कुत्र्यांच्या शर्यती : ज्यात यांत्रिक सशाचा उपयोग केलेला आहे, असा वर्तुळाकार मैदानातील कुत्र्यांच्या शर्यतीचा लोकप्रिय पाश्चात्त्य खेळ. शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने सशाची शिकार करण्याच्या प्राचीन खेळाचे हे आधुनिक स्वरूप होय. अमेरिकेत मॅसॅचूसेट्समध्ये अशा प्रकारच्या कुत्र्यांच्या शर्यती प्रथम भरविण्यात आल्या. जेथे शर्यत संपते, त्या रेषेवर प्रथम रंगीत कपडे हलविले जात व ते लक्ष्य समजून कुत्रे तिकडे धावत, नंतर रंगीत कपड्यांऐवजी जिवंत ससे उपयोगात आणले जाऊ लागले. परंतु त्यातील सशांची हत्या पाहून लोकांनी
त्यास विरोध केला. त्यामुळे हा प्रकार विधिबाह्य ठरविण्यात आला. १९१९ मध्ये ऑलिव्हर पी. स्मिथ यानी जिवंत सशाऐवजी यांत्रिक सशाचा वापर केला. हल्ली या पद्धतीनेच कुत्र्यांच्या शर्यती होतात.
शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने सशांची पारध करणे, हा सर्वमान्य करमणुकीचा प्राचीन प्रकार होता. प्राचीन ग्रीस व ईजिप्तच्या भित्तिचित्रांत शिकारी कुत्र्यांची चित्रे दिसून येतात. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या काळात शिकारी कुत्रे घेऊन सशांची पारध करण्याचा खेळ प्रचलित होता. १८५८ मध्ये नॅशनल कोर्सिंग क्लब इंग्लंडमध्ये स्थापन झाला. असेच क्लब इतरत्रही स्थापन झाले. याच करमणुकीच्या खेळाची परिणती पुढे कुत्र्यांच्या शर्यतीत झाली.
मिडलसेक्समधील वेल्श हार्प येथे झालेल्या १८७६ च्या बैठकीत सशाच्या शिकारीच्या खेळासाठी ४०० यार्डांच्या (३६५·७६ मी.) सरळ धावमार्गाची योजना करण्यात आली. धावमार्ग सरळ असल्यामुळे शिकारी कुत्र्यांचा सहज विजय होत असे. त्यामुळे त्याबद्दल आकर्षण आणि उत्सुकता वाटत नसे. १८९० नंतर किंवा त्या सुमारास वर्तुळाकार धावमार्गाची कल्पना अमेरिकेत पुढे आली. परंतु आर्थिक पाठिंब्याच्या अभावी तिला मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. तथापि या खेळाच्या आधुनिक स्वरूपाचे मूळ या कल्पनेत आढळते.
१९१९ च्या सुमारास अमेरिकेच्या निरनिराळ्या भागांत शर्यतीकरिता निरनिराळे धावमार्ग तयार करण्यात आले. अमेरिकेचा एक खेळाडू चार्ल्स मन इंग्लंडला गेला आणि त्याने आपल्या कल्पनेतील खेळाची चित्रे जनरल आल्फ्रेड सी. क्रिचले यांना दाखविली. आल्फ्रेडला त्याची कल्पना पसंत पडली. त्या दोघांनी मिळून ग्रे हाऊंड रेसिंग असोसिएशन स्थापन केली आणि बेले व्हू (मॅंचेस्टर) येथे शर्यतीचा धावमार्ग तयार केला. वेल्श हार्प येथील योजनेनंतर पन्नास वर्षांनी म्हणजे २४ जुलै १९२६ रोजी कुत्र्याच्या शर्यतीची नवीन योजनेप्रमाणे यशस्वी सुरुवात झाली.
कुत्रा पंधरा महिन्यांचा झाल्यावर त्याला अधिकृत शर्यतीत पळविता येते. शर्यतीत भाग घेणाऱ्या कुत्र्यांच्या अनेक तपशिलांची नोंद करण्यात येते. पहिल्या १८२·८८ मी. (२०० यार्ड) पर्यंत कुत्र्यांचा वेग सरासरी ताशी ५७·६ किमी. (३६ मैल) पर्यंतही जातो. ४७०·९१मी. (५२५ यार्ड) शर्यंतीचा सरासरी वेळ साधारणत: ३० सेकंद असतो. शर्यती रात्री विजेच्या प्रकाशात होतात. लंडन येथील वॉटर्लू व डर्बी या प्रतिवर्षी होणाऱ्या कुत्र्यांच्या शर्यती प्रसिद्ध आहेत. साध्या पळण्याच्या शर्यती सहा कुत्र्यांच्या आणि अडथळ्यांच्या शर्यती पाच कुत्र्यांच्या असतात. ‘मिक द मिलर’ या प्रसिद्ध कुत्र्याने दोन वेळा डर्बी व इतर महत्त्वाच्या शर्यती जिंकल्या.
फ्रान्स, आयर्लंड, इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका येथे कुत्र्यांच्या शर्यतींची क्रीडांगणे आहेत.
गोखले, श्री. पु.
“