ग्रीवा पिंड : (कॅरोटिड बॉडी). रोहिणीतील रक्तामधील रासायनिक बदलाने चेतवल्या जाणाऱ्या ग्रीवेतील (मानेतील) पिंडास (पेशींच्या गोलसर पृथक् समूहास) ग्रीवा पिंड म्हणतात. सामान्य ग्रीवा रोहिणीचे द्विभाजन होऊन अंतर्ग्रीवारोहिणी व बाह्यग्रीवारोहिणी असे तिचे दोन फाटे मानेच्या मध्यावर होतात. या दोन फाट्यांच्या बेचक्यात ग्रीवा पिंड असताे. या रोहिण्यांच्या बाह्यस्तरास तो घट्ट चिकटलेला असतो. मानेच्या दोन बाजूंस एकेक ग्रीवा पिंड असतो.
प्रत्येक ग्रीवा पिंड लालसर रंगाचा असून त्याची लांबी ५–७ मिमी. व जाडी सु. २·५–४ मिमी. असते. त्याचे वजन २ मिग्रॅ. असते. त्याचा बाह्यस्तर तंतुमय असून त्या तंतूंचे फाटे पिंडाच्या अंतर्भागात जाऊन पिंडाचे लहान लहान खंडक बनतात. प्रत्येक खंडकात अधिस्तर सदृश (सर्व शरीरावर आच्छादनात्मक असणाऱ्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहातील कोशिकांसारख्या) अनेक बाजू (पृष्ठभाग) असलेल्या कोशिकांचा समूह असतो. या कोशिकासमूहाभोवती केशवाहिन्या (केसासारख्या बारीक नलिका) व लहान पोकळ्या मोठ्या प्रमाणात असतात. बाह्यग्रीवारोहिणीच्या पश्चकपाल (कवटीच्या मागील बाजूस असलेली) व आरोही ग्रसनी (घशातील) रोहिणीच्या शाखांपासून ग्रीवा पिंडाला मुबलक रक्तपुरवठा होतो. शरीरातील इतर इंद्रियांच्या तुलतेने ग्रीवा पिंडातील रक्तप्रवाहाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे (२ooo मिली. / १oo ग्रॅ. / मिनिट). ते हृदय आणि मेंदूतील रक्तपुरवठ्याच्या प्रमाणाच्या ३o पट आणि अवटू ग्रंथीच्या (श्वासनालाच्या पुढे व बाजूंस असलेल्या ग्रंथीच्या) प्रमाणाच्या ४ पट असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह होत असल्यामुळे रक्तात होणाऱ्या रासायनिक बदलाची नोंद ग्रीवा पिंड चटकन घेतो.
कोशिकासमूहाच्या भोवती तंत्रिका तंतूंचे (मज्जातंतूंचे) दाट जाळे असते. जिव्हा ग्रसनी, अनुकंपी (स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या) आणि प्राणेशा (मेंदूपासून निघणाऱ्या दहाव्या) तंत्रिकांच्या तंतूंमुळे हे जाळे तयार होते. या तंत्रिकांपैकी जिव्हा ग्रसनी तंत्रिका संवेदनावाहक असते. रक्तातील रासायनिक बदलाने ग्रीवा पिंड कोशिका उद्दीपित होताच त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या चेतना जिव्हा ग्रसनी तंत्रिकामार्फत लंबमज्जेतील (लहान मेंदूच्या खालच्या भागातील छेदित शंक्वाकार तंत्रिका कोशिका समूहातील) श्वसन केंद्राकडे मुख्यतः नेल्या जातात. श्वसन केंद्राजवळ असलेल्या हृद्रोहिणी नियंत्रण केंद्रावरही त्याचा परिणाम होतो. ग्रीवा पिंडाला जाणाऱ्या रक्तप्रवाहात बदल घडवून आणण्याचे कार्य अनुकंपी तंत्रिकांचे असावे.
रोहिणीतील रक्तातील ऑक्सिजनाचा दाब ९o मिमी. (पारा) पेक्षा कमी झाल्यास, कार्बन डाय-ऑक्साइडाचा दाब वाढल्यास किंवा अम्लता वाढल्यास ग्रीवा पिंड चेतवला जातो. परिणामत: प्रतिक्षेपी क्रियेने (शरीराच्या एका भागात उत्पन्न झालेल्या संवेदनेमुळे इतरत्र झालेल्या प्रतिक्रियेने) श्वसनक्रिया जोराने होऊ लागते. त्यामुळे ऑक्सिजनाचा पुरवठा वाढतो व जास्त वाढलेला कार्बन डाय-ऑक्साइड शरीराबाहेर टाकला जातो.
शरीराच्या सामान्य अवस्थेत ग्रीवा पिंडामार्फत श्वसनाचे नियंत्रण जवळजवळ होत नसते. परंतु जेव्हा ऑक्सिजनची कमतरता, रक्तस्राव, रक्ताम्लता इ. असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा याच्या कार्यास महत्त्व प्राप्त होते.
ग्रीवा पिंडासारखेच कार्य करणारे पिंड महारोहिणी चापाजवळ (हृदयापासून निघणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीच्या मार्गावरील खाली वळताना होणाऱ्या कमानदार वळणाजवळ) असतात.
ढमढेरे, वा. रा. सलगर, द. चि.
“