ग्लाउबराइट : खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार किंवा चापट वडीसारखे [→ स्फटिकविज्ञान]. पाटन : (001) चांगले [→ पाटन]. भंजन शंखाभ. कठिनता २·५–३. वि गु. २·७५– २·८५. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी. रंग फिकट पिवळा वा करडा. चव किंचित खारट. रा. सं. Na2Ca(SO4)2. सोडियममुळे जळताना याची ज्योत पिवळसर दिसते. दीर्घ काळ उघडे राहिल्यास चिघळून याचे तुकडे पडतात. हे सरोवरातील लवणयुक्त पाण्याच्या बाष्पीभवनाने निर्माण होते. हॅलाइट (मीठ), टाकणखार, सैंधव इत्यादींच्या जोडीने निक्षेपांत (साठ्यांत) आढळते. सॉल्झबर्ग (ऑस्ट्रिया), श्टासफुर्ट (जर्मनी) इ. ठिकाणी ते सापडते. जर्मन रसायनशास्त्रज्ञ ग्लाउबर यांच्या नावावरून ग्लाउबर लवण हे नाव पडले असून हे खनिज रासायनिक दृष्ट्या ग्लाउबर लवणासारखे असल्याने ग्लाउबराइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.