा, (४) द्रवदाब व (५) वाफेची शक्ती.
(१) वीज : जलविद्युत् सामान्यतः दूरवरून खाणीच्या जागेपर्यंत आणलेली असते. बऱ्याच वेळा ती स्वस्त असते. प्रथम ती भूपृष्ठावर खाणीच्या जागेतील मुख्य विद्युत् गृहामध्ये आणून मग तिचा विद्युत् दाब कमी करून ती खाणीमध्ये खेळवली जाते. या विजेचा मुख्य उपयोग धातू गाळण्यासाठी केला जाताे. दुसरा उपयोग खाणकामाची यंत्रे, गाड्या, पाळणे इ. चालविण्यासाठी व दिव्यांसाठी होतो. कधी कधी गरजेनुसार खाणीजवळही जलविद्युत् तयार करतात. प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणारा) आणि एकदिश (एकाच दिशेने वाहणारा) हे दोन्ही प्रकारचे विद्युत प्रवाह खाणकामात वापरतात. एकदिश विद्युत् प्रवाह रूळमार्गी गाड्यांची एंजिने व इतर पुष्कळ यंत्रे चालविण्यासाठी वापरतात. प्रत्यावर्ती प्रवाहाचा उपयोग विशेष करून उघड्या खाणींमध्ये व उघड्या पट्ट्याच्या खाणींमध्ये केला जातो. प्रत्यावर्ती प्रवाहाची साधने व यंत्रे कमी खर्चात चालतात व त्यांची व्यवस्था व दुरुस्ती ही कामे सापेक्षतः सोपी व साधी असतात. आवश्यक अशा कामासाठी प्रत्यावर्ती प्रवाह एकदिश प्रवाहात बदलून घेतात. संपूर्ण खाणीतील विजेच्या वाटपाचे विभागीकरण केलेले असते. यामुळे एखाद्या विभागात प्रवाह बंद पडल्यास तेवढा विभाग बाकीच्या भागापासून वेगळा करुन तेथे दुरुस्त्या करता येतात.
खाणीच्या मुख्य स्थानकामध्ये असणाऱ्या अत्युच्च विद्युत् दाबाचे भूमिगत उपस्थानकांमध्ये ४४० व २२० व्होल्टमध्ये रूपांतर करून मग वीज ठिकठिकाणी खेळविली जाते. काही उघड्या पट्ट्यांच्या खाणींमध्ये ३३,००० व्होल्ट विद्युत दाबाचे ७,३०० ६,६०० ४,१६० किंवा २,३०० व्होल्टच्या विद्युत् दाबात रूपांतर करतात.
(२) डीझेल तेल : ही शक्ती सुलभ व सहज फेरफार करता येण्यासारखी असल्यामुळे कोळसा सोडून इतर खाणकामासाठी डीझेलाचा बराच उपयोग होऊ लागला आहे. काही ठिकाणी मात्र डीझेलावर चालणारी यंत्रणा वापरण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागते. (अ) स्फोट न होईल अशा प्रकारे डीझेलाचे यंत्र बांधलेले असावे लागते, (आ) यंत्रापासून निर्माण होणारा धूर वाहून नेण्यासाठी हवा योग्य प्रकारे खेळती असावी लागते, (इ) बाहेर पडणारे गरम वायू व पृष्ठांचे तापमान यांवर नियंत्रण असावे लागते, (ई) यंत्रातून बाहेर पडणाऱ्या वायूंमध्ये भोवळ, चक्कर आणणारे किंवा विषारी वायू नसावेत, (उ) डीझेल तेल चांगल्या प्रतीचे निवडणे, त्याची काळजीपूर्वक वाहतूक करणे व सुरक्षित असा साठा करणे इतक्या सर्व गोष्टींची पाहणी केल्यानंतर डीझेलाची यंत्रे वापरण्याचा परवाना मिळतो.
(३) संपीडित हवा : माल उचलून घ्यावयाची यंत्रे, घर्षण यंत्रे, वेधन यंत्रे, खोदाईची यंत्रे, शक्तीवर चालणारी फावडी-खोरी यांच्यामध्ये व अशा प्रकारच्या अनेक यंत्रांमध्ये प्रचंड दाबाखाली असलेल्या हवेची शक्ती वापरतात. कोळसा खणण्याकरिता आणि त्याच्या थरांत स्फोट करण्यासाठी संपीडित हवा वापरतात. हे करण्यासाठी ६३० ते ७०० किग्रॅ./चौ. सेंमी. दाबाची हवा असावी लागते. कोळशामध्ये भोक पाडून त्यात ठेवलेल्या नळीमध्ये इतक्या दाबाची हवा एकदम सोडतात. त्यामुळे नळीचे तुकडे होऊन अगोदरच चोहोबाजूंनी कापलेल्या कोळशाच्या खंडाचे अनेक लहान तुकडे होतात.
(४) द्रवदाब शक्ती : खाणकामामध्ये द्रवदाब शक्ती कमी प्रमाणात वापरली जाते. पाणी किंवा तेल यांचा द्रव म्हणून उपयोग करतात. तेल वापरून निर्माण केलेला दाब हा लहान हत्यारे, वर-खाली जाणारे पाळणे आणि सतत चालणाऱ्या जटिल (गुंतागुंतीच्या) यंत्रांत वापरतात. द्रवदाब शक्तीचा एकमेव प्रमुख उपयोग म्हणजे पाण्याचा जोरदार झोत प्लेसरांवर किंवा तत्सम खडकांवर टाकून त्या निक्षेपातील जड व मौल्यवान खनिजे एकत्र गोळा करुन बाजूला काढतात. याला झोत खाणकाम म्हणतात. गिल्सोनाइट नावाचा घन हायड्रोकार्बन पाण्याच्या अशा प्रकारच्या झोताने कापतात. या कामासाठी दर मिनिटाला १,३५० लि. पाणी लागते.
(५) वाफेची शक्ती : पूर्वी पुष्कळ यंत्रे व एंजिने चालविण्यासाठी वाफेचा उपयोग केला जात असे. कित्येक संपीडक यंत्रे, रूळमार्गी गाड्यांची एंजिने, वर-खाली जाणारे पाळणे हे वाफेवर चालत. ज्या ठिकाणी लाकूड, कोळसा यांच्यासारखे इंधन जास्त प्रमाणात मिळते तेथे वाफ तयार करण्यासाठी हेच इंधन वापरतात.
समुद्रातील खाणकाम : यामध्ये समुद्राचे पाणी तसेच समुद्रतळ व त्याखालील खडक यांच्यातून खनिज संपत्ती मिळविण्याच्या कार्याचा समावेश होतो. १९६० सालापूर्वी फक्त तंत्रज्ञांनाच याची माहिती होती. आता त्यात अधिकाधिक लोक लक्ष घालीत आहेत. या खाणकामाकडे लक्ष वळण्याची प्रमुख कारणे पुढील होत : (१) खनिजांची जागतिक मागणी प्रचंड असून ती दिवसेंदिवस वाढत आहे, (२) बहुतेक प्रगत देशांतील भूपृष्ठावर दृश्यांश असणाऱ्या जवळजवळ सर्व निक्षेपांचे खाणकाम पूर्ण झाले असून अशा देशांतील खनिज संपत्ती वापरून कमी झाली आहे, (३) यामुळे कमी दर्जाच्या निक्षेपांपासून उपयुक्त खनिजे, धातू इ. पदार्थ मिळविणे खाणकाम उद्योगधंदेवाल्यांना क्रमप्राप्त होऊन बसले आहे व (४) समुद्रातील खाणकामाला उपयोगी अशा सागरी तंत्रामध्ये बरीच प्रगती झाली आहे.
समुद्राचे पाणी, अगदी खोल तळ, खंडाचा निधाय (समुद्रकिनाऱ्यालगतचा अगदी कमी उताराचा भाग) व खंडाचा उतार आणि समुद्रकिनारा या ठिकाणी सागरी संपत्ती आढळते. हे निक्षेप पुढील तीन प्रकारचे असतात : (१) पाण्यात विरघळलेले, (२) किनारा, निधाय व उतार आणि खोल तळ यांच्यावर पसरलेले परंतु घट्ट न झालेले सुटे पदार्थ व (३) तळावर पक्क्या खडकांच्या स्वरूपात असलेले निक्षेप. मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम, ब्रोमिन, पोटॅशियम, गंधक, स्ट्राँशियम, बोरॉन, युरेनियम व इतर ३० मूलद्रव्ये किंवा/व त्यांची लवणे पाण्यात विरघळलेल्या स्वरूपात असतात. यांव्यतिरिक्त समुद्र जलापासून शुद्ध पाणी मिळविता येते. सुटे व संहत (घट्ट असलेले) निक्षेप एक तर समुद्रतळाच्या पृष्ठभागावर पसरलेले म्हणजे उघडे पडलेले असतात किंवा जागच्या जागी संहत स्वरूपात असतात. या प्रकारांचे निक्षेप पुढील पानावरील कोष्टक क्र. १ मध्ये दिले आहेत.
भूमीवरील खाणकामांप्रमाणे या उद्योगधंद्यातही बाजारात माल प्रत्यक्ष विक्रीसाठी येण्यापूर्वी (१) निक्षेपाचा शोध, (२) त्याचा प्रकार व गुणधर्म, (३) किंमत, (४) त्याचे खाणकाम करण्याची शक्याशक्यता, (५) प्रत्यक्ष खाणकाम, (६) शुद्धीकरण व (७) धातू गाळणे किंवा विक्रीस योग्य पदार्थ तयार करणे या गोष्टी कराव्या लागतात. यांव्यतिरिक्त प्रत्यक्ष खाणकाम सुरू करण्यापूर्वी कराव्य लागणाऱ्या पूर्वतयारीच्या कामांमध्ये समुद्राच्या पाण्याचा विशेषतः ते खारे असल्यामुळे येणाऱ्या अडचणींचा विचार करावा लागतो. समुद्राच्या पृष्ठभागापासून ते पाण्याखाली असलेल्या निक्षेपापर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेली यंत्रणा, नळ, कूपक इ. सामग्री समुद्राच्या पाण्यात सतत रहात असल्यामुळे लाटा व पाण्याचा दाब यांना तोंड देण्याइतकी मजबूत असावी लागते. तसेच समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे त्यांच्यावर अपायकारक रासायनिक विक्रिया होऊ नयेत म्हणून काळजी घेणे आवश्यक असते. मात्र हल्ली मुख्यत्वेकरुन पाहणी करण्याचे व निक्षेप शोधण्याचेच काम चालू आहे. सध्याचे बहुतेक उत्पादन समुद्राचे पाणी, किनारपट्टी किंवा किनाऱ्याजवळील भाग यांवरील प्लेसर निक्षेप व किनाऱ्याजवळ असणारे घट्ट आणि संहत निक्षेप यांचे म्हणजे किनाऱ्याजवळच्या भागांतूनच होते.
समुद्राच्या पाण्यातून सोडियम, मॅग्नेशियम व ब्रोमीन हे मुख्यत्वेकरून काढतात. पैकी मिठाचे उत्पादन सर्वांत जास्त व त्या खालोखाल मॅग्नेशियमाचे होते.
सुट्ट्या प्रकारचे निक्षेप : सर्व प्रकारचे प्लेसर निक्षेप व थोड्याफार खोलीवर असणारे तत्रजात निक्षेप यात येतात. या भागात आढळणाऱ्या मँगॅनिजाच्या गुठळीयुक्त निक्षेपांमुळे व हिऱ्याच्या अपतटी खाणकामामुळे या धंद्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. अजूनही हे खाणकाम जुन्या रूढ पद्धतींनीच होते. गाळाचा उपसा करून हे निक्षेप बाहेर काढतात. यासाठी ओढदोऱ्या, बादल्या व पकडी यांनी युक्त अशी उपसा यंत्रे, जलीय उपसा यंत्रे, वातशक्तिचलित उच्चालक इ. वापरतात. यांतील बहुतेक सर्व यंत्रे जास्तीत जास्त ७० मी. व जलीय उपसा यंत्रे १०० मी. खोलीपर्यंतचे निक्षेप खणून काढतात. १९६८ साली ७० ठिकाणी उपसा करुन खाणकाम चालू होते. ते मुख्यत्वेकरून घट्ट न झालेल्या सुट्या निक्षेपांचेच होते. या खाणकामाच्या एकूण उत्पादनाच्या ६० टक्के उत्पादन वाळू व गोटे यांचे होते. इतर महत्त्वाची खनिजे इल्मेनाइट, रुटाइल आणि झिर्कॉन ही होती. ही सर्व ऑस्ट्रेलियातील होती.
कोष्टक क्र. १. समुद्रातील सुटे व संहत खनिल निक्षेप | ||||||||
सुटे | संहत | |||||||
तळाच्या पृष्ठावर पसरलेले | जागच्या जागी असणारे | पृष्ठावरील | जागच्या जागी असणारे | |||||
उथळ किनारा व अतपटी भागातील प्लेसरांचे निक्षेप : |
गाडले गेलेले किनाऱ्यावरील किंवा नादेय प्लेसर: |
उघडे पडलेले स्तरित निक्षेप : | विखुरलेले घन, शिरांतील किंवा ठोकळ्यांच्या आकाराचे निक्षेप : | |||||
जड खनिजांची वाळू,
लोहाची वाळू, सिलिकेची वाळू व गोटे. चुन्याची वाळू, वाळू व गोटे. |
हिरे, सोने, प्लॅटिनम कथिल यांचे प्लेसर. | कोळसा, लोह धातुक, चुनखडक. | कोळसा, लोह,
कथिल, सोने, गंधक, धातूंची सल्फाइडे, धातूंची लवणे. |
|||||
तत्रजात निक्षेप :
कोबाल्ट, निकेल, तांबे,मँगॅनीज यांच्या गुठळ्या,फॉस्फोराइटाच्या गुठळ्या, फॉस्फोराइटाची वाळू, ग्लॉकोनाइटाची वाळू. |
जड खनिजे :
मॅग्नेटाइट, इल्मेनाइट,रूटाइल, झिर्कॉन,ल्युकॉक्झीन, मोनॅझाइट,क्रोमाइट, शीलाइट,वुल्फ्रॅमाइट. |
तत्रजात लेप :
मँगॅनीज ऑक्साइड त्याबरोबर कोबाल्ट, निकेल, तांबे आणि फॉस्फोराइट. |
(अपतटी म्हणजे किनाऱ्यापासून दूर, नादेय म्हणजे नदीच्या तळावर निक्षेपित झालेले, तत्रजात म्हणजे जेथे आढळतात तेथेच तयार झालेले).
थायलंड व इंडोनेशिया येथे कथिलाचे उत्पादन झाले व किनाऱ्यावरील आणि अपतटी भागांतून होणाऱ्या एकूण उत्पादनाचा ३ टक्के भाग सागरी हिऱ्यांचा होता.
घट्ट झालेले किंवा संहत निक्षेप : समुद्रतळावर जागच्या जागी असणाऱ्या संहत निक्षेपांचे खाणकाम बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. त्यापासून उत्पादनही बरेच होत आहे. हे उत्पादन मुख्यत्वेकरून कोळशाचे आहे. जपानमधील एकूण कोळशाच्या उत्पादनाचा ३० टक्के भाग व इंग्लंडमधील उत्पादनाचा १० टक्के भाग अपतटी खाणकामापासून मिळतो. १९६८ साली अस्तित्वात असलेले काही खाणकामाचे प्रकार पुढीलप्रमाणे होत : (१) बहुतेक सर्व स्तरित निक्षेप, संहत निक्षेप आणि खनिज शिरा यांचे खाणकाम किनाऱ्यावर उभा कूपक खणून व त्याच्या खालच्या भागातून समुद्रतळाखाली असलेल्या निक्षेपात बोगदे खणून करतात. अगोदर वर्णन केलेल्या नेहमीच्या खाण कामाच्या पद्धतीच यासाठी वापरतात. फक्त वर असणाऱ्या छताची विशेष काळजी घेतात. (२) किनाऱ्याजवळ किंवा उथळ जागी असलेल्या निक्षेपांचे खाणकाम त्यांच्या वरच्या बाजूस कृत्रिम बेट तयार करून व त्यावरून समुद्रतळामध्ये कूपक खणून करतात. कृत्रिम बेटे समुद्रातूनच उपसा केलेला निरुपयोगी गाळ किंवा इतर भर टाकून तयार करतात. अशा कृत्रिम बेटावर कूपक खणताना बेटाची सुटी भर, तसेच बेटाच्या भागात असणारी दलदल, पाणथळ जागा वगैरेची व्यवस्थित दखल घेतात व नंतर खालच्या खडकांतील निक्षेपांचे खाणकाम नेहमीच्या पद्धतींनी करतात. हाच प्रकार खनिज तेलाच्या खाणकामासाठी वापरतात. (३) अपतटी आणि जागच्या जागी असणाऱ्या निक्षेपांचे वेधन, छिद्रण व खाणकाम हे मुख्यत्वेकरून गंधकाच्या निक्षेपांसाठी करतात. परंतु अपक्षालनाने (एखाद्या विद्रावकात म्हणजे विरघळविणाऱ्या पदार्थात निक्षेप विरघळून खनिज वेगळे करण्याच्या क्रियेने) जे पदार्थ मिळविता येणे शक्य आहेत, अशा अनेक खनिजांचे खाणकाम या प्रकाराने करता येईल. समुद्रामध्ये स्थिर व पक्के मंच बांधून ज्या प्रकाराने खनिज तेलाचे उत्पादन करतात तोच प्रकार इतर बाबतींतही वापरला जातो [→ खनिज तेल].
समुद्रातील खाणकामाचे भवितव्य : काही समुद्रांमध्ये दोन ते सव्वा दोन हजार मी. खोलीवर सोने, चांदी, शिसे व तांबे यांनी युक्त असलेले गरम खारे पाणी व ऊझ (फॉरॅमिनिफेरा, डायाटम इ. सजीवांपासून तयार झालेले सूक्ष्मकणी मऊ निक्षेप) आहेत, उदा., असे निक्षेप तांबड्या समुद्रात आहेत. त्यांच्यातून धातू मिळविण्याच्या (वेगळे काढण्याच्या) प्रक्रियांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्या लागतील आणि त्यांत बरीच प्रगती करावी लागेल. समुद्रतळावर असणाऱ्या सुट्या निक्षेपांच्या खाणकामासाठी गाळाचा उपसा करणारी अधिक शक्तिशाली व प्रचंड यंत्रणा निर्माण करावी लागेल. आज हे खाणकाम पाण्यांच्या पृष्ठभागावर यंत्रणा उभारून होत आहे, परंतु भविष्य काळात मजुरांना समुद्रतळावर पाण्यात काम करण्याची सोय करुन तसेच यंत्रे पाण्यात वापरून खाणकाम होण्याची शक्यता आहे. संहत निक्षेपांसाठी त्यांचा प्रकार, दर्जा, रासायनिक गुणधर्म, त्यांचे किनाऱ्यापासून अंतर, पाण्याची खोली यांनुसार वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतील. समुद्राच्या तळापासूनच खालच्या खडकात कूपक खणणे आणि तेथेच स्थानके बांधून खाणकाम करणे शक्य होईल. सापेक्षतः दूर जागी असलेल्या ठिकाणापासून अशा समुद्रतळावरील स्थानकांपर्यंत सरळ प्रवेश मिळविण्याच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी संशोधन चालू आहे. सापेक्षतः उथळ जागी घूर्णी (फिरणारी) वेधयंत्रे वापरून कूपक खणता येतील. अधिक खोल पाण्यात वेधन यंत्रणा तळावरच उभारणे व वेधन संपल्यावर तिच्या जागी स्थानक बांधणे शक्य आहे. किनाऱ्यापासून सु. ४० किमी. अंतरापर्यंत मोठ्या व्यासाचे नळ टाकणे शक्य झाले आहे व ते अधिक अंतरापर्यंत वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचा उपयोग कृत्रिम बोगदे म्हणून करता येईल. पूर्वरचित काँक्रिटाचे मजबूत असे भाग जोडून असे बोगदे करता येतात. या बोगद्यांच्या टोकांपासून समुद्रात कूपक खणणे व टोकांवर स्थानके बांधणे काही परिस्थितीत शक्य झाले आहे. कमी जाडीचे वरच्या खडकांचे ओझे असणाऱ्या अंतःसागरी निक्षेपांत योग्य शक्तीचे अणुकेंद्रीय स्फोट करून ते फोडणे शक्य आहे. अशा रीतीने तयार झालेला खडकांचा व निक्षेपांचा चुरा उपसा करून काढता येईल. अणुकेंद्रीय स्फोटाने फोडून व निष्कर्षणाने पदार्थ मिळविणे कुठल्याही खोलीवरील पाण्यात शक्य आहे.
खाणकामातील धोके : खाणकामामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात व धोक्याची परिस्थिती अगदी अनपेक्षितपणे वेळोवेळी निर्माण होत असते. तसेच खाणींमध्ये नैसर्गिक व मनुष्यनिर्मित अशा निरनिराळ्या कारणांनी अपघात होत असतात. उघड्या किंवा भूमिगत या दोन्ही प्रकारच्या खाणींमध्ये लहान मोठ्या आकारांची हत्यारे व यंत्रे, वीज, वाफ, डीझेल, प्रचंड दाबाखालील हवा इ. शक्तींवर चालणारी उपकरणे व यंत्रे यांचा वापर सतत चाललेला असतो. सुरुंगाचे स्फोट, खडक फोडणे, वाहतुकीच्या साधनांवर माल चढविणे-उतरविणे, त्यांची वाहतूक करणे, इ. ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असणारी कार्ये खाणीत नेहमीच चाललेली असतात. या सर्व कामांमध्ये सुरक्षिततेच्या व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे, शिस्तशीरपणा, काळजीपूर्वक काम करणे व नेहमी सावधान असणे आवश्यक असते. गैरशिस्त, अस्वच्छता, निष्काळजीपणा, बेसावधपणा यांच्यामुळे कित्येकदा मोठी वित्तहानी व प्राणहानीदेखील सोसावी लागते. भूपृष्ठावरील उघड्या खाणीपेक्षा भूमिगत खाणीत धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. भूमिगत खाणकामाची जागा निक्षेपावर असणाऱ्या इतर खडकांच्या थरांमुळे भूपृष्ठापासून अलग झालेली असते. भूमिगत खाणकामाचे क्षेत्र केवळ काही थोड्या कूपकासारख्या मर्यादित आकारमानाच्या मार्गांनी भूपृष्ठाशी जोडलेले असते. भूमिगत जागी असणाऱ्या वातावरणात बंदिस्त व खोल जागेमुळे रासायनिक व भौतिक बदल झालेले असतात. त्यामुळे धोक्याची परिस्थिता निर्माण होते. एक म्हणजे ऑक्सिजनाचे प्रमाण कमी कमी होत जाते व मजुरांचे श्वसन, दिवे जळणे, लाकूड कुजणे इ. कारणांनी कार्बन डाय-ऑक्साईड वायूचे प्रमाण वाढत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे खडकात असलेले अपायकारक वायू, स्फोटक पदार्थ जळण्यामुळे तयार झालेले वायू, स्फोटांच्या वेळी व खडक फोडताना तयार झालेली धूळ हे सर्व पदार्थ खाणीतील हवेत मिसळत असतात. खाणीतील अपायकारक वायू व धूळ बाहेर घालवून देऊन खाणीमध्ये शुद्ध आरोग्यदायक हवा पुरविण्यासाठी सोयी कराव्या लागतात.
अपायकारक वायू : निरनिराळ्या खाणींत आढळलेले वायू पुढीलप्रमाणे हाेत : (१) मिथेनः यालाच फायर डँप किंवा मार्श गॅस असेही म्हणतात. हा हवेत ५ ते १४ टक्के असल्यास अतिस्फोटक परिस्थिती निर्माण होते. (२) कार्बन मोनॉक्साईडः याला व्हाईट डॅँप म्हणतात. १ टक्का कार्बन मोनॉक्साइड असणाऱ्या हवेत जोराने श्वसन केल्यास मृत्यू येऊ शकतो. (३) ब्लॅक डँप : या हवेत कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण बरेच असते किंवा ऑक्सिजनाचा अभाव असतो. (४) हायड्रोजन सल्फाइड : याला स्टिंक डँप म्हणतात. तो विषारी असतो. ०·१ टक्क्यापेक्षा अधिक हायड्रोजन सल्फाईड गंभीर स्वरूपाचे शारीरिक व्यंग निर्माण करू शकतो किंवा मृत्यूस कारणीभूत होतो. (५) आफ्टर डँप : स्फोटानंतर किंवा पदार्थ जळण्यानंतर आगीमध्ये कोणते पदार्थ जळले त्यांनुसार या वायूंचे संघटन असते. सामान्यतः यात ऑक्सिजनाचा अभाव व कार्बन मोनॉक्साइडाचे प्रमाण बरेच असते. ज्या ठिकाणी स्फोटक द्रव्यांचा वापर असतो तेथे नायट्रिक ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साइड हे वायू तयार होतात. कोळशाच्या धुळीच्या भूमिगत आगी व स्फोट यांच्यामुळेही कार्बन मोनॉक्साइड तयार होतो. आर्द्रता, तापमान, दाब व घनता याबाबतींत भूमिगत हवा भूपृष्ठावरील हवेपेक्षा वेगळी असते.
धूळ : खाणीमध्ये खडक फोडण्याचे कामच प्रामुख्याने चाललेले असल्यामुळे तेथे धूळ नेहमी तयार होत असते. खडक कोसळणे, सुरुंगांचे स्फोट, मालाची वाहतूक हे सर्व होत असताना धूळ तयार होऊन खाणीतील हवेत पसरत असते. ही धूळ विषारी व बिनविषारी अशा प्रकारची असू शकते. शिसे, क्रोमियम, मँगॅनीज व इतर धातुकांची धूळ विषारी तर कोळसा, ॲस्बेस्टस, सिडेराइट यांसारख्या पदार्थांची बिनविषारी असते. मात्र धुळीमध्ये मग ती कुठल्याही प्रकारची असली, तरी दीर्घकाल श्वसन केल्यास फुप्फुसाचे रोग होतात. अपायकारक नसलेली धूळ थोड्या प्रमाणात श्वसनक्रियेने आत गेल्यास तिची विल्हेवाट लावण्याचे कार्य शरीरक्रिया करू शकतात. मात्र सिलिकेसारख्या पदार्थांची अपायकारक धूळ काही कोशिकांचे (पेशींचे) नुकसान करते. फुप्फुसातील वायुकोशाच्या भिंतीना सूज येऊन त्यात तंतुमय गुठळ्या तयार होतात व मग क्षयरोगासारखा वाटणारा सिलिकॉसीस हा रोग उद्भवतो. कोळसा, सुवर्णमाक्षिक, गंधक इत्यादींची धूळ काही प्रसंगी स्फोटक असण्याची शक्यता असते. धूळ कमी करण्यासाठी पुढील उपाय योजतात : (१) पाणी किंवा योग्य असा द्रव वापरून ओल्या स्थितीत वेधन करतात. (२) ठिकठिकाणी व वेळोवेळी निर्माण होत असणारी धूळ जागच्या जागी गोळा करतात. (३) ज्या ठिकाणी धूळ तयार होते तेथे पाण्याचे फवारे मारतात. (४) योग्य प्रकारचे वायुवीजन करून धूळ बाजूला करण्याची व्यवस्था करतात. (५) कोळशासारखे काही निक्षेप फोडण्यापूर्वी भिजवून ठेवतात.
खाणीतील अंधारामुळेहोणारे रोग : २०-३० वर्षे खाणीत विशेषतः कोळशाच्या खाणीत, काम केल्यावर मजुराला नेत्रदोल (डोळ्यांची बुबुळे असामान्य तऱ्हेने व इच्छेविरुद्ध हालणे) हा रोग होऊ शकतो. सुरुवातीला दृष्टीमध्ये विकार निर्माण होतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास तंत्रिकेचे (मज्जेचे) दोष निर्माण होऊन पूर्ण अंधत्व येऊ शकते. खाणीत असलेला अंधार हाच या रोगाचे कारण असतो. ज्या ठिकाणी प्रकाशाची योग्य अशी सोय असते, तेथे हा रोग जवळ जवळ आढळत नाही.
आगी : उघड्या ज्योती किंवा अग्नी यांचा वापर व खाणीतील काही खनिजांचे व वायूंचे आपोआप स्फोट होऊन ते पेटणे या दोन मुख्य कारणांनी खाणीत आगी लागतात. मेणबत्त्या, कार्बाइडांच्या दिव्याप्रमाणे असणारे उघड्या ज्योतींचे दिवे, सुरुंगासाठी वापरण्यात आलेल्या वाती जळत राहणे, स्फोटक द्रव्य वापरून जळणाऱ्या शेगड्या, स्टोव्ह यांचा वापर, धूम्रपान, विजेच्या उपकरणांत व तारांमध्ये बिघाड होऊन ठिणग्या पडणे अशा अनेक कारणांनी खाणीत आगी लागतात. खाणमजूर काळजीपूर्वक वागल्यास या प्रकारच्या आगी टाळता येतात. जळत असणारे पदार्थ वाटेल तेथे पडू न देणे विड्या, सिगरेटींची जळती थोटके नीट विझवून सुरक्षित जागी टाकणे डेव्ही संरक्षक दिव्यासारखे बंदिस्त ज्योतींचे किंवा विजेवर चालणारे दिवे वापरणे या प्रयत्नांनी बऱ्याच आगी टाळता येतात. कोळसा, कार्बनी खनिजे, गंधकाची धातुके यांच्यासारख्या पदार्थांत ऑक्सिजनाबद्दल नैसर्गिक ओढ असते. कोळसा किंवा अशी खनिजे यांचे ऑक्सिडीभवन होऊन तापमान वाढते. जसजसे तापमान वाढते तसतशी खनिजाची उष्णता-शोषकता वाढते व ते अधिकाधिक तापत जाऊन अखेरीस पेट घेते. फोडून खणून, भरडून बारीक झालेल्या अशा प्रकारच्या खनिजांच्या ढिगांमध्ये ऑक्सिडीभवन अधिक वेगाने होते. अशा प्रकारच्या आगी टाळण्यासाठी फोडलेला माल जागच्या जागी फार वेळ पडू न देता त्याची योग्य प्रकारे व योग्य जागी वाहतूक करणे, खाणीमध्ये थंड हवा खेळविणे ही कामे करावी लागतात.
कोष्टक क्र. २. भारतातील विविध खनिज पदार्थांचे उत्पादन व त्यांची किंमत | |||||
खनिज पदार्थ | एकक | एकूण उत्पादन | |||
१९७१ | १९७२ | ||||
उत्पादन | किंमत हजार
रुपयांत |
उत्पादन | किंमत हजार
रुपयांत |
||
सर्व खनिज पदार्थ | ४५,४७,७९० | ४६,७८,४९० | |||
इंधने | ३४,४८,८६० | ३६,००,९३२ | |||
खनिज तेल (कच्चे) | हजार टन | ७,१८५ | ७,७१,६१० | ७,४८६ | ७,९३,४८० |
दगडी कोळसा | हजार टन | ७१,४९९ | २५,४७,१८३ | ७४,७७१ | ७,९३,४८० |
नैसर्गीक वायू (वापरलेला) | कोटी घ.मी. | ७५·४ | ३६,४१० | ९२·५ | २६,७७,४६९ |
लिग्नाइट | हजार टन | ३,६६० | १,०३,६५७ | ३०६ | ४३,१४० |
धातवीय खनिजे | ६,८५,६९५ | ६,८४,६८५ | |||
क्रोमाइट | टन | २,७३,०६० | २६,९६९ | २,८१,०२५ | २६,७८६ |
चांदी (धातू) | किग्रॅ. | ३,७७३ | २,०५१ | ४,४२७ | २,२२१ |
जस्त (संहत) | टन | १५,८५५ | १४,४७६ | १७,०५५ | १६,७७७ |
टंगस्टन (धातुक) | किग्रॅ. | २९,५६३ | १,१७६ | ३२,३८० | १,२८८ |
डायास्पोर | टन | ४,८८१ | ४८८ | ५,२९८ | ५४७ |
तांबे (धातुक) | हजार टन | ६६६ | ४९,५४१ | ८६९ | ५६,५२४ |
बॉक्साइट | हजार टन | १,५१७ | २१,३८१ | १,६५९ | २२,८३६ |
मँगॅनीज (धातुक) | हजार टन | १,८४१ | ८४,०७८ | १,६२४ | ७२,६४९ |
लोखंड (धातुक) | हजार टन | ३४,२६१ | ३,९५,९१५ | ३५,०३६ | ४,०३,९६३ |
शिसे (संहत) | टन | ४,२६२ | ५,१०२ | ४,५८१ | ५,८६५ |
सोने (धातू) | किग्रॅ. | ३,६५६ | ८४,५१८ | ३,२९० | ७५,४०९ |
अधातवीय खनिजे | ४,१३,२३५ | ३,९२,८७३ | |||
अकीक (अगेट) | टन | ७२८ | १२२ | ६९९ | १०८ |
अभ्रक (कच्चे) | टन | १४,८५५ | २०,७७५ | १३,६३५ | १९,४३३ |
अभ्रक (तुकडेताकडे) | टन | ४,५४० | उपलब्ध नाही | ४,३०९ | उपलब्ध नाही |
अपेटाइट | टन | ११,३०७ | ८२६ | ११,५१३ | ७२३ |
अस्बेटाइट | टन | १३,५८१ | २,२३७ | १२,२७३ | २,७६५ |
कॅल्साइट | टन | २०,४२५ | ३२६ | २४,३०० | ४१३ |
कायनाइट | टन | ६३,४६२ | १५,१३० | ६८,४७९ | १३,७२३ |
कुरूविंद | टन | ३१८ | १६२ | ३८३ | २०९ |
क्वॉर्ट्झ | हजार टन | २२२ | २,११८ | २१८ | २,०९९ |
क्वॉर्ट्झाइट | हजार टन | ११४ | २,२९९ | ९८ | २,६५१ |
क्वॉर्ट्झाइट (फुक्साइट) | टन | २० | ५० | — | — |
गार्नेट (अपघर्षक) | टन | १,३९१ | ५६ | ३,१५६ | १२९ |
गार्नेट (रत्न स्वरूपाचा) | किग्रॅ. | २,९६२ | २४ | २६८ | १ |
चॉक | टन | ४८,८४० | ८४८ | ५९,९१० | १,१४३ |
चिनी माती | हजार टन | ६७३ | सु. १२,०९९ | ७४४ | सु. १३,९७८ |
चुनखडक | हजार टन | २५,०७३ | २,४२,२७३ | २५,५४४ | २, २७,९९९ |
चुनायुक्त कंकर | हजार टन | ४४० | २,३२३ | ३३८ | १,९७६ |
चुनायुक्क प्राणिकवचे | हजार टन | ९५ | १,७६५ | १०१ | २,१५७ |
चुनायुक्त वाळू | हजार टन | १,०२३ | १,३९२ | ९६० | १,१३४ |
जॅस्पर | टन | २१४ | ६ | ४१३ | १२ |
जिप्सम | हजार टन | १,०८८ | १२,१५६ | १,०७८ | १२,६९२ |
डायाटमी माती | टन | ८७ | ५ | ५२ | २ |
डोलोमाइट | हजार टन | १,३२० | २३,३५२ | १,३२२ | २२,०७५ |
तापसह माती | हजार टन | ६१२ | ५,४८२ | ६५९ | ५,६३८ |
तोरमल्ली (टुर्मलीन) | टन | — | — | ५ | — |
नील (सफायर कच्चे) | किग्रॅ. | ८५ | उपलब्ध नाही | ||
पाच (एमराल्ड कच्चे) | कॅरट | २२,५२० | उपलब्ध नाही | २०,२२० | उपलब्ध नाही |
पाच (संस्कारित) | टन | २,२७० | १ | उपलब्ध नाही | उपलब्ध नाही |
पाटीचा दगड (प्लेट) | टन | ७२५ | १०९ | १,००६ | १६४ |
पायराइट्स | टन | ४०,८८६ | ७,५७४ | ३०,७२३ | ५,१६७ |
पायरोफायलाइट | टन | ११,७८० | २३१ | १५,७७९ | ४३१ |
फॉस्फोराइट(रॉकफॉस्फेट) | टन | २,३२,१७० | २०,०६७ | २,१७,१०९ | १९,२५६ |
फेल्सार | टन | ४४,२३६ | ६२० | ४९,८७७ | ६६६ |
फ्ल्युओराइट | टन | ३,१०७ | ३,९४८ | ३,५२७ | ३,५४७ |
बराइट्स | टन | ५८,६९५ | १,४२२ | ४६,११३ | १,४४९ |
मॅग्नेसाइट | हजार टन | २९६ | ११,८७४ | २७३ | ८,२६८ |
मृत्तिका (इतर) | हजार टन | १९२ | ३५९ | १३५ | ३४९ |
रंगीत माती (ऑकर) | टन | ५३,०१८ | ९७३ | ५२,६३६ | ७१८ |
वाळू (इतर) | हजार टन | १,०८४ | १,९०२ | ८६९ | १,७८४ |
वाळू (साच्याची) | हजार टन | ६३ | २६० | ५८ | २२० |
वाळू (सिलिकामय) | हजार टन | ३२६ | ३,८२८ | ३७३ | ४,४०६ |
वुलस्टनाइट | टन | २,०४२ | ८१ | २,२९० | ९० |
व्हर्मिक्युलाइट | टन | ५३७ | १४ | १,३३१ | ४१ |
सिलिमनाइट | टन | ४,३२६ | ६६० | ४,०७३ | ६७० |
सुघट्य मृत्तिका (बॉल क्ले) | टन | १२,६२० | २६६ | १७,११८ | २९३ |
सैंधव (रॉक सॉल्ट) | टन | ३,८४५ | ४८१ | ४,२५२ | ५५५ |
स्टॉरोलाइट | टन | — | — | — | — |
स्टिअराइट | हजार टन | १७७ | ५,४३४ | १७४ | ५,३८० |
हिरा | कॅरट | १९,३८३ | ७,३०५ | १९,७४७ | ८,३३९ |
भूमिगत आगी भूपृष्ठावरील आगीपेक्षा बऱ्याच धोक्याच्या व हानिकारक असतात कारण त्यांच्यामुळे खाणीतील मालाचे जळून नुकसान तर होतेच, शिवाय त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या विषारी वायूंमुळे प्राणहानीदेखील होते. आग-प्रतिबंधक कार्य हे मुख्यत्वेकरून आगी न लागू देणे, लागल्यास त्या पसरू न देणे व त्वरित विझविणे असे असते. आगी लागू नयेत म्हणून खाणीतील शक्य तितके बांधकाम, यंत्रे, वाहतुकीची साधने इ. आगरोधी पदार्थांची बनविलेली असतात. खाणीमध्ये अग्निशामक व त्याबरोबर असणारे पथक सदैव सुसज्ज ठेवलेले असते. ठिकठिकाणी आग विझविणारी द्रव्ये असलेले डबे, सिलिंडर यांच्या स्वरूपात असलेले अग्निशामक, वाळूने भरेलेले डबे, बाटल्या इ. ठेवलेली असतात [→ आगनिवारण].
किरणोत्सर्ग : युरेनियमाच्या खनिजासारख्या काही खनिजांच्या खाणींत किरणोत्सर्गामुळे अपायकारक परिस्थिती निर्माण होत असते. बऱ्याच किरणोत्सर्गी पदार्थांतून रेडॉन वायू बाहेर टाकला जातो. हा वायू अपायकारक असून त्यामुळे फुप्फुसाला इजा होते. या वायूमुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो. अगदी कमी किरणोत्सर्गी असलेले खडकसुद्धा सतत हळूहळू रेडॉन वायू अल्प प्रमाणात बाहेर टाकीत असतात, असे आढळून आले आहे. हा थोडा थोडा गोळा होणारा रेडॉन वायू काही प्रसंगी खाणीतील पाण्यात विरघळतो व त्याबरोबर वाहत जातो आणि कमी दाब असलेल्या ठिकाणी पाण्यातून परत बाहेर पडतो. खाणीमध्ये ठराविक मर्यादेपेक्षा जास्त किरणोत्सर्ग असू नये म्हणून विशेष कायदे करण्यात आलेले आहेत. किरणोत्सर्गाने दूषित असलेली हवा योग्य रीतीने वायुवीजन करून बाहेर घालवून त्या ठिकाणी शुद्ध हवा पुरविणे, हे कार्य काटेकोरपणे करावे लागते.
खाणीतील अपघातांची कारणे : खाणमजूर, पर्यवेक्षक आणि निरीक्षक यांच्या देखरेखीतील चुका व भौतिक घटना या दोन मुख्य प्रकारांनी खाणीत अपघात होतात. देखरेखीतील चुका पुढीलप्रमाणे असू शकतात : (१) चुकीचे ज्ञान : यात ज्ञान अजिबात नसणे, ज्ञान असून ते न वापरणे, अर्धवट ज्ञान असणे या गोष्टी असू शकतात (२) मजुराची असमर्थता : अनुभव नसणे, कसब नसणे, चुकीचे अंदाज बांधणे (३) गैरशिस्त : नियमांचे पालन न करणे, इतरांकडून बळजबरी होणे, चेष्टामस्करी करणे (४) लक्ष विकेंद्रित होणे, लक्ष नसणे (५) धोकादायक सवयी : पर्याय वापरणे, कमी वेळाचे कमी श्रमाचे धोक्याचे मार्ग अवलंबणे व घाई करणे (६) बौद्धिक दृष्ट्या असमर्थ, थकलेले असणे, तापट व रागीट स्वभाव असणे (७) शारीरिक दृष्ट्या असमर्थ : व्यंग, लवकर थकवा येणे, अशक्तपणा. भौतिक कारणे पुढीलप्रमाणे असतात : (१) यंत्रे, वीज, वाफ, रासायनिक प्रक्रिया व इतर यांच्यातील अडचणीच्या व धोक्याच्या परिस्थितीमुळे भौतिक प्रकारचे अपघात होतात. रक्षकाची देखरेख अजिबात न ठेवल्यामुळे किंवा अपूर्ण व सदोष देखरेख असल्यामुळे असे अपघात होतात (२) अव्यवस्थितपणाः अव्यवस्थितपणे इकडे तिकडे पडलेले किंवा गलथानपणे ढीग रचलेले साहित्य (३) सदोष यंत्रसामग्रीः हत्यारे, यंत्रे व इतर साहित्य सदोष असणे (४) असुरक्षित बांधकाम (५) अयोग्य वातावरणः वायुवीजन, स्वच्छता, उजेड यांची योग्य व्यवस्था नसणे (६) अयोग्य संयोजनः खाणकामाचे कार्य, यंत्रे व प्रक्रिया यांची अयोग्य आखणी (७) अयोग्य वेशः सुरक्षिततेसाठी चष्मे, मोजे, मुखवटे न वापरणे, अयोग्य लांब बाह्यांचे शर्ट, कोट, उंच टाचांचे बूट वापरणे.
वरील दोन्ही प्रकारांच्या कारणांवर खाणचालकाला थोड्याफार प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. तसेच काही प्रसंगी खाणमजुरांनाही धोकादायक परिस्थिती आढळली असताना अपघात टाळता येतात. भौतिक किंवा यांत्रिक परिस्थितीतील अपघातांची जबाबदारी निरीक्षकांवर टाकता येते. यासाठी सर्व कामावर लक्ष ठेवणारा रक्षक मजूर, देखरेखनीस मुकादम, पर्यवेक्षक यांची नेमणूक करावी लागते. हे अपघात मुख्यत्वेकरून देखरेखीतील दुर्लक्ष, गलथानपणा यांमुळे होतात. शिस्त-नियमांचे पालन, पद्धतशीर व काळजीपूर्वक काम करणे यांवर काटेकोर लक्ष ठेवल्यास हे अपघात बरेचसे टाळता येतात. खडक कोसळून पडण्याची संभाव्य ठिकाणे, दुर्बलतेची व धोक्याची ठिकाणे वा यंत्रातील दोष योग्य देखरेखीमुळे योग्य वेळी उघड होऊन अपघात टाळता येतात.
खाणकामगारांची सुरक्षितता व कल्याण या गोष्टी खाणकाम उद्योगधंद्यांतील महत्त्वाचे कार्य होय. यामध्ये कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना औषधपाणी, दवाखाने उपलब्ध करणे, त्यांच्या निवासासाठी व्यवस्था करणे, काही प्रसंगी वाहतुकीची व्यवस्था करणे, विमा योजना इ. समाजकल्याणकारी जबाबदारी खाणचालकांवर असते. प्रत्यक्ष खाणकामाबद्दल कामगारांना प्रशिक्षण देणे, यंत्रणेचे व कार्याचे शिक्षण देणे, माहितीपत्रके, चित्रपट इत्यादींच्या साहाय्याने सुरक्षितता, सुव्यवस्था, आरोग्य व स्वच्छता यांबद्दल माहिती देणे, त्यांच्या सभा घेणे, इ. कार्य करावी लागतात. अपघातांची नोंद ठेवून त्यांचे प्रकार, आकडेवारी, कारणे यांची माहिती गोळा करणे व त्यांवरून अपघातांची पुनरावृत्ती होऊ न देणे, अपघात कसे टाळता येतील याची माहिती मिळविणे हे काम करावे लागते. खाणीमध्ये स्वच्छता, उजेड, पाण्याचे वहन, वायुवीजन, सुरक्षिततेसाठी बांधकाम, अग्निशामकांची व्यवस्था या गोष्टी कराव्या लागतात. थोडक्यात ज्या ज्या ठिकाणी किंवा प्रक्रियेत धोक्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असेल, त्यावर डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवावे लागते व ती निवारण्याची व्यवस्था करावी लागते.
भारतामध्ये खाणकामगारांच्या सुरक्षिततेसाठी जून १९६३ मध्ये स्टँडिंग माइन्स सेफ्टी इक्विपमेंट ॲडव्हायझरी बोर्ड व जुलै १९६३ मध्ये नॅशनल कौन्सिल फॉर सेफ्टी इन माइन्स यांची स्थापना करण्यात आली. यांशिवाय खाणकामगारांच्या कल्याणासाठी खालील कायदे वेळोवेळी करण्यात आले आहेत : (१) कोल माइन्स लेबर वेलफेअर फंड (१९४४), (२) मायका माइन्स लेबर वेलफेअर फंड, (३) आयर्न ओअर माइन्स वेलफेअर सेस ॲक्ट (१९६१), (४) माइन्स ॲक्ट (१९५२), (५) एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट (१९४८), (६) मिनिमम वेज ॲक्ट (१९४८), (९) एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड ॲक्ट (१९५२), इत्यादी. [→ औद्योगिक धोके कामगार कल्याण कामगार कायदे कामगार प्रशिक्षण व्यवसायजन्य रोग].
कोष्टक क्र. ३. भारतातील राज्यवार खनिजांचे १९७२ सालचे उत्पादन.
राज्य | उत्पादन
(हजार रूपयांत) |
बिहार | १३,३१,४१४ |
मघ्य प्रदेश | ६,८९,२७४ |
पश्चिम बंगाल | ६,७९,५९१ |
गुजरात | ४,६५,८०७ |
आसाम | ४,२०,०७० |
ओरिसा | २,५२,५९९ |
आंघ्र प्रदेश | २,२१,९१९ |
तमिळनाडू | १,५८,९५१ |
कर्नाटक | १,३५,२८२ |
महाराष्ट्र | १,२६,७४० |
गोवा | १,१४,९८७ |
राजस्थान | ८६,४०१ |
उत्तर प्रदेश | १२,२०१ |
हरियाणा | ६,२९१ |
केरळ | ५,९४९ |
जम्मू व काश्मीर | ४,५५० |
मेघालय | ९०५ |
हिमाचल प्रदेश | ८४२ |
दिल्ली | ६५६ |
भारतातील खाणकाम : भारतामध्ये सु. ५० महत्त्वाच्या खनिजांचे खाणकाम होते. बरीचशी खनिजे उघड्या प्रकारच्या खाणींतून मिळविण्यात येतात. बऱ्याच खाणींत मानवी श्रमच वापरले जातात. कोळसा, सोने, तांबे, जस्त, शिसे व अभ्रक अशा काही थोड्या खनिजांच्या खोल जागी असलेल्या निक्षेपांचे खाणकाम भूमिगत खाणी उघडून चालते. खाणीचे यांत्रिकीकरण बऱ्याच ठिकाणी चालू आहे. मात्र यांत्रिकीकरणासाठी लागणारी बहुतेक सर्व यंत्रे भारतात तयार होत नसल्यामुळे यांत्रिकीकरणाचा वेग मंद आहे. लोह, मँगॅनीज, तांबे, जस्त, शिसे व सोने यांची धातुके, कोळसा व चुनखडक यांच्या बऱ्याच खाणींचे यांत्रिकीकरण झाले आहे. खाणकामासाठी विजेचा व इतर ऊर्जांचा उपयोग वाढत आहे. वर नमूद केलेल्या महत्त्वाच्या खनिजांच्या खाणी पुढील प्रकारच्या आहेत :कोळसा व लिग्नाइट : उघड्या, उथळ व भूमिगत अशा सर्व प्रकारच्या कोळशाच्या खाणी भारतात आहेत. बऱ्याचशा उघड्या खाणी पूर्णपणे व काही अंशतः यांत्रिकीकृत आहेत. भूमिगत खाणी काही पूर्णपणे यांत्रिकीकृत, तर काही थोड्याफार प्रमाणात यांत्रिकीकृत असून बऱ्याच भागात अजून मजूर कुदळी, खोरे वापरून खाणकाम करतात. कोळशाच्या भूमिगत खाणीत उभे व उतरणी कूपक वापरतात. तसेच सलग लांब भिंतीच्या पद्धती आणि खांब व खोल्यांची पद्धत या निखननासाठी वापरतात. तसेच लोह धातुक, चुनखडक, डोलोमाइट, कायनाइट, जिप्सम ही खनिजे उघड्या खाणीतून खणून काढतात. मँगॅनीज धातुक व अभ्रक यांच्या उघड्या आणि भूमिगत अशा दोन्ही प्रकारच्या खाणी आहेत. मात्र दोन्हींच्या बहुतेक खाणी उघड्या प्रकारच्याच आहेत. मँगॅनिजाच्या भूमिगत खाणी उथळ असून त्या निक्षेपास समांतर उतरणी कूपक खणून चालविण्यात येतात. अभ्रकांच्या भूमिगत खाणीत खांब आणि तुळया यांचा आधार देऊन खाणकाम करतात. बिहारमधील तांब्याच्या तीनही भूमिगत खाणींत छातीसमोर होणाऱ्या निखननाच्या पद्धतीने खाणकाम होते. उभे व उतरणी कूपक या खाणींत वापरात आहेत. राजस्थानातील जव्हार येथील जस्त व शिसे यांच्या धातुकांचे खाणकाम भूमिगत असून ते उप-पातळ्या उघडून व आकसत जाणाऱ्या खाणकामाच्या पद्धतींनी होते. कर्नाटकमधील कोलार क्षेत्रातील सोन्याच्या खाणीतील भूमिगत खाणकाम खालच्या किंवा वरच्या हाताच्या पद्धतीने व छातीसमोर होणाऱ्या निखननाच्या पद्धतीने तसेच उप-पातळ्यांवर बोगदे खणून होते.
भारतात १९७१ साली ४९५·२ कोटी रु. किंमतीच्या व १९७२ साली ४७१·४ कोटी रू. किंमतीच्या खनिजांचे उत्पादन झाले. १९७२ मध्ये उत्पादनाच्या दृष्टीने इंधनांचा (कोळसा, लिग्नाइट, खनिज तेल व नैसर्गिक वायू) क्रमांक पहिला होता ( ७७%, किंमत ३६२·६ कोटी रु.), त्यानंतर धातवीय (१५%, ६९ कोटी रु.) व अधातवीय (८%, ३९·८ कोटी रु.), खनिजांचे क्रमांक होते. किंमतीच्या दृष्टीने कोळसा व लिग्नाइट, खनिज तेल व नैसर्गक वायू, लोह धातुक, चुनखडक, मँगॅनीज धातुक, सोने, तांब्याचे धातुक, अभ्रक, डोलोमाइट, कायनाइट, क्रोमाइट व फॉस्फोराइट असे खनिजांचे क्रमांक होते. भारतातील खनिजांचे उत्पादन व त्यांची किंमत यांची १९७१ व १९७२ सालांची आकडेवारी कोष्टक क्र.२ मध्ये दिली आहे.
भारतातील राज्यवार खनिजांच्या १९७२ सालच्या उत्पादनांची किंमत कोष्टक क्र. ३ मध्ये दिली आहे. यात आणवीय खनिजे व संकीर्ण खनिजांचा समावेश केलेला नाही. बिहारमध्ये सर्वांत अधिक खनिजांचे उत्पादन झाले (२८%), त्यानंतर मध्य प्रदेश (१५%) व पश्चिम बंगाल (१४%) यांचा क्रमांक होता. या तीन राज्यांत कोळशाचे प्रामुख्याने उत्पादन होते. १९७२ मध्ये कोळशाच्या एकूण उत्पादनांपैकी या राज्यांचे प्रमाण अनुक्रमे ४२, १९ व २५% होते.
१९७२ साली २७२·३ कोटी रु. किंमतीच्या खनिजांची व धातूंची निर्यात झाली, १९७१ साली हीच निर्यात २५६·५ कोटी रुपयांची होती (वाढ ६·१%). ही निर्यातीतील वाढ मुख्यत्वे लोह धातुक, क्रोमाइट, हिरे, इल्मेनाइट व अभ्रक यांच्या वाढत्या निर्यातीमुळे झाली. खनिजे आणि धातू यांचा परदेशी चलन मिळविण्यातील वाटा अनुक्रमे १२% व ३% होता १९७१ साली हीच आकडेवारी अनुक्रमे १२% व ४·३% होती. धातुके व खनिजे यांच्या निर्यातीमुळे १९७२ साली २२३·२ कोटी रूपयांचे परदेशी चलन उपलब्ध झाले. १९७१ मध्ये या निर्यातीमुळे १८८·८ कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळाले होते (वाढ १८%). १९७१ साली २१०·३ कोटी रुपयांच्या आणि १९७२ साली २२२·७ कोटी रुपयांच्या खनिजांची आयात करण्यात आली (वाढ ६%).
भारतातून लोह धातुक, हिरे (रत्नांच्या स्वरूपातील), अभ्रक, मूल्यवान खडे, मँगॅनीज धातुक, कायनाइट, क्रोमाइट, कोळसा, मीठ (सैंधव), मॅग्नेसाइट, सिलिमनाइट, इल्मेनाइट इ. खनिजे निर्यात करण्यात येतात. ही खनिजे जपान, बेल्जियम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, झेकोस्लोव्हाकिया, रूमानिया, फ्रान्स, रशिया, स्वित्झर्लंड, हंगेरी, इटली, युगोस्लाव्हिया इ. देशांना निर्यात करण्यात येतात. भारतात मुख्यत्वे खनिज तेल, गंधक, ॲपेटाईट (रॉक फॉस्फेट), मूल्यवान खडे, ॲस्बेस्ट्स, धातुक व संहत स्वरूपातील जस्त, औद्योगिक हिरे, क्रायोलाइट, अँटिमनी धातुक इ. खनिज द्रव्ये आयात करण्यात येतात.
खनिजांचे राष्ट्रीय महत्त्व : खनिजांचा उपयोग हजारो वर्षांपूर्वीपासून होत असला, तरी त्यांचे राष्ट्रीय महत्त्व पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी समजून आले. यावेळी युद्ध चालू ठेवण्याच्या बाबतीत अनेक अडचणी येऊ लागल्या. अमेरिकेसारख्या बलाढ्य व मोठ्या देशाला अन्न व जळण पुरविण्यासाठी जहाजे कमी पडू लागली तसेच युद्धात लागणारी अस्त्रे व स्फोटक पदार्थ कमी पडू लागले. यामुळे खनिजांचे उपयोग व त्यांचे महत्त्व यांचा तातडीने विचार करणे भाग पडले. पुढे खनिज नियंत्रण कायदा मान्य होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली. सध्या बहुतेक सर्व देशांत खनिजांच्या संबंधी व खाणकामाबद्दल कायदे व करार करण्यात आलेले आहेत. जगातील कुठलाही एक देश सर्व आवश्यक खनिजांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. जगातील सर्व राष्ट्रांना प्रत्येकाला आवश्यक असणारी सर्व खनिजे हवी असतील, तर त्यांना थोड्या फार प्रमाणात का होईना इतर देशांवर अवलंबून राहावेच लागते. सर्व राष्ट्रांना आवश्यक असणारी खनिजे पुरवावयाची असतील, तर खनिजांचा आँतरराष्ट्रीय विनिमय अटळ आहे. या परिस्थितीमुळे खनिजांच्या बाबतीतले काही कायदे तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचेही आहेत. युद्धाच्याच काय पण शांततेच्या काळीदेखील काही खनिजांचे महत्त्व इतके असते की, त्यांच्याशिवाय उद्योगधंद्यांचे पान हलू शकत नाही. त्यांची आवश्यकता अगदी तीव्र व अटळ असते. काही खनिजे अतिशय महत्त्वाची व मोक्याची असतात. मेटॅलर्जिकल सोसायटी ऑफ अमेरिका व द अमेरिकन इन्स्टीट्यूट ऑफ मायनिंग अँड मेटॅलर्जिकल एंजिनिअर्स या संस्थांनी १९२५ साली अमेरिकेतील व इतर देशांतील खनिजांच्या कायद्यांची पाहणी करून नैसर्गिक संपत्तीच्या बाबतीत अगदी मूलभूत असे आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार कसे असावेत, याची सूत्रे तयार केली.
भारतातील खनिजांविषयीचे धोरण व कायदे : निरनिराळ्या खनिजांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन भारत सरकारने खनिजांचे नियंत्रण, उत्पादन, संरक्षण, आयात, निर्यात इ. गोष्टीवर ताबा ठेवण्यासाठी ठराविक धोरण ठरविले असून यासाठी महत्त्वाचे कायदेही केलेले आहेत. खनिजांच्या संरक्षणासाठी म्हणजे त्यांचे योग्य प्रकारांनी अत्युच्च कार्यक्षमतेने उत्पादन करणे, त्यांचा अपव्यय व दुरुपयोग टाळणे, शक्य तेथे आवश्यक खनिजांऐवजी इतर पर्यायी पदार्थ वापरणे इत्यादींसाठी कायदे केले आहेत. तसेच या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी सल्ला देणाऱ्या, नियंत्रण ठेवणाऱ्या, प्रत्यक्ष कामे करणाऱ्या संस्थाही स्थापन केल्या आहेत. काही अतिशय महत्त्वाच्या व मोक्याच्या खनिजांची माहिती गुप्त ठेवण्यात येते. उदा., अणुशक्ती निर्मितीसाठी लागणारी खनिजे. काही महत्त्वाच्या खनिजांच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. भारतातील खाणकामाचे कायदे दोन मुख्य प्रकारचे आहेत : पहिल्या प्रकारचे कायदे खनिजांवर नियंत्रण, त्यांचे संरक्षण, योग्य प्रकारच्या खाणकामाच्या पद्धतीने उत्पादन यांसंबंधीचे आहेत. दुसऱ्या प्रकारचे कायदे खाणकामामध्ये सुरक्षितता निर्माण करणे, कामाची परिस्थिती सुधारणे, मजुरांचे समाजकल्याण इत्यादींबाबत आहेत. दुसऱ्या प्रकारचे कायदे खाणकाम उद्योगधंद्यात असणाऱ्या निरनिराळ्या लोकांसाठी आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या यादी क्र. १ मधील ५३, ५४ व ५५ या मुद्यांनुसार खाणींचे नियंत्रण, खनिजांचे संरक्षण आणि उत्पादन या गोष्टी सरकारची जबाबदारी ठरविण्यात आली आहे. ६ एप्रिल १९४८ च्या इंडस्ट्रियल पॉलिसी रेग्युलेशननुसार खाणकामाची गणना ज्या उद्योगधंद्यांवर केंद्र सरकारचे नियंत्रण लागते, अशा उद्योगधंद्यांत केली आहे. १९५६ च्या इंडस्ट्रियल पॉलिसी रेग्युलेशनमध्ये शेड्यूल ए व शेड्यूल बी या दोन्हींमध्ये खनिजांची वर्गवारी केली आहे. ए प्रकारात कोळसा आणि लिग्नाइट, खनिज तेले, लोह, मँगॅनीज, क्रोमियम यांची धातुके, जिप्सम, कथिल, मॉलिब्डेनम व वुलफ्रॅम आणि ॲटॉमिक एनर्जी ऑर्डरच्या (कन्ट्रोल ऑफ प्रॉडक्शन अँड यूस) शेड्यूलमध्ये असणारी खनिजे आहेत. बी शेड्यूलमध्ये महत्त्त्वाची खनिजे वगळून इतर सर्व आहेत. वरील ठरावानुसार पहिल्या प्रकारच्या खनिजांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे व दुसऱ्या प्रकारच्या खनिजांची जबाबदारीदेखील हळूहळू सरकारकडेच जाईल म्हणजे नवीन खाणकाम उद्योगधंदे सरकारच हाती घेईल, मात्र त्यात खाजगी कंपन्यादेखील सहभागी होऊ शकतील. खनिज उद्योगधंदे झपाट्याने वाढत असून त्यांची एकूण परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे निरनिराळी धोरणे, नियम व कायदे यांत वेळोवेळी परिस्थितीनुरूप व आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येतात. खाणकामाबद्दल महत्त्वाचे कायदे पुढील होत : (१) द माइन्स ॲक्ट (१९५२), (२) द माइन्स अँड मिनरल (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) ॲक्ट (१९५७), (३) द मिनरल कन्सेशन रूल्स (१९६०) व (४) द माइन्स रूल्स (१९५५). १९६२ मध्ये निर्यातीवर नियंत्रण ठेवणारे फर्मान (एक्स्पोर्ट ऑर्डर) (१९६२) काढण्यात आले. १९६३ मध्ये मालाची पाहणी व त्याच्या दर्जाची चाचणी करण्यासाठी क्वालिटी कंट्रोल (अँड इन्स्पेक्शन) एक्सपोर्ट ॲक्ट करण्यात आला.
खाणकामाचे प्रशिक्षण : इ.स. १९२८ मध्ये बिहारात धनबाद येथे स्थापन झालेल्या इंडियन स्कूल ऑफ माइन्स अँड अप्लाइड जिऑलॉजी या संस्थेत खनिज अभियांत्रिकी, खाणकाम व अनुप्रयुक्त भूविज्ञान या विषयांचे शिक्षण दिले जाते. (१) बनारस हिंदु विश्वविद्यालय, वाराणसी (२) बंगाल एंजिनिअरिंग कॉलेज, सिबपूर (प. बंगाल) (३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर (प. बंगाल) व (४) उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद या सर्व संस्थांत खाणकाम उद्योगधंद्याबाबत पदवी परीक्षेपर्यंतचे शिक्षण दिले जाते.
पुढील संस्था खाणकामासंबंधी कामे करतात. (१) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. १९५८. खनिज तेल, नैसर्गिक वायू व कोळसा वगळून इतर खनिजींचा शोध आणि काही खाणकाम ही संस्था करते. (२) इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स, १९४८. भारतीय सरकारला खनिजांच्या बाबतीत सल्ला देणारी ही संस्था खाणींची पाहणी, खाणकामाच्या तंत्राबद्दल सल्ला देणे इ. कामे करते. तसेच खनिजांचे संरक्षण, खनिजांचा अपव्यय होऊ न देणे इ. गोष्टींवर लक्ष ठेवते व सल्ला देते. (३) कोल बोर्ड. कोळशाच्या खाणीतील सुधारणा व कोळशाचे संरक्षण ही दोन कार्ये ही संस्था प्रामुख्याने करते. (४) नेव्हेली लिग्नाइट कॉर्पोरेशन. दरवर्षी सु. ३५ लाख टन लिग्नाइटाचे उत्पादन करते व संबंधित उद्योगधंदेही चालवते.
पहा : खनिज पूर्वेक्षण धातुक.
संदर्भ :
- Bateman, A. M., Economic Mineral Deposits, Bombay, 1960.
- Boky, B., Mining, Moscow, 1967.
- Dickie, R., Mining science for Craft Students, London, 1968.
- Govt. of India, Mining and Marketing of Indian Manganese Ore, New Delhi, 1971.
- Govt. of India, Indian Minerals Year Book, New Delhi, 1971.
- Lewis, R. S., Elements of Mining. New York, 1958.
- Mckinstry, H., Mining Geology, Bombay. 1960.
- Peele, R.; Church, J. A. Ed., Mining Engineers Handbook, New York, 1961.
- Young, G. J., Elements of Mining, New York, 1946.
लेखक : आगस्ते, र. पां.