कुंपणे व कवाडे : जमिनीची हद्द दर्शविण्याकरिता किंवा ती बंदिस्त करण्याकरिता, बाहेरची जनावरे आत येऊ नयेत वा आतील बाहेर जाऊ नयेत याकरिता तसेच इमारतींचे किंवा बागांचे सौंदर्य वाढविण्यासाठी विविध प्रकारची कुंपणे उभारतात. काही देशांत शेतांना आणि विशेषत: गुरांची  पैदास करण्यात येते अशा ठिकाणी कुंपण घालण्यासंबंधी कायदे

आ. १. काटेरी तारेच्या कुंपणासाठी वापरण्यात येणारी सामग्री : (अ) विंचू, (आ) काटेरी तारांचे प्रकार, (इ) तार ताणणारा मळसूत्री आकडा.

करण्यात आलेले आहेत. 

कुंपणाकरिता वापरलेली सामग्री व तांत्रिक विकास यांत बराच सहसंबंध असल्याचे दिसून येते. सुरुवातीला दगड, काटेरी झुडपे, बांबू इत्यादींसारखी सहज उपलब्ध असणारी सामग्री कुंपणासाठी वापरीत असत. नंतर पोलादी तारा, विविध प्रकारच्या लोखंडी व काँक्रीटच्या जाळ्या व खांब इ. साहित्याचा उपयोग होऊ लागला. एकोणिसाव्या शतकात कुंपणासाठी पोलादी तारांचा वापर सुरू झाला. काटेरी तार १८६० च्या सुमारास आणि विणलेली तार १८८३ च्या सुमारास प्रचारात आली. झाडाच्या विशेषत: काटेरी झाडाच्या, फांद्या जमिनीत खोवून व त्यांचा विस्तार एकमेकांत गुंतवून तात्पुरते कुंपण तयार करतात.

कायम स्वरूपाच्या कुंपणांचे मुख्य तीन प्रकार होतात :(१) काटेरी किंवा दाट वाढणाऱ्या झुडपांची वई, (२) लाकडी, लोखंडी किंवा काँक्रीटचे खांब २·३ ते २·६ मी. पर्यंत समान अंतरावर रोवून त्यांच्या दरम्यानच्या गाळ्यात गज, पट्ट्या, पत्रे,  तारा, जाळ्या वगैरे भरून केलेले कुडण व (३) गडगा किंवा दगडविटांच्या किंवा काँक्रीटच्या वाडेभिंती, असे तीन प्रकार आहेत. पण एकाच कुंपणात यांपैकी एकापेक्षा अधिक प्रकार वापरूनही विविधता आणतात.

आ. २. (अ) लोखंडी खांबाचे काँक्रीटमध्ये गुतावाचे प्रकार, (आ) काँक्रीट खांब व अडवट यांचा सांधा.

वई : झुडपांची वई वाढून कायमचे कुंपण म्हणून पूर्णपणे उपयुक्त होण्यास वर्षा-दोन वर्षांचा कालावधी लागतो. वईकरिता  निवडुंग, घायपात, चिल्हार यांसारख्या काटेरी वनस्पतींचा किंवा मेंदी, डिडोनिया, कोयनेल अशा प्रकारच्या दाट झुडपांचा उपयोग करतात. यांशिवाय प्रिव्हेट, लोकस्ट, ऑसेज ऑरेंज, बक्थॉर्न यांसारख्या पानझडी झाडांचा आणि आर्बर व्हिटी, जूनिपर, बॉक्स, हेमलॉक, स्प्रूस यांसारख्या सदापर्णी वृक्षांचाही वापर करतात.

कुडण : वन्यपशूंपासून व लष्करी साहित्य इत्यादींच्या रक्षणाकरिता उभारावयाच्या कुडणांखेरीज इतर सर्वसाधारण कुडणाची उंची १·२ ते १·५ मी. ठेवतात. त्याकरिता लाकडी खांब वापरतात, पण खांबाचा जमिनीखालचा भाग कुजून खांब थोड्याच वर्षांत निरुपयोगी होतात. लोखंडी खांब वापरतात व ते  गंजू नयेत म्हणून त्यांना वेळोवेळी रंग द्यावा लागतो. बिडाचे खांब तितक्या लवकर गंजत नाहीत. काँक्रीटचे खांब टिकाऊ असतात. खांब जमिनीत सु. अर्धा मी. रोवतात. लाकडी खांब ८ सेंमी. व्यासाचे किंवा १० सेंमी. चौरस वापरतात. जमिनीतील भागास डांबर किंवा लाकूड कुजण्यास प्रतिरोध करणारी पेंटाक्लोरोफिनॉल, मोरचूद, सोडियम आर्सेनेट यांसारखी रसायने लावतात. लोखंडी खांब सर्वसाधारणपणे ५० x ५० x ६ मिमी. आकाराचे काटकोनी छेदाचे वापरतात. प्रबलित (लोखंडी सळया घालून अधिक सामर्थ्यवान केलेल्या) सिमेंट काँक्रीटच्या, बहुशः पूर्वर्निर्मित खांबाचा, जमिनीतील भाग सु. १५ सेंमी जाडीचा आणि त्यावरचा भाग माथ्याजवळ सु. १० सेंमी. राहील असा निमुळता ठेवतात. त्यात प्रबलन म्हणून १० मिमी. जाडीच्या सळया वापरतात. लाकडी खांबास विंचू (आ. १) ठोकून तार मारतात. काँक्रीटच्या खांबात तार ओवण्याकरिता भोके किंवा आडवट बसविण्याकरिता खाचा व भोके (आ. २) ठेवतात. तारा कमीजास्त पिळाच्या असतात. काटेरी तारेत आकडे गुंतविलेले असतात. कडेच्या खांबात मळसूत्री आकडे बसवून त्यांनी तार ताणतात. तारेचा खांबावर येणारा ताण पेलण्याकरिता अगदी कडेच्या व वळणावरच्या खांबांना किंवा तारेची ओळ सरळ रेषेत लांब असेल, तर २० ते ३० मी. अंतरावरच्या खांबांना तीराचा आधार देतात. ४५ x ४५ x ४५ सेंमी. चे खड्डे घेऊन त्यांत १: ४ : ८ प्रमाणाच्या काँक्रीटमध्ये खांब उभारतात. तीर दिलेल्या खांबांचे खड्डे काँक्रीटने संपूर्ण भरतात. इतर खांबांचे खड्डे निम्मे काँक्रीटने भरून वरच्या उरलेल्या खड्‍ड्यात माती चिणून बसविली तरी चालते. लोखंडी खांबाचा काँक्रीटमध्ये गुताव राहण्याकरिता तळाचे सु. १० सेंमी. लांबीचे टोक कोनावर विभागून व ते भाग एकमेकांशी व खांबाशी काटकोनात येतील असे वाकवितात (आ. २) किंवा २० सेंमी. लांबीच्या दोन सळया तळटोकाजवळ वितळजोडाने (वेल्डिंगने) वरीलप्रमाणे बसवितात.


वाडेभिंती : या दगडविटांच्या किंवा प्रबलित सिंमेंट काँक्रीटच्या समान जाडीच्या बांधतात किंवा अंतराअंतरावर खांब बांधून मधील गाळा कमी जाडीचा ठेवतात. बांधकामाच्या वाडेभिंतीवर मुंढारणीची आवश्यकता असते. काँक्रीटची वाडेभिंत प्रत्यक्ष जागेवर काँक्रीट ओतून किंवा पूर्वनिर्मित काँक्रीटचे खांब आणि त्यास ठेवलेल्या उभ्या खोबणीत पूर्वनिर्मित काँक्रीटच्या फळ्या अगर जाळ्या बसवून बनवितात. काही ठिकाणी अधिक संरक्षणासाठी भिंतीच्या माथ्यावर काचेचे धारदार तुकडे काँक्रीटमध्ये रोवतात.

विद्युत् कुंपण : ज्या ठिकाणी सर्व बाजूंनी पूर्ण बंदिस्तपणा अपेक्षित नसतो (उदा., गुरांचे पैदास क्षेत्र) त्या ठिकाणी विद्युत् कुंपणे वापरतात. कुंपणाच्या तारेमध्ये प्रचंड दाबाचा क्षणिक विद्युत् प्रवाह वापरावयाचा असल्यामुळे विशेष खबरदारी घ्यावी लागते. तारांवरील विद्युत् निरोधक सु. १,००० व्होल्टचा दाब सहन करू शकतील असे असणे आवश्यक असून प्रवाह जमिनीत जाणार नाही अशी व्यवस्था करावी लागते.आ. ३. (अ) ढिले फाटक, (आ) योग्य तीर

कवाडे : कुंपणात ठेवावयाची कवाडे म्हणजे वाहने जाऊ शकतील असे दरवाजे होत. फक्त मनुष्यास जाता येईल अशा दरवाजास  फाटक म्हणतात. कुंपणाशी सुसंगत अशी त्याची उंची ठेवतात. वईमधील कवाडे उचलून बाजूला ठेवता येतील अशी हलक्या झापांची अगर बांबूची करतात. कुडणातील कवाडाकरिता दोन स्वतंत्र खांब बसवितात. त्यांपैकी  एकास 

आ. ४. फाटक बसविण्याच्या पद्धती : (अ) नर बसविण्याची रीत, (आ) त्यासाठी नर-माथा, (इ) बांधकामात बसविण्याचा नर.

बिजागरीचा व दुसऱ्या कडी-कोयंड्याचा खांब म्हणतात. बिजागरी खांब जास्त मजबूत असावा लागतो. लाकडी कवाडाच्या झडपांचे सांधे  कवाडाच्या वजनाने ढिले होऊन ओळंबा सोडतात (आ. ३ अ) म्हणून त्यात ठेवावयाचे तीर (आ. ३ आ) करव या दिशेत असावे लागते. लोखंडी झडपांचे सांधे वितळजोडाने केलेले असतात. ते पक्के राहतात. फक्त जास्त वजनदार लोखंडी झडपांना कडी-कोयंड्याच्या टोकास चाकाचा आधार देतात आणि उघडझाप करताना चाक फिरण्याकरिता जमिनीवर काँक्रीटमध्ये सपाट पट्टी गोलाकार बसवितात.

आ. ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे वरचा खालचा नर ओळंबा सोडून बसविलेले फाटक आपल्या वजनाने आपोआप बंद होऊ शकते. त्याकरिता लागणाऱ्या लांब व आखूड नर-माद्या आ. ४ (आ) मध्ये दाखविल्या आहेत. आ. ४ (इ) मध्ये बांधकामात बसवावयाचा नर दाखविला आहे.

ओक, भ. प्र.