खंड्या : ॲल्सिडीनिडी या पक्षिकुलातील हा पक्षी आहे. याचे सु. १२ वंश आणि ८० पेक्षा जास्त जाती आहेत. सगळ्या जगभर हा पक्षी आढळतो. भारतात आढळणाऱ्या पाच-सहा जातींपैकी एक सामान्य जाती असून ती सगळीकडे आढळते. हिचे शास्त्रीय नाव ॲल्सिडो अट्‌थिस  असे आहे.

हा पक्षी चिमणीपेक्षा थोडा मोठा असतो. शरीराची लांबी १८ सेंमी. असते. डोक्याचा वरचा भाग निळा व त्यावर आडव्या काळ्या रेषा पाठ तकतकीत निळी पंख हिरवट निळे, डोक्याच्या दोन्ही बाजूंवर विटकरी, निळा आणि पांढरा रंग असतो. हनुवटी व गळा पांढरा पोटाकडचा भाग विटकरी चोच शरीराच्या मानाने बरीच लांब, जाड, काळी व टोकदार पाय आखूड व लाल रंगाचे आणि शेपूट लांडे असते. नर व मादी दिसायला सारखीच असतात.

याचे मुख्य भक्ष्य मासे असल्यामुळे हा नेहमी तलाव, डबकी, नद्या यांच्या काठी दिसतो. पाण्यावर आलेल्या झाडाच्या एखाद्या फांदीवर किंवा लव्हाळ्याच्या झुडपावर बसून तो भक्ष्य टेहळीत असतो. मधून मधून आपले डोके हालवीत क्लिक्‌ क्लिक्‌ किंवा किल्‌ किल्‌ असा आवाज काढतो. ओरडताना नेहमी शेपटाला झटका देतो. पाण्यात मासा दिसताच तिरकस सूर मारून मासा चोचीत पकडून तो आपल्या जागेवर येऊन बसतो व मासा गिळतो. बेडकांची पिल्ले व पाणकिडेदेखील तो खातो.

याची वीण मार्चपासून जूनपर्यंत होते. नदीकाठच्या डगरीत हा बोगद्यासारखे ०·३–१·२ मी. लांबीचे आडवे बीळ खणतो. बोगद्याच्या आतल्या टोकाशी असलेल्या रुंद भागात मादी ५–७ तकतकीत पांढरी अंडी घालते. सगळ्या गृहकृत्यांत नर व मादी दोघेही भाग घेतात.

खंड्यासाळुंकीपेक्षा मोठी व पारव्यापेक्षा लहान अशी खंड्याची एक जात भारतात आढळते. याचा रंग पांढरा असून त्यावर लहानमोठे काळे ठिपके व पट्टे असतात. डोक्यावर मागे वळलेला लहान तुरा असतो. हे एक एकटे किंवा जोडीने तळ्याच्या किंवा नदीच्या काठी आढळतात. याची मासे पकडण्याची रीत प्रेक्षणीय असते. पाण्याच्या पृष्ठभागापासून ५-६ मी.उंचीवर पंख एकसारखे हालवीत तो तरंगत असतो. खाली पाण्यात मासे दिसले की, पंख मिटून एखादा दगड जसा वरून पाण्यात पडावा त्याप्रमाणे तो धाडकन पाण्यात पडतो व मासा चोचीत धरून बाहेर येतो व तो गिळतो.

कर्वे, ज. नी.