कीर्तन – १ : एक दाक्षिणात्य गानप्रकार. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात तो उदयास आला. इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुणवर्णन हा कीर्तनांचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असते. स्वररचनेपेक्षा येथे गीतरचना महत्त्वाची असते. साहजिकच कीर्तनातील स्वररचना आणि तालयोजना बहुधा साधीच असून सामान्य गायकांनाही ती पेलता येते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी रचिलेली सु. वीस हजार कीर्तने सु. तीन हजार ताम्रपटांद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायिले जावे, हेही सूचित केले आहे. त्यांतील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत. उदा., आबाली व कोंडा मलहाहरी, शंकराभरण, श्रीराग, ललित इ. आज प्रचलित असलेल्या रागांतही ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी कीर्तनरचना केलेली दिसते. ⇨ पल्लवी ,  ⇨ अनुपल्लवी आणि ⇨ चरण असे एका गीताचे तीन भाग ह्या कीर्तनांतून प्रथमच प्रचारात आले. ‘दिव्यनाम कीर्तन’ हा कीर्तनांचा एक विशेष प्रकार. त्यांत फक्त पल्लवी आणि चरण हे दोन गीतभाग आढळतात. चरणसंख्या बरीच असून सर्व चरण एकाच चालीत गायिले जातात,  किंबहुना कधीकधी पल्लवी आणि चरण ह्यांचीही चाल एकच असते. ⇨ त्यागराज, विजय गोपाळ आणि भद्राचलम् रामदास ह्यांनी अशा प्रकारची कीर्तने रचिली

आहेत. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’, ‘मानसपूजा कीर्तन’ आणि ‘संक्षेप रामायण कीर्तन’ हे कीर्तनाचे आणखी काही प्रकार होत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचिली गेली असली, तरी तेलगू भाषेतील कीर्तनांचे प्रमाण अधिक आहे.

अन्नमाचार्य, पेद्द तिरूमलयंगार, चिन्मय (हे सर्व ताळ्ळपाक्कम रचनाकार), पुरंदरदास, भद्राचलम् रामदास, नारायण तीर्थ, गिरिराज कवी,  विजय गोपाळ स्वामी, त्यागराज, गोपाळकृष्ण भारती, अरुणाचल कविरायर, रामलिंगस्वामी हे काही श्रेष्ठ कीर्तनकार होत.

 संदर्भ: 1. Sambamoorthy, P. South Indian Music, Vols III &amp IV, Madras, 1964 &amp1963.           

    2. Sambamoorthy. P. A Dictionary of South Indian Music and Musicians, Vol. II, Madras, 1959. 

कुलकर्णी, अ. र.