खंबायत संस्थान : स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानातील एक संस्थान. आधुनिक गुजरात राज्यात पूर्वीच्या खेडा एजन्सी विभागात ते होते. याची लोकसंख्या ९६,५०१ (१९४१) असून क्षेत्रफळ सु. ८१० चौ. किमी. होते. दोन शहरे व ८८ खेडी असलेल्या या संस्थानचे उत्पन्न सु. ९,६७,००० रु. होते. उत्तरेस खेडा जिल्हा, पश्चिमेस साबरमती नदी, दक्षिणेस खंबायतचे आखात व पूर्वेस बडोदे संस्थान यांनी ते सीमित झालेले असून काही खेडी बडोदे संस्थानात किंवा पुढे इंग्रजांकडे गेली तर संस्थानची काही खेडी खेडा जिल्ह्यात समाविष्ट झाली.
खंबायतसंबंधी अनेक आख्यायिका प्रचलित असून स्तंभ किंवा स्तंभतीर्थ या महादेवाच्या तीर्थावरून हे नाव पडले, असे समजतात. खंबायतच्या प्राचीन इतिहासाविषयी ऐतिहासिक कागदपत्रांतून अनेक उल्लेख सापडतात. अकराव्या शतकात खंबायत अनहिलवाडच्या राजपूत राजांच्या ताब्यात होते व त्यांचे ते एक महत्त्वाचे बंदर होते. पुढे १२९८ मध्ये ते मुसलमानांनी घेतले आणि त्यानंतर अकबराच्या वेळी ते मोगलांच्या आधिपत्याखाली गेले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) मराठ्यांनी त्यावर स्वाऱ्या केल्या आणि १७३० मध्ये तर गुजरातचा सुभेदार मोमीनखान हा मोगल साम्राज्यातून बाहेर पडला आणि त्याने खंबायत स्वतंत्र करून आपला जावई निजामखान याजकडे त्याचा कारभार सुपूर्त केला. या वेळेपासून मोमीनखानाचा वंश खंबायतवर आपली अधिसत्ता गाजवू लागला. १७४२ मध्ये मोमीनखानाच्या मुफ्ताखिर (दुसरा मोमीनखान) या मुलाने निजामखानाचा खून करून खंबायतचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला आणि खंबायत हे वेगळे संस्थान निर्माण केले. बारभाईंच्या फौजांपासून संरक्षण मिळावे, म्हणून रघुनाथरावाने इथे आश्रय घेतला होता. पेशव्यांनी खंबायतवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून जकातीचा हिस्सा देण्याची अट नबाबावर लादली पुढेपुढे नबाब हा हिस्सा देण्याची टाळाटाळ करू लागला. १८०२ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांशी वसईचा तह केला. या तहामुळे खंबायत संस्थानचे जकातीच्या हिश्शाचे सर्व अधिकार इंग्रजांकडे गेले आणि खंबायत हे इंग्रजांचे एक मांडलिक संस्थान बनले. त्यास इंग्रजांनी २१,९२४ रु. एवढा सालिना खंडणी बसविली. इंग्रजांच्या खटपटीमुळे जकातवसुलीची पद्धत सुधारली. पुढे बहादुर मिर्झा हुसेन यावरखान याने १९३० मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतली तथापि सागरगामी जहाजे आखातात येईनाशी झाली. त्यामुळे पूर्वीचे व्यापारी वैभव राहिले नाही. शिया पंथी नबाबांना खून खटल्याखेरीज न्यायदानाचे पूर्णाधिकार होते व सालिना तनखा रु. ५,००० मिळे. खंबायत-पेटलाद रेल्वेचा तीनपंचमांश खर्च संस्थाननेच केला. विसाव्या शतकात फारशा सुधारणा झाल्या नाहीत फक्त सुरुवातीस एक डाक-तार कचेरी होती. ४८९ शाळा, २ कापसाच्या गिरण्या, १,४०० हातमाग व ४ रुग्णालये संस्थानात होती. संस्थानामधील ८० टक्के लोक हिंदू होते व त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. याशिवाय कलाबतू व कोरीव कामही काही लोक करीत. स्वातंत्र्यानंतर १५ फेब्रुवारी १९४८ मध्ये हे संस्थान सौराष्ट्र संघात विलीन झाले.
कुलकर्णी, ना. ह.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..