ग्रेको, एल : ( ? १५४१–६ / ७ एप्रिल १६१४). श्रेष्ठ स्पॅनिश चित्रकार. तो मूळचा ग्रीक. क्रीटमधील कँडिया येथे जन्म. त्याचे मूळ नाव डोमेनिकॉस थेऑटॉकॉपूलॉस. इटलीमध्ये ‘इल ग्रेको’ व स्पेनमध्ये ‘एल ग्रेको’ या नावांनी तो ओळखला जाई.
क्रीटमधील त्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. ‘आयकॉन’ चित्रांच्या बायझंटिन परंपरेमध्ये त्याचे सुरुवातीचे कलाध्ययन झाले असावे. साधारणतः १५६o च्या सुमारास तो इटलीला गेला. व्हेनिस येथे तिशनच्या हाताखाली त्याने चित्रकलेचे शिक्षण घेतले. तिंतोरेत्तोच्या चित्रांचाही त्याच्यावर प्रभाव पडला. १५७o च्या दरम्यान तो रोमला गेला. तेथे मायकेलअँजेलो, रॅफेएल या कलावंतांचा तसेच रीतिलाघववादी संप्रदायाचा त्याच्यावर प्रभाव पडला. १५७६ मध्ये ग्रेकोने स्पेनला प्रयाण केले. तेथे दुसऱ्या फिलिपच्या आज्ञेने एस्कॉरीअलच्या मठासाठी त्याने द ड्रीम ऑफ फिलिप द सेकंड (सु. १५८o) व मार्टरडम ऑफ सेंट मॉरिस (१५८o–८२) ही चित्रे रंगवली. तथापि त्यांपैकी दुसरे चित्र फिलिपला न आवडल्याने ग्रेकोला राजाश्रय लाभला नाही. पुढे त्याची चित्रकला प्राय: चर्चच्या आश्रयानेच वाढली. १५७७–७९ च्या दरम्यान तो टोलीडो येथे स्थायिक झाला. तेथेच त्याचे निधन झाले.
ग्रेकोची चित्रे धार्मिक विषयांच्या भावोत्कट अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांतून त्याची साक्षात्कारी दृष्टी, प्रगाढ धर्मश्रद्धा व आध्यात्मिक गूढभाव यांचा प्रत्यय येतो. सेंट टोम चर्चसाठी काढलेले द बेरिअल ऑफ काउंट ऑर्गांथ (१५८६–८८) हे चित्र, ही त्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते. तीत त्याने भौतिक व आधिभौतिक विश्वातील परस्परविरोधाचे भान चित्ररूपातून नेमकेपणाने प्रकट केले आहे. द प्यूरिफिकेशन ऑफ द टेंपल, ख्राइस्ट हीलिंग द ब्लाइंड, ॲसम्प्शन ऑफ द व्हर्जीन (१५७७), एम्पोलिओ किंवा डिस्रोबिंग ऑफ ख्राइस्ट (१५७७–७९), ओपनिंग ऑफ द फिफ्थ सील (सु. १६१o) ही त्याची आणखी काही श्रेष्ठ चित्रे. व्यक्तिचित्रकार म्हणूनही ग्रेकोची ख्याती आहे. त्याची व्यक्तिचित्रे ही अध्यात्मभावाची संसूचक असून कार्डिनल फेर्नादो नीनो दी गेव्हारा (सु. १६oo), फ्राई हॉर्टेन्शिओ फेलिक्स पॅराव्हिसिनो (सु. १६o९) या व्यक्तिचित्रांतून त्याची प्रचीती येते. यांखेरीज त्याने निसर्गचित्रण (व्ह्यू ऑफ टोलीडो, १६o८), प्रायिक चित्रण (स्पॅनिश प्रॉव्हर्ब ), पुराणकथाधारित चित्रण (लोकून) या प्रकारांतही संस्मरणीय चित्रनिर्मिती केली. व्ह्यू ऑफ टोलीडो हे केवळ एक निसर्गचित्र नव्हे, त्यातून निसर्गाने माणसावर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा साक्षात्कारी प्रत्यय ग्रेकोने साकार केला आहे. नैसर्गिक आकारांना अव्हेरून आकारांच्या विरूपणावर दिलेला भर, अनैसर्गिक उंचउभट मानवप्रतिमा, ज्वालासदृश, वक्राकार रेषांकन, भावप्रक्षोभक व दाहक रंगसंगती, छायाप्रकाशाचा नाट्यपूर्ण अवलंब ही त्याच्या चित्रशैलीची काही वैशिष्ट्ये होत. या सर्वांतून तो एक प्रकारचा अस्वस्थ व करुण भावप्रत्यय साधत असे. ग्रेकोचे व्यक्तिमत्त्व प्रबोधनकालीन कलावंतांप्रमाणेच अतिशय संपन्न होते. स्पेनमध्ये त्याने वास्तुकार व मूर्तिकार म्हणूनही काम केले. त्याने कलाविषयक लेखनही केले असल्याचे उल्लेख सापडतात. ग्रेकोची खास व्यक्तिविशिष्ट शैली व भावोत्कट अभिव्यक्ती यांमुळे अभिव्यक्तिवादासारख्या आधुनिक संप्रदायांना तो जवळचा वाटतो.
संदर्भ : 1. Guinard, Paul Trans. Emmons, James, El Greco : Biographical and Critical Study, Geneva, 1956.
2. Wethey, H. E. El Greco and His School, 2 Vols., Princeton, 1962.
इनामदार, श्री. दे.
“