कुंती-१ : (हिं. कामिनी, जुती, मार्चुला क. अंगारकन गिड, पांद्री इं. सॅटिन-वुड लॅ. मुराया पॅनिक्युलॅटा कुल-रूटेसी). सु. ४·५–७·५ मी. उंचीचा हा लहान शोभिवंत वृक्ष हिमालयाच्या परिसरात यमुना ते आसाम, बिहार व पश्चिम भारत ब्रह्मदेश, श्रीलंका, चीन, अंदमान, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक बेटे इ. प्रदेशांत आढळतो शिवाय हल्ली बागेतही लावतात. साल पातळ व करडी पाने संयुक्त, विषमदली पिच्छाकृती (पिसासारखी) दले तीन ते नऊ, चकचकीत, बहुधा टोकास खाचदार फुले घंटाकृती, पांढरी, सुगंधी, मध्यम आकाराची असून फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, गुलुच्छ फुलोऱ्यात [ → पुष्पबंध], विशेषत: मे–सप्टेंबरमध्ये येतात. संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ रूटेसी   कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. मृदुफळ लाल, लांबट व एक – दोन बियांचे असते. लाकूड ‘चायनीज बॉक्सवुड’ म्हणून प्रसिद्ध आहे. पिवळट रंग, कठिणता व विशिष्ट संरचनेमुळे कापण्यास सोपे असून हत्यारांचे दांडे, कपाटे, काठ्या, मोजणीची (गणिती) उपकरणे, कोरीव काम इत्यादींसाठी चांगले सुवासिक साल सुगंधी प्रसाधने बनविताना वापरतात. मुळाच्या सालीचे चूर्ण अंगदुखीवर चोळण्यास व पोटात घेण्यास उपयुक्त पानांचे चूर्ण कापलेल्या जागी लावतात पानांचा काढा जलशोफावर (द्रवयुक्त सूजेवर) प्यावयास देतात. पाने उत्तेजक, स्तंभक (आकुंचन करणारी), आमांश, अतिसार इत्यादींवर गुणकारी. कुंतीचे तीन भिन्न प्रकार आहेत.

ठोंबरे, म. वा.