ग्रे, टॉमस : (२६ डिसेंबर १७१६–३० जुलै १७७१). इंग्रज कवी. जन्म लंडनमध्ये. शिक्षण ईटन व केंब्रिज येथे. त्याची आरंभीची काव्यरचना लॅटिनमध्ये आहे. टॉमस ग्रेतथापि लवकरच तो इंग्रजी काव्यलेखनाकडे वळला. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील नव-अभिजाततावादी युग आणि उत्तरार्धातील स्वच्छंदतावाद ह्यांच्या सीमारेषेवरील हा कवी आहे. ‘ॲन एलिजी रिटन इन अ कंट्री चर्चयार्ड’ सारखी (१७५१) त्याची विख्यात विलापिका नव-अभिजाततावादी परंपरेतीलच आहे तथापि नव-अभिजाततावादी कवितेत वैपुल्याने वापरले गेलेले ‘हिरोइक कप्लेट’ त्याने आपल्या कवितांतून कटाक्षाने टाळले. त्या कवितेत दुर्मीळ झालेला सुनीत हा काव्यप्रकार मात्र त्याने हाताळला (सॉनेट ऑन द डेथ ऑफ रिचर्ड वेस्ट). बांधीव, अलंकृत रचना आणि नैतिक उद्‌बोधन ह्यांचा वारसा त्याला नव-अभिजाततावादी परंपरेकडून लाभला असला, तरी उत्कट भावनाविष्काराची धडपड, तसेच लोकसाहित्याची आणि मध्ययुगीन विषयांची त्याची आवड त्याला स्वच्छंदतावादाच्या जवळपास घेऊन जातात. केल्टिक व नॉर्स साहित्यांच्या प्रभावातून लिहिल्या गेलेल्या ‘द बार्ड,’ ‘द फेटल सिस्टर्स’ आणि ‘द डिसेंट ऑफ ओडिन’ ह्या कविता त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. त्याच्या कवितेत अनेकदा शब्दावडंबर आणि कृत्रिमता शिरलेली दिसते. परिणामतः नव-अभिजाततावादाचा पुरस्कर्ता सॅम्युएल जॉन्सन आणि इंग्रजी स्वच्छंदतावादाचा एक अध्वर्यू विल्यम वर्ड्‌स्वर्थ ह्यांनी ह्या कृत्रिमतेवर टीका केली. पिंडरच्या धर्तीवर त्याने लिहिलेल्या काही उद्देशिका त्याच्या समकालीनांना दुर्बोध वाटल्या, हेही सूचक आहे. ‘द प्रोग्रेस ऑफ पोइसी’ व ‘द बार्ड’ ह्या त्याच्या उल्लेखनीय पिंडरिक उद्देशिका. इंग्लंडचे राजकविपद त्याला देऊ करण्यात आले होते पण ते त्याने नाकारले (१७५७). इंग्लंडमधील पेम्ब्रोक येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Cecil, David, The Poetry of Thomas Gray, London, 1945.

2. Gosse, Edmund, The Works of Thomas Gray, in Prose and Verse, 4 Vols, London, 1884.

3. Ketton-Cremer, R. W. Thomas Gray, London, 1955.

कुलकर्णी, अ. र.