घटसर्प : एका विशिष्ट जंतूच्या संसर्गामुळे घसा, नाक वगैरे ठिकाणी होणाऱ्या सांसर्गिक रोगाला घटसर्प असे म्हणतात. या रोगामध्ये ग्रस्त भागावर पांढरट पिवळट रंगाचा चामड्यासारखा पापुद्रा वा साखा जमतो. तेथील ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांचा) कोथ (रक्त पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मृत्यू होणे) होऊन त्यावर रक्तातील फायब्रीन (रक्त गोठण्याचे वेळी फ्रायब्रिनोजेन या रक्तातील प्रथिनापासून तयार होणारे प्रथिन) जमा होऊन त्याच्यापासूनच हा पापुद्रा तयार होतो. हा रोग २ ते १८ वर्षांच्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. प्रौढांत त्याचे प्रमाण कमी असते.

घटसर्पाच्या जंतूला कॉरिनिबॅक्टेरियम डिप्थेरी  असे नाव असून त्याचा शोध १८८३ मध्ये क्लेप्स यांनी लावला त्याचे सविस्तर वर्णन लफ्लर यांनी केले म्हणून त्या जंतूला ‘क्लेप्स-लफ्लर’ जंतू असेही म्हणतात. हा जंतू दंडाकृती असून त्याची अनेक रूपे दिसतात. दंडाला काही ठिकाणी बाक आल्यासारखा, तर काही ठिकाणी त्यात रंजक-कण साठल्यासारखे दिसतात. सूक्ष्मदर्शकाने तपासले असता त्यांची मांडणी चिनी अक्षरांसारखी दिसते. हा जंतू अचल व अबीजाणू (सुप्तावस्थेतील निरोधी रूप प्राप्त न होणारा) असून त्याचे शरीराबाहेर संवर्धन केले असता, तो द्राक्षशर्करेचे (ग्लुकोजाचे) किण्वन (आंबविण्याची क्रिया) करू शकतो. परंतु उसाच्या साखरेचे किण्वन करू शकत नाही. ग्रॅम यांच्या रंजकपद्धतीने रंजक क्रिया केल्यास तो जंतू ‘ग्रॅम रंजकव्यक्त’ (ग्रॅम रंजकाने रंगणारा) दिसतो. या जंतूच्या संसर्गक्षमतेनुसार त्याचे तीव्र, मध्यम आणि सौम्य असे तीन प्रकार मानलेले आहेत.

घटसर्पाच्या जंतूंसारखेच दिसणारे आणि तसेच रंजकगुण असलेले आणखी एका प्रकाराचे जंतू कित्येक वेळा घशात व जखमांत आढळतात. परंतु ते संसर्गी नसतात. त्यांना घटसर्पाभ जंतू असे म्हणतात. या जंतूचे व्यवच्छेदक (दोन सारखी लक्षणे दाखविणाऱ्या रोगांतील सूक्ष्म फरक ओळखून) निदान करण्यासाठी त्यांची विविध शर्करांवरील किण्वन क्रिया तपासावी लागते. या जंतूंपासून रोग होत नसल्यामुळे असे व्यवच्छेदक निदान करण्याची फार जरुरी असते.

घटसर्पाचे जंतू ग्रस्त (रोगपीडित) भागांतच असतात परंतु त्यांच्यापासून उत्पन्न होणारे बाह्यविष रक्तमार्गे सर्व शरीरभर पसरुन लक्षणे आणि उपद्रव उत्पन्न करते. ह्या बाह्यविषाचा हृद्‌स्नायूंवर फार विपरीत परिणाम होत असल्यामुळे या रोगाची मारकशक्ती फार असते. तंत्रिकांवरही (मज्जांवरही) या विषाचा विपरीत परिणाम होत असल्यामुळे स्नायुपक्षाघात होण्याचा संभव असतो. हे बाह्यविष शुद्ध स्वरूपात तयार करण्यात आले असून त्याचा उपयोग घटसर्पाची सक्रिय प्रतिरक्षा (रोगापासून संरक्षण) उत्पन्न करण्यासाठी केला जातो.

रोग्याच्या खोकण्या-शिंकण्याबरोबर तुषार रूपाने हे जंतू बाहेर पडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग करतात. तसेच दूषित हातरुमाल, कपडे, भांडी, टॉवेल वगैरे जिनसांमुळेही संसर्ग होऊ शकतो. रोग होऊन गेल्यानंतरही कित्येक दिवस हे जंतू रोग्याच्या नाकात व घशात असू शकतात. तसेच काही व्यक्तींना रोग झाला नसला, तरी त्यांच्या नाक-घशात हे जंतू असू शकतात. अशा व्यक्तींना ‘रोगवाहक’ असे नाव असून त्यांच्यामुळेही रोग संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे : संसर्ग झाल्यानंतर ३ ते ५ दिवसांच्या परिपाककालानंतर (रोगजंतूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून रोग लक्षणे दिसेपर्यंतच्या काळानंतर) लक्षणे सुरू होतात. घसा खवखवणे, दुखणे, नाक वाहणे या प्राथमिक लक्षणांनंतर अंगावर काटा येऊन ज्वर चढतो. कित्येक वेळा ज्वर फार नसला तरी रोग तीव्र व मारक असू शकतो. अतितीव्र घटसर्पात ज्वर मुळीच नसतो, उलट शक्तिपात होऊन रोगी पांढरा फटफटीत पडतो. त्याची चर्या भीतिग्रस्त असल्यासारखी असून ओठ निळसर दिसतात. रोगी अत्यंत अस्वस्थ असतो.

ग्रस्त भागावर म्हणजे मुख्यतः घशातील गिलायूवर (टॉन्सिल्सवर) अथवा ग्रसनीच्या (घशाच्या) पश्चभित्तीवर वर वर्णन केलेला पापुद्रा वा साखा दिसू लागतो. हा पापुद्रा प्रथम पांढरट असून पुढे तो पिवळट लालसर होतो. पापुद्रा खरडून काढण्याचा प्रयत्न केल्यास तो खालच्या ऊतकास घट्ट चिकटलेला असल्यामुळे रक्तस्त्राव होतो. मृदुतालू, नाकाच्या आतील श्लेष्मकला (बुळबुळीत पदार्थ स्रवणारे पातळ पटल) स्वरयंत्र आणि श्वासनालामध्येही (मुख्य श्वासनलिकेमध्येही) संसर्ग झाल्यास असाच पापुद्रा तयार होतो. त्वचेवरील जखमा, नेत्रश्लेष्मकला, योनी आणि मणिच्छद (शिश्नाच्या सर्वांत पुढील भागावरील त्वचेचे आवरण) या जागीही क्वचितप्रसंगी घटसर्पाचा संसर्ग झाल्यास असाच पापुद्रा दिसू लागतो.

घशात सूज आल्यामुळे मानेतील गाठी व त्याभोवतीच्या ऊतकांना शोथ (दाहयुक्त सूज) आल्यामुळे सर्वच मान सुजून जाड दिसते. घशाच्या व स्वरयंत्राच्या शोथामुळे गिळणे, श्वास घेणे या क्रियांना फार अडथळा होतो, त्यामुळे दर श्वासागणिक घशातून चमत्कारिक आवाज येतो. श्वसनक्रिया नीट न चालल्यामुळे रक्ताला पुरेसा ऑक्सिजनपुरवठा मिळत नाही. त्यामुळे सर्वांगाला विशेषतः चेहऱ्याला निळसर छटा येते.

श्वासाला एक तऱ्हेची दुर्गंधी येऊन नाकातून रक्तमिश्रित स्राव होऊ लागतो.

श्वसनरोध आणि जंतूंचा हृद्‌स्नायूंवरील विपरीत परिणाम यांमुळे मृत्यू ओढवतो. तंत्रिकांवरील परिणामामुळे मृदुतालू, डोळ्याचे स्नायू, ग्रसनी, हातपाय व क्वचित शरीराचा अर्धा भाग या अनुक्रमाने पक्षाघात होऊ शकतो. असा पक्षाघात रोगाच्या ५-६ व्या दिवसापासून ४०—४५ व्या दिवसांपर्यंत होऊ शकतो. कित्येक वेळा मूळ दुखणे सौम्य असल्यामुळे पक्षाघात झाल्यानंतरच निदान होऊ शकते.

अतितीव्र प्रकारांत त्वचेखाली आणि अंतस्त्यांत (छाती व पोटाच्या पोकळीतील इंद्रियांत) रक्तस्राव होतो.

निदान : वर वर्णन केलेल्या लक्षणांवरून विशेषतः ग्रस्त भागावरील पापुद्र्यावरून निदान करणे फारसे कठीण नसते. त्या पापुद्र्यावर साठलेल्या स्रावामध्ये चिनी अक्षरांसारख्या दिसणाऱ्या जंतूंमुळे सूक्ष्मदर्शकाने निदान सुलभ होते. घटसर्पाभ जंतूंपासूनच निदान करणे कित्येक वेळा कठीण होते.  

गिलायुशोथाच्या एका प्रकारात गिलायूवर बारीक बारीक पिवळट कण जमून ते एकत्र जमले, तर घटसर्पाच्या पापुद्र्यासारखे दिसतात. त्यामुळे त्याचे व्यवच्छेदक निदान काही वेळा कठीण होते परंतु सुक्ष्मदर्शकपरीक्षेने निदानास मदत होते.

चिकित्सा : स्पष्ट निदानाची वाट न पाहता बाह्यविषप्रतिरोधी प्रतिविष (प्रतिरक्षक रक्तरस) शक्य तितक्या त्वरेने टोचणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जितक्या लवकर ही लस टोचली जाईल तितका रोगप्रतिहार होण्याचा संभव वाढतो. रोगाच्या तीव्रतेनुसार या प्रतिविषाची मात्रा द्यावी लागते. दिवसातून दोन तीन वेळाही प्रतिविष टोचणे जरूर पडते. इतर जंतूंचा संसर्ग न व्हावा म्हणून पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे वापरतात.

रोग संसर्गी असल्यामुळे शक्यतर घटसर्पाच्या रोग्याला रुग्णालयात ठेवणे इष्ट असते.

श्वसनाला अडथळा उत्पन्न झाल्यास श्वासनालाला भोक पाडून त्यात नळी घालून श्वसन व्यवस्थित चालण्याची तरतूद करावी लागते. या शस्त्रक्रियेने एक मोठा धोका टळतो.

संपूर्ण विश्रांतीची अत्यंत जरूरी असते. हालचाल केली असता हृद्‌स्नायूंवर ताण पडून हृदय बंद पडण्याचा संभव असतो. रोग्याला पूर्णपणे निजवून ठेवून जरूर तर नाकातून नळी घालून अन्न द्यावे लागते.


प्रतिबंध : हा रोग मुलांमध्ये अधिक प्रमाणात होत असल्यामुळे मुलांची तपासणी करून रोगक्षमव्यक्ती शोधून काढण्यासाठी ‘शिक परीक्षा’ (बेला शिक या ऑस्ट्रियन बालरोगतज्ञांनी शोधून काढलेली परीक्षा) करतात. या परीक्षेमध्ये त्वचेमध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात बाह्यविष टोचतात. रोगक्षम व्यक्तींमध्ये टोचल्यापासून ३६ तासांत त्या जागी सूज व लाली येते. अशा रोगक्षम व्यक्तीला महिन्यातून एकदा अशी तीन वेळा प्रतिबंधक लस टोचली असता घटसर्प होण्याचा संभव फार कमी होतो. वयाच्या सहाव्या महिन्यापासून अठराव्या महिन्यापर्यंत ही लस टोचतात व पुढे पाचव्या वर्षी म्हणजे शाळेत जाण्याच्या वेळी पुन्हा एकदा टोचतात. घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या तीन रोगांचा प्रतिबंध व्हावा म्हणून अशी मिश्र लस आता उपलब्ध असून ती मुलांना दिल्यास त्या तिन्ही रोगांचा प्रतिबंध करणे ही गोष्ट आता सर्वमान्य झालेली आहे.

‘रोगवाहक’ व्यक्ती शोधून काढून त्यांच्यावरही योग्य तो उपचार करणे अगत्याचे असते.      

    ढमढेरे, वा. रा. 

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : ह्या विकाराला रोहिणी म्हणतात. हा जिभेच्या मुळाशी कंठामध्ये होतो. हा विकार शीघ्र वेगाने निर्माण होतो व वाढतो. हा साध्य होण्याला अतिशय कठीण असतो. रक्तज व त्रिदोषज रोहिणी असाध्य असतात. बाकीच्या तीन एक एक दोषाने होणाऱ्या साध्य असतात.

घशामध्ये घशाचा मार्ग बंद करणारे मांसांकुर ह्या रोगात उत्पन्न होतात. ही पाच प्रकारची असते. त्या त्या दोषाने होणाऱ्या रोहिणी तीन. तिन्ही दोषांनी होणारी एक व रक्ताने होणारी एक अशा पाच प्रकारच्या रोहिणी होतात.

वातज रोहिणी मध्य गळा आतून व बाहेरून शेकून अंगुली शस्त्राने किंवा मीठ लावलेल्या नखाने खरडून काढावी व पंचमुळांच्या काढ्याने गुळण्या कराव्यात किंवा तेलाने गुळण्या करून ते नाकातही घालावे.

पित्तज रोहिणीमध्ये जळवा लावून रक्त काढावे. गव्हला, खडीसाखर व मध एकत्र करून हे मिश्रण रोहिणीवर घासावे. कफाचा संबंध अधिक असेल, तर लोध्र आणि रक्तचंदनही अधिक घालावी आणि त्यांच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. त्याचप्रमाणे द्राक्षे, फालसा ह्यांच्या काढ्याचा उपयोग करावा.

रक्तज बरी होणार नाही असे सांगून पित्तजाप्रमाणे चिकित्सा करावी. कफज असेल तर घेरोसा, तिखट औषधे ही कफज रोहिणीला लावावीत आणि आघाड्याचे बी, गोकर्णी, दार्ता, विडंग, सैंधव ह्यांच्या चूर्णाने सिद्ध केलेले तेल नाकात घालण्याकरिता व गुळण्याकरिता वापरावे.

पहा : शालाक्य : मुखरोग-रोहिणी.     

                                                                                    जोशी, वेणीमाधवशास्त्री

पशूंतील घटसर्प : पशूंतील ⇨गळसुजी  या रोगात मनुष्यातील घटसर्पासारखी लक्षणे आढळत असल्यामुळे गळसुजी या रोगालाही घटसर्प ही संज्ञा देण्यात येते. ते तितकेसे बरोबर नाही. तथापि वासरात होणाऱ्या घटसर्पाची लक्षणे खऱ्या अर्थाने मनुष्यात होणाऱ्या घटसर्पाच्या लक्षणाशी मिळतीजुळती आहेत.

वासरांचा घटसर्प : (काफ डिप्थेरिआ). आॅक्टिनोमायसिस नेक्रोफोरस  किंवा स्फेरोफोरस नेक्रोफोरस  या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे हा रोग होतो. हे जंतू दंडाकृती असले तरी त्यांची विविध रूपे दिसतात. ते कधी तंतूसारखे किंवा लांबट वाटोळेही दिसतात. ह्या रोगजंतूंमुळे वासराशिवाय घोडा, डुक्कर, मेंढ्या इ. जनावरांत निरनिराळे रोग होतात.

सहा आठवड्यांच्या आतील वासरांना हा रोग प्रामुख्याने होतो, परंतु चार ते सहा महिन्यांपर्यंत तो होण्याची शक्यता असते. गोशाळेतील बऱ्याच वासरांत एकाच वेळी रोग दिसून येतो, त्यावेळी बहुधा खाण्याची भांडी रोगजंतूमुळे दूषित झालेली असतात. खाद्यावाटे तोंडातील जखमातून रोगजंतू शरीरात-रक्तात-प्रवेश मिळवितात.

लक्षणे : ताप, तोंडावाटे लाळ गळणे, दूध पिणे बंद करणे व गिळताना त्रास होणे ही प्राथमिक लक्षणे दिसतात. तोंड, गाल, हिरड्या, जीभ व घसा यांच्या श्लेष्मकलेवर सूज येऊन त्यांवर पिवळट पांढऱ्या रंगाचे विविध आकाराचे चट्टे दिसतात. चट्ट्यावर जाडसर पापुद्रे जमतात. पापुद्रे प्रथमतः पांढरट रंगाचे असतात, पण पुढे पिवळट व लालसर होतात. सहज निघून येणारे हे पापुद्रे ओढून काढले, तर त्याखालील त्वचेवर लाल खोलगट दुखरे व्रण दिसतात. आजूबाजूच्या भागावर बरीच सूज येते व वासराला खाणेपिणे अशक्य होते. पुढील चार–सहा दिवसांत अशक्त झालेली वासरे मरून जातात. पण बरीचशी दोन तीन आठवडे तग धरतात. या मुदतीत रोगजंतूचा उपद्रव फुप्फुसे व आतड्यापर्यंत पोहोचतो व फुप्फुसशोथ (फुप्फुसाची सूज), आंत्रशोथ (आतड्याची सूज), अतिसार (हगवण) इ. विकार आणि जंतुविषामुळे होणारी विषरक्तता (रक्त प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणावर विष भिनणे) यांमुळे अनेक वासरे मरतात.

निदान : वरील लक्षणांवरून रोगनिदान होऊ शकते. सूक्ष्मदर्शकाने पापुद्र्यांची परीक्षा केल्यास त्यात रोगजंतू दिसून येतात व त्यामुळे निश्चित रोगनिदान होऊ शकते.

चिकित्सा : आजारी वासरापासून रोगसंसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे निरोगी वासरांना दूर हलवतात. दूषित गोठे जंतूनाशकाने स्वच्छ करतात व रोग थांबल्यानंतरही तीन आठवडे मोकळे सोडून मगच तिथे निरोगी वासरे ठेवतात. रोगनिदान झाल्यावर त्वरित प्रतिजैव अगर सल्फा औषधे वापरल्यास गुण येतो.

मांजराचा घटसर्प : मांजरातील घटसर्पामुळे मुलांना घटसर्प होतो अशी समजूत प्रचलित आहे. मनुष्यात होणाऱ्या घटसर्पाचे कॉरिनिबॅक्टेरियम डिप्थेरी  हे जंतू मांजराच्या रोगपीडित भागात सहसा सापडत नाहीत. त्यामुळे ह्या समजुतीस शास्त्रीय आधार नाही. कदाचित ते रोगवाहक असण्याचा संभव आहे. पर्शियन जातीच्या मांजरात हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.

लक्षणे : आजारी मांजर सुस्त होते, खात नाही, थरथर कापते, तोंडाच्या कडांतून लाळ गळते, नाक वाहते, श्वासोच्छ्‌वासास त्रास पडतो व तो करताना आवाज येतो व मधून मधून तोंड उघडून धाप लागल्याप्रमाणे करते. जीभ व घसा सुजलेला दिसतो व त्यावर. करड्या अथवा पांढरट पिवळ्या रंगाचे पापुद्रे दिसतात व तोंडास घाण वास येतो. अशक्तपणा वाढतो, चालताना लटपटते, धाप लागते व आजारी झाल्यापासून तीन ते सात दिवसांत मरते.

चिकित्सा : आजारी मांजरास निरोगी मांजरापासून दूर ठेवतात. घशाला ग्लिसरीन व आयोडीन यांचे मिश्रण लावतात. वेळीच उपाययोजना झाल्यास स्ट्रेप्टोमायसीन व क्लोरोमायसेटिन गुणकारी ठरतात. आजारी मांजरापासून मुलांना दूर ठेवणे चांगले.

                                                                                                                                                                                

  नामदास, रा. भा.