खनिज जल : निसर्गतःच खनिज द्रव्ये किंवा वायू यांनी युक्त असलेल्या आणि विशेषतः औषधी उपयोगाच्या पाण्याला खनिज जल व त्याच्या झऱ्याला खनिज झरा म्हणतात. अशी द्रव्ये खडकांतून व जमिनीतून वाहताना पाण्यात आलेली असतात. त्यांच्यामुळे पाण्याला विशिष्ट गुणधर्म येतात. सामान्यपणे खनिज जल पिण्यालायक नसले, तरी पिण्याचे पाणी व खनिज जल यांच्यात काटेकोरपणे भेद करता येत नाही. कारण काही खनिज जले नागरी पाणीपुरवठ्यासाठी वापरली जातात. नैसर्गिक पाण्यात बहुधा थोडेफार खनिज द्रव्य असते. मात्र खनिज जलात काही खनिजे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असतात.पाण्यात खनिज द्रव्य कोणते व किती प्रमाणात असेल, हे पाणी ज्या खडकांमधून व जमिनीमधून जाते त्यांच्या गुणधर्मांवर आणि पाणी त्यांच्यात किती काळ होते यांवर अवलंबून असते.
इतिहास : इतिहासपूर्व काळापासून मानवास खनिज जलाची माहिती आहे. वैद्यकाचे जनक हिपॉक्राटीझ यांनी इ. स. पू. ४०० च्या सुमारास व प्लिनी यांनी इ. स. ७७ मध्ये खनिज झऱ्यांचे वर्णन केल्याचे उल्लेख आढळतात. रोमनांना इटलीतील खनिज झरे तर माहीत होतेच, शिवाय ते आखेन (जर्मनी) आणि बाथ (इंग्लंड) येथील खनिज जल वापरीत असत. बऱ्याच खनिज झऱ्यांच्या जवळपास गावे व उपचारकेंद्रे उभारली गेली असून ती प्रसिद्ध आहेत. सेल्ट्सर व विशी नावाची खनिज जले जगप्रसिद्ध आहेत.
आढळ : जगाच्या पुष्कळ भागांत खनिज झरे आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये असे ८,८०० झरे असून व्हाइट सल्फर, गेटिसबुर्ग, सारटोग, ऑइल स्प्रिंग, रिचर्डसन, मौंट क्लेमन्स इ. झरे प्रसिद्ध आहेत. बाडेन-बाडेन, विसबाडन, होमबुर्ग (जर्मनी) विटेल (फ्रान्स) हॅरोगेट, चेशर चेरी रॉक (इंग्लंड) कारलॉवो व्हारी (झेकोस्लोव्हाकिया) बाडन, ल्यूक (स्वित्झर्लंड) स्पा (बेल्जियम) इ. यूरोपातील झरे प्रसिद्ध आहेत.
भारतात तीनशेहून जास्त खनिज झरे असून ते औषधी व पवित्र मानले जातात. पंजाब, बिहार, आसाम, काश्मीर, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्या इ. भागांत खनिज झरे आहेत. गरमपाणी, नांबार (आसाम) राजगीर टेकड्या, मोंघीर (बिहार) कावा (भडोच), लासुंदरा (खेडा), टाटापाणी (सरगुजा) तुवा, अनावल (सुरत), आनबोनी (छिंदवाडा), सामोनी (होशंगाबाद) इ. ठिकाणे खनिज झऱ्यांकरिता प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात कडाळणी, सापासोन पाली, कोंकर, सतीवली, वज्राबाई, वज्रेश्वरी, खेड, उन्हाळा, अरवली, तुराल, राजेवाडी, संगमेश्वर, राजापूर, मात, गणेशपुरी, अकोली, देवटक टाकेद, कळवण (उन्हाळी) इ. ठिकाणी खनिज जल आढळते. रत्नागिरी ते मुंबई दरम्यान सरळ रेषेत असलेली उन्हाळी त्या भागात विभंग (प्रचंड भेगा) असल्याचे सुचवितात.
गुणधर्म : सामान्यतः खनिज जल नितळ असते. मात्र त्यात द्रव्याचे कण तरंगत असल्यास त्याला वेगवेगळ्या छटा येतात. कॅल्शियम कार्बोनेटाने किंवा गंधकाने पांढरी, मृत्तिकेमुळे किंवा स्लेटमुळे निळसर तांबडी, लोह ऑक्साइड किंवा लाल शैवले यांच्यामुळे लालसर इ. छटा येतात. हायड्रोजन सल्फाइडामुळे गंधकाचा किंवा कुजकट वास येतो, उदा., नांबार येथील खनिज जल. सोडियम व मॅग्नेशियम सल्फेटांमुळे कडवट, मिठाने खारट तर क्षारकीय (ज्यात अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारे संयुग संयुक्त रीत्या उपस्थित असते अशा) लवणांमुळे मचूळ चव आणि बुळबुळीतपणा येतो. खनिज जलात सामान्यतः कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, सोडियम, पोटॅशियम, तांबे इ. धातूंची कार्बोनेट, क्लोराइडे, फॉस्फेटे, सल्फेटे, सल्फाइडे, सिलिकेटे वगैरे संयुगे आणि कार्बन डाय-ऑक्साइड व हायड्रोजन सल्फाइड वायू ही असतात. कधीकधी त्यांच्यामध्ये बेरियम, स्ट्राँशियम, लिथियम, आर्सेनिक, आयोडीन, फ्ल्युओरीन, बोरॉन, किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारी) द्रव्ये व हीलियम, आर्गॉन, रेडॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे अक्रिय (रासायनिक विक्रियेत सहजासहजी भाग न घेणारे) वायूही आढळतात.
काही खनिज झरे साध्या पावसाच्या पाण्यात खडकांमधील आणि जमिनीतील खनिज द्रव्ये विरघळून तयार झालेले असतात. मात्र इतर झऱ्यांतील काही पाणी तरी खालील तप्त खडकांमधून आलेले असते. त्यामुळे थंड, उष्ण आणि कधीकधी उकळते झरेही आढळतात. उष्ण झऱ्यांचे पाणी अधिक खोल भागातून येत असल्याने त्यांच्यातील खनिज द्रव्ये नुसती पाझरून किंवा विरघळून न येता रासायनिक मिश्रण होऊन येतात. त्यांच्यात कलिले (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेली विशिष्ट प्रकारची द्रवमिश्रणे) अधिक प्रमाणात असतात व कधीकधी किरणोत्सर्गी गुणधर्मही असतात. उलट थंड झऱ्यांचे पाणी जमिनीच्या वरील भागातून येत असल्याने ते खनिज द्रव्यांचा विद्राव असते. खनिज जलाचे तापमान व रासायनिक संघटन यांचा परस्पर संबंध नसला, तरी सामान्यपणे उष्ण पाण्यात खनिज द्रव्य अधिक असते.
वर्गीकरण : खनिज जलांचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारांनी करतात. तापमानानुसार त्यांचे पुढील प्रकार होतात. २१० से. पेक्षा कमी तापमानाचे थंड (उदा., शॅरन, न्यूयॉर्क) २१०–३७० से. अल्पोष्ण किंवा कोमट (उदा., वॉर्मस्प्रिंग, जॉर्जिया) ३७०–४२० सें. उष्ण (उदा., हॉटस्प्रिंग्ज, आर्कॅन्सॉ) व ४२० पेक्षा अधिक अत्युष्ण (उदा., सॅन बर्नरडीनो, कॅलिफोर्निया). भारतात ४९० सें. पेक्षाही जास्त तापमानाचे थोडे झरे आहेत. खनिज जलातील द्रव्यानुसार त्यांचे दोन प्रमुख प्रकार पडतात. (अ) वायुयुक्त : कार्बोनेटेड (कार्बन डाय-ऑक्साइड असलेले) गंधकी किंवा हायड्रोजन सल्फाइडयुक्त (पंजाब, उत्तर प्रदेश) नायट्रोजनयुक्त मिथेनयुक्त (कार्ब्युरेटेड) व (आ) खनिज लवणाचा प्रकार आणि प्रमाण यांच्यानुसार खारट (विसबाडन) कडू (एप्सम) खारट-कडू (कार्ल्सबात) क्षारकीय (लासवेगास) मृत्तिकामय (लूका, इटली) लोहयुक्त किंवा कॅलिबिएट (बुसांग, फ्रान्स) व सिलिकामय. यांशिवाय रेडॉनयुक्त रेडियम जल (तुवा, सुरत) लिथियमयुक्त बेरियमयुक्त (हॅरोगेट) आर्सेनिकयुक्त (फ्रान्स) बोरॉनआयोडीनयुक्त (वुडहॉल) अक्रिय वायुयुक्त (बाथ) स्ट्राँशियमयुक्त इ. खास प्रकारही आढळतात. खनिज जलाचा तर्षणदाब (विरघळलेल्या पदार्थाच्या रेणूंच्या गतीमुळे निर्माण होणारा दाब) रक्ताच्या तर्षणदाबाच्या संदर्भात पाहून त्यांचे अल्पबली, समबली व अतिबली असे प्रकार पाडतात. तसेच जलाच्या उपयुक्ततेनुसार पिण्यासाठी (गरमपाणी, आसाम) आणि वैद्यकीय चिकित्सेसाठी वापरले जाणारे असेही प्रकार पाडतात. पिण्याच्या खनिज जलात द्रव्ये कमी असतात व लोह जवळजवळ नसते.
खनिज जलचिकित्सा : विशिष्ट गुणधर्मांमुळे खनिज जलांचा रोगपरिहारासाठी उपयोग करतात. या शास्त्राला खनिज जलचिकित्सा म्हणतात. बेल्जियममधील स्पा येथील खनिज जल रोग बरे करण्यासाठी वापरीत असत. म्हणून या चिकित्सेला ‘स्पा-चिकित्सा’ असेही म्हणतात. उपचारांबरोबरच पाळावयाच्या पथ्यांचाही या चिकित्सेत समावेश करतात. प्राचीन चिनी वाङ्मयात व बायबलमध्ये हिचा उल्लेख आहे. ऐतिहासिक काळाच्या प्रारंभी पंगुत्वावर खनिज जल वापरीत. गंधकीय, खारट, क्षारकीय, कॅल्शियमयुक्त, आर्सेनिकयुक्त अशा भेदांनुसार खनिज जलांचे चिकित्सेतील वैशिष्ट्य ठरविले जावे, असे विसाव्या शतकात झालेल्या संशोधनामुळे तज्ञांचे मत झाले आहे. खनिज जलाचा बाह्योपचारासाठी किंवा पोटात घेण्यासाठीही उपयोग करतात. बहुधा खनिज जलावर प्रक्रिया करावी लागत नाही. मात्र कधीकधी त्याच्यातील लोह काढून टाकतात व त्याच्यातील लवणांचे व वायूंचे प्रमाण जुळवून घ्यावे लागते.उपचार करताना पाण्याचे तापमान, तर्षणदाब व झऱ्याचे ठिकाण, उंची आणि जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) ही लक्षात घ्यावी लागतात. तसेच पाण्यातील खनिज द्रव्यांमुळेही त्यांच्या उपयुक्ततेवर मर्यादा पडतात. संधिवात व सायाटिका या विकारांकरिता ३६·५० से. ते ३८·५० से. तापमानाचे जल वापरतात. काही खनिज जले स्नानचिकित्सेत तर काही रेचक म्हणून उपयोगी पडतात. मात्र सर्व उपचार वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि योग्य काळापुरतेच करावयाचे असतात. तंतुशोथ (शरीरातील पांढऱ्या तंतुमय पेशीसमूहांची दाहयुक्त सूज) अतिस्थूलता, यकृतरोग, वृक्कविकार (मूत्रपिंडाचे विकार), वात, तंत्रिकाविकार (मज्जाविकार), अस्थि-संधिशोथ (हाडांच्या सांध्याची सूज), रक्तपरिवहन (रुधिराभिसरण), त्वचा रोग (इसब, कंड), ज्वर, ऋतुनिवृत्ती (मासिक पाळी बंद होणे) व स्त्रियांचे काही विकार, अग्निमांद्य, अपचन, गंडमाळा, गाऊट (रक्तात यूरिक अम्ल जास्त प्रमाणात साचणे, सांध्याना दाहयुक्त सूज येणे इ. लक्षणे असेलेली स्थिती ) इ.रोगांवर खनिज जलचिकित्सा केली जाते. भारतातील खनिज जलांचे या दृष्टीने संशोधन अद्याप व्हावयाचे असून अशा ठिकाणांचा उपचारकेंद्रे व प्रवासी स्थळे म्हणून विकास करण्यास पुष्कळच वाव आहे.
कृत्रिम खनिज जले : लेओन्हार्ट थर्नीसर यांनी १५७२ साली प्रथम कृत्रिम खनिज जल (गंधकी) तयार केले. १६९७ साली एन्. ग्रू यांनी न फसफसणारे खनिज जल आणि १७२० मध्ये लिमेरी यांनी विविध प्रकारची खनिज जले तयार केली. शॉ, कॅव्हेंडिश, जोसेफ प्रीस्टली इत्यादींनी १७५०– ७५ दरम्यान फसफसणारी जले तयार केली. १९३२ साली स्वादिष्ट सॅकरीन जलाचा शोध लागल्यावर श्ट्रूव्हे यांनी पुष्कळ खनिज जले जशीच्या तशी तयार केली. नैसर्गिक खनिज जलाचे प्रथम काळजीपूर्वक रासायनिक विश्लेषण करून घेतात. त्यानुसार साध्या पाण्यात वा काही खनिज जलांत योग्य प्रमाणात लवणे व वायू घालतात. विशेषतः ब्रिटनमध्ये सोडा वॉटर, लेमोनेड, जिंजर बीर, स्वादयुक्त सौम्य पेये इत्यादींनाही खनिज जल संबोधण्यात येते. अमेरिकेत अशी जले बाटल्यांतून मिळतात व ती पेये म्हणून किंवा औषधी उपयोगांकरिताही वापरतात.
पहा : उन्हाळे गायझर निसर्गोपचार भौतिकी चिकित्सा.
ठाकूर, अ. ना. ढमढेरे, वा. रा.
“