कुतुबमीनार : दिल्लीच्या दक्षिणेस १७·७ किमी. अंतरावरील मेहरोली येथे असलेला जगप्रसिद्ध उंच मनोरा. हा मनोरा पाच मजली असून, त्याची सध्याची उंची ७२·५६ मी., तळचा व्यास १४·४० मी. व शिरोभागाचा व्यास २·७४ मी. आहे. दिल्लीचा पहिला सुलतान कुत्बुद्दीन ऐबक ह्याने दिल्ली येथे ‘कुव्वतुल इस्लाम’ ही पहिली मशीद ११९३ ते ११९७ ह्या काळात, त्या

कुतुबमिनार

ठिकाणी पूर्वी असलेली हिंदू व जैन देवालये (हिंदूंची सत्तावीस नक्षत्रांची मंदिरे) पाडून त्या वास्तुसामग्रीतून बांधली, असे उल्लेख आढळतात. ह्या मशिदीच्या नजीकच ऐबकाने ११९९ मध्ये कुतुबमीनार उभारण्यास प्रारंभ केला. मशिदीचा मुअज्जिनचा बांग पुकारण्याचा मनोरा आणि ऐबकाच्या पराक्रमाचा विजयस्तंभ अशी दुहेरी योजना त्यामागे होती. ऐबकाच्या कारकीर्दीत (१२०६–१०) फक्त पहिल्या मजल्याचेच बांधकाम पूर्ण होऊ शकले. त्याचा वारस सुलतान शम्सुद्दीन अल्तमश ह्याने १२३० मध्ये मनोऱ्याचे एकूण चार मजल्यांचे बांधकाम पूर्ण केले. पुढे चौदाव्या शतकात मनोऱ्याच्या शिरोभागाची विजेच्या आघाताने नासधूस झाली. तेव्हा फिरोजशहा तुघलकाने (कार. १३५१–८८) १३६८ मध्ये चौथ्या मजल्याची पुनर्रचना केली, त्यावर पाचवा मजला चढवला व त्यास घुमटाची जोड दिली. तथापि हा घुमट १८०३ मध्ये भूकंपामुळे खाली आला. त्यावेळी स्मिथ ह्या स्थापत्यविशारदाने नवा घुमट चढवला तथापि तो मूळ वास्तूशी शैलीदृष्ट्या इतका विजोड होता, की त्यावर खूपच टीका होऊन तो खाली उतरवण्यात आला. हा भाग अद्यापही कुतुबमीनाराच्या परिसरात दिसतो.

हा मनोरा हिंदु-इस्लामी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. मनोऱ्याचा वास्तुकल्प इस्लामी वास्तुविशारदाचा असावा व प्रत्यक्ष बांधणी मात्र तत्कालीन हिंदू कारागिरांनी केली असावी. त्यामुळे वास्तूच्या अलंकरणात भारतीय वैशिष्ट्ये आढळून येतात. तुघलकाने केलेली मनोऱ्याच्या वरच्या मजल्यांची पुनर्रचना कलात्मक एकात्मतेशी विसंवादी वाटते. मनोऱ्याचे खालचे तीन मजले तांबड्या-पिवळ्या वालुकाश्मात आहेत तर वरचे दोन मजले पांढऱ्या संगमरवरात आहेत व त्यावर तांबड्या वालुकाश्माचे आडवे पट्टे आहेत. अलंकरणदृष्ट्या पहिल्या मजल्याच्या रचनेत गोलाकार व कोनाकृती उभ्या खाचांचा आलटून-पालटून वापर केलेला आहे, दुसऱ्या मजल्याच्या रचनेत केवळ गोलाकार, तर तिसऱ्या मजल्यात केवळ कोनाकृती अशा उभ्या खाचा आहेत. ह्याउलट वरचे दोन मजले मात्र सपाट गोलाकार आहेत. मनोऱ्याचा पृष्ठभाग खाचांप्रमाणेच आडव्या कोरीव नक्षीपट्टांनी सजविलेला आहे. त्यांवर कुराणातील वचने खोदून तसेच ‘अरेबस्क’ नक्षीप्रकाराचा अवलंब करून सुंदर अलंकरण साधले आहे. ह्या वास्तूचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मजल्यांना पुढे झुकलेल्या अलंकृत सज्जांची जोड दिलेली आहे. हे सज्जे भरघोस अलंकरणाने सजविलेल्या हिमस्फटिकी अश्वाकृती झुकावांवर (स्टॅलॅक्टाइट कॉर्बेल) अधिष्ठित आहेत. ह्या मनोऱ्याच्या अंतर्भागात ३७६ पायऱ्या असून, हवा व उजेड भरपूर आहे. घाटदार आकार व उंची ह्यांमुळे ही वास्तू आकर्षक दिसते.

कुतुबमीनारच्या निर्मितीविषयी अनेक मतभेद आहेत. काहींच्या मते ही मुळात हिंदू वास्तू असून, मुस्लिमांनी तिच्यात फेरफार करून ती पूर्ण केली. हा मनोरा पृथ्वीराज चौहान (कार. ११७९–९२)ह्याने उभारला, असेही एक मत आहे. त्यावरून त्याला ‘पृथ्वीलाट’ असेही संबोधतात. तसेच ह्या ठिकाणी गुप्तवंशाने नक्षत्रांचा अभ्यास करण्यासाठी वर्तुळाच्या परिघावर देवळे बांधून मध्यभागी हा उंच मनोरा उभारला, अशी नोंद वॅग्नर ह्या पाश्चात्त्य प्रवाशाने केली आहे. (सु. ११०४). अलीकडील संशोधनात पु. ना. ओक ह्यांनी इस्लाम धर्माच्या उदयापूर्वी विक्रमादित्याच्या काळातील (३८०—४१३) वेधशाळेचा हा मध्यवर्ती निरीक्षणस्तंभ असावा, असे मत व्यक्त केले आहे तर डॉ.डी.एस्‌.त्रिवेद ह्यांनी कुतुबमीनार हा समुद्रगुप्ताने इ.स.पू. २८० मध्येउभारलेला विष्णुध्वज (वेधशाळेचा मनोरा) आहे,असे मत सप्रमाण मांडले आहे. तथापि वास्तुशैलीदृष्ट्या ही मते विवाद्य ठरतात. मुस्लिमांनी पूर्वीच्या काळात गझनी येथे कुतुबमीनारच्या वास्तुकल्पाशी साधर्म्य असणारे दोन मनोरे उभारले होते. याउलट हिंदूंचा पूर्वीच्या काळातील चितोड येथील छोटेखानी स्तंभ शैलीदृष्ट्या अगदी भिन्न आहे. वास्तविक मनोऱ्याची वास्तुरचना, त्यावरील उभ्या खाचा,‘अरेबस्क’ अलंकरण व हिमस्फटिकी झुकाव ही खास इस्लामी वैशिष्ट्ये होत.

संदर्भ : 1. Chopra, Prabha, Ed. Delhi : History and Places of Interest, Delhi, 1970.

    2. Munshi, R.N. History of Qutb Manar, Bombay, 1911.

    3. Oak, P.N. Some Blunders of Indian Historical Research, New Delhi, 1966.

    4. Triveda, D.S. Visnudhvaja or Qutb Manar, Varanasi, 1962.

इनामदार, श्री. दे.