कुमारव्यास : (सु. चौदावे–पंधरावे शतक). प्रख्यात कन्नड महाकवी. कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा जाणणाऱ्या एका गौड (पाटील) घराण्यात त्याचा जन्म झाला व गदगजवळील कोळवाड येथे त्याने काही काळ पाटीलकी केली, एवढीच माहिती त्याच्या जीवनाबाबत उपलब्ध आहे. गदग (जि. धारवाड) येथील श्रीवीरनारायण देवाच्या कृपाप्रसादाने त्याने कन्नडमध्ये महाभारत  काव्य रचले. प्रचलित आख्यायिकेवरून कवीचे नाव नारणप्पा असे समजले जाते व त्याने लिहिलेल्या महाभारत  ह्या काव्यग्रंथाची, गदगभारत  अथवा कर्नाट भारत कथा  अशीही नावे आढळतात.

कुमारव्यासाच्या काळाविषयी संशोधकांत तीव्र मतभेद असून,  त्याबाबत १२५० ते १५०० च्या दरम्यान वेगवेगळी मते मांडली जातात. कर्नाटक कविचरितेमध्ये कुमारव्यास विजयानगर येथील देवरायाच्या काळात म्हणजे १४१९ ते १४४६ च्या दरम्यान होऊन गेला असावा, असे लिहिले आहे तर ई. पी. राईस आणि रेव्हरंड किटेल या संशोधकांच्या मते तो विजयानगर येथील कृष्णदेवरायाच्या काळात, म्हणजे १५०९ ते १५२९ च्या दरम्यान होऊन गेला असावा.  मंजेश्वर गोविंद पै यांनी अंतर्गत पुराव्यावरून तो बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला असावा, असे मत मांडले आहे. कन्नड  साहित्य चरित्रकार आर्‌. एस्‌. मुगळी यांनी त्याचा काळ चौदाव्या शतकाचा उत्तरार्ध किंवा पंधराव्या शतकाचा पूर्वार्ध असा दिला आहे.  कुमारव्यासाच्या भाषेतील मराठी किंवा मराठी वळणाच्या शब्दप्रचुरतेमुळे, देवगिरीच्या यादवांचे राज्य नष्ट झाल्यावर, तेथून कर्नाटकात आलेल्या ब्राह्मणांत नारणप्पा असावा असे मानले जाते.  शिवाय महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय कर्नाटकात दृढमूल होण्यास कुमारव्यासभारताची लोकप्रियताच कारणीभूत झाली असावी असे दिसते. कन्नड साहित्यात जैन आणि वीरशैव संप्रदायांच्या तोडीचे महत्त्व वैष्णव संप्रदायाला कुमारव्यासभारतामुळेच प्राप्त झाले.

त्याने लिहिलेला भारत  हा एकच ग्रंथ सध्या उपलब्ध असून, तो उत्कृष्ट आहे. सहजसुंदर रसपरिपोष, आकर्षक शैली व भाषाप्रभुत्व त्यात आढळते. कुमारव्यासाच्या सूक्ष्म, सहज व नाविन्यपूर्ण रूपकरचनेमुळे त्याला ‘रूपक साम्राज्याचा चक्रवर्ती’ म्हटले जाते. मूळ भारत कथा, कन्नडसारख्या देशी भाषेत उत्कटपणे, जिवंतपणे आणि कल्पकतेने त्याने साकार केली असून कन्नड साहित्यातील ती एक महान कृती म्हणून गणली जाते. कुमारव्यासाचा प्रभाव मुक्तेश्वर (१५७४–१६४५), चंद्रात्मज रुद्र (सतरावे शतक) इ. मराठी कवींवरही पडलेला दिसतो.  

वर्टी, आनंद