कुंकू : एक सौभाग्यचिन्ह, सौंदर्यप्रसाधन व पूजाविधीतील एक आवश्यक मंगल पदार्थ. बव्हंशी हिंदू कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया कुंकवाचा वापर करतात. कुंकू कपाळावर लावतात, तसेच केसातील भांगामध्ये घालतात. इतर धर्माच्या स्त्रियांत कुंकू लावण्याची प्रथा दिसत नाही.

कुंकुमम् या संस्कृत शब्दावरून मराठीत कुंकू हा शब्द आला. मूळ शब्दाचा अर्थ ‘केशर’ असा आहे, कंकु लावण्याची ही प्रथा केव्हा सुरू झाली हे नक्की सांगता येत नाही, पण जुन्या वाङ्‍मयातील उल्लेखांवरून ही प्रथा माहाभारतकाली अस्तित्वात होती असे दिसते. काहींच्या मते ही प्रथा आर्यांचीच आहे, तर काही लोक आर्यांनी ही प्रथा आर्येतरांकडून उचलली, असे मानतात. तर काही लोक या प्रथेचा संबध पशुबलीशी लावतात. पशुला मारून त्याच्या रक्ताचा टिळा नववधूस लावून गृहप्रवेश करण्याची प्रथा एके काळी दक्षिणेतील आर्येतर जातीत होती. या प्रथेचे रूपांतर कालांतराने कुंकू लावण्याच्या प्रथेत झाले आसावे.

हिंदू धर्मात आणि हिंदू संस्कृतीत कुंकवाला सौभाग्यचिन्ह म्हणून अन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू स्त्रिया त्याला अहेव लेणे मानतात. देवपूजा, लग्नसंभारंभ, मौंजीबंधन इ. विधींत कुंकवाचा वापर आवश्यक व मंगलदायक समजण्यात येतो. मंगलकार्य व देवपूजेच्या वेळी जोंधळ्यास किंवा तांदुळास कुंकू लावून मंगल अक्षता तयार करण्यात येतात. नव्या वस्त्रास तसेच घरातून बाहेर पडतेवेळी एक सुवासिनीस किंवा परस्परांस मंगलसूचक म्हणून कुंकू लावतात. ओवाळताना व मंगल प्रसंगी पुरुषांनाही कुंकुमतिलक लावण्यात येतो. काही पुरूष स्नानानंतर आपल्या कपाळास कुंकुमतिलक लावतात. वधूवरांना कुंकू लावण्याची प्रथा पारशी लोकांतही दिसून येते. लाल कुंकुमतिलक लावण्याने ध्यानधारणा करण्यास आणि चित्त एकाग्र करण्यास सुलभ जाते, असे काही लोक मानतात. निरनिराळ्या प्रांतांत व समाजात कुंकू लावण्याच्य़ा निरनिराळ्या पध्दती रूढ आहेत आवडीप्रमाणे कुंकवाच्या टिकल्यांच्या आकारात फेरफार झालेला दिसुन येतो. साधी टिकली अर्धचंद्राकृती आकार, आडवी चिरी, उभी चिरी, चंद्रबिंबासारखे वाटोळे कुंकु, सफरचंदाच्या आकाराचे कुंकु,प्रकाश ज्योतीच्या आकाराचे कुंकू, गुणाकाराच्या चिन्हात चार छोट्या टिकल्यांचे कुंकू इ. अनेक प्रकार रूढ आहेत.

कोरडे कुंकू (पिंजर) व ओले कुंकू (सुवासिक गंध) असे कुंकवाचे दोन प्रकार आहेत. हळदीवर क्षार किंवा अम्ल यांची रासायनिक प्रक्रिया करून कुंकू तयार करतात. अम्लाची संहती व हळकुंडे अम्लामध्ये भिजत ठेवल्याचा कालावधी यांवर कुंकवाला येणाऱ्या लाल रंगाच्या छटा अवलंबून असतात. विरल सल्फ्यूरिक अम्लात हळकुंडे भिजत ठेवल्याने लाल रंग येतो. त्यात पापडखार व टाकणखार मिसळल्यास लाल रंग पक्का होतो. नंतर हळकुंडे वाळवून दळतात व चाळून त्याची वस्त्रगाळ पूड करतात. हे कुंकू कोरडे असते.

मेणात खलून तयार केलेले लाल कुंकू व डिंकाच्या द्रवात रंग वापरून केलेले कुंकू असे ओल्या कुंकवाचे दोन प्रकार आहेत. मेणात खललेल्या कुंकवात कधीकधी हिंगूळ व शेंदूर यांसारखी विषारी द्रव्ये वापरतात. त्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होण्याचा धोका असतो. दुसऱ्या प्रकारचे कुंकू तयार करताना गरम पाण्यात डेक्स्ट्रिन विरघळवून खळ तयार करतात व तीत पाण्यात विरघळणारा इओसिन रंग किंवा तत्सम तांबडा रंग मिसळतात. खळ खराब होऊ नये म्हणून अल्प प्रमाणात संरक्षक द्रव्ये घालतात. मिश्रण थंड झाल्यावर त्यात सुगंधी द्रव्ये घालतात. लाल रंगाच्या कुकंवाव्यतिरिक्त काळे, जांभळे, हिरवे इ. विविध रंग असलेले कुंकू म्हणून वापरण्यात येणारे पदार्थ ओल्या किंवा पेन्सिलींच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध आहेत.

हळकुंडे, पापडखार व सवागी यांच्या विशिष्ट मिश्रणापासून कुंकू तयार करण्याची एक सोपी पद्धत आहे. त्यातील हळकुंडांमुळे हळदीचे जंतुनाशक गुणधर्म कुंकवात असतात. अलीकडे तांबड्या रंगाबरोबरच विविध रंगांचे गंध वापरण्याकडे स्त्रियांचा कल आहे. तथापि एक मंगल पूजाद्रव्य म्हणून कुंकवाचे महत्त्व आजही कायम आहे.

खोडवे, अच्युत पतकी, व. मं.