खाजोटी, मोठी : (हिं. बिचुआ इं. निलगिरी नेटल लॅ. जिरार्डिनिया झेलॅनिका कुल-अर्टिकेसी). ही १-२ मी. उंच आणि बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ ओषधी किंवा लहान क्षुप (झुडूप) श्रीलंकेत व भारतात (हिमालय, आसाम, कोकण, दख्खन, पश्चिम द्वीपकल्प, सह्याद्री इ.) सापडते. मुळे बहुवर्षायू खोडावर व फांद्यांवर खोलगट उभ्या रेषा व सर्वांगावर राठ दाहक केस असतात. पाने साधी, मोठी, हृदयाकृती, खंडित व दंतुर लहान, एकलिंगी फुले अकुंठित (अमर्याद) वल्लरीवर ऑक्टोबरात येतात. पुं-पुष्पे खाली व स्त्री-पुष्पे वरच्या कक्षेत असतात. कृत्स्नफळे (शुष्क, आपोआप न फुटणारी व एकच बीज असलेली फळे) काळी व चापट [→ अर्टिकेसी]. पानांचा काढा ज्वरावर देतात. डोकेदुखी आणि सुजलेल्या सांध्याकरिताही पाने उपयुक्त खोड व फांद्या यांपासून निघणारा धागा लांब, टिकाऊ, मजबूत, पांढरा व रेशमासारखा असून त्यापासून आसामात गोणपाटाचे कापड विणतात. हा धागा लोकरीत मिसळतात त्यापासून कोळ्यांची जाळी बनवितात, तथापी तो व्यापारी दृष्ट्या कमी सोयीचा असतो.
मोठी खाजोटी
ज्ञानसागर, वि. रा.
“