कीटकांचे वर्गीकरण : आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील कीटकवर्ग हा सर्वांत मोठा, प्रमुख आणि अतिशय महत्त्वाचा आहे. जगातील एकंदर ज्ञात प्राणिजातींपैकी ७० टक्के जाती कीटकांच्या आहेत. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत एकंदर सात लक्ष कीटकजातींची नोंद केलेली आहे असा समज आहे, पण ही संख्या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या कीटकांच्या जातींच्या एक-पंचमांश तरी आहे की नाही याची शंकाच आहे. कीटकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर विविधता आढळत असली तरी सर्वांमध्ये काही समान लक्षणे आढळतात: (१) शरीराचे शीर्ष (डोके), वक्ष (छाती) आणि उदर (पोट) असे तीन मुख्य भाग असतात (२) शीर्षावर शृंगिका (सांधे असलेले लांब स्पर्शेंद्रिय), जंभ (जभडा) आणि जंभिका (विविध कार्यासाठी अनेक प्रकारे रूपांतरित झालेले जंभाच्या मागील उपांग) ही मुखांगे (तोंडाचे अवयव) असतात (३) वक्षाच्या अधर पृष्ठाला पायांच्या तीन जोड्या जोडलेल्या असतात (४) उदरावर बव्हंशी उपांगांचा अभाव असतो आणि (५) श्वसनासाठी श्वासनाल तंत्र असते.

वर्गीकरणाच्या नेहमीच्या पद्धतीला अनुसरून कीटकवर्गाचे कित्येक गण पाडलेले आहेत गणात कुले, कुलांत वंश आणि वंशात जातींचा समावेश केलेला आहे. कीटकांच्या वर्गीकरणाच्या पद्धती भिन्न भन्न असल्यामुळे कीटकवर्गातील गणांची निश्चित संख्या जरी देता येत नसली, तरी ती २९–३३ आहे असे मानावयाला काहीच हरकत नाही. कीटकांच्या वर्गीकरणात पंखांचे अस्तित्व किंवा त्यांचा पहिल्यापासूनचा अभाव, रूपांतरणाचे (स्वरूप व संरचना यांत बदल होण्याचे) प्रकार अथवा रूपांतरणाचा अभाव व मुखांगांचे प्रकार यांचा विचार केला जातो. असे जरी असले तरी पंखांच्या लक्षणांचाच विचार प्रामुख्याने केला जातो. विविध गणांना दिलेली नावे पंखांच्या लक्षणांवरच आधारलेली आढळतात.

कीटकवर्गाचे ॲप्टेरिगोटा (अपक्ष, पंखहीन) आणि टेरिगोटा (सपक्ष) असे दोन उपवर्ग आहेत. पंखांचा अभाव व रूपांतरणाचा जवळजवळ अभाव ही ॲप्टेरिगोटाची (अपक्ष-उपवर्गाची) मुख्य लक्षणे होत, तर टेरिगोटात (सपक्ष-उपवर्गात) सर्वांना पंख असतात पण काही गणांत गौणत: पंखांचा अभाव असतो.

 उपवर्ग १ : ॲप्टेरिगोटा (अपक्ष-उपवर्ग) : पंख नसलेले कीटक. ही अपक्ष-स्थिती आद्य होय अशी कल्पना आहे. रूपांतरणाचा जवळजवळ अभाव असतो प्रौढांमध्ये जननेद्रिंय-पूर्व उदर-उपांगांच्या एक किंवा अधिक जोड्या असतात प्रौढांचे जंभ सामान्यत : शीर्ष-संपुटाशी (डोक्याच्या पोकळीच्या आवरणाशी) फक्त एकाच ठिकाणी जोडलेले असतात. या उपवर्गामध्ये पुढील चार गण आहेत : (१) थायसॅन्यूरा, (२) डायप्लूरा, (३)प्रोट्यूरा, (४) कोलेंबोला.

(१) थायसॅन्यूरा : या गणातील कीटकांची लांबी १·२७ सेंमी. किंवा त्यापेक्षाही कमी असते पंख नसतात उदराचे ११ खंड असून त्यांपैकी काही थोड्या किंवा अधिक खंडांवर लहान उपांगे असतात  संयुक्त नेत्र आणि अक्षिका (साधा डोळा) कधीकधी असतात गुदखंडावर दोन किंवा तीन बारीक बहु -संधियुक्त पुच्छिका (पुष्कळ सांधे असलेल्या शेपट्या) असतात. उदा., कसर (लेपिझ्मा).

(२) डायप्‍लूरा : या गणातील कीटकांना दोन सारख्या लांबीच्या व बहु-खंडयुक्त शृंगिका असतात संयुक्त नेत्र व अक्षिका नसतात उदर निमुळते होत गेलेले व सखंड असते सगळ्या किंवा बहुतेक जननेंद्रियपू‍र्व उदर-खंडांवर कंटिकारूप उपांगे (बारीक काट्यासारखे अवयव) असतात गुदखंडावर पुच्छिकांची एक जोडी असते. उदा., कँपोडिया.

(३) प्रोट्यूरा : या गणातील कीटक सूक्ष्म असून त्यांना शृंगिका व संयुक्त नेत्र नसतात रंग पांढुरका असतो उदर बारा खंडांचे बनलेले असते पहिल्या तीन खंडांवर लहान उपांगांची प्रत्येकी एक जोडी असते वेधन (खुपसण्याची) मुखांगे असतात श्वासनाल असतात वा नसतात रूपांतर अत्यल्प असते. उदा., एसीरेंटोमॉन.

(४) कोलेंबोला : हे कीटक लहान असून शृंगिकांत चार खंड असतात संयुक्त नेत्र नसतात उदरखंड सहा किंवा कमी असतात उदरावर उपांगांच्या जोड्या नसतात पण शेवटच्या किंवा उपांत्य खंडावर उडी मारण्याकरिता एक खास स्कंद-उपकरण असते श्वासनाल तंत्र सामान्यतः नसते. उदा., ऑर्किसेला.

उपवर्ग २टेरिगोटा (सपक्ष- उपवर्ग) : या कीटकांना पंख असतात, पण काही कीटकांत गौणत: पंख नसतात रूपांतरण पूर्ण किंवा अपूर्ण, क्वचित अत्यल्प किंवा मुळीच नसते प्रौढांमध्ये जननेंद्रियपूर्व उदर-खंडांवर उपांगे नसतात, जंभ शीर्ष-संपुटाशी दोन ठिकाणी जोडलेले असतात.

सपक्ष-उपवर्गाचे दोन विभाग पाडलेले आहेत : एक एक्झॉप्टेरिगोटा (बहि‍र्विकासी-पक्ष) आणि दुसरा एंडॉप्टेरिगोटा (अंतर्विकासी-पक्ष). पंखांच्या उत्पत्तीच्या प्रकारावरून ही नावे दिलेली आहेत. तथापि रूपांतरणाचे लक्षण विचारात घेऊन काही कीटकशास्त्रज्ञांनी या दोन विभागांना अनुक्रमे हेमिमेटॅबोला (अर्धरूपांतरणी) आणि होलोमेटॅबोला (पूर्णरूपांतरणी) अशी नावे दिली आहेत.

विभाग १.एक्झॉप्टेरिगोटा : (बहिर्विकासी-पक्ष, अर्धरूपांतरणी). या विभागातील कीटकांचे रूपांतरण साधे, कधीकधी अत्यल्प असते कोषित रूप क्वचितच असते  डिंभावस्थांना (अळीसारख्या अवस्थांना) साधारणत: अर्भके म्हणतात संरचनेच्या दृष्टीने अप्राैढ अवस्था प्राैढांसारख्याच असतात पंखांचा विकास बाह्य असतो.

एक्झॉप्टेरिगोटा विभागात पुढील सोळा गण आहेत : (१) एफिमेरॉप्टेरा, (२) ओडोनेटा, (३) प्लेकॉप्टेरा ,(४) ग्रायलोब्‍लॅटोडिया, (५) आर्‌थॉप्टेरा, (६) फॅस्मिडा, (७) डर्‍मॅप्टेरा, (८) एंबायॉप्टेरा, (९) डिक्टिऑप्टेरा, (१०) आयसॉप्टेरा, (११) झोरॅप्टेरा, (१२) सॉकॉप्टेरा, (१३) मॅलोफॅगा, (१४) सायफन‍्क्युलेटा, (१५) हेमिप्टेरा, (१६) थायसॅनॉप्टेरा.

(१) एफिमेरॉप्टेरा : या गणातील कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असून मागची जोडी पुष्कळच लहान असते विश्रांतीच्या वेळी पंख पाठीवर उभे असतात. शृंगिका आखूड व मुखांगे अवशेषी असतात उदराच्या मागच्या टोकावर दोन लांब पुच्छिका असतात व पुष्कळदा एक मध्य पुच्छ-तंतू असतो रूपांतरण अपूर्ण असते अर्भके जलीय असून त्यांना श्वासनाल-क्लोम (कल्ले) असतात. उदा., शेंबडी (मे‍फ्लाय).

(२) ओडोनेटा : या कीटकांना सारख्या किंवा जवळजवळ सारख्या पंखांच्या दोन जोड्या असतात पंख पातळ व त्यात शिरांचे दाट जाळे असते शृंगिका अतिशय आखूड व मुखांगे दंशनाकरिता (चावण्यासाठी) असतात, डोळे अतिशय मोठे व ठळक असतात रूपांतरण, अपूर्ण असते अर्भके जलीय असून त्यांना गुद-क्‍लोम अथवा पुच्छ-क्लोम असतात बळकट परिग्राही अधरोष्ठ (पकड घेणारा खालचा ओठ) असतो. या गणात सगळ्या चतुरांचा समावेश होतो.

(३) प्लेकॉप्टेरा : या गणातील कीटक मध्यम ते मोठ्या आकारमानाचे असतात पंखांच्या दोन जोड्या असून कीटक विश्रांती घेत असतात त्या उदर पृष्ठावर सपाट असतात मागची जोडी बहुधा मोठी असते शृंगिका लांब आणि मुखांगे दंशनाकरिता असून कमकुवत असतात  उदराच्या टोकावर बहुधा लांब पुच्छिका असतात रूपांतरण अपूर्व असते अर्भके जलीय असून त्यांना बहुधा श्वासनाल-क्लोम असतात. या गणात अश्म-पतंगांचा समावेश होतो.

(४) ग्राय‍लोब्‍लॅटोडिया : या गणातील कीटकांमध्ये पुष्कळ आदिम (आद्य) लक्षणे आढळत असल्यामुळे जातिवृत्ताच्या दृष्टीने त्यांना बरेच महत्त्व आहे. हे कीटक मध्यम आकारमानाचे असतात डोळे अतिशय लहान किंवा मुळीच नसतात शृंगिका मध्यम लांबींच्या व तंतुरूप व मुखांगे जंभयुक्त असतात सगळे पाय जवळजवळ सारखे असतात मादीच्या अंडनिक्षेपकाची (अंडी घालण्याच्या अवयवाची) चांगली वाढ झालेली असते नराची जननेंद्रिये असममित (असमान रूपांची) असतात पुच्छिका लांब व आठ खंड असलेल्या, उदा., ग्रायलोब्‍लॅटा.


(५) आर्‌थॉप्टेरा : बहुधा मध्यम आकारमानाचे वा मोठे कीटक बहुधा पंखांच्या दोन जोड्या असतात पुढचे पंख जाड व मागचे पातळ असतात मागच्या पंखांची पंख्याप्रमाणे घडी होऊन पुढच्या पंखांखाली ते झाकले जाऊ शकतात पुष्कळांचे पंख आखूड असतात तर कित्येकांना ते नसतात सामान्यतः दंशनमुखांगे असतात मागच्या पायांची जोडी बहुधा माठी आणि उडी मारण्याकरिता तिचे परिवर्तन झालेले असते संयुक्त नेत्र असतात अक्षिका बहुधा दोन किंवा तीन असतात अथवा मुळीच नसतात पुच्छिका लांब किंवा आखूड आणि साध्या  वा  खंडयुक्त असतात रूपांतरण साधे किंवा अत्यल्प असते. या गणात टोळ, नाकतोडे, राळी (रातकिडे) इत्यादींचा समावेश होतो.

(६) फॅस्मिडा : या गणातील कीटक मोठे असून त्यांचे अतिशय रूपांतरण झालेले असते काही काटक्यांसारखे दिसणारे तर काही पानांसारखे दिसणारे असतात रूपांतरण साधे किंवा अत्यल्प असते मुखांगे दंशनाकरिता असतात शृंगिका लांब, तंतुरूप व बहुखंडयुक्त असतात त्या क्वचित आखूड असतात संयुक्त नेत्र लहान असतात अक्षिका मुळीच नसतात किंवा दोन-तीन असतात पंख असतात किंवा नसतात पुढच्या जोडीतील पंख (आच्छद) लहान व शल्‍कांसारखे (खवल्यांसारखे) असतात किंवा ते नसतात पुच्छिका लहान आणि खंडरहित असतात. उदा., तिवा, पर्णकीटक.

(७) डर्‌मॅप्टेरा : या गणातील कीटक लांबट असतात पंखांच्या दोन जोड्या असून पुढच्या जोडीचे अगदी आखूड आणि चामट आच्छदात परिवर्तन झालेले असते मागच्या जोडीतील पंख पातळ, अर्धवर्तुळाकार असून त्यांच्यावरील शिरांची व्यवस्था अरीय (त्रिज्यीय) असते अपक्ष कीटक ही बहुधा आढळतात मुखांगे दंशनाकरिता असतात पुच्छिकांचे परिवर्तन होऊन त्यांचा चिमटा बनतो अंडनिक्षेपक लहान असतो किंवा नसतो रूपांतरण अत्यल्प किंवा मुळीच नसते. उदा., कान घोण.

(८) एंबायॉप्टेरा : या गणातील कीटक संघचारी (गटाने राहणारे) असून रेशमी अस्तर असलेल्या बिळात राहणारे आहेत मुखांगे दंशनाकरिता व चर्वणाकरिता असतात शीर्ष मोठे आणि शृंगिका तंतुरूप असतात मादीचे संयुक्त नेत्र लहान आणि नराचे बहुधा मोठे असतात अक्षिका नसतात वक्ष जवळजवळ उदराइतकेच लांब असते पाय आखूड आणि धावण्याकरिता मजबूत पुढच्या पायांचा पहिला गुल्फखंड (घोट्याचा भाग) मोठा असून त्यांत ग्रंथी आणि तनित्रे (तंतू निर्माण करणारे अवयव) असतात नराला पंख असतात किंवा नसतात मादीला मुळीच नसतात पंख पातळ व आकाराने सारखे असून त्यांच्या दोन जोड्या असतात स्वस्थ बसलेल्या कीटकाच्या अंगावर ते सपाट पसरलेले असतात. नरामध्ये रूपांतरण हळूहळू होते, मादीत मुळीच होत नाही. उदा., ऑलिगोटोमा.

(९) डिक्टिऑप्टेरा : या गणातील कीटक लंबवर्तुळाकार किंवा लांबट असतात शृंगिका जवळजवळ नेहमी तंतुरूप आणि अनेक खंड असलेल्या असतात जंभ असतात सगळे पाय सारखे असतात किंवा भक्ष्य पकडण्याकरिता पुढच्या पायांचे परिवर्तन झालेले असते पुढच्या पंखांच्या परिवर्तनाने कमी अधिक जाड आच्छद तयार होतात मादीत अंडनिक्षेपक लहान असून उदराच्या मोठ्या झालेल्या सातव्या अधरपट्टात (खालच्या पट्टात) दडलेला असतो नराची जननेंद्रिये गुंतागुंतीची आणि असममित असून बव्हंशी उदराच्या नवव्या अधरपट्टात दडलेली असतात नवव्या अधरपट्टावर कंटिकांची एक जोडी असते पुच्छिकांत पुष्कळ खंड असतात अंडी अंडसंपुटात घातलेली असतात. या गणात झुरळ आणि खंडोबाचा किडा यांचा समावेश होतो.

(१०) आयसॉप्टेरा : लहान ते मध्यम आकारमानाचे कीटक समाजप्रिय आणि बहुरूपी जाती यांचे मोठे समुदाय असून त्यांत सपक्ष व अपक्ष लैंगिक व्यक्ती आणि अपक्ष वंध्य (वांझ) सैनिक व कामकरी असतात पंखांच्या दोन्ही जोड्या अगदी सारख्या असतात. पंख लांब व पातळ असून गळून पडू शकतात मुखांगे दंशनाकरिता असतात पुच्छिका आखूड किंवा अतिशय आखूड असतात दोन्ही लिंगांत जननेंद्रिये बहुधा नसतात किंवा अल्पविकसित असतात रूपांतरण अत्यल्प असते किंवा मुळीच नसते. उदा., वाळवी.

(११) झोरॅप्टेरा : हे कीटक सूक्ष्म असून काहींना पंख असतात तर काहींना नसतात मुखांगे दंशनाकरिता असतात शृंगिका नऊ खंड असलेल्या व मणिमालेसारख्या असतात पंख नसलेल्या रूपांमध्ये डोळे नसतात सपक्ष रूपांमध्ये संयुक्त नेत्र आणि अक्षिका असतात पंख लांब असून गळून पडू शकतात पुढची जोडी मागच्या जोडीपेक्षा पुष्कळ मोठी असते पुच्छिका आखूड आणि खंडरहित असतात मादीत अंड निक्षेपक नसतो नराची जननेंद्रिये विशेषित असून कधीकधी असममित असतात रूपांतरण अत्यल्प असते. उदा., झोरोटायपस.

(१२) सॉकॉप्टेरा : हे कीटक लहान किंवा सूक्ष्म असून शृंगिका तंतुरूप असतात पंख असतात किंवा नसतात असले तर पातळ असून पुढची जोडी मोठी असते मुखांगे दंशनाकरिता असतात पुच्छिका नसतात रूपांतरण क्रमाक्रमाने होते किंवा मुळीच नसते. उदा., पुस्तकातील ऊ (सॉक्स) .

(१३) मॅलोफॅगा : लहान किंवा अतिशय लहान, चपटे व अपक्ष कीटक हे मुख्यत: पक्ष्यांच्या अंगावर आणि कमी प्रमाणात सस्तन प्राण्यांच्या अंगावर बाह्यपरजीवी (शरीराच्या बाहेर राहणारा परजीवी) म्हणून राहतात डोळे फार लहान असतात अक्षिका नसतात शृंगिकांत तीन-पाच खंड असतात मुखांगे दंशनाकरिता असतात पुच्छिका नसतात रुपांतरण नसते. उदा., सस्तन प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या अंगावरील चावणाऱ्या उवा .

(१४) सायफन्‌क्युलेटा : हे अपक्ष कीटक सस्तन प्राण्यांच्या शरीरावर बाह्यपरजीवी असतात डोळे अतिशय लहान असतात किंवा मुळीच नसतात अक्षिका नसतात शृंगिकांत तीन-पाच खंड असतात मुखांगाचे अतिशय परिवर्तन झालेले असून ती वेधी (खुपसणारी) व चुषी (शोषणारी) असतात ती डोक्याच्या आत ओढून घेता येतात वक्षखंड सायुज्यित (एकत्रित झालेले) असतात प्रत्येक पायाच्या टोकावर एक नखर (नखी) असतो श्वास-रंध्रे पृष्ठीय असतात पुच्छिका नसतात रूपांतरण नसते. उदा., रक्त शोषणाऱ्या उवा [→ ऊ].

(१५) हेमिप्टेरा : हे कीटक मध्यम आकारमानाचे किंवा मोठे असून त्यांना बहुधा पंखाच्या दोन जोड्या असतात पुढच्या जोडीतील पंख जाड असतात मुखांगे वेधनाकरिता आणि चूषणाकरिता अनुकूलित असतात अधरोष्ठापासून तयार झालेले संधियुक्त चूषी तुंड (तोटी) असून त्याच्या आत वेधी जंभ असतात अग्र-वक्ष बाकीच्या वक्ष-खंडांपासून अलग असतो रूपांतरण बहुधा क्रमाक्रमाने होते व ते क्वचित पूर्ण असते. उदा., ढेकूण, पाणढेकूण, सिकाडा, पादक-यूका [→ मावा] आणि शल्क-कीटक [→ खवले किडे].

(१६) थायसॅनॉप्टेरा :लहान किंवा सूक्ष्म कीटक शृंगिका आखूड व सहा-दहा खंड असलेल्या डोळे लहान, मुखांगे वेधी आणि असममित असतात बहुधा अतिशय अरुंद पंखांच्या दोन जोड्या असून त्यांच्या कडांवर लांब दृढ रोम (राठ लव) असतात पुच्छिका नसतात रूपांतरण अत्यल्प असून त्यात सुरुवातीच्या कोषित रूपाचा समावेश होतो. या गणात फुलकिड्यांचा [थ्रिप्स,  →फुलकिडे ] समावेश होतो.

विभाग २. एंडॉप्टेरिगोटा : (अंतर्विकासी –पक्ष,पूर्णरूपांतरणी). या विभागातील कीटकांचे रूपांतरण गुंतागुंतीचे असून त्यात कोषित रूप असते पंखांचा विकास आंतरिक असतो अप्रौढ अवस्थांना सर्वसाधारणपणे अर्भके म्हणतात व त्यांची संरचना आणि सवयी प्रौढांपेक्षा भिन्न भिन्न असतात.


 

एंडॉप्टेरिगोटा विभागात पुढील नऊ गणांचा समावेश होतो : (१) न्यूरॉप्टेरा, (२) मेकॉप्टेरा, (३) लेपिडॉप्टेरा, (४) ट्रायकॉप्टेरा, (५) डिप्टेरा, (६) सायफनॅप्टेरा, (७) हायमेनॉप्टेरा, (८) कोलिऑप्टेरा, (९) स्ट्रेप्सिप्टेरा.

(१) न्यूरॉप्टेरा : या गणातील कीटक लहान किंवा काहीसे मोठे असतात साधारणपणे सारख्या आणि पातळ पंखांच्या दोन जोड्या असतात शृंगिका बहुधा लांब असतात मुखांगे वेधी असतात उदरावर पुच्छिका नसतात डिंभांची मुखांगे दंशनासाठी अथवा चूषणासाठी अनुकूलित असतात जलीय डिंभांना उदर-क्लोम असतात कोषावर आवरण नसते. उदा., आल्डर माशी, मुंगीचा वाघ.

(२) मेकॉप्टेरा : लहान वा माफक आकारमानाचे काटकुळे कीटक शृंगिका लांब व तंतुरूप असतात पातळ व लांब पंखांच्या दोन जोड्या असतात कधीकधी पंख अल्पविकसित असतात किंवा मुळीच नसतात मुखांगे दंशनाकरिता असून ती खाली वाकलेल्या तुंडाच्या टोकावर असतात उदर लांब असून त्याच्या टोकावर आखूड पुच्छिका असतात डिंभ सुरवंटांसारखे असून मांसाहारी असतात. वक्ष-पादांच्या तीन जोड्या असतात उदर-पाद असतात अगर नसतात कोषाभोवती आवरण नसते. या गणात वृश्चिक- भक्षिकांचा (कोळ्यांचे भक्षण करणाऱ्या कीटकांचा) समावेश होतो.

(३) लेपिडॉप्टेरा : लहान, मध्यम किंवा मोठ्या आकारमानाचे उडणारे कीटक चांगली वाढ झालेल्या पातळ पंखांच्या दोन जोड्या  पंख, शरीर आणि उपांगे शल्कांनी आच्छादिलेली असतात जंभ अवशेषी असतात अगर मुळीच नसतात जंभिकांच्या परिवर्तनाने एक लांब चूषण नलिका तयार झालेली असून ती गुंडाळता येते शृंगिकांची टोके फुगीर असतात डोळे मोठे असतात अग्रवक्ष मध्यवक्षारी सायुज्यित झालेला असतो रूपांतरण पूर्ण असते डिंभ सुरवंटांसारखे असून त्यांना वक्ष-पादांच्या तीन आणि उदरपादांच्या बहुधा पाच जोड्या असतात मुखांगे दंशनाकरिता असतात कोषांभोवती बहुधा कमीअधिक प्रमाणात आवरण असते. या गणात सर्व फुलपाखरे आणि पतंग यांचा समावेश होतो [→ फुलपाखरू.]

(४) ट्रायकॉप्टेरा : लहान किंवा मध्यम आकारमानांचे पतंगांसारखे कीटक पातळ, केसाळ आणि विषम आकारमानाच्या पंखांच्या दोन जोड्या असतात मुखांगाचे चाटून खाण्याकरिता अनुकूलन झालेले असते जंभ नसतात, पण असलेच तर त्यांचे अवशेष असतात डिंभ जलीय असून विजातीय कणांपासून बनविलेल्या नलिकांत राहतात कोष नलिकेतच तयार होतो. उदा., कॅडीस माशी.

(५) डिप्टेरा : लहान, मध्यम अथवा काहीशा मोठ्या आकारमानाचे कीटक पंख अतिशय पातळ व पारदर्शक असून त्यांची फक्त पुढची जोडीच असते मागच्या जोडीचे शरीराचा तोल राखण्याकरिता संतोलकात परिवर्तन झालेले असते मुखांगांचे वेधनाकरिता आणि चूषणाकरिता परिवर्तन झालेले असते जंभ क्वचितच असतात अग्रवक्ष आणि पश्चवक्ष लहान असून मोठ्या मध्यवक्षाशी त्यांचे सायुज्यन झालेले असते रुपांतरण पूर्ण असते डिंभ पादहीन असून शीर्ष अगदी लहान व आत ओढून घेतलेले असते कोष मोकळा किंवा आवरणात असतो. उदा., घरमाशी, डास, गोमाशी इत्यादी.

(६) सायफनॅप्टेरा : नियततापी प्राण्यांच्या शरीरावर प्रौढावस्थेत बाह्यपरजीवी असणारे कीटक आकारमानाने लहान, शरीर दोन्ही बाजूंनी चापट आणि पक्षहिन डोळे नसतात अक्षिका बहुधा दोन असतात शृंगिका आखूड आणि बळकट असतात मुखांगांचे वेधनाकरिता आणि चूषणाकरिता परिवर्तन झालेले असते रूपांतरण पूर्ण असते डिभं लांब व पादहिन असतो कोष गुटिकेत (संपुटात) असतात. या गणात पिसवांचा समावेश होतो.

(७) हायमेनॉप्टेरा : लहान, मध्यम अथवा मोठ्या आकारमानाचे कीटक पातळ पंखांच्या दोन जोड्या असतात मागचे पंख पुढच्या पंखांपेक्षा लहान असून ते त्यांना अंकुशिकांनी (बारीक आकड्यांनी) जोडलेले असतात डोळे मध्यम आकाराचे अक्षिका सामान्यत: असतात नराच्या शृंगिकांत १२, मादीच्या शृंगिकांत १३ खंड असतात मुखांगांचे दंशन, चूषण किंवा चाटण्याकरिता परिवर्तन झालेले असते उदराचे पहिले काही खंड संकुचित झालेले असून त्याचा पहिला खंड पश्चवक्षाला जोडलेला असतो अंडनिक्षेपक नेहमी असतो आणि त्याचे करवतण्याकरिता, भोसकण्याकरिता किंवा दंश करण्याकरिता परिवर्तन झालेले असते रूपांतरण पूर्ण असते डिंभांना पाय नसतात सामान्यातः कोष गुटिकेत सुरक्षित असतो. या गणात मधमाश्या, मुंग्या, गांधीलमाश्या, इक्‌न्युमन माश्या इत्यादींचा समावेश होतो.

(८) कोलिऑप्टेरा : सूक्ष्म आकारमानापासून तो मोठ्या आकारमानापर्यंतचे कीटक पुढच्या पंखांच्या जोडीच्या परिवर्तनाने आच्छद तयार होतात दोन्ही आच्छद पाठीवर सरळ मध्यरेषेवर एकमेकांना चिकटून असतात पुष्कळदा ते सायुज्यित होतात मागच्या जोडीतील पंख पातळ असून आच्छदाखाली मिटलेल्या स्थितीत असतात कधीकधी मागची पंखाची जोडी अथवा दोन्ही जोड्या नसतात त्वचा चामट अथवा शृंगमय (केराटिनयुक्त) असते मुंखांगे दंशनाकरिता अनुकूलित असतात तुंड डोक्यापासून पुढे आलेले अथवा खाली वाकलेले असते डोळे ठळक असतात अक्षिका बहुधा नसतात शृंगिका विविध आकारमानाच्या असतात जंभ मजबूत आणि कधीकधी फार मोठे असतात अग्रवक्ष मोठे आणि चल असते मध्यवक्ष आणि पश्चवक्ष उदराला जोडलेले असते रूपांतरण पूर्ण असते डिंभ कृमिरूप असून त्याला पादांच्या तीन जोड्या असतात कोष क्वचितच गुटिकेत असतो. या गणात मुद्‍गलांचा (भुंगेऱ्यांचा) आणि टोक्यांचा समावेश होतो.

(९) स्ट्रेप्सिप्टेरा : लहान अंतःपरजीवी (शरीराच्या आत राहणारा परजीवी) कीटक नर मुक्तजीवी असतात मुखांगे दंशनाकरिता असणाऱ्या मुखांगांच्या प्रकारची पण अपकृष्ट (ऱ्हास पावलेली) असतात शृंगिका ठळक आणि व्यजनाकार (पंख्यासारख्या) असतात नराचे मागचे पंख पंख्यासारखे असतात पुढच्या पंखांच्या परिवर्तनाने दोन मुद्‍गराकार (गदाकृती) संतोलक तयार होतात माद्या डिंभांसारख्या असतात त्यांना शृंगिका, डोळे, पंख अथवा पाय नसतात शीर्ष वक्षाशी सायुज्यित असते माद्या आणि डिंभ, मधमाश्या, गांधीलमाश्या इत्यादींच्या शरीरात कायम परजीवी असतात पोषकाच्या (ज्यावर परजीवी उपजीविका करतो त्या जीवाच्या) शरीरातून अन्न शोषून घेऊन हे त्याच्या इंद्रियांचे परिर्वतन घडवून आणतात रूपांतरण ‘अतिरूपांतरण’ प्रकारचे असते. उदा., स्टायलॉप्स.

पहा: कीटक.

 

संदर्भ: 1. Essig. E.O. College Entomology, New York, 1958.

    2. Imms, A.D. A General Textbook of Entomology, Bombay,1961.

    3. Ross, Herbert H. A Textbook of Entomology, New York, 1965. 

 

कर्वे,ज. नी. परांजपे, स.य.