कुमारन आशान : (१२ एप्रिल १८७३–१६ जानेवारी १९२४). आधुनिक काळातील प्रसिद्ध मलयाळम् कवी व समाजसुधारक. त्यांचे मूळ नाव कुमारन. ‘आशान’ म्हणजे शिक्षक किंवा गुरू. काही काळ ते शिक्षक होते म्हणून त्यांना ही उपाधी लागली. जन्म केरळमध्ये त्रिवेंद्रमजवळील कायिक्करा येथे ईळव नावाच्या अस्पृश्य जातीत झाला. केरळमधील अस्पृश्यांत ईळव जातीचा वर्ग बराच मोठा आहे. बंगलोर आणि कलकत्ता येथे संस्कृत, इंग्रजी, मलयाळम् तसेच बंगाली आणि इतर भारतीय भाषा-साहित्यांचा अभ्यास. बंगालमधील सामाजिक प्रबोधनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांच्याच जातीतील नारायण गुरुस्वामी (१८५६–१९२८) हे त्यांचे आध्यात्मिक तसेच धर्मसुधारणेची स्फूर्ती देणारे गुरू. ईळव जातीच्या उद्धारार्थ नारायण गुरुस्वामींनी स्थापलेल्या ‘श्री नारायण धर्म परिपालन योगम्’ या संस्थेच्या कार्यात कुमारन यांनी सक्रिय भाग घेतला. ह्या संस्थेचे ते सोळा वर्षे सरचिटणीस होते तसेच संस्थेच्या विवेकोदयम् ह्या मुखपत्राचे ते संपादकही होते. नारायण गुरुस्वामींच्या दीर्घकालीन सान्निध्यामुळे चिन्नस्वामी म्हणून कुमारन ओळखले जात. ह्या काळात त्यांनी संस्थेची बळकट संघटना उभारली. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे १९१३ मध्ये त्यांना त्रावणकोर संस्थानाच्या विधिमंडळाचे सभासद नेमण्यात आले. वयाच्या ४५व्या वर्षी (१९१८) भानुमती आम्मा नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झाला. १९२० मध्ये त्यांनी संस्थेच्या पदाचा राजीनामा दिला व साहित्यसेवेस आणि खाजगी जीवनास अधिक वेळ मिळावा म्हणून त्रिवेंद्रमजवळील तोनक्कळ येथे थोडीशी शेती घेऊन ते तेथेच राहू लागले. विवाहानंतर त्यांच्या हातून विशेष दर्जेदार साहित्यनिर्मिती झाली.
सुरुवातीचे त्यांचे लेखन संस्कृत साहित्याच्या प्रभावातून झालेले असून ते प्रामुख्याने भाषांतरित व स्फुट स्वरूपाचे आहे. त्यानंतरच्या त्यांच्या कवितेने मात्र क्रांतिकारी वळण घेतले. वीण पुवु (१९०७) हे त्यांचे आधुनिक शैलीतील पहिले काव्य असून त्यात गळून पडलेल्या एका फुलावरची प्रतीकात्मक विलापिका आहे. केवळ ४१ कडव्यांच्या या काव्यात सखोल प्रतीकता आहे. नळिनि (१९११) व लीला (१९१३) ह्या त्यांच्या दोन प्रेमकाव्यांत उदात्त प्रेमाचा सुंदर अविष्कार आढळतो. प्ररोदनम् (१९१९) ही त्यांचे वाङ्मयीन गुरू ⇨ ए. आर्. राजराज वर्मा (१८६३–१९१८) यांच्या मृत्यूवरील तत्त्वचिंतनपर विलापिका आहे. ‘चिंता विष्टयाय सीता’ (१९१९) ह्या काव्यात त्यांनी रामाने त्यागिलेल्या सीतेच्या मन:स्थितीचे उत्कृष्ट चित्रण केले आहे.
अस्पृश्यतेची तीव्र झळ त्यांना सोसावी लागली. त्यामुळेच हिंदू धर्मापेक्षा बौद्ध धर्माकडे त्यांचा नंतरच्या काळात विशेष कल होता. दुरवस्था (१९२२) व चंडालभिक्षुकि (१९२२) या दोन कथाकाव्यांत त्यांनी जातिभेदनिर्मूलनाचा व मानवतेचा पुरस्कार केला आहे. करुणा (१९२३) ह्या अखेरच्या व सर्वोत्कृष्ट काव्यात ते सामाजिक पुनर्रचनेकडून जीवनाच्या अधिक व्यापक स्वरूपाकडे वळलेले दिसतात. बुद्धानुयायी उपगुप्त आणि वासवदत्ता यांची प्रेमकथा त्यात वर्णन केली आहे. त्यांची भावगीतात्मक स्फुट कविता ‘पुष्पवाटि’, ‘मणिमाला’ व ‘वनमाला’ ह्या संग्रहांतून प्रसिद्ध झालेली आहे.
मलयाळम् साहित्यात कथाकाव्याला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्याचे व भावगीतांचा नवा प्रवाह मलयाळम् काव्यात आणण्याचे श्रेय कुमारन आशान यांना दिले जाते. कुमारन आशान, ⇨ वळ्ळत्तोळ नारायण मेनन (१८७९–१९५८) आणि ⇨ उळ्ळूर एस्. परमेश्वर अय्यर (१८७७–१९४९) हे तीन कवी ‘थोर त्रयी’ म्हणून मलयाळम् साहित्यात ओळखले जातात. मद्रास येथे १९२१ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स यांनी कुमारन आशान यांच्य कर्तृत्वाचा गौरव केला. केरळमध्ये पल्लना नदीत एका बोटीच्या अपघातात त्यांचे अकाली आकस्मिक निधन झाले.
त्रिवेंद्रम येथे १२ एप्रिल १९७३ रोजी त्यांची जन्म शताब्दी मोठ्या भव्य स्वरूपात साजरी झाली. केरळ सरकारने कुमारन यांच्या जन्मग्रामी, मृत्युग्रामी आणि कर्मग्रामी त्यांची स्मारके उभारून त्यांच्या साहित्यसेवेचा व समाजसेवेचा यथोचित गौरव केला.
संदर्भ : 1. George, K. M. Kumaran Asan, Delhi, 1972.
2. Ravindran, T. K. Asan and Social Revolution in Kerala : A Study of His Assembly Speeches, Trivandrum, 1973.
नायर, एस्. के. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
“