ग्रू, निहेमिया : (२६ सप्टेंबर १६४१–२५ मार्च १७१२). इंग्लिश वनस्पतिशारीरविज्ञ व क्रियावैज्ञानिक. ग्रू व इटलीतील मार्चेल्लो मालपीगो (१६२८–९४) यांना वनस्पतिशारीराचे (वनस्पतींच्या शरीर रचनेसंबंधीच्या शास्त्राचे) संस्थापक मानण्यात येते. त्यांचा जन्म मॅन्स्टर-वॉरिकशर येथे झाला. केंब्रिजमधील पेंब्रोक हॉलमधून १६६१ मध्ये ते वैद्यक विषयाचे पदवीधर झाले व १६७१ मध्ये लेडन येथे एम्.डी. झाले. प्रथम त्यांनी कोवेंट्री येथे वैद्यक व्यवसाय केला पण पुढे ते लंडनमध्ये गेले. १६७१ मध्ये ते रॉयल सोसायटीचे सदस्य, १६७२ मध्ये अभिरक्षक (क्युरेटर) व १६७७ पासून कार्यवाह झाले. १६७२ मध्ये त्यांनी वनस्पतींच्या शारीरविषयक ॲनॅटमी ऑफ व्हेजिटेबल्स बिगन  हा ग्रंथ व १६७३ मध्ये वनस्पतिविज्ञानाच्या इतिहासासंबंधीचा आयडिया ऑफ फायटॉलॉजिकल हिस्ट्री  हा ग्रंथ लिहिला. १६८१ मध्ये रॉयल सोसायटीच्या विनंतीवरून त्यांनी ग्रेशॅम महाविद्यालयात परिरक्षित (जतन केलेल्या) केलेल्या नैसर्गिक व कृत्रिम दुर्मीळ वस्तूंची जंत्री तयार केली व तत्पूर्वी १६७६ मध्ये त्यांनी रॉयल सोसायटीपुढे दिलेल्या व्याख्यानांची माहिती द कंपॅरेटिव्ह ॲनॅटमी ऑफ स्टमक्स अँड गट्स बिगन  या शीर्षकाखाली तिला जोडून लिहिली हा अभ्यास सतराव्या शतकातील फार महत्त्वाचा मानला जातो. १६८२ मध्ये वनस्पतिशारीरासंबंधी ॲनॅटमी ऑफ प्लँट्स  हा सुप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी चार खंडांत प्रकाशित केला व यात पहिल्याने केसरदले हे फुलातील नर-अवयव आहेत हे दर्शविले तथापि हा शोध सर टॉमस मिलिंग्टन यांचा असल्याचे त्यांनीच नमूद केले आहे. ते लंडन येथे मृत्यू पावले.

पहा : शारीर, वनस्पतींचे.

जमदाडे, ज. वि.