ग्वान–हान–च्यींग : (सु. १२२४–सु. १२९७). एक आद्य चिनी नाटककार. त्याच्या आयुष्याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला असावा. बहुधा त्याचे वास्तव्य चीनच्या उत्तरेकडील हबे प्रांतात असावे. तो व्यवसायाने नट होता. त्याने सु. ६७ नाटके लिहिली. त्यांपैकी १८ उपलब्ध आहेत. थोऊ-अ युआन (इं. शी. इन्जस्टीस अगेन्स्ट थोऊ-अ) व च्यव फंग जन (इं. शी. अ कोर्टिझन इन डिस्ट्रेस) ही त्याची विशेष उल्लेख नाटके होत. त्याची बहुतेक नाट्यकथानके ही आख्याने, लोककथा ह्यांवर आधारलेली असत. त्याने आपल्या नाटकांतून ऐतिहासिक, अद्भुतरम्य, सामाजिक, कौटुंबिक असे अनेक विषय हाताळले. तसेच शोकात्मिका, सुखात्मिका, उपहासिका, संगीतिका ह्या प्रकारांचाही अवलंब केला. तो खऱ्याखुऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा नाटककार होता. त्याच्या नाटकांतून दैनंदिन घटनांचा नाट्यपूर्ण आविष्कार असून त्यांतील व्यक्तिरेखा समाजाच्या सर्व थरांतून त्याने निवडल्या. सामाजिक व्यथा आणि विसंगती ह्यांचे चित्रण त्याने निर्भयपणे केले व सत्ताधाऱ्यांच्या अनुनयापासून तो कटाक्षाने दूर राहिला. त्याच्या बहुतेक नाटकांतून शोषक व शोषित ह्यांच्या संघर्षावर भर दिलेला आहे. चिनी नाट्येतिहासात जिला उत्तरेकडील नाट्यपरंपरा म्हणतात, ती परंपरा त्याच्या नाटकांनी विकसित केली. या परंपरेतच चिनी संगीतिकेचा ‘जा ज्यू’ (tsa-chu) हा आद्य प्रकार मोडतो. चिनी नाट्यक्षेत्रातील ग्वान हान-च्यींगच्या कर्तृत्वाची तुलना पुष्कळदा इंग्रजी नाट्यक्षेत्रातील शेक्सपिअरच्या कर्तृत्वाशी केली जाते. त्याच्या आठ नाट्यकृतींचे इंग्रजी अनुवाद १९५८ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. सध्याच्या चीनमध्ये त्याच्या लिखाणाला विशेष प्रसिद्धी देण्यात येत आहे.
ह्वांग ई शू (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)