कुडा : फुलझाडांपैकी ॲपोसायनेसी कुलामध्ये कुडा या नावाखाली पुढे वर्णन केलेल्या तीन निरनिराळ्या वनस्पतींचा समावेश होतो.
पांढरा कुडा : (हिं. कुर्ची गु. कुडो, कडवो इंद्रजव क. कोरिसिगे, कोडमुरक सं. कुटज, इंद्रजव, पांडुर इं. ईस्टर ट्री, कोनेसी बार्क ट्री डिसेंटरी रोझबे लॅ. होलॅऱ्हीना अँटिडिसेंटेरिका कुल-ॲपोसायनेसी). कण्हेर, सर्पगंधा इ. वनस्पतींच्या वंशातील हे मोठे, पानझडी क्षुप (झुडूप) अथवा लहान वृक्ष भारतात सर्वत्र (हिमालयात १,२४० मी. उंचीपर्यंत), ब्रह्मदेश व मलाया येथे आढळते. महाराष्ट्रात पानझडी जंगलात सामान्यपणे आणि कोकणात विशेष प्रमाणात सापडते. खोडाची साल करडी, गुळगुळीत व किंचित लवदार पाने साधी, अल्पवृंत (लहान देठाची), संमुख (समोरासमोर), तळाशी रुंद, पुढे अरुंद व टोकदार पांढरी, मध्यम आकाराची फुले गुलुच्छीय वल्लरीवर फांदीच्या टोकास फेब्रुवारी ते जूनमध्ये येतात. [→ ॲपोसायनेसी पुष्पगंध] पेटिकाफळ शेंगेसारखे, लांब, सडपातळ, जोडीने येते व त्यावर पांढरट ठिपके असतात बिया अनेक व त्यांवर तपकिरी केसांचा व पुढे गळून पडणारा पुंजका असतो.
ह्याचे लाकूड नरम व हलके असून फण्या, खेळणी, चित्रांच्या चौकटी, कातीव काम, साध्या सजावटी सामानाचे भाग, खाटांचे पाय इ. किरकोळ उपयोगाचे असते. पाला गुरांना चारा म्हणून घालतात. फुलांची भाजी करतात. मुळाची साल अत्यंत कडू, ज्वरप्रतिबंधक व रक्तसंग्राहक असून आमांश व अतिसार यांवर गुणकारी आहे बिया (इंद्रजव) स्तंभक (आकुंचन करणाऱ्या), कृमिनाशक व वायुनाशी असून त्या मुलांची संग्रहणी, अतिसार, शूळ (तीव्र वेदना), जीर्णज्वर, दमा इत्यादींवर उपयुक्त आहेत.
काळा कुडा : (गोड इंद्रजव हिं. सिरई, दुधी सं. मधुइंद्रायण इं. ब्ल्यू डायिंग रोझबे लॅ.राइटिया टिंक्टोरिया). पांढऱ्या कुड्याच्या कुलातील पण भिन्न वंशातील हा लहान पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र पानझडी जंगलात आढळतो. ह्याची उंची ६–७·५ मी. व घेर ०·९–१·२ मी. असतो. साल खवलेदार परंतु गुळगुळीत व पाने अल्पवृंत, पातळ, गुळगुळीत व भाल्यासारखी असतात. फुले पांढरी व सुवासिक ⇨ तगरीच्या फुलासारखी असून मार्च—मेमध्ये द्विशाखी वल्लरीवर फांद्यांच्या टोकास येतात. फुलाची सामान्य लक्षणे ⇨ ॲपोसायनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फुलात अनेक पांढऱ्या रेषाकृती विरळ खवल्यांचे तोरणअसते. शेंगा (पेटिकाफळे) व बी पांढऱ्या कुड्याप्रमाणे असते.
लाकूड मध्यम कठीण प्रतीचे, हस्तिदंती रंगाचे, कातीव व कोरीव कामास बरे असते उपयोग पांढऱ्या कुड्याप्रमाणे मुळाची साल व बी (गोड इंद्रजव) यांचे औषधी गुणधर्मही तसेच साल शक्तिवर्धक व बी वाजीकर (कामोत्तेजक) असून रक्तदोष, यकृताचे व पित्ताशयाचे रोग, अर्शरोग (मूळव्याध) इत्यादींवर गुणकारी. पाला गुरांना खाऊ घालतात पाने बिड्यांकरिता वापरतात पाने पाण्यात उकळून निळा रंग बनवितात. शोभेकरिता झाडे बागेत लावतात.
तांबडा कुडा : (हिं. धरवली, दुधी क. काडुनागळू इ. डाउनी ओलिअँडर लॅ. राइटिया टोमेंटोजा). काळ्या कुड्याच्या वंशातील ही दुसरी जाती भारतात सर्वत्र (दाट जंगलांत) श्रीलंकेत व ब्रह्मदेशात आढळते. सु. ७–१० मी. उंचीचा हा पानझडी वृक्ष असून सालीतून पिवळा चीक निघतो. पाने अल्पवृंत व दोन्ही टोकांस निमुळती, लवदार व वाळल्यावर तांबडी विटकरी दिसतात. सर्व कोवळे भाग लवदार बहुतेक सर्व लक्षणे काळ्या कुड्याप्रमाणे फुलांचा वास चांगला नसून एप्रिल-जूनमध्ये सुकल्यावर ती पिवळी दिसतात. तोरणाचे खवले आखूड,५–१०, बोथट व नारिंगी असतात. बियांवरचा केसांचा पुंजका पांढरा पाने आणि कोवळी फळे खाद्य सालीतील पिवळट चिकापासून पिवळा रंग तयार करतात. लाकूड मध्यम प्रतीचे व उपयोग काळ्या कुड्याप्रमाणे सालीचा उपयोग आर्तवदोष (मासिक पाळीचे दोष) व मूत्रपिंडाच्या विकारांवर होतो. ही झाडे शोभेकरिता बागेत लावतात. (चित्रपत्र ५२).
पहा : ॲपोसायनेसी
चंद्रस, ग. शं.
“