कीट, जॉर्ज : (१९०१– ). श्रीलंकेमधील एक आधुनिक चित्रकार व कवी. कँडी येथील ट्रिनिटी महाविद्यालयात शिक्षण. चित्रकलेचे पारंपारिक शिक्षण त्याने घेतले नाही. १९२७ पासून ‘सिलोन आर्ट क्लब’ या खासगी संस्थेत तो जात असे त्यामुळे आधुनिक कलेची त्यास आवड निर्माण झाली. श्रीलंकेमधील सिगिरी येथील खडकावर रंगविलेल्या चित्रांतील स्त्रीविषयक प्रणयाचा व अद्‍भुतरम्यतेचा आविष्कार कीट याच्या चित्रांत आढळतो. कामुकतेचा भाव दाखविण्यासाठी वापरलेली तांबूस रंगाची पार्श्वभूमी, एकाच रेषेत दाखविलेले कपाळ व नाक, मुद्दाम दाखविलेले मोठ्या आकाराचे डोळे ही सर्व वैशिष्ट्ये बसोली, मेवाड व मध्य भारतीय कलेत आढळतात. त्याचप्रमाणे कार्ले व मथुरा येथील मूर्तिशिल्पांतील गोलाकारही तो आपल्या कलाकृतींतून वापरतो. हे भारतीय संस्कार भारतीय चित्रकला व प्राचीन काव्य यांच्या अभ्यासामुळे कीटने आत्मसात केले आहेत.

 

१९२७ पासून आधुनिक कलेशी संबंध आल्यामुळे गोगँ व सेझान यांच्याप्रमाणे निसर्गातील वास्तव आकारांचे संस्करण, तसेच पिकासो व ब्राक या कलाकारांप्रमाणे त्यांचे विरूपण करण्याकडे कीटची प्रवृत्ती आहे. 

 

थोडक्यात म्हणजे त्याची कला वास्तववादी नसून तिच्यात हळुवार रेखनात्मकता, काव्यमय रंगसंगती आणि त्यांतून निर्मिलेले आकार या सर्वांची लयबद्ध मांडणी असते. त्याच्या कविव्यक्तित्वाचाही प्रभाव त्याच्या चित्रकलेत दिसतो. त्याच्या इंग्रजी कवितांचे संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत.

संदर्भ: Archer, W.G. India and Modern Art, London, 1959.

 

दिवाकर, प्र. वि.